अष्टमोऽध्याय:
श्रीगणेशाय नमः
ॐ नमोजी गुरुराया ॥ भवच्छेदका पळवीं माया ॥ श्रीज्ञानेश्वरा सदयहदया ॥ मम किंचित नाम मिरविशी ॥१॥
अघा हे ज्ञानदिवटी ॥ आम्हा साधकां जे दिठी ॥ मिरवला आहेसी पूर्णकोटी ॥ हिनकारक महाराजा ॥२॥
तरी मागिले अध्यायीं कथन ॥ विधियुक्त वीरभद्र केला प्रसन्न ॥ आणि स्वर्गवासातें भोगून ॥ महीलागीं मच्छिंद्र उतरला ॥३॥
आणि वज्रावटिके वज्रभगवती ॥ तोपविलें स्नानाप्रती ॥ उष्णोदकीं भोगावती ॥ जगामाजी मिरविली ॥४॥
यापरी द्वारका करुनि तीर्थ ॥ गोमतीं स्नानविधी यथार्थ ॥ करुनियां द्वारकानाथ ॥ प्रसन्न चित्तीं आगळा ॥५॥
त्यावरी आला आयोध्येस ी ॥ तरी श्रोतिया कथा परियेसीं ॥ स्नान करुनि शरयूतीरासी ॥ रामदर्शना जातसे ॥६॥
तों पशुपतराव तया ग्रामीं ॥ रामवंशांत पराक्रमी ॥ तो देवालयीं पूजेलागुनी ॥ आला होता संभारें ॥७॥
अपार सैन्य जें भोंवती ॥ सदनीं तुरंगमें रावती ॥ छत्रचामरें कळसदीप्ती ॥ लाजविती मानूतें ॥८॥
वाजी गज यांचे रंग आणिक ॥ तेहीं चपळ अलोलिक ॥ वाताकृती लक्ष एक तयाभोंवते फिरताती ॥९॥
सकळ वाजी श्रृंगारयुक्त ॥ जडित पाखरा हाटकवत ॥ रत्नकोंदणीं हार लखलखीत ॥ कीं नक्षत्रमणी मिरविले ॥१०॥
त्यांतही झळकत झालरीयुक्त ॥ गुणीं ओविले अपार मुक्त ॥ कोणी विराजत गंगावत ॥ शुभ्रतेजीं मिरवले ॥११॥
ग्रीवे माळा रत्नवती ॥ हाटकासी जे ढाळ देती ॥ रत्न नोहे तेजगभस्ती ॥ चमूलागी मिरवला ॥१२॥
पदीं पैंजण रुणझुणती ॥ कीं वीरांची वीरश्री वाचे वदती ॥ कीं शत्रुगणींच्या अपार पंक्ती ॥ ब्रीद म्हणती विभांडूं ॥१३॥
ऐशियापरी वाजी ते हौसे ॥ कीं चिंतल्या ठायीं दाविती वास ॥ अतिवातचपळगतीस ॥ सर सर म्हणती माघारा ॥१४॥
अगा ते वाजी न म्हणूं महीचे ॥ कीं इंदुबंधुरत्न उदधीचे ॥ विशाळ शुक्तीकापात्र अब्धीचें ॥ मुक्त करुनि आणिले ते ॥१५॥
याचकनीती विकासूनि अवनीं ॥ हत्ती मिरवती पृतनेलागुनी ॥ विशाळ गंडस्थळ दंतकदनी ॥ चूडे सुवर्ण मिरवलें ॥१६॥
हाटक व्यक्त त्यां भूषण ॥ हौदे अंबारिया देदीप्यमान ॥ कीं पृतनामहीचे नग ते पूर्ण ॥ भावनीं ऐसें पाहे कां ॥१७॥
अपार सैन्य बहु संभार ॥ पाहतां उचलिले जे गिरिवार ॥ कीं पर्वत माथां तरुशृंगार ॥ तैशा पताका गजपृष्ठीं ॥१८॥
एकाहूनि एक अधिक ॥ महारथी ते युद्धकामुक ॥ दहा सहस्त्र रायासवें लोक ॥ युद्धकामुक असती ॥१९॥
परी युद्धशास्त्री चतुर सुगम ॥ कीं परशक्तीस देती दम ॥ ऐसे प्रतापीक स्तोम ॥ इंद्रसुखा आगळे कीं ॥२०॥
पायीचें पायदळ अपार ॥ वस्त्राभरणीं मंडिताकार ॥ छडीदार आणि चोप दार ॥ जासूद हलकारे मिरवती ॥२१॥
हेमभूषणीं मुक्तमाळा ॥ सकळ पाइकां झळकती गळां ॥ जडितरत्नीं अति तेजाळा ॥ हेमालंकार करकमळीं ॥२२॥
दाहीं अंगुळीं मुद्रिका गहन ॥ हेममुक्तें ते मिरवती श्रवण ॥ पहातेपणीं राणीवपण ॥ भार पडेल लोकातें ॥२३॥
असो ऐशी अपार संपत्ती ॥ मिरवला पाशुपत अयोध्यापती ॥ ते सकळ दाटी देवळाभोंवतीं ॥ राजीराजीने मिरवली ॥२४॥
त्यांत श्रीरामदर्शनाकारण ॥ जाता झाला योगद्रुम ॥ परी ते द्वारपाळ परम ॥ नाथालागीं बोलत ॥२५॥
परम पाप संचल्या तुंबळ ॥ तेव्हां मिरवे द्वारपाळ ॥ प्रथम धर्मालागी काळ ॥ अधर्मपरी मिरवतसे ॥२६॥
