Skip to main content

एकादशोऽध्याय:

श्रीगणेशाय नमः

जयजयाजी इंदुशलाका ॥ मुगुटमणे सकळटिळका ॥ इंदिरापते विबुधजनका ॥ भक्तिमानसा विराजित ॥१॥

ऐसा धैर्यऔदार्यवंत ॥ पुढें बोलवी भक्तिसारग्रंथ ॥ मागिले अध्यायीं गहिनीनाथ ॥ जन्मोदय पावला ॥२॥

यावरी गोरक्ष मच्छिंद्रनाथ ॥ महीचीं तीर्थे करीत ॥ हिमाचल बद्रिकेदारात ॥ भ्रमण करीत ॥ हिमाचल बद्रिकेदारात ॥ भ्रमण करीत पैं गेले ॥३॥

इतुकी कथा सिंहावलोकनीं ॥ पूर्वाध्यायात कीजे श्रवणी ॥ असो गुरुशिष्य बद्रिकाश्रमीं ॥ शिवालया पातले ॥४॥

बद्धांजळी जोडोनि कर ॥ करिते झाले नमस्कार ॥ नमस्कार करुनि जयजयकार ॥ स्तुतिसंवादें आराधिलें ॥५॥

हे त्रिपुरारी शूळपाणी ॥ अपर्णावर पंचाननी ॥ रुंडमाळा चिताभस्मी ॥ दिव्यतेजभूषित तूं ॥६॥

हे कामांतका दक्षतेजा ॥ भोळवट वरां देसी दानवां ॥ कैलासपते महादेवा ॥ सदाशिवा आदिमूर्ते ॥७॥

हे दिगंबरा जगजेटीं ॥ भाळीं गंगा मौळीं जटाजूटी ॥ नरकपाळ करसंपुटीं ॥ इंदुकळेतें मिरविशी ॥८॥

उरगवेष्टन कुरंगसाली ॥ व्याघ्रांबर वसनपाली ॥ गजचार्मादि मिति झाली ॥ परिधाना महाराजा ॥९॥

हे कैलासवासा उमापती ॥ दक्षजामाता आदिमूर्ती ॥ चक्रचालका मायाभगवती ॥ आम्हां दासां अससी तूं ॥१०॥

हे नीलग्रीवा आदिपीठ ॥ करुणकारा उत्तमा श्रेष्ठ ॥ स्वीकारुनि सर्व अरिष्ट ॥ सुख देसी देवांसी ॥११॥

हे भाळदृष्टित्रार्थनयनी ॥ डमरु त्रिशूळ विराजे पाणीं ॥ सदा प्रिय वृषभ वाहनीं ॥ भस्मधारणी महाराजा ॥१२॥

हे स्मशानवासी वैराष्यशीळा ॥ नगजामात रक्षमाळा ॥ श्वेतवर्णा तमोगुणा आगळा ॥ वाहसी गळां राममंत्र ॥१३॥

हे सर्वाधीश विश्वपती ॥ भिक्षाटणी बहुत प्रीती ॥ जटा पिंगटा त्रिपुंड्र लल्लाटीं ॥ शुद्ध वीरगुंठी शोभतसे ॥१४॥

फरशांकुश डमरु हातीं ॥ लोप पापा पातोपातीं ॥ षडाननताता सुत गणपती ॥ विद्यालक्षणीं मिरविसी ॥१५॥

ऐसी स्तुति अपार वचनीं ॥ करीत मच्छिंद्र बद्रिकाश्रमीं ॥ स्तुति ऐकूनि प्रेमें उगमी ॥ प्रगट झाला महाराज ॥१६॥

मग मच्छिंद्राचा धरुनि हस्त ॥ सप्रेम त्यातें आलिंगित ॥ निकट बैसवूनि पुसे त्यातें ॥ योगक्षेम कैसा तो ॥१७॥

गोरक्षातें घेऊनि जाळी ॥ मुख स्वकरें कुरवाळी ॥ म्हणे बा उदय येणें काळीं ॥ हरिनारायण झालासी ॥१८॥

ऐसें वदोनी आणिक वदत ॥ हें महाराज मच्छिंद्रनाथ ॥ हा तव शिवयोगें सुत ॥ तारक होईल ब्रह्मांडा ॥१९॥

म्यां पूर्वीच यातें पाहिलें होतें ॥ म्हणशील तरी कनकगिरीतें ॥ तुवां अभ्यासूनि सुतें ॥ आणिल दैवत घरातें ॥२०॥

श्रीराम नरसिंह सूर्य हनुमंत ॥ भैरव काळिका वीरांसहित ॥ पाचारितां मीही तेथ ॥ आलों होतों महाराजा ॥२१॥

तस्मात् पूर्वीची होय ओळखी ॥ म्हणवूनि गोरक्ष घेतला अंकीं ॥ परी आतां असो शेखी ॥ एक वचन ऐकिजे ॥२२॥

