Skip to main content
पडताळणी प्रलंबित

शिवलीलामृत अध्याय दहावा

श्रीगणेशाय नमः ॥

कामगजविदारकपंचानना । क्रोधजलदविध्वंसप्रभंजना । मदतमहारका चंडकिरणा । चंद्रशेखरा वृषभध्वजा ॥ १ ॥

मत्सरदुर्धरविपिनदहना । दंभनगच्छेदका सहस्रनयना । अहंकारअंधकासुरमर्दना । धर्मवर्धना भालनेत्रा ॥ २ ॥

आनंदकैलासनगविहारा । निगमागमवंद्या सुहास्यवक्त्रा । दक्षमखदलना आनंदसमुद्रा । ब्रह्मानंदा दयानिधे ॥ ३ ॥

नवमाध्यायाचे अंती । उद्धरिला शबर सिंहकेतनृपती । यावरी सूत शौनकादिकांप्रती । नैमिषारण्यी सांगत ॥ ४ ॥

आनर्तदेशी वास्तव्य करीत । एक द्विज नामे देवरथ । वेदाध्ययनी शास्त्ररत । पंडित आणि वंशज होय ॥ ५ ॥

त्याची कन्या चातुर्यखाणी । शारदानामे कमलनयनी । जिचे स्वरूप देखोनी । जन होती तटस्थ ॥ ६ ॥

तव ते झाली द्वादशवर्षी । पित्याने लग्न करूनि संभ्रमेसि । पद्मनाभ द्विजासी । देता झाला विधियुक्त ॥ ७ ॥

तोही परम अधीत ब्राह्मण । सभाग्य आणि वेदसंपन्न । जयाची विद्या पाहोन । राजे होती तटस्थ ॥ ८ ॥

लग्नसोहळा जाहलियावरी । काही दिवस होता श्वशुरघरी । सायंकाळी नदीतीरी । संध्यावंदनासी तो गेला ॥ ९ ॥

परतोन येता अंधार । पायास झोंबला दुर्धर विखार । तेथेच पडिले कलेवर । नगरात हाक जाहली ॥ १० ॥

मातापितासमवेत । शारदा धावोनि आली तेथ । गतप्राण देखोनि प्राणनाथ । शरीर घालीत धरणीवरी ॥ ११ ॥

म्हणे विद्याधनाचे सतेज । आजि बुडाले माझे जहान । वोस पडली सेज । बोलो गुज कोणासी ॥ १२ ॥

माझे बुडाले भांडार । सर्परूपे वरी पडला तस्कर । दग्ध झाली आभरणे समग्र । म्हणोनि टाकी तोडोनिया ॥ १३ ॥

देखोनि शारदेची करुणा । अश्रु आले जनांचियां नयना । म्हणती अहा पशुपते भाललोचना । हे आता करील काय ॥ १४ ॥

मग त्या विप्राचे करूनि दहन । माता पिता बंधु आप्त जन । शारदेस संगे घेऊन । सदनाप्रती गेले ते ॥ १५ ॥

कित्येक दिवस जाहलियावरी । घरची कार्यास गेली बाहेरी । शारदा एकली मंदिरी । तव एक अपूर्व वर्तले ॥ १६ ॥

नैधृव नामे ऋषीश्वर । वृद्ध तपस्वी गेले नेत्र । शिष्य हाती धरोनि पवित्र । सदना आला शारदेच्या ॥ १७ ॥

शारदा आसन देऊनि सत्वर । पूजन करोनि करी नमस्कार । नैधृव म्हणे सौभाग्य वाढो अपार । हो तुज पुत्र वेदवक्ता ॥ १८ ॥

विप्रास न दिसे केवळ अंध । अमोघ वदला आशीर्वाद । हासोनि शारदा करी खेद । शोक करी दुःखभरे ॥ १९ ॥

म्हणे हे अघटित घडे केवी पूर्ण । सांगितले पूर्ववर्तमान । नैधृव म्हणे माझे वचन । असत्य नोहे कल्पांती ॥ २० ॥

माझे जिव्हेबाहेर आले । ते माघारे न सरे कदाकाळे । माझे तपानुष्ठान वेगळे । अघटित तेचि घडवीन ॥ २१ ॥

