Skip to main content

चत्वारिंशतितमोऽध्याय:

श्रीगणेशाय नमः

जयजयाजी पंढरीनाथा ॥ पुंडलीकवरदा रुक्मिणीकांता ॥ दीनबंधो अनाथनाथा ॥ पुढें ग्रंथ बोलवीं ॥१॥

मागिलें अध्यायीं रसाळ वचन ॥ तुवां बोलविलें कृपेंकरुन ॥ स्वर्गी चरपटीनाथें जाऊन ॥ इंद्राचा गर्व हरिलासे ॥२॥

हरिहरांची जिंकूनि कोटी ॥ पुढे लोभाची भेटी ॥ गमनकळा नारदहोटीं ॥ प्राप्त झाली महाराजा ॥३॥

उपरी मनिकर्णिकेचें करुनि स्नान ॥ पुढें पातले पाताळभुवन ॥ घेवूनि बळीचा गौरव मान ॥ वामनातें भेटला ॥४॥

भोगावतीची करुनि आंघोळी ॥ पुनः पातला भूमंडळीं ॥ यावरी कथा पुढें कल्होळीं ॥ नवरसातें वाढी कां ॥५॥

असो आतां रमारमण ॥ ग्रंथाक्षरीं बैसला येवून ॥ तरी पुढें श्रोतीं सावधान ॥ कथारस घ्यावा कीं ॥६॥

इंद्र चरपटीनें जिंकला ॥ वैभवें मशकातुल्य केला ॥ तरी तो विस्मयवान खोंचला ॥ खडतरपणीं हदयांत ॥७॥

मग जो गुरु वाचस्पती ॥ परम ज्ञाता सर्वमूर्ती ॥ सहस्त्रनयन तयाप्रती ॥ घेवूनियां बैसलासे ॥८॥

देवमंडळांत सहस्त्रनयन ॥ घेवूनि बैसलासे कनकासन ॥ जैसा नक्षत्रीं रोहिणीरमण ॥ अति तेजें मिरवला ॥९॥

ऐशा रीती पाकशासन ॥ बैसला सेवूनि सभास्थान ॥ मग बृहस्पती विस्मयरत्न ॥ चरपटप्रताप सांगतसें ॥१०॥

अहा वय धाकुटें सान स्वरुप ॥ परी अर्कासमान थोर प्रताप ॥ हरिहरादि करुनि लोप ॥ स्थापूनि गेला आपुलेचि ॥११॥

तरी वाताकर्षणविद्या सबळ ॥ देवदानव झाले निर्बळ ॥ नाथपंथीं हें महाबळ ॥ आतळलें कैसें कळेना ॥१२॥

तरी यातें करुनि उपाय ॥ साध्य करावी इतुकी ठेव ॥ या कर्मासी कोण लाघव ॥ स्वीकारावें महाराजा ॥१३॥

कीं तयाच्या गृहाप्रती जावून ॥ दास्य करावें मनोधर्मे ॥ तोषवूनि सर्व कर्म ॥ महीवरी मिरवावें ॥१४॥

असो यापरी यत्न करुन ॥ भेट घ्यावी त्या गंवसून ॥ परी ते जोगी तीव्रपणें ॥ वर्तताती सर्वदा ॥१५॥

तरी उगलीच घेऊनि सदृढ भेट ॥ अर्थ वदावा तयासी निकट ॥ परी काय चाड आमुची अलोट ॥ कार्यार्थी भीड कोणती ॥१६॥

तरी भिडेचें उपजेपण ॥ उजेड पडेल दासत्वेंकरुन ॥ तयामागें रानोरान ॥ अपार मही हिंडावी ॥१७॥

तरी हिंडल्यानें कोणे काळीं ॥ उदय पावेल कृपानव्हाळी ॥ अमरपुरीची देवमंडळी ॥ तेजोयुक्त होईल ॥१८॥

म्हणाल ऐसें कासयान ॥ हा विपर्यास येईल घडोन ॥ तरी महीं होतो पुण्यपावन ॥ आसन माझें घेतसे ॥१९॥

तरी मी येथें सावधान ॥ करुनि रक्षितों आपुलें आसन ॥ तस्मात् अमरावती सोडून ॥ जाणें नाहीं मजलागीं ॥२०॥

ऐसें बोलतां अमरपती ॥ बोलता झाला वाचस्पती ॥ म्हणे महाराजा नाथाप्रती ॥ येथेंचि आणावे महायत्नें ॥२१॥

तरी तो यत्न म्हणशील कैसा ॥ यज्ञ करावा सोमभासा ॥ त्या निमित्तें नाथ राजसा ॥ घेवोनि यावें स्वर्गासी ॥२२॥

मग तो येथें आल्यापाठी ॥ दावूनि भक्तीची अपार कोटी ॥ मोह उपजवोनि नाथापोटीं ॥ कार्य साधूनि घेइजे ॥२३॥

ऐसें बोलतां तपोद्विज ॥ परम तोषला अमरराज ॥ उपरी म्हणे महाराज ॥ कोणा पाठवूं पाचाराया ॥२४॥

यावरी बोले कचतात ॥ हे महाराज अमरनाथ ॥ मच्छिंद्रपिता अष्टवसूंत ॥ उपरिचर नामें मिरवतसे ॥२५॥

उपरिचर जातां महीतळवटीं ॥ मच्छिंद्राची घेईल भेटी ॥ सांगूनि त्यातें कार्य शेवटीं ॥ मग मच्छिंद्र आम्हां बोधील ॥२६॥

