Skip to main content

तिसरा अध्याय

सूत सांगतात, “ऋषीहो, याविषयी आणखी एक कथा सांगतो ती ऎका. पूर्वी या पृथ्वीवर उल्कामुख नावाचा एक सार्वभौम राजा होता. तो राजा जितेंद्रिय व सत्य बोलणारा, भक्तिमान व बुद्धिमान होता. तो देवळात जाऊन प्रत्येक दिवशी ब्राह्मणांना द्र्व्य देऊन संतुष्ट करीत असे. त्याची भार्या पतिव्रता, सुंदरवदना व अत्यंत रूपवान होती. एक दिवशी तो राजा स्त्रीसह नदीचे तीरावर सत्यनारायणाचे पूजन करीत होता. त्या वेळी साधुवाणी व्यापारासाठी पुष्कळ द्रव्य घेऊन राजा पूजन करीत होता त्या ठिकाणी आला, व नौका नदीच्या तीरावर उभी करून राजाच्या जवळ आला व व्रत करणार्‍या राजाला पाहून अत्यंत विनयाने विचारू लागला. साधुवाणी म्हणाला, “हे राजा, भक्तियुक्त अंत:करणाने हे तू काय करीत आहेस, ते सविस्तर मला सांग. माझी ऎकण्याची इच्छा आहे.” राजा म्हणाला, “हे साधो, पुत्र, धन इत्यादी प्राप्त व्हावे या हेतूने अतुल तेजस्वी, सर्व मनोरथ पूर्ण करणार्‍या सत्यनारायण विष्णूचे पूजनात्मक व्रत मी बांधवासह करीत आहे.” राजाचे हे वाक्य ऎकून अत्यंत आदराने साधुवाणी म्हणाला. “महाराज आपण हे व्रत विस्तार करून मला सांगा; जसे सांगाल तसे मी करीन, मला पण संतती नाही. ती या व्रतामुळे नक्की होईल.” असे बोलून व्यापारासाठी अन्य गावी न जाता आनंदाने साधुवाणी घरी परत आला, व त्याने संतती देणारे हे व्रत आपल्या भार्येला सांगितले, ज्या वेळी मला संतती होईल त्या वेळी मी सत्यनारायणाचे व्रत करीन असा नवस पण त्याने केला. अशा प्रकारचे व्रत शीलवान साधु वाण्याने आपल्या लीलावती नावाच्या भार्येला सांगितले. नंतर धार्मिक व पतिव्रता अशी त्याची लीलावती नावाची भार्या आनंदी अंत:करणाने पतीची सेवा करीत असता, सत्यनारायणाच्या कृपाप्रसादाने गर्भवती झाली. नंतर तिला दहावा महिना सुरू होताच एक कन्यारत्‍न प्राप्त झाले. ती कन्या शुक्ल पक्षातील चंद्रा प्रमाणे प्रत्येक दिवशी वाढू लागली व म्हणूनच तिचे नाव कलावती असे ठेवले. नंतर काही दिवसांनी त्या लीलावतीने साधु वाण्याला गोड वाणीने प्रश्न विचारला. “महाराज, पूर्वी नवस केलेले सत्यनारायणाचे व्रत आपण का करीत नाही?” असा तिचा प्रश्न ऎकून साधुवाणी म्हणाल. “हे प्रिये, कलावतीच्या लग्नाच्या वेळी हे सत्यनारायणाचे व्रत मी करीन.” अशा प्रकारे भार्येचे समाधान करून व्यापारासाठी साधुवाणी दुसर्‍या गावाला निघून गेला. त्याची कन्या कलावती गुणांनी व वयाने मोठी होऊ लागली. साधु वाण्याने आपली मुलगी लग्नाला योग्य झाली आहे असे पाहून मित्रमंडळींबरोबर विचार केला व लगेच उत्तम वर शोधण्यासाठी एका दूताला आज्ञा केली. तो दूत आज्ञेप्रमाणे वर शोधण्यासाठी कांचन नावाच्या नगराला आला. नंतर तो दूत एका वाण्याच्या मुलाला घेऊन परत आला; त्या वेळी सर्वगुणसंपन्न व सुंदर अशा वाण्याच्या मुलाला पाहून त्या साधु वाण्याने आपल्या ज्ञातिबांधवांसह आनंदी अंत:करणाने त्या वैश्यपुत्राला विधियुक्त कन्यादान केले. त्या विवाहाचे वेळी दुर्दैवाने पूर्वी नवस केलेले सत्यनारायणाचे व्रत करण्यास तो विसरला. त्यामुळे भगवान त्याच्यावर रागावले. नंतर तो व्यापारात चतुर असणारा साधुवाणी कालाच्या प्रेरणेप्रमाणे व्यापारासाठी जावयासह निघून गेला. आणि सिंधु नदीच्या जवळ असणार्‍या रम्य अशा रत्‍नसारपुरामध्ये जाऊन आपल्या श्रीमान जावयासह तो साधु वाणी व्यापार करू लागला. ते दोघे चंद्रकेतूच्या नगरात व्यापार करीत असता काही काल उत्तम गेला. इतक्यातच सत्यनारायण प्रभूंनी हा वाणी आपल्या सत्यनारायण पूजनाच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झाला आहे म्हणून याला भयंकर दु:ख प्राप्त होवो असा शाप दिला. शाप दिल्यानंतर थोड्याच दिवसांत चंद्रकेतूच्या राजवाड्यात चोरी झाली व तो चोर चोरलेले द्रव्य घेऊन साधुवाणी ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आला. आपल्यामागून राजदूत येत आहेत असे पाहून तो चोर घाबरला व चोरलेले द्रव्य साधुवाण्याच्या दाराजवळ टाकून तो चोर पळून गेला. इतक्यात ते राजदूत, सज्जन साधुवाणी ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आले व त्यांनी चोरीस गेलेले राजद्रव्य त्या ठिकाणी पाहिले व हेच ते चोर आहेत असे समजून त्या दोघांस बांधले, व आनंदाने धावत धावत त्या दोघांना आपणासमोर आणले आहेत. आज्ञा करावी.” राजाने विशेष विचार न करताच त्यांना बंदीशाळेत टाकण्याची आज्ञा केली व लगेच राजदूतांनी त्या दोघांना बेड्या घालून किल्ल्यातील कारागृहात टाकले.