घरींची बाहेरूनि आली त्वरित । माता पिता बंधु समस्त । समूळ कळला वृत्तान्त । म्हणती विपरीत केवि घडे ॥ २२ ॥

ऋषीचा आशीर्वाद अमोघ पवित्र । क्षणे रंकाचा करी सहस्रनेत्र । शापे न लगता क्षणमात्र । कुळासहित संहारित ॥ २३ ॥

शापबळेचि विशेष । सर्प केला राजा नहुष । यादवकुळ निःशेष । भस्म झाले ब्रह्मशापे ॥ २४ ॥

ब्राह्मणी क्षोभोनि निर्धारी । शक्राची संपत्ति घातली सागरी । ब्रह्मशापे मुरारी । अंबऋषीचे जन्म घेत ॥ २५ ॥

विधिहरिहर चित्ती । ब्रह्मशापाचे भय वाहती । विप्रशापे राव परीक्षिती । भस्म झाला क्षणार्धे ॥ २६ ॥

जमदग्नीचा क्रोध परम । चौघे पुत्र केले भस्म । स्त्रिया असता पांडुराजसत्तम । भोग नाही सर्वदा ॥ २७ ॥

विप्रशापाची नवलगती । साठ सहस्र सगर जळती । कुबेरपुत्र वृक्ष होती । नारदशापेकरोनिया ॥ २८ ॥

कृष्णासहित यादवकुळ । ब्रह्मशापे भस्म झाले सकळ । दंडकाऐसा नृपाळ । क्षणमात्रे दग्ध केला ॥ २९ ॥

ब्रह्मशाप परम दृढ । नृगराज केला सरड । धराधरशत्रु बळ प्रचंड । सहस्र भगे त्या अंगी ॥ ३० ॥

क्षयरोगी केला अत्रिनंदन । मेदिनीवसनाचे केले आचमन । शाप देवोनि सूर्यनंदन । दासीपुत्र केला पै ॥ ३१ ॥

पाषाणाचे करिती देव । रंकाचेही करिती राव । मंत्राक्षता टाकिता नवपल्लव । कोरड्या काष्ठा फुटेल की ॥ ३२ ॥

ब्राह्मण थोर त्रिजगती । हे ब्रह्मांड मोडोनि पुन्हा घडती । यावरी नैधृव तियेप्रती । बोलता झाला ते ऐका ॥ ३३ ॥

म्हणे ऐके शारदे यथार्थ । तू धरी उमामहेशव्रत । षडक्षर मंत्र विधियुक्त । नित्य जप करावा ॥ ३४ ॥

म्हणे या व्रताचे फळ होय पूर्ण । तंववरी मी येथेचि राहीन । मग त्याच्या अंगणात मठ करून । राहता झाला नैधृव तो ॥ ३५ ॥

म्हणे व्रताचा आरंभ प्रेमेसी । करावा जाण चैत्रमासी । अथवा मार्गशीर्षेसी । शुद्धपक्षी करावा ॥ ३६ ॥

पाहोनि सुमुहूर्त सोमवार । अष्टमी चतुर्दशी परिकर । पूजावा उमामहेश्वर । एक संवत्सर नेमेसी ॥ ३७ ॥

गुरुवचन शारदा ऐकोन । तैसेच करी न पडे न्यून । नैधृवगुरूपासून । षडक्षर मंत्र घेतला ॥ ३८ ॥

दिव्य शिवमंदिर करून । वरी दिधले शुभ्रवितान । चारी स्तंभ शोभायमान । नानाफळे शोभताती ॥ ३९ ॥

अष्टगंधे सुवाससुमने । भूमि शोधूनि रंगमाळा आस्तरणे । षोडशवर्ण यंत्रकरणे । अष्टदळे तयामाजी ॥ ४० ॥

तयामाजी चतुर्दळ । त्यावरी घालोनि तांदुळ । वरी घट स्थापून अढळ । शोभा बहुत आणिजे ॥ ४१ ॥

उमामहेश प्रतिमा दोन्ही । स्थापिजे सुवर्णाच्या करोनी । मग एकनिष्ठा धरूनी । षोडशोपचारी पूजिजे ॥ ४२ ॥

यथासांग ब्राह्मण-संतर्पण । सुवासिनी पूजिजे प्रीतीकरून । षड्रस चतुर्विध अन्न द्यावे भोजन तृप्तीवरी ॥ ४३ ॥