यातें विद्येतें अभ्यासिलें ॥ परी तपाविण विगलित ठेलें ॥ जैसें शत्रु जगत्रयीं झाले ॥ मग तें हीनत्व प्रतापा ॥२३॥

कीं जीवनाविण वृक्ष जैसा ॥ काळरुप भासे तैसा ॥ कीं तरुविण ग्राम जैसा ॥ बुभुक्षित लागतसें ॥२४॥

कीं नाकेंविण सुंदर नारी ॥ कीं विनातोय सरितापात्रीं ॥ कीं नक्षत्राविण शोभा रात्रीं ॥ कदाकाळी दिसेना ॥२५॥

तरी तपाविण लखलखीत ॥ विद्याभांडार न दिसत ॥ जैसा मानव परम क्षुधित ॥ विकळ शरीरीं मिरवतसे ॥२६॥

तरी आतां माझिया आश्रमीं ॥ तपा बैसवीं योगद्रुमी ॥ मग तपबळानें बलाढ्यगामी ॥ विद्याअस्त्रें मिरवेल हा ॥२७॥

याउपरीं मच्छिंद्रनाथ बोलत ॥ वय धाकुटें बाळ अत्यंत ॥ परी तप तीव्रक्लेशांत ॥ साहिलें जाईल कैसें जी ॥२८॥

येरु म्हणे वरदपाणी ॥ तुझ्या आहे मौळिस्थानीं ॥ तरी तपक्लेशावर कडसणी ॥ दुःख देणार नाहीं बा ॥२९॥

यापरी येथें नित्यनित्य ॥ मी समाचारीनें गोरक्षातें ॥ तूं निःसंशय सकलातें ॥ तपा गोरक्षा बैसवीं ॥३०॥

ऐसें वदतां आदिनाथ ॥ अवश्य मच्छिंद्रनंदन म्हणत ॥ उत्तम आहे ऐसें बोलत ॥ अंगिकारिता पैं झाला ॥३१॥

तेथें आमुचें काय हरलें ॥ कीं जन्मांधा चक्षू आलें ॥ कीं सदैव हरिणीतें सांभाळिले ॥ एकटपणीं पावसांत ॥३२॥

तेंवी तूं आणि तुझा दास ॥ येथें आश्रमीं करितां वास ॥ तेथें वाईट काय आम्हांस ॥ चिंता माझी निरसेल ॥३३॥

ऐसी शिवातें बोलूनि वाणी ॥ परी हर्ष न माये मच्छिंद्रमनीं ॥ जें योजिलें होतें अंतःकरणीं ॥ तेचि घडूनि पैं आलें ॥३४॥

फारचि उत्तमोत्तम झालें ॥ गोरक्षासी शिवें अंगिकारिलें ॥ आतां जाईल संगोपिलें ॥ अर्थाअर्थी बहुवसें ॥३५॥

मग उत्तम वेळा उत्तम दिवस ॥ ग्रहबळ जाणूनि नक्षत्रास ॥ उत्तम तिथी उत्तम मास ॥ पाहूनि तपा बैसविला ॥३६॥

लोहाचा करुनि कंटक नीट ॥ त्या अग्रीं योजूनि चरणांगुष्ठ ॥ वामपादा देऊनि कष्ट ॥ उभा राहिला गोरक्ष तो ॥३७॥

वायुआहारीं ठेवूनि मन ॥ क्षणिक अन्न त्यजून ॥ उपरी फळपत्रीं आहार करुन ॥ क्षुधाहरण करीतसे ॥३८॥

सूर्यमंडळीं ठेवूनि दृष्टी ॥ तपो करीतसे तपोजेठी ॥ तें मच्छिंद्र पाहूनि निजदृष्टीं ॥ परम चित्तीं तोषिला ॥३९॥

मग आदिनाथा विनवोनी ॥ मच्छिंद्र निघाला तीर्थाटनी ॥ द्वादश वर्षांचा नेम करुनी ॥ गोरक्षातें सांगितले ॥४०॥

असो मच्छिंद्र गेला तीर्थाटनी ॥ येरीकडे बद्रिकाश्रमीं ॥ रात्रंदिवस बद्रिकाशूळपाणी ॥ जवळी जाऊनि बैसला ॥४१॥

वस्यें आपण आदिनाथ ॥ गोरक्षाचें दास्य करीत ॥ मागें पुढें राहूनि अत्यंत ॥ आल्या विघ्ना निवटीतसे ॥४२॥

असो यावरी मच्छिंद्रनाथ ॥ गया प्रयाग करुनि त्वरित ॥ काशी अवंतिका मिथुळासहित ॥ मथुरा काश्मिरी पाहिली ॥४३॥

अयोध्या द्वारका महाकाळेश्वर ॥ सोमनाथ करुनि तत्पर ॥ ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर ॥ घृणेश्वर पाहिला ॥४४॥

