Skip to main content

पाचवा अध्याय

सूत सांगतात, “मुनी हो, आणखी एक कथा सांगतो, ती श्रवण करा. पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा प्रजेचे पालन करण्याविषयी अतिशय तत्पर होता. त्याने प्रसादाचा त्याग केल्यामुळे त्याला अतिदु:ख प्राप्त झाले, ते असे तो राजा एकदा अरण्यातून सिंह, वाघ इत्यादी प्राण्यांना मारून वडाच्या झाडाजवळ आला तो त्या ठिकाणी गवळी लोक आपल्या बांधवांसह भक्तियुक्त अंत:करणाने सत्यनारायणाचे पूजन करीत आहेत, असे राजाला दिसले. परंतु राजा हे सर्व पाहूनही त्या ठिकाणी गेला नाही व त्याने सत्यनारायण भगवंतास नमस्कारही केला नाही. तरी सुद्धा गवळी लोकांनी सत्यनारायणाचा प्रसाद राजापुढे आणून ठेवला; व नंतर भक्तिभावाने सर्व गोपबांधवांनी प्रसाद भक्षण केला व आनंदी झाले. राजा मात्र प्रसादाच्या त्यागामुळे अतिदु:खी झाला. त्या राजाचे शंभर मुलगे व धनधान्यादि सर्व संपत्ती नाश पावली. हे सर्व सत्यनारायणाच्या अवकृपेनेच झाले असेल असे राजाला वाटले, व ज्या ठिकाणी गोपांनी सत्यनारायणाचे पूजन केले होते त्या ठिकाणी जाण्याचा निश्चय राजाने केला. नंतर गवळी लोकांच्या जवळ गेला व त्यांच्यासह भक्ति श्रद्धेने युक्त होऊन यथाविधी सत्यनारायणाचे पूजन केले. त्यामुळे हा अंगध्वज राजा धन-पुत्र इत्यादी ऎश्वर्याने संपन्न झाला व या लोकात सुखी होऊन शेवटी वैकुंठ लोकात गेला. हा सर्व लाभ सत्यनारायणाच्या पूजनामुळे झाला म्हणून सर्वांनी सत्य नारायणाचे पूजन अवश्य करावे. जो कोणी अतिदुर्लभ असे सत्यनारायणाचे व्रत करतो व फल देणारी अशी कथा भक्तिभावाने श्रवण करतो त्याला सत्यनारायणाच्या कृपेने धनधान्यादी सर्व वस्तूंचा लाभ होतो व जो दरिद्री असेल त्याला द्रव्य मिळते व जो बंधनात पडला असेल तो बंधनातून मुक्त होतो. जो भयभीत झाला असेल तो सत्यनारायणाच्या पूजनामुळे भीतीपासून मुक्त होतो. इच्छित संपूर्ण ऎश्वर्य या लोकी भोगून अंती सत्य नारायणाच्या नगरास जातो. ऋषीहो, जे व्रत केले असता मनुष्य सर्व दु:खांतून मुक्त होतो, ते हे सत्यनारायणाचे व्रत तुम्हाला सांगितले. विशेषत्वेकरून कलियुगात सत्यनारायणाची पूजा फल देणारी आहे. या देवाला कोणी काल, कोणी ईश, कोणी सत्यदेव व कोणी सत्यनारायण असे म्हणतात. नानारूपे धारण करुन सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा असा भगवान कलियुगात सत्यनारायण व्रतरूपी होईल. मुनिश्रेष्ठहो, जो कोणी ही सत्यनारायणाची कथा पठण करील किंवा श्रवण करील त्याची सर्व पापे श्री सत्यनारायणाच्या कृपेने नाहीशी होतील. या ठिकाणी श्रीसत्यनारायण कथेतील पाचवा अध्याय संपूर्ण झाला.