पुराणश्रवण कीर्तन । येणेच करावे जागरण । गुरुवचनी विश्वास पूर्ण । धरूनि वर्तणे सर्वदा ॥ ४४ ॥

कुंदेंदुवर्ण केवळ । कर्पूरगौर पयःफेनधवल । ज्योतिर्मय शुभ्र तेजाळ । रजतवर्ण निर्मळ जो ॥ ४५ ॥

सूर्यकोटिसम तेज विराजित । शुभ्र आभरणी भूषित । जगदानंदकंद गुणातीत । स्वधुनी विराजित मस्तकी ॥ ४६ ॥

शुभ्र जटामुकुटमंडित । सर्प मणियुक्त विराजित । किशोरचंद्र भाळी मिरवत । भस्मचर्चित शुभ्र दिसे ॥ ४७ ॥

उन्मीलित भाललोचन । केयूरांगद शुभ्र वीरकंकण । मुंडमाळा शोभायमान । दिसती लोचन सूर्येंदुवत ॥ ४८ ॥

दिव्य गरुडपाचूहूनि वरिष्ठ । विराजमान दिसे नीलकंठ । दशभुज आयुधे सघट । झळकती प्रळयचपळेऐसी ॥ ४९ ॥

खट्वांग त्रिशूळ कपाल डमरू । अंकुश पाश घंटा नागधरू । पिनाक पाशुपत कमल तेजाकारू । शुभ्रवर्ण आयुधे ॥ ५० ॥

शुभ्र तेजस्वी शार्दूलचर्मवसन । शुभ्र स्फटिकवर्ण गजाजिन । मणिमय शुभ्र सिंहासन । नाना रत्ने विराजित ॥ ५१ ॥

कैलासगिरी शुभ्रवर्ण । वरी मंडप शुभ्र सहस्रयोजन । स्तंभविरहित सहस्रकिरण । गगनी जेवी प्रकाशे पै ॥ ५२ ॥

ऐरावताहूनि विशाळ शुभ्र । पुढे शोभे नंदिकेश्वर । मणिमय कुंडले सुंदर । शेष तक्षक झळकती ॥ ५३ ॥

ब्रह्मानंदसुख मुरोन । ओतिले शिवस्वरूप सगुण । आता भवानीचे ध्यान । शारदा ध्यानी आणीत ॥ ५४ ॥

बाला तन्वंगी सुंदर । विराजमान चंद्रशेखर । चतुर्भुज पाशांकुशधर । गदापद्मयुक्त जे ॥ ५५ ॥

सुरतरुसुमनमालायुक्त । मल्लिकाबकुळ कमळी विराजित । इभमुक्तावतंस डोलत । शोभा अद्भुत कोण वर्णी ॥ ५६ ॥

हरिमध्या भुजंगवेणी । जलजवदना आकर्णनयनी । द्वादशादित्यशोभा जघनी । कांची वरी झळकतसे ॥ ५७ ॥

मागे स्त्रिया वर्णिल्या बहुत । निःसीमरूपलक्षणयुक्त । ओवाळूनि टाकाव्या समस्त । तीच्या पादांगुष्ठावरूनी ॥ ५८ ॥

कोटिमन्मथशोभा साजिरी । त्रिभुवनजननी त्रिपुरसुंदरी । ब्रह्मांड फोडोनिया वरी । आगीचा सुवास धावत ॥ ५९ ॥

पदमुद्रा जेथे उमटती । तेथे आरक्त कमळे उगवती । द्विजपंक्तीचा रंग पडता क्षिती । खडे होती दिव्यमणी ॥ ६० ॥

या ब्रह्मांडमंडपात देख । ऐसे स्वरूप नाही आणिक । शशि मित्र द्विमुख । जिच्या तेजे शोभती ॥ ६१ ॥

विधिशक्रादि बाळे अज्ञान । स्नेहे निजगर्भी करी पाळण । समस्त त्रिभुवन लावण्य । ओतिले स्वरूप देवीचे ॥ ६२ ॥

विशाळ ताटंके प्रभाघन । ओतिली शशिमित्रतेज गाळून । गंडस्थळी प्रभा पूर्ण । पडली झळके अत्यंत ॥ ६३ ॥

