Skip to main content

कान्होबा निवडीं आपुलीं गो...

कान्होबा निवडीं आपुलीं गोधनें ॥धु०॥

पांच पांच पोळ्या तीन भाकरी । दीड कानिवला एक पुरी । आम्हा धाडिलें वैल्या दुरी । आमुची ठकवून खाल्ली शिदोरी ॥ कान्हो० ॥१॥

परियेसी शारंगधरा । तुझा बैल चुकला मोरा । सांगूं गेलों तुझ्या घरा । पाठीं लागला तुझा म्हातारा ॥ कान्होबा० ॥२॥

परियसीं हृषीकेशी । गाई म्हशीचें दूध पिशी । वासरें प्यालीं म्हणून सांगशी । उद्यां ताक नाहीं आम्हासी ॥ कान्हो० ॥३॥

कान्होबा ओढाळ तुझ्या गाई । होत्या नव्हत्या कळंबा ठायीं । शिव्या देती तुझी आई ॥ कान्होबा० ॥४॥

विष्णुदास नामा साहे । देवा तूंचि बाप माये । अखंड माझे ह्रदयीं राहें ॥ कान्होबा० ॥५॥

अरे अरे कान्हया वेल्हाळा

अरे अरे कान्हया वेल्हाळा । तूंरे बरविया गोपाळा । तुज देखियेलें डोळां । रे धेनुवा हुंबरती ॥१॥

माते देवो शिदोरी । ऐसें म्हणतसे मुरारी । मी जाईन वो दुरी । धेनु चारावयालागीं ॥२॥

अलें बेलें चिलें मेकें । सुरण मिरगोडी पैं तिखें । दह्यावांचोनी नव्हे निकें । शिदोरी ताकें कालऊं निकें ॥३॥

वडजा वाकुडा पेंदा सुदामा । हेचि पांतिकर आम्हां । तेथें विष्णुदास नामा । उच्छिष्ट शितें वेंचितसे ॥४॥

kanhoba nivadi aapli palana