श्री गणपतीची कहाणी
ऐका परमेश्वरा गणेशा, तुमची कहाणी, निर्मळ मळे, उदकाचे तळें, बेलाचा वृक्ष, सुवर्णाचीं कमळें, विनायकाचीं देवळें रावळें. मनाचा गणेश मनीं वसावा. हा वसा कधीं घ्यावा? श्रावण्या चौथीं घ्यावा. माही चौथीं संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पशापायलीचं पीठ कांडाव. अठरा लाडू करावे. सहा देवाला द्यावे, सहा ब्राह्मणाला द्यावे, सहाचं सहकुटुंबी भोजन करावं. अल्प दान, महापुण्य. असा गणराज मनीं ध्यायीजे, मनी पाविजे, चिंत्त लाभिजे, मनकामना निर्विघ्र कार्यसिध्दि किजे. ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरी सुफळ सपूर्ण.
आदित्यराणूबाईची (पौष रवीवारची) कहाणी
ऐका आदित्यराणूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा, फुलं, दूर्वा, आणायला रानांत जात असे. तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणानं विचारलं, "काय ग बायांनों, कसला वसा वसतां? तो मला सांगा." " तुला रे वसा कशाला हवा? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील." ब्राह्मण म्हणाला, "उतत नाहीं, मातत नाहीं, घेतला वसा टाकीत नाहीं." तेव्हा त्या म्हणाल्या, "श्रावणमास येईल, तेव्हां पहिल्या आदितवारीं मौन्यान (मुकाट्यान) उठावं, सचीळ (वस्त्रासहित) स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं. विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्यराणूबाई काढावी. सहा रेघांचं मंडळ करावं, सहा सुतांचा तातू करावा. त्याला सहा गाठी द्याव्या. पानफूल वहाव, पूजा करावी. पानाचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गुळाखोबर्याचा नैवेद्य दाखवावा, सहा मास चाळावी, सहा मास पाळावी, माघी रथसप्तमीं संपूर्ण कराव. संपूर्णाला काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्यांची खीर, लोणकड तूप, मेहूण जेवू सांगाव. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोडगळसरी द्यावी, ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाच उद्यापन कराव." असा वसा ब्राह्मणान केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावण धाडलं, ब्राह्मण जाते वेळेस भिऊं लागला. कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीन सांगितलं, " भिऊ नका, कापू नका, तुमच्या मुली आमचे येथे द्या" "आमच्या मुली गरीबाच्या, तुमच्या घरीं कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल." राणी म्हणाली, " दासी करीत नाही, बटकी करीत नाहीं. राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू."
धरित्रीची कहाणी
dharitri devanchi kahani katha