तरी त्यातें पाचारुन ॥ कार्ययज्ञाचा वदूनि काम ॥ विमानयानीं रुढ करुन ॥ पाठवावा महाराजा ॥२७॥

यापरी मच्छिंद्रनाथ ॥ आला असतां अमरपुरींत ॥ गौरवोनि तुवां त्यातें ॥ तुष्टचित्तीं मिरवावा ॥२८॥

तरी शक्ति तव सरितालोट ॥ मच्छिंद्र उदधिपोट ॥ संगमिता पात्र अलोट ॥ प्रेमतोय भरलें असे ॥२९॥

तरी सुमुखाचें पडतां जळ ॥ कार्यशुक्तिकामुक्ताफळ ॥ तूतें ओपील तपोबळ ॥ नवनाथ आणोनियां ॥३०॥

मग तो मुक्त अविंधविधी ॥ लावी भक्तीच्या शस्त्रास्त्रसंधीं ॥ मग तें रत्न कर्णविधीं ॥ स्वीकारी कां महाराजा ॥३१॥

ऐसे ऐकूनि गुरुवचन ॥ परम तोषला सहस्त्रनयन ॥ मग रथीं मातली पाठवोन ॥ उपरिचरा पाचारी ॥३२॥

उपरिचर येतां वदे त्यातें ॥ म्हणे महाराजा कामना मनांत ॥ उदेली करुं सोममखातें ॥ पूर्ण करीं आतां तूं ॥३३॥

तरी विमानयानीं करोनि आरोहण ॥ जाऊनियां मच्छिंद्रनंदन ॥ उपरी त्यातें सवें घेऊन ॥ जावें नवनाथमेळीं ॥३४॥

मग ते आर्या भावार्थित ॥ मेळवोनि आणी अमरपुरींत ॥ सोममखाचें सकळ कृत्य ॥ तया हस्तें संपादूं ॥३५॥

अवश्य म्हणे वसुनाथ ॥ तत्काळ विमानयानीं बैसत ॥ बद्रिकाश्रमी मच्छिंद्रनाथ ॥ लक्षूनियां पातला ॥३६॥

तों गोरक्ष धर्मनाथ ॥ चौरंगी कानिफा गोपीचंद राजसुत ॥ बद्रिकाश्रमी जालंधर अडबंगीनाथ ॥ तीर्थस्नानीं ऐक्यमेळा झाला असे ॥३७॥

ऐशा समुदायांत मच्छिंद्रनाथें ॥ अवचटपणीं देखिला ताते ॥ मग उठोनि मौळी चरणातें ॥ समर्पीत महाराजा ॥३८॥

मग नाथ वसु भेटून ॥ बैसला सकळांमध्यें वेष्टून ॥ म्लानवाणीं कार्यरत्न ॥ अमरांचें सांगतसे ॥३९॥

म्हणे महाराज हो शक्रापोटीं ॥ अर्थ उदेला मखकोटी ॥ तरी आपण नवही जेठी ॥ साह्य व्हावें कार्यार्था ॥४०॥

बहुतांपरी करुनि भाषण ॥ सर्वांचे तुष्ट केलें मन ॥ उपरी मच्छिंद्रातें बोधून ॥ अवश्यपणीं वदविलें ॥४१॥

मग जालंदर कानिफा चौरंगी ॥ मच्छिंद्र गोरक्ष अडबंगी ॥ गोपीचंद रायादि अन्य जोगी ॥ आरुढ झाले विमानीं ॥४२॥

गौडबंगाली हेलापट्टण ॥ प्रविष्ट झालें तैं विमान ॥ राव गोपीचंद मातेसी भेटून ॥ समागमें घेतली ॥४३॥

उपरी विमानयानी होऊन ॥ पहाते झाले वडवालग्राम तेथून ॥ तेथें वटसिद्धनागनाथ पाहून ॥ आरुढ केला विमानीं ॥४४॥

तेथूनि भर्तरीचें करुनि काम ॥ विमान चालविती इच्छिल्या व्योमें ॥ तों गौतमतीरीं नाथ उत्तम ॥ जती भर्तरी अवतरला असे ॥४५॥

यापरी तीर्थ करितां महीपाठीं ॥ महासिद्ध जो नाथ चरपटी ॥ अवंतीसी होता ताम्रपर्णीकांठीं ॥ सवें घेतला महाराजा ॥४६॥

तेणें पुण्यमान देशी विटग्राम नामानें ॥ पहाते झाले विमानयानें ॥ तेथें रेवणसिद्ध बोधून ॥ आरुढ केला विमानीं ॥४७॥

असो नवनाथ परिवारासहित ॥ ते विमानयानीं झाले स्थित ॥ चौर्‍यायशीं सिद्धांसमवेत ॥ अमरपुरीं पातले ॥४८॥

विमान येतां ग्रामद्वारी ॥ सामोरा आला वृत्रारी ॥ परम गौरवोनि वागुत्तरीं ॥ चरणांवरी लोटला ॥४९॥

सकळां करोनि नमनानमन ॥ नेत सदना सहस्त्रनयन ॥ आपुल्या आसनीं बैसवोन ॥ षोडशोपचारें पूजिले ॥५०॥

नवनाथां पाहोनि सकळ अमर ॥ मनीं संतोषले अपार ॥ तेज पाहोनियां गंभीर ॥ उभे तेथें ठाकलें ॥५१॥