भीमाउगमीं भीमाशंकर ॥ आंवढ्या नागनाथादि पंढरपूर ॥ करुनि चौदा पीठें थोर ॥ भगवतीची पाहिली ॥४५॥

कार्तिक शेषाद्रि मल्लिकार्जुन ॥ सरितासरोवरीं अपार स्नान ॥ घडलें करितां महीतें गमन ॥ लोटलीं वर्षे द्वादशादि ॥४६॥

सकळ तीर्थे महीची करुन ॥ शेवटीं सेतुबंधीं जाऊन ॥ रामेश्वराचे चरण वंदून ॥ स्नाना गेला अब्धीसी ॥४७॥

तों श्वेतबंधीं वायुसुत ॥ जाऊनि नमी मच्छिंद्रनाथ ॥ परी मच्छिंद्रा पाहतां मकरध्वजतात ॥ आल्हादला चित्तीं बहुत तो ॥४८॥

परमप्रीतीं लबडसवडी ॥ मच्छिंद्रहस्त धरुनि ओढी ॥ हदयीं आलिंगूनि परम आबडीं ॥ निकट बैसवी महाराजा ॥४९॥

म्हणे बा तूं योगद्रुमानें ॥ कोणीकडे केलें येणें ॥ चोवीस वर्षी तुझें दर्शन ॥ आजि झालें महाराजा ॥५०॥

कीं आळशावरी गंगा वळली ॥ कीं द्वादश वर्षे पर्वणी आली ॥ तैसी माते गोष्ट जाहली ॥ आज दर्शनें तुझ्या बा ॥५१॥

ऐसें बोलूनि वायुसुत ॥ परम मच्छिंद्राचें आतिथ्य करीत ॥ मग समय पाहूनि संतोषयुक्त ॥ मच्छिंद्रातें बोलतसें ॥५२॥

आज चोवीस संवत्सर झाले ॥ परी तुजकडे माझे चक्षु लागले ॥ कैं भेटसील म्हणोनि भुकेले ॥ पारणें फिटलें आजि तें ॥५३॥

हे महाराज योगुद्रुमा ॥ कामनीं वेधली जो आम्हां ॥ त्या सरिताप्रवाहीं हस्तवर उगमा ॥ बुडवितो मजलागीं ॥५४॥

तरी त्या कामनाजळांत ॥ तूं तारक झाला आहेसी मातें ॥ झालासी परी अद्यापपर्यंत ॥ बाहेर न काढिसी महाराजा ॥५५॥

पूर्वी मजला देऊनि वचन ॥ तुवां केलें आहे गमन ॥ परी स्त्रीराज्याचें स्थान ॥ पाहिलें तुवां नाही कीं ॥५६॥

आतां तरी धरुनि चित्तीं ॥ प्रसन्न करी कृपाभगवती ॥ मैनाकिनीची कामरती ॥ पूर्ण आहुति घेई कां ॥५७॥

आपुले वचनेंकरुनि त्याचें ॥ आणिक फल दे मम वचनाचें ॥ मग पावूनि आर्त मनीचे ॥ सुटका केव्हां होईल ॥५८॥

मी गुंतलो तिचे वचनीं ॥ कीं मच्छिंद्र पाठवीन ये भुवनीं ॥ तरी ते रतिसुखाच्या कामाश्रमीं ॥ मच्छिंद्रनाथा मिरविजे ॥५९॥

ऐसें वचन तीतें व्यक्त ॥ आहे तरी मज करां मुक्त ॥ आणि तुवांही वचन दिधलें मातें ॥ तेंही सत्य करीं आतां ॥६०॥

ऐसी ऐकूनि हनुमंतवाणी ॥ अवश्य म्हणे च्छिंद्रमुनी ॥ मग त्रिरात्र तेथें वस्ती करुनी ॥ निघते झाले उभयतां ॥६१॥

मार्गी जातां अनेक तीर्थे ॥ यथाविधि झाले सरिते ॥ मग गौडबंगाला टाकूनि त्वरितें ॥ स्त्रीराज्यांत संचरलें ॥६२॥

तंव ती सकळ स्त्रियांची स्वामिनी ॥ विराजलीसे राज्यासनीं ॥ महापुण्यांशें तपोखाणी ॥ मैनाकिनी ज्ञानकळा ॥६३॥

शृंगारमुरड उत्तमजन ॥ तेथें भोगीतसे राज्यासन ॥ गज वाजी उदधी रत्न ॥ रथ उष्ट्रादि असती पैं ॥६४॥

छडीदार चोपदार ॥ रत्नपारख हेमकार ॥ राउतपूर्ण भांडार ॥ पोतदार फरासी ॥६५॥

यंत्रधारी मंत्रधारी ॥ नानामंत्री असती कुसरी ॥ शास्त्रनिपुण कारभारी ॥ लेखकही सेवा विराजले ॥६६॥

जासुद हलकारे वकीलात ॥ करुं जाणती सकळ समंतात ॥ पायदळ अश्वराउत ॥ नसे गणित पृतनेतें ॥६७॥

