Skip to main content

चवथा अध्याय

नंतर साधुवाण्याने आपणास वाटेत विघ्ने येऊ नयेत म्हणून ब्राह्मणांस दक्षिणा देऊन आशिर्वाद घेतला व जावयासह स्वतःचे नगरास गेला. तो साधुवाणी काही थोडा दूर गेल्यावर संन्यासवेष धारण करणार्‍या सत्यनारायण प्रभूंनी साधुवाण्याची परीक्षा करण्यासाठी “हे साधो, या तुझ्या नौकेत काय आहे, ते सांग” असा प्रश्न विचारला. धनाने उन्मत्त झालेले ते दोन वाणी त्याची निंदा करून हसू लागले व म्हणाले, “संन्यासीबुवा, आमचे द्रव्य नेण्याची तुमची इच्छा आहे काय? आमची नौका वेली व पाने यांनी भरलेली आहे.” असे साधुवाण्याचे उन्मत्तपणाचे भाषण ऎकून भगवान म्हणाले, “तुझे बोलणे खरे होवो.” असे बोलून संन्यास वेष धारण करणारे भगवान तेथून गेले व तिथून थोड्याच अंतरावर असलेल्या समुद्राच्या तीरावर बसले , संन्यासी दूर गेल्यावर साधुवाण्याने आपले नित्यकर्म केले व नौकेकडे गेला आणि पाहिले तर हलके पणामुळे नौका वर आलेली पाहून साधुवाणी आश्चर्यचकित झाला. नौकेत वेली व पाने पाहून तो साधुवाणी मूर्च्छा येऊन जमिनीवर पडला. नंतर थोड्या वेळाने सावध होऊन चिंता करू लागला. त्या वेळी साधुवाण्याचा जावई म्हणाला, “महाराज, आपण शोक का करता? संन्याशाने जो आपणास शाप दिला त्या मुळेच हा सर्व प्रकार घडला आहे तो संन्यासी पाहिजे ते करण्यास समर्थ आहे, म्हणून आपण त्याला शरण जाऊ म्हणजे आपले सर्व मनोरथ पूर्ण होतील.” असे जावयाचे भाषण ऎकून साधुवाणी यतीजवळ गेला व त्याला पाहून भक्तीने नमस्कार केला, व आदराने बोलू लागला. “महाराज, मी जे आपल्या जवळ खोटे बोललो त्या अपराधाची क्षमा करा.” असे म्हणून पुन्हा पुन्हा नमस्कार केला व तो साधुवाणी अतिशय दु:खी झाला. संन्यास वेषधारी भगवान शोक करणार्‍या साधु वाण्याला म्हणाले, “शोक करू नकोस. मी सांगतो ते ऎक. तू माझ्या पूजना विषयी पराङमुख आहेस व म्हणूनच माझ्या आज्ञेने तुला वारंवार दु:ख प्राप्त झाले.” हे ऎकून साधुवाणी भगवंताची स्तुती करू लागला. साधुवाणी म्हणाला, “तुझ्या मायेने मोहित झालेले ब्रह्मादिक देवही तुझे गुण व रूप जाणू शकत नाहीत. हे प्रभॊ, हे आश्चर्य आहे.” तुमच्या मायेने मोहित झालेला मी एक मूर्ख आहे. मी आपणास कसा जाणेन? माझ्यावर कृपा करा. मी यथाशक्ती आपले पूजन करीन. मी आपणास शरण आलो आहे. माझे रक्षण करा. माझे पूर्वीचे द्रव्य मला मिळावे.” असे साधुवाण्याचे भक्तिभावयुक्त वाक्य ऎकून भगवान संतुष्ट झाले; व साधुवाण्याला इच्छित वर देऊन अदृश्य झाले. नंतर साधुवाण्याने नौकेवर जाऊन पाहिले तो पूर्वीप्रमाणे नौका द्रव्याने भरलेली आहे असे दिसले; व सत्यनारायणाच्या कृपेनेच हे सर्व मला मिळाले असे म्हणून साधुवाण्याने आपल्या बांधवांसह सत्यनारायणाचे यथासांग पूजन केले, व सत्यनारायणाच्या कृपाप्रसादाने आनंदी झाला व प्रयत्नाने नौका नदीत लोटून आपल्या घरी गेला. नंतर साधुवाणी जावयाला म्हणाला, “ही पाहा माझी