मग हवनकृत्य मनकामना ॥ वदतां झाला सकळ जनां ॥ म्हणे महाराजा कवणे स्थाना ॥ सिद्ध अर्थ अर्थावा ॥५२॥

मग वाचस्पति आणि मच्छिंद्रनाथ ॥ म्हणती सुरवरपाळा ऐक मात ॥ सिंहलद्वीपीं स्थान अदभुत ॥ यज्ञ तेथें करावा ॥५३॥

अटव्य कानन आहे तुमचें ॥ शीतळ छायाभरित जळाचें ॥ तेथें न्यून साहित्याचें ॥ पडणार नाहीं कांहींच ॥५४॥

उपरिचरन वसु गंधर्व घेऊन ॥ पाहत झालें अटव्यवन ॥ तेथें यज्ञसाहित्य आहुती करुन ॥ यज्ञ आरंभ मांडिला ॥५५॥

दंपत्य बैसोनि सहस्त्रनयन ॥ मंत्रप्रयोगीं बृहस्पती आपण ॥ यज्ञ आहुती नवही जण ॥ स्वाहा म्हणोनि कुंडीं टाकिती ॥५६॥

परी किलोतळेचे सीमे आंत ॥ अटव्यवन होते अदभुत ॥ यज्ञ होतां मीननाथ ॥ मच्छिंद्रातें आठवला ॥५७॥

मग पाचारोनि उपरिचर तात ॥ मच्छिंद्र म्हणे जी वसु समर्थ ॥ सिंहलद्वीपीं मीननाथ ॥ कवण ग्रामीं ठेविला ॥५८॥

येरु म्हणे त्याच्या ग्रामसीमेंत ॥ अटव्यवन हें विख्यात विराजित ॥ तरी कीलोतळेसहित मीननाथ ॥ पाचारितों आतांचि ॥५९॥

मग उपरिचर वसु प्रत्यक्ष जाऊन ॥ मीननाथासह कीलोतळारत्न ॥ पाचारुनि एक क्षण ॥ भेटी केली उभयतां ॥६०॥

परम स्नेहानें क्षण एक कांहीं ॥ वाहवले मोहप्रवाही ॥ उपरी दारा सुत तया ठायीं ॥ मच्छिंद्रानें ठेविले ॥६१॥

चौरंगी आणि अडबंगीनाथ ॥ मिरवीत बैसविले समुदायांत ॥ यज्ञआहुती तयांचे हस्तें ॥ स्वीकारीत महाराजा ॥६२॥

दहा नाथ यज्ञआहुती ॥ प्रवाहीं चाले मच्छिंद्रजती ॥ पुत्रमोह धरुनि चित्तीं ॥ अभ्यासातें बैसविला ॥६३॥

अभ्यास करितां मीननाथ ॥ वाचस्पती शक्रासी बोलत ॥ म्हणे महाराजा यज्ञार्थ ॥ तुम्ही बैसतां सरेना ॥६४॥

तरी दंपत्यार्थ उपरिचरवसु ॥ बैसवोनि पहावा अर्थ सुरसु ॥ ऐसे बोलतां प्राज्ञ विशेषु ॥ अमरपाळ समजला ॥६५॥

मग हातींचें सोडूनि यज्ञकंकण ॥ वसुहाती केलें स्थापन ॥ मग न्यूनपणें बहुतां प्रार्थून ॥ निजदृष्टीं विलोकी ॥६६॥

सर्व पदार्थ आणवोनि आपण ॥ अंगें झिजवी शचीरमण ॥ उदकपात्र सांगतां जाण ॥ सिद्ध होय पुढारी ॥६७॥

खाद्य भोज्य षड्रस अन्न ॥ करें आणीतसे पात्रीं वाढून ॥ शेवटीं शिणले तयाचे चरण ॥ निजहस्तीं चुरीतसे ॥६८॥

ऐसी सेवा करितां संपन्न ॥ तुष्ट होतसे जतीचे मन ॥ हदयीं भाविती यावरुन ॥ प्राणसांडी करावी ॥६९॥

येरीकडे मीननाथ ॥ सुतासी विद्या अभ्यासीत ॥ तो समय जाणोनि सापेक्ष ॥ इंद्र मयूरवेषें नटलासे ॥७०॥

निकटतरुशाखेवरती ॥ विद्या अभ्यासीत गुप्तपंथीं ॥ तों अकस्मात वातास्त्र जपती ॥ वाताकर्षण लाधलें ॥७१॥

दैवें सर्व तपराहटी ॥ सकळ लाधली हातवटी ॥ उपरी वाताकर्षणविद्या पाठीं ॥ वातप्रेरक अस्त्र लाधलें ॥७२॥

ऐसी विद्या होतां सघन ॥ परम हरुषला सहस्त्रनयन ॥ परी एक संवत्सर होतां यज्ञ ॥ अभ्यासीत तंववरी ॥७३॥

असो हवनअर्पण आहुती ॥ मग पावूनि पूर्ण समाप्ती ॥ मग मच्छिंद्रनाथ प्राज्ञिक जती ॥ अग्रपूजे बैसला ॥७४॥

मग पूजा करोनि सांगोपांग ॥ उपरी दशमनाथें पूजिलें अंग ॥ वस्त्रभूषणें चांग ॥ देऊनिया गौरविलें ॥७५॥

सकळां बैसवोनि कनकासनीं ॥ उभा राहिला जोडीनि पाणी ॥ सर्वासी वदे म्लानवदनीं ॥ नाथ वचन माझें परिसा ॥७६॥