कुत्तेवान चित्तेवान ॥ साकरखाणी पहिलवान ॥ दिवाणादि कपिलखान ॥ गजमस्तकीं रुढती ॥६८॥

खिस्मतगारी करणार ॥ सिकारकी बंडीदार ॥ ताशा मरफी पनवाळ थोर ॥ कुशळपणीं वाजविती ॥६९॥

गायक हेर बातमीदार ॥ खेळक प्राज्ञी निपुणतर ॥ वाद्यधारी शृंगारकर ॥ शिंपी कुल्लाल विराजले ॥७०॥

असो ऐसी राजकारणें ॥ बहुत असती कामें भिन्नें ॥ परी सकळ समुदायकानें ॥ स्त्रिया अवध्या मिरवल्या ॥७१॥

असो अवघ्या कटकांत ॥ संचरते झाले उभयतां नगरांत ॥ राजद्वारी जाऊनि त्वरित ॥ झाले दृष्टीस रायासी ॥७२॥

दृष्टीं पाहतांच अंजनीसुत ॥ स्त्रियांसी आनंद झाला बहुत ॥ बोलावूनि त्वरितात्वरित ॥ कनकासनीं बैसविलें ॥७३॥

एकासनीं मच्छिंद्रनाथ ॥ एकासनीं अंजनीसुत ॥ षोडशोपचारीं पूजूनि त्वरित ॥ बद्धांजली केली तैं ॥७४॥

म्हणे महाराजा दिव्यरथा ॥ वातनंदना अंजनीसुता ॥ द्वितीय कोण सांग आतां ॥ आगमन झालें महाराजा ॥७५॥

येरु म्हणे वो शुभाननी ॥ त्वां बैसूनि तया प्राज्ञी ॥ तरी त्या तपाच्या कामना मनीं ॥ पूर्ण करीं आतां वो ॥७६॥

मम भक्तीचे वरदावळीं ॥ कीं पुरुष लाधशील मच्छिंद्र बळी ॥ तरी तोचि हा होय येणें काळीं ॥ रतिसुखा निववावें ॥७७॥

कीं सेवेलागी उडुगणनाथ ॥ कीं अरुणासह पूर्ण आदित्य ॥ तेवीं तूतें मच्छिंद्रनाथ ॥ काम व्यक्त पुरवावया ॥७८॥

कीं शचीलागीं सहस्त्रनयनी ॥ कीं शोभला जैसा शिव अपर्णी ॥ तेवीं तूतें मच्छिंद्र्मुनी ॥ रतिसुखा हेलावें ॥७९॥

ऐसें बोलोनि वज्रशरीरी ॥ निवांत बैसला आसनावरी ॥ मग राहूनि तेथें तीन रात्रीं ॥ निघता झाला कपिराज ॥८०॥

पुन्हां श्वेतपदा येऊन ॥ करीत बैसला श्रीरामचिंतन ॥ येरीकडे मच्छिंद्रनंदन ॥ सुखामाजी हेलावे ॥८१॥

बैसूनियां कनकासनीं ॥ राज्याविलासा भोगी मुनी ॥ मुक्तमाळा ग्रांवेलागुनी ॥ हेलावती समोर ॥८२॥

हेममुद्रिका ओपूनि कर्णी ॥ हस्त विराजले कनकोंदणी ॥ भरजरी भूषणें हेमकर्णी ॥ ढाळ देती लखलखीत ॥८३॥

पुढें सेवे परिचारिका ॥ परी त्याही दारा लावण्यलतिका ॥ उर्वशीच्या सारुनि आवांका ॥ सेवेलागीं उतरल्या ॥८४॥

वडीजाई बडीदार ॥ वारंवार करिती पुकार ॥ छडीदार चोपदार ॥ दवलतजादा म्हणताती ॥८५॥

मुक्तलवगांचे तुरे माळी ॥ कस्तुरी शोभे केशर भाळीं ॥ राज्यासनीं स्त्रियामंडळी ॥ सुशोभित भंवतालीं ॥८६॥

जैसा नभांत तारांगणीं ॥ वेष्टित शोभला उडुगणस्वामी ॥ तेवीं स्त्रियांत मच्छिंद्र मुनी ॥ निजभारीं शोभला ॥८७॥

कीं देवगणीं शचीनाथ ॥ परम शोभिवंत घवघवीत ॥ तेवीं स्त्रीमंडळींत ॥ मच्छिंद्रनाथ मिरवला ॥८८॥

सदा बैसूनि एका आसनीं ॥ खेळ खेळती द्यूतकर्मी ॥ नाना विनोदून विनोदवाणी ॥ हास्य करिती गदगदां ॥८९॥

राज्यवैभवादि कारभार ॥ स्वयें करिती सारासार ॥ नानाकुशलता अपार ॥ निजदृष्टीं पाहतसे ॥९०॥

