श्री रामाचा पाळणा
बाळा जो जो रे कुळभूषणा । दशरथनंदना ।
निद्रा करि बाळा मनमोहना । रामा लक्षुमणा ॥धृ॥
पाळणा लांबविला अयोध्येसी । दशरथाचे वंशी ।
पुत्र जन्मला हृषीकेशी । कौसल्येचे कुशी ॥१॥
रत्नजडित पालख । झळके अमोलिक ।
वरती पहुडले कुलदीपक । त्रिभुवननायक ॥२॥
हालवी कौसल्या सुंदरी । धरुनी ज्ञानदोरी ।
पुष्पे वर्षिली सुरवरी । गर्जती जयजयकार ॥३॥
विश्वव्यापका रघुराया । निद्रा करि बा सखया ।
तुजवर कुरवंडी करुनिया । सांडिन आपुली काया ॥४॥
येऊनि वसिष्ठ सत्वर । सागे जन्मांतर ।
राम परब्रहा साचार । सातवा अवतार ॥५॥
याग रक्षुनिया अवधारा । मारुनि रजनीचरा ।
जाईल सीतेच्या स्वयंवरा । उद्धरि गौतमदारा ॥६॥