मातें घडला एक अन्याय ॥ परी आपण सहन करा समुदाय ॥ म्यां मयूरवेष धरुनि मायें ॥ अभ्यासिलें विद्येतें ॥७७॥

मीनजतीचा प्रताप गहन ॥ मज सांपडलें विद्यारत्न ॥ तरी आपुला वर त्यातें देऊन ॥ सनाथपणीं मिरवावें ॥७८॥

ऐसें बोलतां अमरनाथ ॥ सर्वासी समजलें तस्करीकृत्य ॥ मग ते कोपोनि परम चित्तांत ॥ शापवचन बोलताती ॥७१॥

म्हणती इंद्रा तूं कृत्रिम ॥ आणिलें ठकवावया कारण ॥ तरी चोरुनि घेतलें विद्यारत्न ॥ निष्फळ होईल तुजलागीं ॥८०॥

ऐसें बोलता सकळ जती ॥ मग उपरिचर वसु वाचस्पती ॥ गौरवोनि अपार युक्तीं ॥ तुष्ट केलें चित्तांत ॥८१॥

म्हणती महाराजा शापमोचन ॥ पुढें बोला कांहीं वचन ॥ मग ते बोलती तयाकारण ॥ तप आचरावें इंद्रानें ॥८२॥

द्वादश वर्षे तप आचरितां ॥ विद्या फळेल तत्त्वतां ॥ परी नाथपंथी छळ न होतां ॥ पदरावरी पडेल ॥८३॥

ऐसें बोलोनि सकळ जती ॥ विमानारुढ झाले समस्ती ॥ खाली उतरुनि महीवरती ॥ नाना तीर्थे भ्रमताती ॥८४॥

ऐसें भ्रमण करितां जती ॥ तीर्थे झालीं अपरिमिती ॥ याउपरी कीलोतळेतें मच्छिंद्रजती ॥ पुसोनिया चालिला ॥८५॥

मग तें कीलोतळेचें नमन ॥ अवर्ण्य आहे अनुष्ठान ॥ नेत्रीं प्रेमबिंदु आणोन ॥ बोळविलें नाथासी ॥८६॥

सवें घेऊनि मीननाथ ॥ विमानयानी झाले समस्त ॥ खालीं उतरुनि मृत्युमहींत ॥ नाना तीर्थे पाहिलीं ॥८७॥

हेलापट्टणीं मैनावती ॥ पोहोंचवोनि तीर्थे हिंडती ॥ तेव्हां मीननाथें तीर्थक्षितीं ॥ सिद्ध तीन निर्मिले ॥८८॥

तयांचें सांगितलें पूर्वी नाम ॥ आतां सांगावया नाहीं काम ॥ असो सिद्धकटकासह उत्तम ॥ तीर्थे करीत भ्रमताती ॥८९॥

येरीकडे अमरनाथ ॥ लक्षूनियां सह्याद्रिपर्वत ॥ द्वादश वरुषें तप निश्चित ॥ तीव्रपणी आचरला ॥९०॥

परी तें आचरितां तीव्रपणीं ॥ मंत्रप्रयोगें सोडी पाणी ॥ तेणें सरिता लोट लोटोनी ॥ भीमरथीतें भेटली ॥९१॥

तें मणिकर्णिकेचे जीवन ॥ आणिलें होतें कमंडलू भरोन ॥ परी इंद्रहस्तीं प्रवाही होऊन ॥ इंद्रायणीं पडियेलें ॥९२॥

ऐसें तप करोन ॥ स्वस्थानासी इंद्र जाऊन ॥ उपरी नवनाथ करितां तीर्थाटन ॥ बहुत दिवस लोटले ॥९३॥

शके सत्राशें दहापर्यंत ॥ प्रकटरुपें मिरवले नाथ ॥ मग येऊनि आपुले स्थानांत ॥ गुप्तरुपें राहिले ॥९४॥

मठींत राहिला कानिफाजती ॥ उपरी मछिंद्रासी मायबाप म्हणती ॥ जानपीर जो जालंदर जती ॥ गर्भागिरीं नांदतसे ॥९५॥

त्याहूनि खालतां गैबीपीर ॥ तो गहनीनाथ परम सुंदर ॥ वडवानळ ग्रामीं समाधिपर ॥ नागनाथ असे कीं ॥९६॥

वीटग्रामीं मानवदेशांत ॥ तेथें राहिले रेवणनाथ ॥ चरपट चौरंगी अडबंगी तीर्थ ॥ गुप्त अद्यापि करिताती ॥९७॥

भर्तरी राहिला पाताळभुवनीं ॥ मीननाथ गेला स्वर्गालागोनी ॥ गिरनार पर्वतीं गोरक्षमुनी ॥ दत्ताश्रमीं राहिला ॥९८॥

गोपीचंद आणि धर्मनाथ ॥ ते स्वसामर्थ्ये गेले वैकुंठांत ॥ विमान पाठवोनि मैनावतीतें ॥ घेऊनि विष्णु गेलासे ॥९९॥

पुढें चौर्‍यायशीं सिद्धांपासून ॥ नाथपंथ मिरवला अतिसामर्थ्यानें ॥ येथूनि चरित्र झालें संपूर्ण ॥ सर्व नाथांचें महाराजा ॥१००॥

तरी आतां सांगतों मुळापासून ॥ कथा वर्तली कवण ॥ प्रथमाध्यायीं गणपतिस्तवन ॥ सुंदरपणीं मिरवले ॥१॥

