श्री नागपंचमीची कथा
आटपाट नगर होतं. तिथे एक शेतकरी होता.त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं. श्रावणमास आला. नागपंचमीचा दिवस.शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं ? वारूळात जी नागांची नागकुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला व ती लवकरच मेली. काही वेळाने नागीण तिथं आली.आपलं वारूळ पाहू लागली.तो तिथं वारूळ नाही आणि पिल्लेही नाहीत. इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेला नांगराचा फाळ दिसला.तसं तिच्या मनात आलं ह्या शेतकऱ्याच्या नांगरानं माझी पिल्लं मेली.ह्या शेतकऱ्याचा निर्वंश करावा असे तिच्या मनाने घेतले. फणफणतच ती शेतकऱ्याच्या घरी गेली. मुला-बाळांना, लेकीसुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला. त्याचबरोबर सर्वजण मरून पडले. पुढं तिला समजलं की त्याची एक परगावी आहे, तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती तिथे ती आली.
तिच्या घरी येऊन पाहिले तर काय त्या बाईने पाटावर नागीण व त्यांची नऊ नागकुळं काढली आहेत.त्यांची पूजा केली आहे, दुधाचा नैवेद्य दाखविला आहे. नागाला लाह्या, दूर्वा वगैरे वाहिल्या आहेत. दुधाचा नैवेद्य दाखविला आहे. नागाला लाह्या, दूर्वा वगैरे वाहिल्या आहेत. पूजा पाहून नागीण संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदानं लोळली.
मुलीला म्हणाली, बाई, बाई तू कोण आहेस ? तुझे आई-बाप कोठे आहेत ? इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले व प्रत्यक्ष नागीण समोर पाहून ती घाबरली. नागीण म्हणाली, बाई भिऊ नकोस. विचारल्या प्रश्नाचे उत्तर दे. तिने सारी हकीकत सांगितली.ती ऐकून नागिणीला फार वाईट वाटले.
ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजित आहे, आपलं व्रत पाळत आहे आणि हिच्या बापाचा आपण निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे काही चांगलं नाही.तिने मुलीला सारी हकिकत सांगितली. तिला फार वाईट वाटलं. मग तिने आई-वडिल जिवंत होण्याचा उपाय विचारला. नागिणीने तिला अमृत आणून दिले.ते घेऊन ती त्याच पावली आपल्या माहेरी आली.तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं. सर्व मंडळी जिवंत झाली.सगळयांना आनंद झाला.
तिने वडिलांना घडलेली हकीकत सांगितली.तेंव्हा त्यांनी विचारले, हे व्रत कसं करावं ? मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की, इतकं काही केलं नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर शिजवू नये, तळलेले खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा.तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला.
जशी नागीण त्यांना प्रसन्न झाली, तशी तुम्हा आम्हा होवो. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
nagpanchami kahani katha