बिंबाधर अतिरिक्त । नासिकीचे वरी डोलता मुक्त । प्रवाळचि केवळ भासत । तेज अमित न वर्णवे ॥ ६४ ॥

नेत्रांजनप्रभा पडली मुक्तशिरी । तो गुंजेऐसे दिसे क्षणभरी । जगन्माता हास्य करी । तो रंग दिसे शुभ्र मागुती ॥ ६५ ॥

ओळीने बैसल्या हंसपंक्ती । तैसे द्विज हासता झळकती । मुक्त शुभ्रवर्ण मागुती । हैमवतीचे झळकती ॥ ६६ ॥

दंतपंक्ती शुभ्र अत्यंत । अधरप्रभेने आरक्त भासत । डाळिंबबीज पक्व शोभत । क्षणैक तैसे दीसती ॥ ६७ ॥

कंठीचे मुक्ताहार संपूर्ण । दिसती इंद्रनीळासमान । श्यामलांगप्रभा देदीप्यमान । मुक्तांमाजी बिंबली ॥ ६८ ॥

कमंडलु तेजस्वी सुंदर । तेवी विश्वजननीचे पयोधर । कुमार आणि इभवक्त्र । ज्यांतील अमृत प्राशिती ॥ ६९ ॥

प्रळयचपळा गाळोनि समग्र । रंगविले वाटे देवीचे अंबर । मुक्तालग कंचुकी प्रभाकर । बाहुभूषणे झळकती ॥ ७० ॥

इंद्रनील कीलवर्णी । लीलावेषधारिणी । भक्तानुग्रहकारिणी । प्रलयरूपिणी आदिमाता ॥ ७१ ॥

आदिपुरुषाची ज्ञानकळा । घडी मोडी ब्रह्मांडमाळा । जिचे स्वरूप पाहता डोळा । जाश्वनीळा धणी न पुरे ॥ ७२ ॥

कृत्तिकापुंज झळके गगनी । तैसे जलजघोस डोलती कर्णी । अरुणसंध्यारागा उणे आणी । कुंकुमरेखा आरक्तपणे ॥ ७३ ॥

विश्वप्रलयी शिव सगुणपण । टाकोनि होता तत्काळ निर्गुण । परी तिचे सौभाग्य गहन । ताटंककुंकुममहिमा हा ॥ ७४ ॥

दोन वेळा वरिले कर्पूरगौरा । भवानीने लाविला कपाळी बिजवरा । तांबूलरेखांकित वदनचंद्रा । अपार कवि वर्णिती ॥ ७५ ॥

प्रयागी त्रिवेणी जैसी । अंबेची वेणी शोभे तैसी । कृष्णवर्ण कुरळ निश्चयेसी । आदित्यनंदिनी होय ते ॥ ७६ ॥

शुभ्र हार गुंफिला दिव्यसुमनी । तेचि ब्रह्मांडावरूनि स्वर्धुनी । माजी आरक्तपुष्पे दिसती नयनी । पद्मजनंदिनी गुप्त ते ॥ ७७ ॥

मूदराखडी मच्छकच्छादि अलंकार । हे प्रयागी तळपती जळचर । केशाग्रीं गुच्छ विशाळ थोर । सागराकार शोभती ॥ ७८ ॥

काये ब्रह्मांडे गुंफिली सकळ । तेचि डोलत मोहनमाळ । जीव शिव दोन्ही स्तन तेजाळ । आवरोनि धरिले दोन पक्षी ॥ ७९ ॥

अक्षय सौभाग्य नव्हे खंडन । म्हणून वज्रचूडमंडित कर जाण । दशांगुळी मुद्रिका बंधु जनार्दन । दशावतार नटलासे ॥ ८० ॥

पायी नेपुरे पैंजण । गर्जता शिव समाधि विसरून । पाहे मुखचंद्र सावधान । नेत्रचकोरेकरूनिया ॥ ८१ ॥

भक्ते जे का एकनिष्ठ । पायी दोल्हारे जोडवी अनुवट । ऐसे स्वरूप वरिष्ठ । शारदा ध्यात ब्रह्मानंदे ॥ ८२ ॥

ऐसे एक संवत्सरपर्यंत । आचरली उमामहेश्वरव्रत । नैधृव उद्यापन करवीत । यथाविधिप्रमाणे ॥ ८३ ॥