त्यावेळी आम्ही चोर नाहीं असे ते म्हणत होते, परंतु सत्यदेवाच्या मायेमुळे त्यांचे बोलणे कोणी ऎकले नाहि; उलट साधुवाण्याचेच सर्व द्रव्य जप्त केले. सत्यनारायणाच्या शापामुळे साधुवाण्याच्या भार्येला फार दु:ख झाले व त्याच्या घरातील सर्व द्रव्य चोरांनी चोरले. तेव्हापासून मानसिक दु:ख व रोग यांनी व्याप्त होऊन क्षुधा व तृषा यांनी दु:खी झालेली साधुवाण्याची भार्या प्रत्येक घरी भिक्षा मागण्यासाठी फिरू लागली. साधुवाण्याची मुलगी कलावतीपण घरोघर भिक्षा मागू लागली. एक दिवस ती कलावती भुकेने व्याकुळ झालेली अशी एका ब्राह्मणाच्या घरी गेली व त्या ठिकाणी तिने सत्यनारायणाचे पूजन चाललेले पाहिले, आणि तेथे बसली व नंतर कथा ऎकून सत्यनारायण प्रभूंंची प्रार्थना केली व प्रसाद भक्षण करून आपल्या घरी गेली. त्या वेळी फार रात्र झाली होती. त्यामुळे आईने कलावतीस प्रेमाने असे विचारले की, “हे मुली, तू इतकी रात्र होईपर्यंत कोठे होतीस? तुझ्या मनात काय विचार चालू आहे?” ते ऎकून कलावती म्हणाली, “हे आई, मी एका ब्राह्मणाच्या घरी सर्व इच्छा पूर्ण करणारे व्रत पाहिले.” मूलीचे वाक्य ऎकून आनंदी झालेली साधुवाण्याची भार्या सत्यनारायणाचे व्रत करण्यास तयार झाली व त्या पतिव्रता असणार्‍या साधुवाण्याच्या भार्येने आपला पती व जावई लवकर घरी येवोत असा संकल्प करून बांधव व इतर आप्तजन यांसह सत्यनारायणाचे पूजन केले व ‘हे भगवंता, माझ्या पतीचे व जावयाचे अपराध क्षमा करण्यास आपण समर्थ आहात’ अशी सत्यनारायणाची प्रार्थना केली. त्या वेळी भगवान सत्यनारायण व्रताने संतुष्ट झाले. नंतर चंद्रकेतुच्या स्वप्नात जाऊन त्यांनी सांगितले, “हे नृपश्रेष्ठा, तू जे दोन वाणी बंदीशाळेत टाकले आहेस ते सकाळी सोडून दे. तसेच हे राजा, तू जे त्यांचे धन घेतले आहेस ते त्यांचे त्यांना परत दे. असे जर तू न करशील तर धन, पुत्र व राज्य यांसह तुझा नाश करीन.” असे राजास स्वप्नात सांगून सत्यनारायण भगवान अदृश्य झाले. नंतर प्रात:काळी राजाने सभेमध्ये बसून स्वजनांसह सर्वांना ते स्वप्न सांगितले व जे दोन वाणी आपण बंदीशाळेत टाकले आहेत त्यांना लवकर मुक्त करा अशी दुतांना आज्ञा केली. दूतांनी राजाच्या आज्ञेप्रमाणे साधुवाणी व त्याचा जावई या दोघांना बंधमुक्त करून राजाच्या समोर आणले व हात जोडून नम्रतेने म्हणाले. “महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणे बंदीशाळेतून मुक्त करून दोनही वैश्यपुत्र आणले आहेत.” नंतर साधुवाणी व त्याचा जावई यांनी चंद्रकेतु राजाला नमस्कार केला व पूर्वीचा वृत्तान्त आठवून शिक्षेच्या भीतीमुळे त्यांनी काहीच भाषण केले नाही. त्या दोघा वाण्यांना पाहून चंद्रकेतु राजा आदराने म्हणाला, “वैश्यहो, तुमच्या दैवयोगाने तुम्हाला दु:ख भोगावे लागले. आता भीती नाही.” असे बोलून त्यांच्या बेड्या काढवून क्षौरकर्म व मंगलस्नान करविले. नंतर त्या दोघांना वस्त्र व अलंकार देऊन गौरव केला व नम्र भाषणाने त्यांना अत्यंत संतुष्ट केले व त्या वाण्याने जे द्रव्य घेतले ते ते त्यांना दुप्पट करून दिले व म्हणाला, ‘हे साधो, आपण आपल्या घरी जा.” नंतर त्या दोघांनी राजाला नमस्कार केला व म्हणाले, “आम्ही आपल्या कृपेने घरी जातो.” या ठिकाणी सत्यनारायण कथेतील तिसरा अध्याय पुरा झाला.