रसायनीं कविताकार ॥ वेदज्ञ बोलती शास्त्र अपार ॥ ज्योतिष भविष्य जाणणार ॥ व्याकरणादिक मिरवले ॥९१॥

धनुर्धर युद्धशास्त्री प्रबळ ॥ कीं भिन्न पाहती प्रळयकाळ ॥ जळ तें निर्मील विशाळ ॥ उभे असती सन्मुख ॥९२॥

संगीतकार गायनप्रकारी ॥ गंधर्वसरी तानमानी कळाकुमरी ॥ औषधीक वैद्य रोगापरी ॥ परीक्षिकी मीनले ते ॥९३॥

अश्वारोहण उत्तमयुक्तीं ॥ अश्व फिरवणें वाताकृती ॥ कोकशास्त्र भाष्याकृती ॥ स्वर्गाचाराचे सकळिक ॥९४॥

नाटककळा सकळी शृंगारीत ॥ आणूनि टेंकती राजसंमत ॥ प्रसंगानुसार वाचे वदत ॥ बोलूं जाण ती चातुरी ॥९५।

ऐसिया गुणांचे उत्तम भरत ॥ हेलावती राजसभेत ॥ तेणें चित्तसरितेंत ॥ आनंदतोय हेलावे ॥९६॥

तेणेंकरुनि मच्छिंद्रनाथ ॥ सुखाब्धीचा मीन तळपत ॥ ऐसे लोटले दिवस बहुत ॥ रतिसुखामाझारीं ॥९७॥

तों समयें चित्तसुखमेळीं ॥ ऋतु पावली राजबाळी ॥ ते कामरतीचे सुखवेळीं ॥ गरोदर झाली ते दारा ॥९८॥

तो गणामाजी भद्रजाती ॥ सर्वगुणी मुनी भद्रमूर्ती ॥ अंशरुपें प्रगटूनि रती ॥ देह धरिता पैं झाला ॥९९॥

रेतरक्त जेणें काळीं ॥ लोटत मासां नवांचे मेळी ॥ तदनंतर प्रसून झालिया बाळी ॥ बाळ बालार्क देखिला ॥१००॥

त्यातें भरतां द्वादश दिवस ॥ उत्तमापरी केले बारसें ॥ नाम ठेविलें त्या देहास ॥ मीननाथ म्हणवूनी ॥१॥

याउपरी याचकां देऊनि दान ॥ उचितार्थे सकळ तोषविले जन ॥ नानारत्नीं देऊनी भूषण ॥ गौरवातें मिरविलें ॥२॥

असो ऐसे संगोपनीं ॥ तीन संवत्सर तया स्थानीं ॥ लोटूनि गेलीं सुखासनी ॥ मच्छिंद्रातें भोगितां ॥३॥

यावरी आतां दुसरें कथन ॥ हस्तिनापुरीं कुरुनंदन ॥ जनमेजयाच्या वंशाकारण ॥ बृहद्रवा जन्मला ॥४॥

तो जन्मेजयापासूनि पुढती ॥ सातवा पुरुष वंशाप्रती ॥ दोन सहस्त्र सातशतीं ॥ कली गेलासे लोटूनी ॥५॥

तो बृहद्रवा राजा थोर ॥ राज्यपदी हस्तिनापूर ॥ मेळवूनि महीचे अपार विप्र ॥ सोमयाग मांडिला ॥६॥

एक वरुषें त्या क्षितीं ॥ अग्निकुंडीं पूर्णाहुती ॥ पुष्ट होऊनि दाहकमूर्ती ॥ तुष्ट शरीरीं मिरवला ॥७॥

परी शिवनेत्रींचा प्रळयाग्नी ॥ देणें दाहिले होते पंचबाणी ॥ परी तो गेला होता भक्षुनी ॥ द्विमूर्धनी महाराजा ॥८॥

तो शिवशरीरीं चेतला मदन ॥ जठरीं वाहत होता द्विमूर्धन ॥ तयामाजी जीवित्वप्राण ॥ अंतरिक्ष संचरला ॥९॥

तो अंतरिक्ष महाराज ॥ अग्निजठरामाजी विराजे ॥ तो गर्भ अति तेजःपुंज ॥ यज्ञकुंडीं सांडिला ॥११०॥

पूर्ण होतांचि यज्ञआहुती ॥ शेष प्रसाद मिरवूनी निगुती ॥ मग यज्ञकुंडी विप्राहुती ॥ रक्षा काढी बृहद्रवा ॥११॥

विप्राहातें सलील बाळतेजातें ॥ रक्षा स्पर्शतां लागे हातें ॥ दृष्टी पाहतां बाळातें ॥ मंजुळवत रुदन करी ॥१२॥

तंव तो पुरोहित ज्ञानी द्विज ॥ रायासी म्हणे महाराज ॥ यज्ञकुंडीं तेजःपुंज ॥ बाळ प्रसाद मिरविलें ॥१३॥

