Skip to main content
पडताळणी प्रलंबित

महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेर गौरी पूजन

मराठवाडयात मात्र काहीशी वेगळी पद्धत पाहावयास मिळते. 'गौरी' असा उल्लेख न करता तिला 'महालक्ष्मी' असं संबोधलं जातं आणि महालक्ष्मीच्या रूपातच तिची पूजा केली जाते. मराठवाडयात नव्यानं लग्न झालेली मुलगी या दिवशी आवर्जून माहेरी येते. मुलीच्या लग्नानंतर पहिल्या महालक्ष्मी सणाच्या वेळी तिचे आई-वडील 'महालक्ष्म्या' घेऊन मुलीच्या घरी (सासरी) जातात. नव्या सुपात ठेवून या महालक्ष्म्या सासरच्या घरी सन्मानानं दिल्या जातात. सासरची मंडळीही आपल्या घरी 'लक्ष्मी' आली या भावनेनं देवीच्या या प्रतिमांचा स्वीकार करतात आणि सुनेलाही महालक्ष्मीच्या रूप मानतात. पूर्वी वर्षभर सुनेला सासूरवास सहन करावा लागत असला तरी या तीन दिवसांच्या काळात मात्र तिला अत्यंत सन्मानानं वागवलं जायचं. आता सासूरवासाचं प्रमाण कमी झालं असलं तरी या तीन दिवसांत सुनेचा सन्मान मात्र कायम आहे. दिवाळीत जेवढे फराळाचे पदार्थ केले जातात तितकेच पदार्थ या सणाच्या निमित्तानं केले जातात. विदर्भात ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी असाही एक प्रकार आहे. ज्येष्ठा गौरी श्रवणातच येतात. तर कनिष्ठा गौरी भाद्रपद महिन्यात येतात. दोन्हीकडे लक्ष्म्यांच्या पुढे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ, त्या लक्ष्मीच्या मुली, असा परिवार असतो. त्याशिवाय वेगवेगळ्या धान्याच्या राशी महालक्ष्मीपुढे ठेवल्या जातात. एकंदरच हा उत्सव शेतीशी निगडित असल्याचं दिसतं. भारतात भाद्रपदातली ज्येष्ठा गौर महाराष्ट्रातही विविध प्रकारे अवतरते. सालंकृत मूर्तिरूपात अनेक ठिकाणी ती जोडीने येते. ज्येष्ठा आणि कनिष्ठा! बायकांच्या भाषेत सोवळ्यातली आणि ओवळ्यातली. या मूर्तिरूपांना बहुधा महालक्ष्मी, लक्ष्म्या म्हणतात. कोकणात अनेक ठिकाणी एकच मूर्ती असते. कोकण-गोवा प्रदेशात मुखवट्याची एकच गौरीची मूर्ती असते. पण त्याच जोडीला पाणवठ्याकाठी आपोआप उगवलेली रंगीबेरंगी फुलांची तेरड्याची रोपे आणून तीच गौर म्हणून पुजतात. कोकणस्थ ब्राह्मणात व कर्नाटकात अनेक ठिकाणी पाणवठ्यावरून किंवा तुळशीच्या रोपाजवळचे दोन खडे कलशात घालून मिरवत आणून तेच गौर म्हणून पूजतात. काही ठिकाणी तिला 'गंगा गौर' म्हणतात. खरेतर ही खड्यांची किंवा तेरड्याच्या रोपांचीच मूळ गौर असावी. माणसाच्या भौतिक विकासाबरोबर तिला सालंकृत मूर्तिरूप आले असावे. रूप कसेही असले तरी तिच्या उपासनेचा उल्हास सगळीकडे सारखाच! काही नियम मात्र कटाक्षाने पाळले जातात
पहिल्या दिवशी तिला दुर्वा (हरळी सारखी वेली जा), कापूस (सरकी सारखी म्हातारी हो), आघाडा वाहतात आणि मेथीची भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवतात. दुसर्या दिवशी तिला पाना-फुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी माळतात, हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहतात तर नैवेद्याला १६ भाज्या, १६ कोशिंबीरी, १६ चटण्या, १६ पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची १६ दिव्यांनी आरती करतात. संध्याकाळी हळदी-कुंकवाचा मोठा समारंभ केला जातो. तिसर्या दिवशी तिला खीर-कानवल्याचा (करंजीचा प्रकार मुरड घालुन करतात, गौर मुरडून परत यावी म्हणून) नैवेद्य दाखवुन तिची पाठवणी (विसर्जन) करतात. अश्याप्रकारे ही माहेरवाशीण येते, राहाते, आणि डोळ्यात पाणी आठवण म्हणून ठेवते पणं परत येण्याचे वचन मात्र देऊन जाते. स्त्रीचं मन नेहमी स्वतःच्या कुटुंबाशी जोडलेलं असतं. घराची भरभराट व्हावी घरात नेहमी सुखसमृद्धी नांदावी, आपल्या माणसांचा उत्कर्ष व्हावा व त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे ही इच्छा तिच्या मनात सदैव असते त्यामुळेच हे सणवार, व्रतवैकल्ये ती मोठ्या उत्साहाने, श्रद्धेने व मनोभावे करते.
gauri pujan , gauri details