उपरी सांगूनि रेताक्षिती ॥ आणि मच्छिंद्राची जन्मस्थिती ॥ तो बद्रिकाश्रमाप्रती ॥ तपालागीं बैसला ॥२॥

या प्रसंगाचें श्रवण पठण ॥ नित्य करितां भावेंकरुन ॥ तरी समंधबाधा घरांतून ॥ जाईल वासूनी महाराजा ॥३॥

द्वितीय अध्यायीं अत्रिनंदन ॥ विद्यार्णव केला अनुग्रह देऊन ॥ उपरी नागपत्रीं अश्वत्थी जाऊन ॥ सिद्धयर्थकळा साधिली ॥४॥

तो अध्याय करितां नित्य पठण ॥ अपार धन लाभेल संसारी जाण ॥ विजयलक्ष्मी पाठीं बैसून ॥ करील हरण दरिद्र ॥५॥

तृतीय अध्यायीं मच्छिंद्र मारुती ॥ युद्धा प्रवर्तले श्वेतक्षितीं ॥ युद्ध करुनि उपरांतीं ॥ ऐक्यचित्त झालें असे ॥६॥

याचें झालिया पठण ॥ शत्रु होतील क्षीण ॥ मुष्टिविद्यासाधन ॥ तया होत सर्वथा ॥७॥

मुष्टिबाधा झाली असोन ॥ अपकार होईल तियेने ॥ मुर्तिमंत मारुती करोनि रक्षण ॥ राहे तया घरीं सर्वदा ॥८॥

चतुर्थ अध्यायीं वदली कथा ॥ अष्टभैरव चामुंडा समस्ता ॥ रणीं जिंकूनि वसुसुता ॥ ज्वालामुखी भेटली ॥९॥

तो अध्याय नित्यपठण करितां ॥ चुकेल कपटाची बंधनव्यथा ॥ शत्रु पराभवोनि सर्वथा ॥ निरंतर शांति मिरवेल ॥११०॥

पांचवे अध्यायींचे कथन ॥ भूतें घेतलीं प्रसन्न करुन ॥ अष्टपती जिंकून ॥ विजयी झाला मच्छिंद्र ॥११॥

ती कथा नित्य करिता पठण ॥ भूतसंचार नोहे त्या घराकारण ॥ आले असतां जाती सोडोन ॥ परम त्रासेंकरोनियां ॥१२॥

सहाव्या अध्यायांत ॥ शिवअस्त्र कालिका मच्छिंद्रनाथ ॥ युद्ध करुनि प्रसन्नचित्त ॥ वश्य झालीं अस्त्रें ती ॥१३॥

तो अध्याय नित्य करितां पठण ॥ शत्रूलागीं पडेल मोहन ॥ निष्कपट तो करुनि मन ॥ किंकर होईल द्वारींचा ॥१४॥

सातव्या अध्यायीं अपूर्व कथा ॥ जिंकूनि वीरभद्र केली ऐक्यता ॥ उपरी स्वर्गापासाव मच्छिंद्रनाथा ॥ इच्छेसमान झालीसे ॥१५॥

ती कथा नित्य गातां ऐकतां ॥ लिप्त नोहे त्रौर्‍यायशींची व्यथा ॥ झाली असेल मिटेल सर्वथा ॥ चिंत्ता व्यथा हरतील ॥१६॥

जखीणभयापासुनी ॥ त्वरित मुक्त होईल जनीं ॥ एक मंडळ त्रिकालीं अभ्यासूनी ॥ फलप्राप्ति घेइजे ॥१७॥

आठव अध्यायीं सकळ कथन ॥ पाशुपतरायासी रामदर्शन ॥ रणीं मित्रराज जिंकोन ॥ केला प्रसन्न विद्येसीं ॥१८॥

तो अध्याय नित्य गातां ऐकतां ॥ आपुला सखा देशावरता ॥ तो गृहासी येऊन भेटेल तत्त्वतां ॥ चिंताव्यथा हरेल कीं ॥१९॥

नववे अध्यायीं कथन ॥ गोरक्षाचा होऊनि जन्म ॥ उपरी सेवूनि बद्रिकाश्रम ॥ विद्यार्णव झालासें ॥१२०॥

तो अध्याय नित्य गातां ऐकतां ॥ साधेल विद्या इच्छिल्या अर्था ॥ ब्रह्मज्ञान रसायण कविता ॥ चवदा विद्या करोनि राहे ॥२१॥

दशम अध्यायीचें कथन ॥ स्त्रीदेशीं मच्छिंद्रनंदन ॥ अंजनीसुतअर्थी पाठवोन ॥ अर्थ किलोतळेचे पुरविले ॥२२॥

एकांतीं बैसूनि अनुष्ठान ॥ संजीवनी पाठ करी गौरनंदन ॥ गहिनीनाथाचा झाला जन्म ॥ कर्दमपुतळा करितां तो ॥२३॥

तो अध्याय करितां पठण ॥ स्त्रियांचे दोष जातील कपटपण ॥ फळे वाचतील होतां जाण ॥ जगीं संतती मिरवेल ॥२४॥

उपरी गृहद्रव्याच्या यज्ञांत ॥ उदय पावला जालिंदरनाथ ॥ तो एकादश अध्याय पठण करितां नित्य ॥ अग्निपीडा होईना ॥२५॥

आणि जयाचे धवळारात ॥ पूर्वीचा कांहीं दोष असत ॥ तो जाऊनि संपत्तिविशेषातें ॥ संततीसह भोगील कीं ॥२६॥