प्रत्योदक उचलोनि हातीं ॥ बाळ दावी रायाप्रती ॥ राव पाहोनि तेजस्थिती ॥ परम चित्तीं तोषला ॥१४॥

जैसा जलार्णव मंथन करितां ॥ त्यांत चतुर्दश रत्नें निघतां ॥ मग आनंद न माये सुरवरचित्ता ॥ तैसें झालें बृहद्रव्या ॥१५॥

कीं संजीवनींचा धरुनि अर्थ ॥ कच गेला शुक्रगृहातें ॥ साधूनि येतां संजीवनीतें ॥ शचीनाथ आनंदला ॥१६॥

कीं राम उपजतां कौसल्ये कुशीं ॥ आनंद झाला दशरथासी ॥ तेवीं पाहतां बाळमुखासी ॥ बृहद्रवा आनंदला ॥१७॥

मग पुरोहित विप्रापासुन ॥ निजकरी कवळी अग्निनंदन ॥ परम स्नेहें हदयीं धरुन ॥ घेत चुंबन बाळाचें ॥१८॥

परम उदेला आनंद पोटीं ॥ कीं चंद्रोदयींची ऐक्यभेटी ॥ मग समुद्रपात्रा तोयदाटी ॥ प्रेमलहरी उचंबळे ॥१९॥

वारंवार घेत चुंबन ॥ कीं त्यातें भासे प्रत्यक्ष मदन ॥ परी तो मदनचि व्यक्त पूर्ण ॥ शिवकायेचा प्रगटला ॥१२०॥

कीं सत्त्वगुणी विद्युल्लता ॥ पाळा मांडिला शरीरावरुता ॥ कीं पुनर्विधु प्रसन्न होतां ॥ तेज आपुलें अर्पिलें ॥२१॥

कीं संघांत अपार किरणीं ॥ महीं मिरवला हा उत्तम तरणी ॥ असो ऐसा अपार चिन्ही ॥ वर्णिता ग्रंथ वाढेल ॥२२॥

असो बृहद्रवा लवडसवडीं ॥ अंतःपुरांत जात तांतडी ॥ धर्मपत्नी संसारसांगडी ॥ निजदृष्टीं विलोकी ॥२३॥

नाम तिचें सुलोचना ॥ होय ती प्रत्यक्ष सुलोचना ॥ शुभानना ती देवांगना ॥ महीलागीं उतरली ॥२४॥

कीं प्रत्यक्ष रमा सरस्वती ॥ कीं दिव्य अपर्णेची मूर्ती ॥ उदया आली मायभगवती ॥ कुरुकुळातें तारावया ॥२५॥

जिचे पाहतां चरण ॥ गंगोदक दिसे मळिण ॥ शंतनूसारखें टाकूनि रत्न ॥ शिवमौळी विराजली ॥२६॥

तस्मात् गंगासमान हातीं ॥ देतां अपूर्व लागे गोष्टी ॥ असो तिनें बाळक देखतां दृष्टी ॥ पुसे रायातें आवडीनें ॥२७॥

म्हणे महाराजा विजयध्वजा ॥ करीं कवळिलें कवण आत्मजा ॥ मातें भासें मित्रवोजा ॥ दुसरा तरणी आहे हा ॥२८॥

येरु म्हणे वो शुभाननी ॥ यज्ञकुंडाद्विमूर्धनी ॥ प्रसादरुपें दिधलें तेणें ॥ राजस्तंभीं मिरवावया ॥२९॥

तव उदरीं जो मीनकेत ॥ मनानें वरीं आपुला सुत ॥ तयावरील सकळ हेत ॥ या बाळातें मिरवावा ॥१३०॥

तरी वंशासी मीनकेत ॥ दिव्यस्वरुपा आहे सुत ॥ तयाचा पाठिराखा निश्वित ॥ ईश्वरे हा प्रेरिला ॥३१॥

अगे हा अयोनिसंभव जाण ॥ अवतारदक्ष चिद्रत्न ॥ ज्वाळामाळी होऊनि प्रसन्न ॥ प्रसाद दिधला आपणांसी ॥३२॥

ऐसें वदतां राजभूष ॥ सुलोचना कवळी बाळकंदर्प ॥ तयाचें पाहूनि दिव्यरुप ॥ मोहदीप उजळला ॥३३॥

बाळ हदयीं कवळूनि धरितां ॥ पयोधरीं लोटली पयसरिता ॥ बाळमुखीं स्तन घालितां ॥ पयःपान स्वीकारी ॥३४॥

मग उत्तम करी बाळरीती ॥ स्नानमार्जनादि सारिती ॥ यापरी द्वादश दिनांप्रती ॥ परम सोहळा मांडियेला ॥३५॥

मेळवूनि सुवासिनी ॥ पाळणा घातला योगप्राज्ञी ॥ जालिंदर हें नाम जनीं ॥ सकळां आवडीं ठेविलें ॥३६॥