त्या धर्मद्वारींचे म्हणती श्वान ॥ ते द्वारपाळ द्वाररक्षण ॥ आपण बुडुनि यजमाना ॥ बुडवूं पाहती निश्वयें ॥२७॥
महानष्ट जातां समोर ॥ कदा न म्हणती लहानथोर ॥ न भांड चित्तीं परम निष्ठुर ॥ वाचे कठोर बोलती ॥२८॥
सप्तजन्म तस्करनीती ॥ शत ब्रह्महत्या जया घड ती ॥ तेव्हां तो पावे द्वारपाळ क्षितीं ॥ धर्मविनाश रायाचा ॥२९॥
ऐसियेपरी द्वारपाळ ॥ राजद्वारीं असती सकळ ॥ मच्छिंद्र जातां उतावेळ ॥ हटकूनि डंभ केली असे ॥३०॥
तीव्र वाचे बोलती वचन ॥ म्हणती कान फाडूनि बुद्धिहीन ॥ कोठें जासी तांतडीनें ॥ मतिमंदा हे मूर्खा ॥३१॥
हे भ्रष्टा तूतें कैसें कळेना ॥ कीं राव आला आहे दर्शना ॥ त्यात तूं जासी बुद्धिहीना ॥ सर परता माघारा ॥३२॥
ऐसें म्हणूनि निष्ठुर वचन हातीं ॥ लोटिलें मच्छिंद्रनाथाप्रती ॥ येणेंकरुनि परम चित्तीं ॥ विक्षेपातें पावला ॥३३॥
परी तो सर्वज्ञ संतापासी ॥ विवेक अर्गळा घाली त्यासी ॥ तो म्हणे सेवकांसीं ॥ संवाद करणें विहित नव्हे ॥३४॥
पतिस्वाधीन पतिव्रता ॥ कीं पात्रसोई वाहे सरिता ॥ तेवीं बुद्धि करुनि पाशुपता ॥ सेवक सेवा आव्हानिती ॥३५॥
कीं सुईमागें गुंतो जातां ॥ कीं मित्रामागें रश्मी येतां ॥ तदनुबुद्धि पाशुपता ॥ सेव क सेवा आव्हानिती ॥३६॥
कीं रत्नामागे सकळकळा ॥ माउलीसवें आव्हानूं बाळा ॥ तदनुबुद्धि अयोध्यानृपाळा ॥ सेवक सेवा आव्हानिती ॥३७॥
कीं माळी मळ्याचा योजूनि पंथ ॥ सयुक्त सोडी उदक आंत ॥ तदनुबुद्धि पाशुपत ॥ सेवक सेवा आव्हानिती ॥३८॥
ऐसिये शब्दां सदगुणवाणी ॥ बोधी सकळां विवेकखाणी ॥ बंधनीं निर्मूनि विक्षेप मनाचे चरणीं ॥ घालितां झाला महाराज ॥३९॥
परी बुद्धिप्रकरण ॥ अणिक सुचले तयाकारण ॥ कीं सेवकांतें काय बोलून ॥ शिक्षा देऊं राजातें ॥४०॥
एक राव आर्हाटितां ॥ संपूर्ण सेवकां दाटे व्यथा ॥ जेवीं गवसनी मित्रा घालितां ॥ रश्मी आतुडती सहजचि ॥४१॥
शरीरीं कोठें घालितां घाय ॥ परी सर्वोपरी दुःख होय ॥ तदनुशिक्षा योजितां राया ॥ दुःख मिरवी घृतनेते ॥४२॥
ऐसें योजूनि मच्छिंद्रनाथ ॥ भस्मचिमुटी कवळी हाता ॥ स्पर्शास्त्रमंत्रप्रयुक्ता ॥ रामनामीं जल्पला ॥४३॥
येरीकडे पाशुपत ॥ देवा बद्धांजुळी होऊनि प्रणत ॥ रामासन्मुख दंडवत ॥ महीं मस्तक ठेवीतसे ॥४४॥
तों स्पर्श मग येऊनि निकट ॥ करिता झाला अंगीं झगट ॥ झगट होतां महीपाठ ॥ भाळा सहज झालीसे ॥४५॥
राव उठूं पाहे क्षणीं ॥ परी सुदृढ युक्त न सोडी मेदिनी ॥ भाळपदादी उभयपणीं ॥ महीयुक्त झालीं तीं ॥४६॥
करितां यत्न बहुतांपरी ॥ परी विभक्त नोहे कदा धरित्री ॥ बहु श्रमला नानापरी ॥ उपाय कांहीं चालेना ॥४७॥
मग बोलावूनि सेवकमंत्री ॥ वृत्तांत सांगे झाल्यापरी ॥ म्हणे कदा न सोडी धरित्री ॥ व्यक्त झाली सर्वस्वें ॥४८॥
परी मंत्री बुद्धिमंत ॥ एकटाचि तेव्हां बाहेर येत ॥ सेवकां पुसे रळी मात ॥ कोणी कोणातें झाली कां ॥४९॥
मनांत म्हणे कोणी जाती ॥ आला असेल नगराप्रती ॥ गांजिल असेल राजदूतीं ॥ म्हणून क्षोभला असेल तो ॥५०॥
मग त्यातें क्षोभ न येतां ॥ क्षोभ वरिला श्रीभगवंता ॥ तयाचे साधू जगीं छळितां ॥ क्रोध नावरे देवासी ॥५१॥