बाराव्यांत हें कथन ॥ जालिंदरें गुरु केला अत्रिनंदन ॥ उपरी कानिफाचा होऊनि जन्म ॥ विटंबिले देवांसी ॥२७॥

तो अध्याय करितां पठण ॥ क्षोभ न पावे कोणी देवता जाण ॥ क्षोभित असल्या होतील शमन ॥ सुख सर्व त्याचि देती ॥२८॥

तेराव्या अध्यायांत ॥ मैनावतीतें प्रसन्न नाथ ॥ होऊनि केलें अचल सनाथ ॥ ब्रह्मरुपीं आगळी ॥२९॥

तरी तो अध्याय करितां पठण ॥ स्त्रीहत्येचें दोष सघन ॥ त्यांचे होऊनि सकळ निरसन ॥ उद्धरील पूर्वजां चतुर्दश ॥१३०॥

चतुर्दश अध्यायीं कथन ॥ गर्तेत जालिंदर गोपीचंदानें ॥ स्त्रीबोलें घातले नेऊन ॥ गुप्त निशीमाझारी ॥३१॥

तो अध्याय पठण करितां ॥ असेल बंध कारागृहीं व्यथा ॥ तरी त्याची होईल मुक्तता ॥ निर्दोष जनीं वर्तेल ॥३२॥

पंचदशांत सुढाळ कथन ॥ कानिफामारुतीचे युद्धकंदन ॥ उपरी स्त्रीराज्यांत जाऊन ॥ आतिथ्य पूर्ण भोगिलें ॥३३॥

तो अध्याय गातां ऐकता नित्य ॥ घरचे दारचे कलह नित्यकृत्य ॥ शांति पावोनि सर्व सुखांत ॥ निर्भयपणें नांदेल ॥३४॥

सोळावे अध्यायांत ॥ कानिफा भेटला गोपीचंदातें ॥ तरी तो अध्याय वाचितां नित्यानित्य ॥ दुःस्वप्नातें नाशील ॥३५॥

सप्तदश अध्यायीं कथन ॥ जालिंदर काढिला गर्तेतून ॥ उपरी नाथाची दीक्षा घेऊन ॥ गोपीचंदें अर्चिला ॥३६॥

तोचि अध्याय पठण करितां ॥ योग साधेल योग आचरतां ॥ दुष्टबुद्धि जाईल सर्वथा ॥ सुपंथपंथा लागेल तो ॥३७॥

अष्टादश अध्यायीं कथन ॥ बद्रिकाश्रमी गोपीचंद जाऊन ॥ तपःपूर्ण भगिनी उठवोन ॥ तीव्रपणीं आचरला ॥३८॥

तो अध्याय नित्य पठण करितां ॥ ब्रह्महत्या नासेल सर्वथा ॥ पूर्वज कुंभीपाकीं असतां ॥ सुटका होईल तयांची ॥३९॥

एकोणिसाव्यात गोरक्षाकारण ॥ भेटला मारुति श्रीरामप्रीतीने ॥ तरी तो अध्याय करितां पठण ॥ तया मोक्षार्थ साधेल कां ॥१४०॥

तिसाव्यात अदभुत कथन ॥ श्रीमाच्छिंद्रा भेटीचे कारण ॥ गोरक्ष स्त्रीराज्यांत जाऊन ॥ स्नेहसंपन्न जाहला ॥४१॥

तो अध्याय पठण करितां गोड ॥ लागलें असेल अत्यंत वेड ॥ तरी ती चेष्टा जाऊनि धड ॥ होऊनि प्रपंच आचरेल ॥४२॥

एकविसाव्यांत स्त्रीराज्यांतून ॥ मच्छिंद्रासी काढिलें गोरक्षनंदनें ॥ नानापरी बोधूनि मन ॥ दुष्टकर्मातें निवटिलें ॥४३॥

तो नित्य अध्याय पठण करितां ॥ नासेल बहुजन्माची गोहत्या ॥ निष्कलंक होऊनि चित्ता ॥ तपोलोकीं मिरवेल ॥४४॥

बाविसाव्यांत सोरटीग्रामी ॥ गोरक्षें मीननाथा मारोनी ॥ पुन्हां उठविला मंत्रेंकरोनी ॥ मच्छिंद्रमोहेंकरुनियां ॥४५॥

तरी तो अध्याय नित्य पठण करितां ॥ पुत्रांर्थिया पुत्र तत्त्वतां ॥ तो होईल विद्यावंत ॥ विद्वज्जना मान्य कीं ॥४६॥

तेविसाव्यांत रसाळ कथन ॥ मच्छिंद्र गोरक्ष गर्भाद्री जाऊन ॥ सुवर्णविटेकरितां सुवर्ण ॥ गर्भगिरि केला असे ॥४७॥

आणिक केला तेथें उत्सव ॥ तरी तो अध्याय पठण नित्य भावे ॥ करितां घरीं सुवर्ण नव ॥ अखंड राहे भरोनि ॥४८॥

चोविसाव्यांत भर्तरीनाथ ॥ जन्मोनि आला आवंतिकेंत ॥ तरी तो अध्याय पठण करितां नित्य ॥ बाळहत्या नासेल ॥४९॥

बाळहत्या जन्मांतरी ॥ तेणें समस्त वांझ होती नारी ॥ तरी ते नासेल संसारीं ॥ सुखी होऊनि बाळ वांचे ॥१५०॥