यज्ञकुंडींचा ज्वाळामाळी ॥ प्रसन्न झाला तेणें काळीं ॥ ज्वाळांत उदेला म्हणूनि सकळीं ॥ नाम जालिंदर स्थापिलें ॥३७॥

ऐशा करुनियां गजरा ॥ ग्रामांत वांटिली गोड शर्करा ॥ अपार धन याचक नरां ॥ लौकिकार्थ वांटिलें ॥३८॥

ऐशिया गजरें पूर्ण राहटी ॥ झाली बहुत दिवसां लोटी ॥ मास संवत्सर पंचवटी ॥ षट् सप्तम लोटले ॥३९॥

यापरी तो बृहद्रवा राणा ॥ अपार पाळिल्या ललना ॥ पुढें योजूनि मौंजीबंधना ॥ यज्ञोपवीत आराधी ॥१४०॥

याउपरी कोणे एके दिवसी ॥ राव विचार करी मानसीं ॥ गृहस्थाश्रमी जालिंदरासी ॥ लग्नविधी उरकाया ॥४१॥

म्हणवूनि आपला पुरोहित ॥ मंत्रि सवें देऊनि त्यातें ॥ उत्तम कुमारी शोधार्थ ॥ महीवरी प्रेरिला ॥४२॥

गुणवंत रुपवंत ॥ सुलक्षणी कुमारी पाहत ॥ मंत्री आणि पुरोहित ॥ देशावरी हिंडती ते ॥४३॥

येरीकडे जालिंदर ॥ राजांगना परम सुंदर ॥ घेऊनिया अंकावर ॥ चुंबन घेती लालसें ॥४४॥

परम स्नेहानें ऊर्ध्वदृष्टी ॥ पाहूनि बोले योगजेटी ॥ धूर्मिण मंत्री मम दृष्टीं ॥ दिसत नाहीं कां माते ॥४५॥

येरी म्हणे पाडसा ऐकें ॥ तुज स्त्री करावया जनकें ॥ पुरोहित आणि मंत्री देखें ॥ पाठविले आहेत बा ॥४६॥

येरु म्हणे स्त्री काये ॥ माता म्हणे बायकोसी म्हणावें ॥ येरु म्हणे मज दावावें ॥ बायका कैशा जननीये ॥४७॥

येरी म्हणे मजसमान ॥ बायको येईल तुजकारण ॥ जैसी मी बा त्याचसमान ॥ तुज बायको येईल कीं ॥४८॥

ऐसी सुलोचना त्यातें वदतां ॥ तो शब्द रक्षूनि आपुल्या चित्ता ॥ बाळांत येऊनि खेळतां खेळतां ॥ बाळांलागीं पुसतसे ॥४९॥

म्हणे गडे हो ऐका एकु ॥ मम तात माता करिती बायकु ॥ तीस कासयासाठीं अर्थकौतुकु ॥ करितां बायकु तें सांगा ॥१५०॥

तंव ते बोलती विचक्षण ॥ बहु शठपणीं बोलती हांसून ॥ जालिंदर बुद्धिहीन ॥ बायकोही कळेना ॥५१॥

मग ते म्हणती मूर्खा ऐक ॥ बायकु म्हणतां संसार निक ॥ विषयसुखाचें पूर्ण भातुक ॥ जगामाजी मिरवीतसे ॥५२॥

विषयसुख म्हणजे काई ॥ सांगती न ठेवता गोवाई ॥ ते ऐकूनि थरारुन जाई ॥ मनीं विचार करीतसे ॥५३॥

अगा जग हें परम अधम ॥ आचरण आचरती परम दुर्गम ॥ जें कां जगाचें उत्पत्तिस्थान ॥ तेचि रमणी रमतात ॥५४॥

तरी आपण करुं नये ऐसें ॥ याचा मनाला सबळ त्रास ॥ ऐसें रचुनि विवेकास ॥ मुलांतूनि निघाला ॥५६॥

माता बोलली मजसमान ॥ कांता मिरवतसे चिद्रत्न ॥ तरी ती कांता मज मातेसमान ॥ वेव्हारा योग्य वाटेना ॥५७॥

तरीही पूर्ण अधर्मराशी ॥ कदा न वर्तू कार्यासी ॥ मग सांडूनि ग्रामधामदारासी ॥ काननांतरीं निघाला ॥५८॥

परी ग्रामद्वारीं ग्रामरक्षक ॥ त्यांनीं जातां पाहिलें बाळक ॥ परी राजनंदन म्हणूनि धाक ॥ हटकावया अंतरले ॥५९॥

परी बुद्धीचा त्यांनी विवेक केला ॥ हेर मागें पाठविला ॥ कोणी जाऊनि त्वरें नृपाला ॥ सांगताती तांतडीनें ॥१६०॥

हे महाराज भुवननाथ ॥ विपिनीं गेला आपुला सुत ॥ रायें ऐसा ऐकूनि वृत्तांत ॥ आला धांवत तांतडीने ॥६१॥