अकरा शते दंपत्य । वस्त्रअलंकार दक्षिणायुक्त । पूजोनि शारदा हर्षभरित । तव रवि अस्त पावला ॥ ८४ ॥

जप ध्यान कीर्तन करीत । शारदा गुरुजवळी बैसत । अर्धयामिनी झालिया अकस्मात । भवानी तेथे प्रगटली ॥ ८५ ॥

असंभाव्य तेज देखोनि । नैधृवासी नेत्र आले तेच क्षणी । नैधृव शारदा लागती चरणी । प्रेमभावे करूनिया ॥ ८६ ॥

देवीचे करिती स्तवन । उभे ठाकती कर जोडून । परी त्या दोघावाचून । आणिक कोणी न देखती ॥ ८७ ॥

जय जय भवानी जगदंबे । मूळप्रकृति प्रणवस्वयंभे । ब्रह्मानंदपददायिनी सर्वारंभे । चिद्विलासिनी तू माये ॥ ८८ ॥

धराधरेंद्रनंदिनी । सौभाग्यसरिते हेरंबजननी । भक्तहृदयारविंदचिन्मयखाणी । वेदपुराणी वंद्य तू ॥ ८९ ॥

तुझिये कृपे निश्चिती । गर्भांधासी नेत्र येती । मागे सांडून पवनगती । पांगुळ धावती कृपे तुझ्या ॥ ९० ॥

मुके होती वाचाळ । मूर्ख पंडित होती तत्काळ । रत्ने होती सिकताहरळ । गारा होती चिंतामणी ॥ ९१ ॥

भवभयहारके भवानी । भक्तपालके मनोल्हासिनी । वेदमाते द्विजजनरंजनी । वेधले ध्यानी ब्रह्मादिक ॥ ९२ ॥

त्रिपुरसुंदरी त्रिभुवनजननी । दोषत्रयहारके त्रितापशमनी । त्रिकाळ जे सादर तव ध्यानी । त्रिदेहविरहित ते ॥ ९३ ॥

शिवमानससरोवरमराळिके । जय जय विज्ञानचंपककळिके । सकळ ऐश्वर्यकल्याणदायके । सर्वव्यापके मृडानी ॥ ९४ ॥

ऐसे ऐकता सुप्रसन्न । देवी म्हणे माग वरदान । नैधृवे वृत्तांत मुळीहून । शारदेचा सांगितला ॥ ९५ ॥

मम मुखांतून वचन आले । ते अंबे पाहिजे सत्य केले । तुवा जरी मनी धरिले । तरी काय एक न करिसी ॥ ९६ ॥

यावरी शिवजाया बोले वचना । हे शारदा पूर्वी शुभानना । द्रविडदेशी विप्रकन्या । नाम भामिनी इयेचे ॥ ९७ ॥

इच्या भ्रतारासी स्त्रिया दोघीजणी । ही धाकुटी प्रिया मृदुभाषिणी । इणे वर वश करोनी । वडील कामिनी विघडविली ॥ ९८ ॥

शेजारी एक जार होता । तो ईस बहुत दिवस जपत असता । एकान्त पाहोनि इच्या हाता । धरिता झाला दुर्बुद्धी ॥ ९९ ॥

इणे नेत्र करोनि आरक्त । झिडकारिला तो जार पतित । मग तो होवोनि खेदयुक्त । गृहासी गेला दुरात्मा ॥ १०० ॥

इचे त्यास लागले ध्यान । सुरत आलिंगन आठवून । इच्या ध्यासेकरून । तो जार मृत्यु पावला ॥ १०१ ॥

ईस विधवा हो म्हणून । इच्या सवतीने शापिले दारुण । मग तीही पावली मरण । इच्या दुःखेकरूनिया ॥ १०२ ॥

मग हेही काळे मृत्यु पावली । तेचि शारदा हे जन्मली । पूर्वीच्या जारे ईस वरिली । ये जन्मी जाण निधरे ॥ १०३ ॥

तोचि पद्मनाभ ब्राह्मण । गेला इसी दावा साधून । इचा पूर्वजन्मीचा भ्रतार जाण । द्रविडदेशी आहे आता ॥ १०४ ॥