रत्‍नपुरीनगरी,” असे बोलून द्र्व्याचे रक्षण करणारा एक दूत घरी पाठविला. तो दूत नगरात गेला व साधुवाण्याच्या भार्येला पाहून त्याने नमस्कार केला व हात जोडून तिला अपेक्षित असणारे वाक्य बोलू लागला. तो म्हणाला, “बांधव व पुष्कळ द्रव्य यांसह साधुवाणी जावयाला बरोबर घेऊन आपल्या नगराच्या जवळ आले आहेत.” असे दूताचे वाक्य ऎकून आनंदी झालेल्या साधुवाण्याच्या भार्येने मुलीला ‘सत्यनारायणाची पूजा कर’ असे सांगितले व आपण लगेच पतिदर्शनासाठी गेली. आईचे वाक्य ऎकून तिने सत्यनारायणाचे व्रत पूर्ण केले. परंतु प्रसाद भक्षण न करता पतिदर्शनासाठी उत्सुक झालेली ती तशीच गेली, त्यामुळे रागावलेल्या सत्यनारायण प्रभूंनी तिचा पती असलेली नौका द्र्व्यासह पाण्यात बुडविली. त्या वेळी त्या ठिकाणी आलेल्या कलावतीला तिचा पती दिसला नाही, त्यामुळे अत्यंत शोकाने विव्हळ होऊन ती रडत भूमीवर पडली. बुडालेली नौका व त्यामुळे दु:खी झालेली आपली कन्या पाहून भयभीत अंत:करणाने साधुवाणी नावाड्यांसह हा काय चमत्कार, असे म्हणून विचार करू लागला. नंतर लीलावती आपल्या कन्येची ती अवस्था पाहून दु:खी झाली व आक्रोश करून आपल्या पतीला म्हणाली, “अहो, एवढ्या थोड्या अवधीत नौकेसह कलावतीचा पती कसा अदृश्य झाला? कोणत्या देवाच्या अवकृपेमुळे हे झाले? मला हे समजत नाही. नंतर तिने मुलीला पोटाशी धरले व रडू लागली. इतक्यात पती नाहीसा झाल्याने दु:खी झालेल्या कलावतीने पतीच्या पादुका घेऊन सती जाण्याचा निश्चय केला. धार्मिक व सज्जन असा तो साधुवाणी भार्येसह मुलीचे अशा प्रकारचे चरित्र पाहून अतिशोकाने संतप्त झाला व सत्यनारायणानेच नौका नाहिशी केली असेल कारण त्याच्या मायेने मी मुग्ध झालो आहे. नंतर सर्वांना बोलावून साधुवाण्याने, ‘माझे मनोरथ पूर्ण झाल्यास मी सत्यनारायणाचे पूजन करीन’ असे सर्वांना सांगितले. आणि सत्यनारायणाला पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार घातले. तेव्हा दीनांचे रक्षण करणारे सत्यनारायण संतुष्ट झाले व भक्तप्रेमी भगवान आकाशवाणीने म्हणाले, “हे साधो, तुझी कन्या प्रसादाचा त्याग करून आपल्या पतीच्या दर्शनासाठी आली आहे म्हणुन तिचा पती अदृश्य झाला. हे साधो, ही तुझी कन्या जर घरी जाऊन प्रसाद भक्षण करून येईल तर तिचा पती तिला प्राप्त होईल यात शंका नाही.” आणि पुन्हा बंदरात येऊन पाहते तो तिचा पती स्वजनांसह तिच्या दृष्टीस पडला. नंतर कलावती आपल्या पित्यास म्हणाली, “आता लवकर घरी चला, उशीर का करता?” मुलीचे हे वाक्य ऎकून तो साधुवाणी अतिशय आनंदी झाला व त्याने यथाविधी सत्यनारायणाचे पूजन केले, व नंतर तो साधुवाणी धन व बांधव यांसह आपल्या घरी गेला व प्रत्येक पौर्णिमा व मकर संक्रांत या दिवशी सत्यनारायणाचे पूजन करून या लोकी सुखी झाला व शेवटी सत्यनारायण प्रभूंंचे सत्य लोकात गेला. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील चौथा अध्याय पुरा झाला.