Skip to main content
पडताळणी प्रलंबित

गौरीपूजन (दिवस दुसरा)

दुसर्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा केली जाते. सकाळी गौरींची/महालक्ष्मीची पूजा-आरती करून केलेल्या फराळाचा (रव्याचा लाडू, बेसनलाडू, करंजी, चकली, शेव, गुळपापडीचा लाडू) नैवेद्य दाखवतात. नंतर संध्याकाळी आरती करतात. पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, आंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ वगैरे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो. नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे इत्यादी. केलेले सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात. महाराष्ट्रात सायंकाळी महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम केला जातो. दर्शनाला आलेल्या महिला व मुलींचे आदरपूर्वक स्वागत करण्याची पद्धती प्रचलित आहे. विदर्भातल्या गौरींचा (लक्ष्म्यांचा) नैवेद्यही वहऱ्हाडी अघळपघळ प्रवृत्तीसारखाच! जोंधळ्याची आंबील हवीच! बहुधा गोड. कधी तिखट-खारी. तीही सत्यनारायणाच्या प्रसादासारखी सव्वा पटीत! सव्वा पावशेर/शेर/पायली! आंबील शिजवलेलं मोठं पातेलं तसंच लक्ष्म्यांपुढे! मग पुरणपोळी, १६ भाज्या वगैरे आहेच! जेवायला खूप लोकांना बोलवायचं. आंबिलीचे पावित्र्य मोठे. इथे तिथे हात धुवायचा नाही- अंगणात एका खास खड्ड्यातच हात धुवायचे! 'समुद्र' म्हणतात त्याला. नंतर तो खड्डा बुजवायचा! हळदी-कुंकवाला येणारी प्रत्येकजण लक्ष्मीची खणा-नारळांची ओटी आणि ऐपतीनुसार धान्य घेऊन येणार! पुन्हा गृहिणीने ती सगळी 'रास' घटस्थापनेपूर्वी घरातच पै-पाहुण्यांसाठी पदार्थ खाऊ घालूनच संपवायची. उचलून घराबाहेर काही न्यायचं नाही. अनेक ठिकाणी नैवेद्याच्या वेळी कणकेचे १६, कुठे ३२ दिवे आणि मुठे करून केळीच्या पानाभोवती ठेवायचे! नैवेद्य केळीच्या पानावरच वाढायचा. वाढून झालं की वऱ्हाडात त्या खोलीचं दार काही काळ बंद ठेवतात. आत लक्ष्म्या जेवतात ना! दार उघडलं की बारकाईनं पान बघायचं. कोणकोणते पदार्थ उष्टावले गेलेत? एक संकेत मात्र सगळीकडे! गौरी, लक्ष्मी घरात असेपर्यंत घरातला पैसा बाहेर द्यायचा नाही.
gauri pujan day 2 , gauri pujan