पंचविसाव्यात गंधर्व सुरोचन ॥ रासभ झाला शापेंकरुन ॥ तरी तो अध्याय केलिया पठण ॥ शापवचन बाधेना ॥५१॥

आणि मानवाविण दुसरा जन्म ॥ होणार नाही तयाकारण ॥ आरोग्य काया पतिव्रता कामिन ॥ पुत्र गुणी होईल ॥५२॥

सव्विसावे अध्यायांत ॥ गणगंधर्व झाला विक्रमसुत ॥ आणि विक्रम भर्तरीसुत ॥ एकचित्त ॥ भेटी होऊनि राहिले ॥५३॥

तो अध्याय करितां पठण ॥ गोत्रहत्या जाति नासून ॥ पोटीं पाठीं शत्रुसंतान ॥ न राहे होऊनियां ॥५४॥

सत्ताविसाव्यांत अदभुत कथन ॥ राज्यपदी बैसला राव विक्रम ॥ भर्तरी पिंगलेचें होऊनि लग्न ॥ दत्तानुग्रह लाधला ॥५५॥

तरी तो अध्याय करितां पठण ॥ पदच्युत पावेल पूर्वस्थान ॥ गेली वस्तु पुनः परतोन ॥ सांपडेल तयांची ॥५६॥

अट्ठाविसाव्या अध्यायांत ॥ पिंगलेकरितां स्मशानांत ॥ विरक्त होऊनि भर्तरीनाथ ॥ पूर्ण तप आचरला ॥५७॥

तो अध्याय करितां श्रवण पठण ॥ त्या भाविकाचें होईल लग्न ॥ कांता लाभेल गुणवान ॥ सदा रत सेवेसी ॥५८॥

एकुणतिसावे अध्यायींचे चरित्र ॥ भर्तरी होऊनि विरक्त पवित्र ॥ गोरक्ष सांगती अत्रिपुत्र ॥ गुरुनाथ पै केला ॥५९॥

तो अध्याय नित्य करितां पठण ॥ सुटेल क्षयरोगापासून ॥ आणि त्रितापांची वार्ता जाण ॥ कालत्रयीं घडेना ॥१६०॥

तिसाव्या अध्ययांत ॥ जन्मला चौरंगीनाथ ॥ परी तें चरित्र पठण करितां ॥ तस्करी दृष्टी बंधन होय ॥६१॥

एकतिसाव्यांत चौरंगीनाथ ॥ तपा बैसला हिमालयांत ॥ तरी तो अध्याय पढतां ॥ कपटमंत्र न चालती ॥६२॥

बत्तिसाव्यांत सुगम कथन ॥ मच्छिंद्र त्रिविक्रमदेहीं संचरोन ॥ द्वादश वर्षे राज्य करोन ॥ रेवतीसी पुत्र दिधला ॥६३॥

त्या अध्यायाचें करितां पठण ॥ अयुष्य असतां देहाकारण ॥ गंडांतरें करुं येतील विघ्नें ॥ आपोआप टळतील कीं ॥६४॥

तेहतिसाव्यांत गौरनंदन ॥ वीरभद्राचा घेऊनि प्राण ॥ मच्छिंद्रशव स्वर्गाहून ॥ महीवरती उतरिलें ॥६५॥

तरी ती कथा करितां पठण ॥ धनुर्वाताचें निरसे विघ्न ॥ झालेल्यातें होतां श्रवण ॥ पीडा हरेल तयाची ॥६६॥

चौतिसाव्यांत रेवणजन्म ॥ होऊनि भेटला अत्रिनंदन ॥ सहज सिद्धिकळा दावून ॥ गेला असे महाराजा ॥६७॥

तरी ती कथा करितां पठण ॥ जाणें कोणत्याही कार्याकारण ॥ तो सिद्धार्थ साधेल कार्यसाधन ॥ यश घेऊन येईल तो ॥६८॥

पस्तिसाव्यांत पूर्ण कथन ॥ रेवण झाला विद्यावान ॥ दत्तकृपें स्वर्गी जाऊन ॥ बाळें आणिलीं विप्राचीं ॥६९॥

तरी ती कथा करितां पठण ॥ महासिद्ध येईल उदराकारण ॥ बेचाळिसांचें करुनि उद्धरण ॥ गातील आख्यान लोक परी ॥१७०॥

छत्तिसाव्यांत अपूर्व कथा ॥ जन्म झाला वटसिद्धनाथा ॥ आस्तिक ऋषि झाला ताता ॥ तयाचिये मातेसी ॥७१॥

ती कथा करितां श्रवण पठण ॥ सर्पवृश्चिक दंश जयाकारण ॥ झालिया विषाचें उत्तीर्ण ॥ श्रवण केलिया अध्याय तो ॥७२॥

सदतिसाव्या अध्यायांत ॥ नागनाथासी गुरु झाला अत्रिसुत ॥ उपरी विद्याबळें मच्छिंद्रनाथ ॥ जिंकियेले भिडोनी ॥७३॥

ती कथा करितां श्रवण पठण ॥ सदना न लागे कुशीलपण ॥ लागल्या त्याचें होईल बंधन ॥ विद्यावंत होऊनियां ॥७४॥

अडतिसाव्यांत चरपटीचा जन्म ॥ होऊनि दत्तात्रेयें दीक्षा देऊन ॥ विद्येमाजी करुनि संपन्न ॥ तीर्थावली धाडिला ॥७५॥

तरी ती कथा सुरस ॥ श्रवण पठण होतां त्यास ॥ हिंवताप मधुरा नवज्वरास ॥ शांति होईल सर्वस्वीं ॥७६॥

