दुसरा अध्याय
भगवान म्हणाले, “नारदा, हे व्रत पूर्वी कोणी केले होते ते सांगतो. ऎक, सुंदर अशा काशीनगरात एक दरिद्री ब्राह्मण राहात होता. भूक व तहान यांनी पीडित होऊन तो ब्राह्मण पृथ्वीवर रोज फिरत असे. आचारनिष्ठ व धार्मिक ब्राह्मणांवर कृपा करणारा भगवान त्या दु:खी ब्राह्मणाला पाहून भगवंतानी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व काशीनगरातल्या त्या ब्राह्मणाला प्रश्न विचारला, “हे ब्राह्मणा, तू दु:खी होऊन दररोज पृथ्वीवर कशासाठी फिरतोस? ते सर्व ऎकण्याची माझी इच्छा आहे. हे ब्राह्मणश्रेष्ठा, ते तू मला सांग.” हे वृद्ध ब्राह्मणरूपी भगवंताचे भाषण ऎकून तो ब्राह्मण म्हणाला. “मी अतिशय दरिद्री ब्राह्मण आहे. मी भिक्षा मागण्यासाठी रोज पृथ्वीवर फिरतो. हे भगवंता, दारिद्र्य नाहीसे करण्याचा एखादा उपाय आपणास माहीत असेल तर तो कृपा करून मला सांगा.” असे ब्राह्मणांचे भाषण ऎकून भगवान म्हणाले. “सत्यनारायण नावाचा विष्णु सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून मनातील फल देणारा आहे. जे व्रत केले असता मनुष्य सर्व दु:खांतून मुक्त होतो त्या सत्यनारायणाचे पूजनात्मक उत्तम व्रत तू कर.” त्यानंतर ब्राह्मणाला पूजनाचे सर्व विधान सांगून सत्यनारायण प्रभू तिथेच गुप्त झाले. वृद्ध ब्राह्मणाने सांगितलेले व्रत मी अवश्य करीन असा ध्यास दरिद्री ब्राह्मणाला लागल्यामुळे त्याला रात्री निद्रा लागली नाही नंतर तो ब्राह्मण सकाळी उठून ‘मी आज सत्यनारायणाचे व्रत करीन’ असा मनाशी निश्चय करून गावात भिक्षा मागण्यासाठी गेला. त्याच दिवशी त्या ब्राह्मणाला खूप पैसा मिळाला व त्याने पूजनाची सर्व तयारी करून आपल्या बांधवांसह सत्यनारायणाचे पूजन केले. नंतर तो दरिद्री ब्राह्मण या सत्यनारायण व्रतामुळे सर्व दु:खांतून मुक्त झाला व धनधान्यांनी समृद्ध होऊन आनंदी झाला. त्या वेळेपासून तो ब्राह्मण प्रत्येक महिन्याला सत्यनारायण व्रत करू लागला व या व्रतामुळे सर्व पापांतून मुक्त होऊन अंती दुर्लभ अशा मोक्षाला गेला. ब्राह्मणहो, ज्या वेळी हे सत्यनारायण व्रत जो कोणी मनुष्य भक्तिभावाने करील त्या वेळी त्याचे सर्व दु:ख नाहीसे होईल. मुनिहो, याप्रमाणे नारायण भगवंताने नारदांना सत्यनारायणाचे व्रत सांगितले तेच मी तुम्हाला सांगितले अन्य काय सांगू?” ऋषी पुन्हा विचारतात, “त्या ब्राह्मणापासून हे व्रत कोणी ऎकले व नंतर कोणी प्रत्यक्ष हे व्रत केले, ते सर्व ऎकण्याची इच्छा आहे व श्रद्धा पण आहे.” सूत म्हणतात, “मुनिहो, हे व्रत पृथ्वीवर कोणी केले ते सांगतो, ते ऎका. एकदा हा ब्राह्मण आपल्या वैभवाप्रमाणे आपले बांधव व इष्टमित्र यांसह आनंदाने व भक्तीने हे व्रत करीत असताना लाकडे विकणारा मोळीविक्या त्या ठिकाणी आला. तो मोळीविक्या तहानेने व्याकुळ झालेला असल्यामुळे मस्तकावरील मोळी बाहेर ठेवून ब्राह्मणाच्या घरी गेला व तो व्रत करीत आहे असे पाहून त्याला नमस्कार केला व विचारले, “महाराज, आपण काय करीत आहात? व हे व्रत केल्याने काय फळ मिळते, ते विस्तारपूर्वक सांगा.” ब्राह्मण म्हणाला, “सर्व इच्छा पूर्ण करणारे असे हे सत्यनारायणाचे व्रत आहे. त्याच्याच कृपाप्रसादाने मला पुष्कळ धनधान्य मिळाले आहे.” नंतर त्या मोळीविक्याने हे व्रत समजावून घेतले व अंंती आनंदाने प्रसाद भक्षण करून पाणी पिऊन शहरात मोळी विकण्यासाठी गेला. सत्यनारायणाचे चिंतन करीत लाकडाची मोळी मस्तकावर घेऊन या गावात लाकडे विकून जे द्रव्य मिळेल त्या द्र्व्याने मी सत्यनारायणाचे उत्तम पूजन करीन असा मनाशी त्याने निश्चय केला व धनिक लोक ज्या नगरात राहात होते तिथे तो गेला व त्या दिवशी त्याला दुप्पट द्रव्य मिळाले. नंतर त्याने आनंदी अंत:करणाने उत्तम पिकलेली केळी, साखर, तूप, दूध, गव्हाचा रवा सव्वा या प्रमाणात खरेदी करून आपल्या घरी आला व आपले बांधव व इष्टमित्र यांना बोलावून विधियुक्त रीतीने यथासांग सत्यनारायणाचे पूजन केले. या सत्यनारायण व्रताच्या प्रभावाने तो मोळीविक्या धनधान्य व पुत्र इत्यादी संपत्तीने युक्त झाला व या लोकात सुख भोगून शेवटी सत्यनारायण प्रभूंच्या लोकी गेला. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील दुसरा अध्याय पुरा झाला.