तीनशेसाठ योजन । येथोनि दूर आहे तो ब्राह्मण । स्त्रीहीन इचे स्वरूप आठवून । तळमळीत सर्वदा ॥ १०५ ॥

तो ईस स्वप्नामध्ये नित्य येवोन । भोग देईल प्रीतीकरून । जागृतीहूनि विशेष जाण । सुख होईल इयेते ॥ १०६ ॥

ऐसे लोटता बहुत दिवस । पुत्र एक होईल शारदेस । शारदानंदन नाम तयास । लोकी विख्यात जाण पा ॥ १०७ ॥

ईस नित्यभोगी होईल जो हरिख । तैसाच विप्र पावेल सुख । स्वप्नानंदे विशेष देख । तृप्ति होईल निर्धारे ॥ १०८ ॥

ऐसे तयासी सांगोन । अंबा पावली अंतर्धान । त्यावरी शारदा नित्य स्वप्न । देखती झाली तैसेचि ॥ १०९ ॥

तव ती झाली गरोदर । जन निंदा करिती समग्र । दीर भावे सासू श्वशुर । आप्त सोयरे सर्व आले ॥ ११० ॥

देवीचे करणे अघटित । खदखदा जन हासत । म्हणती हे केवी घडे विपरीत । अंबा ईस भेटली कधी ॥ १११ ॥

एक म्हणती कर्ण नासिक छेदून । बाहेर घाला खरारोहण करून । तो आकाशवाणी बोले गर्जोन । सत्य गर्भ शारदेचा ॥ ११२ ॥

जन परम अमंगळ । म्हणती हे कापट्यवाणी सकळ । त्यात एक वृद्ध होता पुण्यशीळ । वदता झाला ते ऐका ॥ ११३ ॥

ईश्वरी मायेचे अगम्य चरित्र । अघटित घडवी निर्धार । स्तंभेवीण धरिले अंबर । कुंभिनी तरे जळावरी ॥ ११४ ॥

ग्रहगण भगणे विधु मित्र । यास आहे कोणाचा आधार । सर्वदेही व्यापक परमेश्वर । परी शोधिता ठायी न पडे ॥ ११५ ॥

परस्परे पंचभूतांसी वैर । ती एकरूपे चालती कौतुक थोर । जननीगर्भी जीव समग्र । रक्षितो कैसा पहा हो ॥ ११६ ॥

काय एक न करी जगन्नाथ । राजा पूर्वी यूपकेत । त्याचे जळी पडले रेत । ते जळ प्राशीत वेश्या एक ॥ ११७ ॥

तितुकेनि झाली ते गर्भिणी । पुत्र प्रसवली उत्तम गुणी । विभांडकाचे रेत जळी पडोनी । ते जळ हरिणी प्राशीत ॥ ११८ ॥

तोचि झाला ऋषिश्रृंगी । तेणे ख्याती केली दशरथयागी । सौराष्ट्रराजा स्पर्शता करे मृगी । दिव्य पुत्र प्रसवली ॥ ११९ ॥

सत्यवती मत्स्यगर्भसंभूत । तो मत्स्य राजपुत्र होत । महिषासुर दैत्य । महिषीगर्भी जन्मला ॥ १२० ॥

कित्येक ऋषि करुणावंत । वचनमात्रे गर्भ रहात । रेवतीरमण जन्मत । रोहिणीपोटी कैसा पा ॥ १२१ ॥

सांबाचे पोटी मुसळ झाले । ते कोणी कैसे घातले । कुंतीपोटी पांडव जन्मले । पांच देवासमागमे ॥ १२२ ॥

ऐसे बोलती वृद्धजन । तरी निंदा करिती दुर्जन । मागुती देववाणी झाली पूर्ण । ऐका वचन मूर्ख हो ॥ १२३ ॥

शारदेस कोणी असत्य म्हणती । तरी जिव्हा चिरोनि किडे पडती । ऐसे ऐकता सात्त्विक सुमती । सत्य सत्य म्हणती त्रिवाचा ॥ १२४ ॥

कित्येक दुर्जन पुन्हा बोलत । हे सर्वही कापट्य असत्य । तो जिव्हा चिरोनि अकस्मात । किडे गळो लागले ॥ १२५ ॥

हे देखोनि सर्व जन । शारदेसी घालिती लोटांगण । म्हणती माते तू सत्य पूर्ण । जानकीरेणुकेसारखी ॥ १२६ ॥