एकूणचाळिसाव्यांत कथा ॥ चरपटीनें जिंकिलें अमरनाथा ॥ हरिहरादि देवां समस्तां ॥ स्वर्गी ख्याती लाविली ॥७७॥

तरी तो अध्याय करितां पठण ॥ तो युद्धां जातां तपोधन ॥ शस्त्रबाण पावोन ॥ जय घेऊन येईल कीं ॥७८॥

यावरी चाळिसाव्यांत कथन ॥ सर्व नाथांतें पाकशासन ॥ स्वर्गी नेऊनि करी हवन ॥ विद्यार्थिरुपें अर्थ पुरविला ॥७९॥

तरी चाळिसावा नित्य पठण करितां ॥ लाभेल सर्व इच्छिल्या अर्था ॥ यश श्री ऐश्वर्य योग्यता ॥ पुत्रपौत्रीं नांदेल ॥१८०॥

एकुणचाळिसांचा फलार्थ ॥ तोचि प्राप्त तदर्थ ॥ कीं चाळिसावा एक परिस ॥ कीं कामधेनु कल्पतरु ॥८१॥

गोरक्ष बोलतो वाचेकरुन ॥ त्यातें असत्य मानील जन ॥ जो निंदक यातें दावील निंदून ॥ तो अधिकारी विघ्नांचा ॥८२॥

इहलोकीं परलोकीं ॥ राहणार नाहीं परम सुखी ॥ निर्वश पावोनि शेवटीं वंशीं ॥ पिचेल ग्रंथ निंदितां हा ॥८३॥

अगा हा ग्रंथ नोहे भक्तिसार ॥ आहे गोरक्षाचा किमयागार ॥ परी पालटोनि भाषांतर ॥ महाराष्ट्र अक्षरीं रेखिला ॥८४॥

म्हणोनि श्रोते हो भाविक जन ॥ सोडोनि द्या कीं निंदावचन ॥ विश्वासपर स्वार होऊन ॥ मोक्षमुक्काम करी कीं ॥८५॥

तरी हा ग्रंथ संग्रह करुन ॥ चमत्कार पाहावा पठण करुन ॥ हे चाळीस प्रसंग मंत्रनिर्वाण ॥ महासिद्धीचे असती कीं ॥८६॥

हे चाळीस मंत्र परोपकारी ॥ आहेत दुःखाची करतील बोहरी ॥ तरी संग्रह करुनि उगलेचि घरी ॥ ठेवा विश्वास धरुनियां ॥८७॥

ह्या चाळीस अध्यायांत मंत्रयंत्र ॥ सुखकारक असती अति पवित्र ॥ दुःखदरिद्रहरण सर्वत्र ॥ गोरक्षकानें निर्मिलें ॥८८॥

पठण करितां षण्मासमिति ॥ जो अध्याय ज्या कार्याप्रति ॥ तें कार्य होईल निःसंशय चित्तीं ॥ पठण करुनि पहावें ॥८९॥

याउपरी वाचितां न ये जरी ॥ तरी संग्रह करुनि ठेवावा घरीं ॥ नित्य वंदितां नमस्कारीं ॥ कार्य त्यांतचि घडेल ॥१९०॥

एक कुसुम झोंकूनि वरती ॥ चला म्हणावें मम कार्याप्रति ॥ नवनाथ वंदूनि उक्ति ॥ नमस्कार करावा ॥९१॥

ऐसा याचा आहे मार्ग ॥ करुनि पहावा चमत्कार चांग ॥ नवनाथ ओडवोनि अंग ॥ कार्य तुमचें करितील कीं ॥९२॥

तरी असो विजय संपत्ती ॥ नांदो श्रोत्याच्या गृहाप्रति ॥ धुंडिसुत हेंचि प्रार्थी ॥ मालू नरहरी देवाते ॥९३॥

शके सत्राशें एकेचाळीस ॥ प्रमाथीनाम ज्येष्ठ मास ॥ शुक्लपक्ष प्रतिपदेस ॥ ग्रंथ समाप्त जाहला ॥९४॥

तरी ओंव्या सर्व नेमस्त ॥ सप्तसहस्त्र सहाशत ॥ उपरी ऐसे देदीप्यवंत ॥ ओंव्या मंत्र असती ह्या ॥९५॥

अध्याय वाचावया न बनेल ज्यासी ॥ तरी अध्यायांतील एक ओंवीसी ॥ पठण करुनि नाथनामासी ॥ कार्यकाज करावें ॥९६॥

असो आतां बहु भाव ॥ श्रोते असोत चिरंजीव ॥ इहलोकीं परलोकीं ठेव ॥ आनंदाची होतसे ॥९७॥

तरी समस्त नाथांतें धुंडीसुत ॥ मालू नरहरि हेंचि विनवीत ॥ कीं श्रोते असोत सुखरुपवंत ॥ सर्व अर्थी सर्वदा ॥९८॥

स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ चत्वारिंशतितमाध्याय गोड हा ॥१९९॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ अध्याय ४० ॥ ओंव्या १९९ ॥

॥ नवनाथभक्तिसार चत्वारिंशतितमोऽध्याय समाप्त ॥

॥ नवनाथांचा श्लोक ॥

गोरक्षजालंदरचर्पटाश्च अडबंगकानीफमछिंदराद्याः ।

चौरंगिरेवाणकभर्तिसंज्ञा भूम्यां बभूवुर्नवनाथसिद्धाः ॥

॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