परी तो चपळ विलक्षण ॥ म्हणे कोणी येईल धांवोन ॥ म्हणोनि मार्गातें सोडोन ॥ महाकाननीं रिघाला ॥६२॥

तंव त्या विपिनीं तरुदाटी ॥ विशाळ जाळिया तृण अफाटी ॥ त्यांत संचरतां हेर दृष्टी ॥ चुकुर झाले पाहतां ॥६३॥

परी तो योगेंद्र चपळ बहुत ॥ जातां जातां एक पर्वत ॥ त्याची दरी धरुनि सुत ॥ उत्तरदिशे चालिला ॥६४॥

येरीकडे नृपनाथ ॥ काननीं निघाला शोध करीत ॥ परी शोध लागला दूतस्थानापर्यंत ॥ पुढें शोध लागेना ॥ ॥६५॥

पाहतां परी बहु विपिन ॥ परी जालिंदराचें न पावें दर्शन ॥ जैसा अमावस्येचा दिन ॥ चंद्रभणी लोपतसे ॥६६॥

ऐसें झालें सकळांसी ॥ निराशपणें ग्रामासी ॥ येते झाले झालिया निशी ॥ शोक करितां सकळांनीं ॥६७॥

रायासह अपार जन ॥ पाहती आपुलालें सदन ॥ परी बृहद्रवा आणि सुलोचना ॥ परम अट्टहास करिताती ॥६८॥

बाळलीला खेळ अद्भुत ॥ आठवोनि गातां रुदन करीत ॥ राव म्हणे हा अनुचित ॥ प्रसाद हातींचा पैं गेला ॥६९॥

मातें अग्नि झाला प्रसन्न ॥ अहा माझें कर्म गहन ॥ हातीचें गेले चिद्रत्न ॥ काय करुं उपाय हो ॥१७०॥

अहा बाळक माझें अर्कासमान ॥ तेजरुप वाटे मदन ॥ माता म्हणे खेळ उत्तम ॥ काय वर्णूं तयाचा ॥७१॥

ऐसा करितां अट्टहास ॥ परी आणिक सरदार बुद्धिलेश ॥ रायास सदा बोधी नानाभाष्य ॥ युक्तिप्रयुक्ती करोनियां ॥७२॥

म्हणती राया नरोत्तमा ॥ जालिंदर अयोनिसंभव ॥ तरी हा सेवितां महाकानन ॥ त्यासीं मरण नसेचि ॥७३॥

मही समुद्रवलयांकित ॥ शोध करुं आम्ही निश्वित ॥ परी केव्हां तरी तुमचा सुत ॥ तुम्हां भेटेल महाराजा ॥७४॥

तरी निःसंशयेंकरुन ॥ धैर्यअर्गळी ठेवा मन ॥ ऐशा युक्तीकरुन ॥ रायासी शांत करिताती ॥७५॥

येरीकडे जालिंदर ॥ पर्वतदरीं अतिगुहार ॥ संचरला परी महीवर ॥ काळोखी रात्र दाटली ॥७६॥

तयामाजी झालें विपरीत ॥ विपिनी वणवा लागला बहुत ॥ पुढें तें कानन अग्नि जाळीत ॥ तयापासीं पातला ॥७७॥

तंव त्या दरींत जालिंदर ॥ निद्रें व्यापिला तृण अपार ॥ तों जवळी आला वैश्वानर ॥ तृण भक्षावया कारणें ॥७८॥

तों बाळ गोमटें देखिलें दृष्टीं ॥ विस्मयो करी आपुले पोटीं ॥ हें बाळ मम उदरजेठीं ॥ उदय पावलें होतें कीं ॥७९॥

उत्तम ठाव पाहूनि यातें ॥ सांडिलें होतें म्यां गर्भातें ॥ येथें यावया कारण यातें ॥ कां पडलें न कळे हो ॥१८०॥

मग शांत होऊनि मूर्तिमंत ॥ बाळ त्वरें केला जागृत ॥ अंकीं घेऊनि पुसे त्यातें ॥ कारण काय येथें यावया ॥८१॥

येरु पाहूनि तया आदरें ॥ म्हणे कोण तुम्ही सांगा सत्वर ॥ येरु म्हणे मी वैश्वानर ॥ जननीजनक तुझा मी ॥८२॥

येरु म्हणे जननीजनक ॥ कैसे होतील हरएक ॥ मग तो मुळींहूनि कथा पावक ॥ तयालागीं सांगतसे ॥८३॥

असो आतां वैश्वानर ॥ पुढें पुढती लिहितां पर ॥ ती कथा पुढें धुंडीकुमार ॥ मालू नरहरींचा सांगे की ॥८४॥

स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ एकादशाध्याय गोड हा ॥१८५॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ अध्याय ॥११॥ ओंव्या ॥१८५॥

॥ नवनाथभक्तिसार एकादशाध्याय समाप्त ॥