मग तीस पुत्र झाला सतेज । लोक म्हणती शारदात्मज । वाढत जैसा द्विजराज । शुद्धद्वितीये पासूनी ॥ १२७ ॥

उपनयन झालिया पूर्ण । आठवे वर्षी वेदाध्ययन । चारी वेद षट्शास्त्र जाण । मुखोद्गत पुराणे ॥ १२८ ॥

नवग्रहांत जैसा वासरमणी । तेवी पंडितांत अग्रगणी । जेणे अनुष्ठाने पिनाकपाणी । प्रसन्न केला सर्वस्वे ॥ १२९ ॥

यावरी शारदा पुत्रसमवेत । लक्षुनि शिवरात्रिव्रत अद्भुत । गोकर्णक्षेत्राप्रति जात । यात्रा बहुत मिळाली ॥ १३० ॥

तो द्रविडदेशीचा ब्राह्मण । तोही आला यात्रेलागून । परस्परे पाहून । कष्टी होती अंतरी ॥ १३१ ॥

परस्परा कळली खूण । पूर्वी देवी बोलिली वचन । उमामहेश्वरव्रताचे पुण्य । अर्ध देई पतीसी ॥ १३२ ॥

पुत्र देई त्याचा त्यास । तू त्यापासी राहे चार मास । समागम न करी निःशेष । शिवपदासी पावसी ॥ १३३ ॥

मग शिवरात्रियात्रा करून । भ्रतारासी केले नमन । म्हणे हा घ्या आपुला नंदन । म्हणोनि करी दिधला ॥ १३४ ॥

उमामहेश्वरव्रत । त्याचे अर्धपुण्य देत । मग शारदा सवे जात । द्रविडदेशाप्रती तेव्हा ॥ १३५ ॥

शारदा व्रतस्थ पूर्ण । दुरून पतीचे घे दर्शन । विख्यात झाला शारदानंदन । महापंडित पृथ्वीवरी ॥ १३६ ॥

तप आचरला अपार । मातृपितृभजनी सादर । माता भवानी पिता शंकर । हेचि भावना तयाची ॥ १३७ ॥

जो न करी जनकजननीचे भजन । धिक् त्याचे तप ज्ञान । धिक विद्या धिक थोरपण । धिक भाग्य तयाचे ॥ १३८ ॥

घरी साठवी स्त्रियेचे गोत । आणि मायबापा शिणवीत । अन्न नेदी बाहेर घालीत । शब्दबाणे हृदय भेदी ॥ १३९ ॥

तो जरी पढला षट्शास्त्र । परी अनामिकाहुनि अपवित्र । तयाचे न पहावे वक्त्र । विटाळ कदा न व्हावा ॥ १४० ॥

यद्यपि झाला स्पर्श जाण । तरी करावे सचैल स्नान । महादोषी तो कृतघ्न । यम दारुण गांजीत ॥ १४१ ॥

यावरी शारदेचा भ्रतार । महातपस्वी योगीश्वर । शरीर ठेवोनि परत्र । पावला तो शिवपदा ॥ १४२ ॥

शारदाही चिंतून मदनदहन । करी विधियुक्त सहगमन । पतिसमवेत कैलासभुवन । पावोनि सुखे राहिली ॥ १४३ ॥

शिवलीलामृत सुरस पूर्ण । किंवा हे दिव्य रसायन । भवरोगी सेविता जाण । आरोग्य होऊनी शिव होती ॥ १४४ ॥

जे मृत्यूने कवळिले सहज । त्यांसी नावडे हा रसराज । ज्यांची सुकृते तेजःपुंज । तेचि अधिकारी येथीचे ॥ १४५ ॥

ब्रह्मानंदे श्रीधर । श्रोतया विनवी जोडोनि कर । शिवलीलामृत निर्जर । तुम्ही सेवा आदरे ॥ १४६ ॥

पुढील अध्यायी सुरस कथा । पावन होय श्रोता वक्ता । मृडानीसहित शिव तत्त्वता । पाठी राखी सर्वार्थी ॥ १४७ ॥

शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड । परिसोत सज्जन अखंड । दशमाध्याय गोड हा ॥ १४८ ॥

॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

shri shiv leelamrut adhyay 10 shiv lilamrut