पौराणिक कथा
पुराणात अशी कथा आहे, असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया श्रीमहालक्ष्मी गौरीला शरण गेल्या. त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली. श्रीमहालक्ष्मी गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना आणि पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले; म्हणून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात.
संस्कृत शब्दकोशातील अर्थानुसार 'गौरी' म्हणजे आठ वर्षाची, अनाघ्रात अशी पवित्र कन्या. तसेच गौरी म्हणजे पृथ्वी, वरुण पत्नी, तुळशीचे झाड, मल्लिका उर्फ जाईची वेल हेही अर्थ कोशात दिले आहेत. या आधारेच तेरड्याच्या फुलाचीही गौरी म्हणून पूजा केली जाते.
भाद्रपद मासात येणार्या गौरींचे पूजन करून अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया हे व्रत करतात.
ज्येष्ठागौरी पूजन महाराष्ट्रात भिन्न-भिन्न रितीने केले जाते. अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठागौरीचे आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर तिचे पूजन आणि मूळ नक्षत्रावर तिचे विसर्जन, असे हे तीन दिवसांचे मूळ व्रत आहे. याला 'ज्येष्ठागौरी पूजन' असे म्हटले जाते. काही गावांत या गौरी सोन्या-चांदीचे वा पितळेचे मुखवटे धारण करणाऱ्या असतात. त्या मूर्तीना चांगल्या साड्या नेसवून दागदागिन्यांनी नटवले जाते. तर काही ठिकाणी केवळ कागदावर गौरीचे चित्र काढून किंवा छापील कागद आणून तिचे पूजन केले जाते. कित्येक गावांत अशी प्रथा आहे की, नदीतील पाच खडे किंवा लहान दगड आणावयाचे आणि तेच पूजावयाचे. काही ठिकाणी सुवासिक फुले येणार्या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. त्या मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात. (- ही एक रूढी आहे.), कित्येक ठिकाणी तर मातीचे लहान लहान घट आणून त्यात हळद बांधलेला दोरा, खारीक आणि खोबरे घालतात आणि ते घट एकावर एक ठेवून ती उतरंड गौरी म्हणून पूजतात.
श्रावणातली व्रतं वैकल्याची धामधूम संपत असतानाच गृहिणींना वेध लागतात गौरी-गणपतीचे! अंगणात तुळशीपासून पूजास्थापनेच्या घरातल्या जागेपर्यंत सडा रांगोळ्यांनी घर सजायचे. लक्ष्मीची रांगोळीची पावले आणि ओल्या हळदी-कुंकवांच्या हातोप्याने गौरींचा रस्ता शोभिवंत करावा. तुळशीपासून डोईवर खणाने झाकलेले मुखवटे प्रत्येक रांगोळीच्या पावलांवर टेकवीत सवाष्णींनी अदबशीर घरात आणायचे. दर टप्प्यावर - 'लक्ष्मी आली, सोन्याच्या पावली।' हा लोकमंत्र बायकांच्या मनातून उत्साहाने उमटत राहावा. गौरीला प्रथम चूल-भानवशीजवळ न्यायचे - कुणीतरी म्हणावे 'गौरी गौरी, काय पाहतेस?' उत्तर याव, 'चूल-भानवस!' - करीत करीत मग दूधदुभते, गाई-गुरांचा गोठा, धान्याची कोठारे (डबे), घरातल्या सोन्या-रुप्याच्या (असल्यास) तिजोऱ्या, कपाटे, पेट्या... असं सगळं घर फिरून झालं की गौरी मुख्य जागी स्थानापन्न कराव्या.
"लाडके गौराय कधी येसी पानी पडलं नय भारलं भादव्याला येणं को-या सुपात येणं झणकत येणं"
खांद्यापर्यंत आकाराच्या एक-दीड फुटाच्या सालंकृत, साड्या नेसवलेल्या साचांवर मुखवटे चढवले की मूर्तिमंत गौरी प्रकट होतात. काही ठिकाणी नारळाला/तांब्याला कुंची घालून बाळं ठेवतात. मग पुढचे दोन-अडीच दिवस या माहेरवाशिणींच्या कौतुकात घरातल्या सासुरवाशिणी आणि खास गौरींसाठी आलेल्या माहेरवाशिणी रंगून जातात. रोज सकाळ-संध्याकाळ फुले, गजरे, आरती, नैवेद्याच्या परोपरी आणि मुख्य म्हणजे गौरींची सालंकृत रूपे आणि भोवतालची सजावट यात बायकांच्या पारंपरिक कलाकौशल्यांची उधळण झालेली असते. थोड्याफार फरकाने ज्या घरी गौरी बसतात, त्या बहुसंख्य घरांत असंच वातावरण असतं. गौरींचा उत्सव प्रामुख्याने स्त्रीप्रधान उत्सव आहे. गौरी अनुराधा नक्षत्रावर येत असल्या, तरी तिचा दिग्विजयी पुत्र मात्र तिथीनुसार चतुर्थीच्या दिवशीच आलेला असतो.
हिंदू देवताशास्त्रात तसेच समाजजीवनात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे. अपराजितपृच्छा या ग्रंथामध्ये द्वादशगौरींचा उल्लेख येतो. अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाई असे सांगितले आहे. लातूर येथील नीलकंठेश्वर मंदिरात शिवाची आणि गौरीची एक सुंदर कोरीव प्रतिमा आहे. त्यांच्या पायाशी एक घोरपड दाखवली आहे. गौरीच्या डाव्या हातात बीजपूरक आहे, केसांवर फुलांची वेणी आहे. ही शिव परिवारातील देवता असून कनोज येथे हिचे मंदिर आहे. एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली. त्याला अनुसरून गौरीने असुरांचा संहार केला व शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. महालक्ष्मीच्या कृपा प्रसादाने आपापल्या सौभाग्य प्राप्त झाले अशी आख्यायिका प्रचलित आहे; म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या.
अशौच असेल, तर गौरी आवाहन आणि पूजन करू नये.
Gauri pauranik katha