गौरीपूजेच्या बाबतींत पुराणामध्यें अशी एक गोष्ट सांपडते
गणपतीची आई जी गौरीमाता, पार्वती, तिची पूजाहि झालीच पाहिजे. म्हणून गणपती आल्यापासून तिसर्या दिवशीं गौरीहि येते. गणपति हा शंकर - पार्वतीचा मुलगा. त्यामुळें तो घरीं आल्यानंतर त्याची आई गौरी हे देखील माहेरीं येणें स्वाभाविक आहे. या गौरीमातेच्या पूजेमागचा हेतु ही कीं, भरपूर धनधान्य आणि स्वास्थ याचें वरदान तिच्याकडून मिळावें. त्याचप्रमाणें भरपूर आयुष्यहि तिच्याजवळ मागावें याहि हेतूनें भाविक मग तिची पुजा करतें. या गौरीपूजेच्या बाबतींत पुराणामध्यें अशी एक गोष्ट सांपडते कीं, पूर्वीच्या काळीं दैत्यांनीं देवांना अतिशय त्रास दिला. त्यामुळें देवांच्या स्त्रियांना आपलें सौभाग्य कसें सुरक्षित राहील याबद्दल धास्ती वाटली. काळजी वाटली. त्या कारणानें सगळ्याजणींनीं एकत्र जमून या संकटामधून आपली मुक्तता करण्यासाठीं महालक्ष्मीस विनविण्याचें ठरविलें. आणि तसें झाल्यावर व महालक्ष्मीची त्यांनी पूजा बांधल्यावर ती त्यांना प्रसन्न झाली. तिनें दैत्यांचा संहार केला. आपल्या भक्तमंडळींना अडचणींतून मुक्त केलें. सुखाची त्यांच्यावर खैरात केली. त्यामुळे या उपकाराची आठवण म्हणून दरवर्षी गौरीपूजेचा हा उत्सव बायका साजरा करतात. त्या मागची प्रमुख भावना ही कीं, आपणांस अखंड सौभाग्य लाभावें. परंतु खेडोपाडींच्या सामान्य बायका या सणामागचें कारण विचारतांना ही गोष्ट न सांगतां एवढेंच म्हणतात कीं, "या कारणानें पार्वतीला माहेरीं यायला मिळतें. पार्वती म्हणजे आपलीच पोर. माहेरवाशीण वर्षांतून एकदां येणारी. तिनें कौतुक करायचें. तिला माहेर करायचें. तिला सुखांत ठेवायची." आणि त्या दृष्टीनेंच सर्वत्र हा सण पार पडतांना दिसतो. सूर्या समूक माजं घर ग बाई मी लोटीतें घरदार
पायीं साकळ्या तंगभार ग बोटीं जोडवीं झिनकार
कमरीं दाबाला चारी कुलपं ग गळीं पुतबीळ्याची माळ
वर चिताक नक्षीदार ग डाळीं डोरलं पांच फेर
नथ नाकांत डौलदार ग काप कानांत गजबार
डोकीं केवडा मारी ल्ह्यार ग चोळी अंगांत हिरवीगार
नेशी पिवळा पितांबर ग हातीं सोन्याच बिलवर
मी ग निगालें न्हवयीना ग लेक बाबांची तालीवार अशा प्रकारचे सगळे दागिने-जुन्या काळचे असे - एकत्र गुंफून तयार झालेलें गीत गात घरोघरींच्या पोरीबाळी न्हवणाला जातात. गौर आणायला म्हणून जातात. हातांत पानाफुलांनी सजवलेला तांब्या घेऊन नदीवर नाहींतर आडावर अगर विहिरीवर जावयाचें. त्यावेळीं जातांना केलेला साजशिणगार असा बोलून दाखवायचा. घोळ्यामेळ्यानें जमून ठेक्यांत पावलें टाकीत जातांना एकमेकींचा दिमाख एकमुखानें असा म्हणावयाचा. मग खरोखर घरांत तसें वैभव नांदत नसलें तरी फिकीर नाहीं. मनाचें ऐश्वर्य कायम. कल्पनेची भरारी दांडगी. पाणवठ्यावर जाऊन ही गौर आणावयाची म्हणजे तांब्यांतील पाण्यांत पांच खडे घेऊन यावयाचे. बरोबर नेलेलें तेरड्याचें पान व फूल त्यास वहावयाचें. कोंकणामध्यें गंगेवर तेरडा नेऊन ठेवतात. त्यावेळीं नारळ व कोरें सूप नेऊन तो तेरडा व सात खडे माघारी आणतात. तेरड्यावर मुखवटा बसवतात. त्यावरच सर्व साजशिणगार चढवतात. देशावर फक्त पांच खडे आणतात. ते घेऊन घरी आलेल्या मुलीच्या पायावर गरम पाणी ओतून, तिला हळदकुंकू लावून आणि ओवाळून घरांत घेतात. आणि मग ते पांच खडे एकाद्या गाडग्यांत नाहींतर पितळेच्या भांड्यांत ठेवून गौरी बसवतात. त्या संख्येनें दोन असतात. आणि त्यांची मांडणीहि मोठी अभिनव असते. म्हणजे गाडग्यावर गाडगें उतरंडीसारखें रचावयाचें आणि वरच्या तोंडाला हळदीकुंकवानें माणसाचा चेहरा काढलेल्या लहान टिंगणीचा मुखवटा ठेवायचा. त्यावर खण घालावयाचा. कुणीं कुणीं भांड्यावर भांडें अगर डब्यावर डबे ठेवून त्यावर मातीचा अगर वाटीवर काजळीनें काढलेला मुखवटा ठेवून उंची लुगडीं नेसवतात. क्वचित् प्रसंगीं पितळेचे मुखवटेहि दिसून येतात. मात्र या सगळ्या गोष्टींसाठीं वापरण्यांत येणार्या गाडग्यांत अगर भांड्यांत सवाष्णीची ओटी असते. तांदूळ अगर गहूं, पानसुपारी, लेकुरवाळें हळकुंड, खोबर्याची वाटी वगैरे वगैरे सर्व या गौरीला लागते. त्याचप्रमाणे मुखवटा असेल त्या बेतानें नाकांत व कानांत डाग घालतात. आणि एरव्हीं सर्रास सर्व गौरींना गळ्यांतील ठळक दागिने घालण्याची प्रथा आहे. उंची लुगडें आणि दागदागिने यामुळें ही गौर नक्षत्रासरखी दिसते. तिच्या पुढें घरांतील सुंदर वस्तूंची मांडणी करून दोन्ही बांजूना दोन समया तेवत ठेवायच्या. आणि खणनारळ समोर मांडले म्हणून त्यांना हळदकुंकूं वहायचें. या वेळीं ही सगळी शोभा बघून डोळ्याचें पारणें फिटल्यासारखें वाटतें.
gauri pujan , gauri details