Skip to main content
पडताळणी प्रलंबित

शिवलीलामृत अध्याय तेरावा

श्रीगणेशाय नमः ॥

जो सद्गुरु ब्रह्मानंद । अपर्णाहृदयाञ्जमिलिंद । स्मरारि गजास्यजनक प्रसिद्ध । चरणारविंद नमू त्याचे ॥ १ ॥

स्कंदपुराण सूत । शौनकादिकांप्रती सांगत । त्रेतायुगीं अद्भुत । कथा एक वर्तली ॥ २ ॥

दक्षप्रजापति पवित्र । आरंभिता झाला महासत्र । निंदोनि स्वामी त्रिनेत्र । सर्व निर्जर बोलाविले ॥ ३ ॥

जगदात्मा सदाशिव । जयासी वंदिती पद्मज रमाधव । आम्नाय आणि वासव । स्तविती ज्यासी सर्वदा ॥ ४ ॥

शिवमहिमा नेणोनि अदभुत । दिवसनिशीं दक्ष निंदित । नरमुंडमाळा अपवित्र बहुत । गळां घालित कैसा हा ॥ ५ ॥

करी ओलें गजचर्म प्रावरण । न कंटाळे दुर्गधीने मन । भिक्षा मागे नरकपाल घेऊन । वसे श्मशानीं सर्वदा ॥ ६ ॥

चिताभस्म अंगीं चर्चिलें । विखार ठायी ठायीं वेष्टिले । भ्रष्ट तितुकें अंगिकारिले । सवें पाळे भूतांचे ॥ ७ ॥

अभद्र तितुकें अंगिकारिले । यासी कोण म्हणतील भलें । ज्यासी जे योग्य नाहीं बोलिलें । तें दिल्हे येणे सर्वस्वें ॥ ८ ॥

यासी देव म्हणेल कोण । क्रोधे संतप्त अनुदिन । तृतीयनेत्रीं प्रळयाग्न । वाटे त्रिभुवन जाळील ॥ ९ ॥

मस्तकीं वाहे सदा पाणी । नाचत जाऊन निजकीर्तनीं । भक्त देखितां नयनीं । बैसे देवोनि अवघेचि ॥ १० ॥

दैत्यांसी देवोनियां वर । येणेंचि माजविलें अपार । न कळे यासी लहान थोर । वाहन ढोर तयाचें ॥ ११ ॥

शिवनिंदा करावया कारण । एकदां दक्ष गेला कैलासालागून । शिवें नाहीं दिधलें अभ्युत्थान । तेणें दु:खे क्षोभला ॥ १२ ॥

ऐसा दक्ष शिवासी निंदी । यज्ञीं न पूजी विभाग नेदी । पुरली आयुष्याची अवधी तरीच हे बुद्धि उपजली ॥ १३ ॥

शिवभजन न करी जो पतित । त्यावरी विघ्ने पडती असंख्यात । याग जप तप दान व्यर्थ । उमानाथ नावडे जया ॥ १४ ॥

जेणें निंदिला शिव दयाळ । परम निर्दय तो दुर्जन खळ । मनुष्यांमाजीं तो चांडाळ । त्याचा विटाळ न व्हावा ॥ १५ ॥

असो दक्षकन्या दाक्षायणी । कैलास वाट पाहे भवानी । म्हणे याग मांडिला पितृसदनीं । मज बोलावू न ये का ॥ १६ ॥

अपर्णा म्हणे त्रिनेत्रा । मी जाईन पित्याच्या सत्रा । तेणे सर्व कन्या पंचवक्त्रा । सन्मानेसी बोलाविल्या ॥ १७ ॥

मज विसरला काय म्हणोन । तरी मी तेथवरी जाईन । यावरी बोले भाललोचन । मृडानीप्रती तेधवां ॥ १८ ॥

म्हणे मृगलोचने ऐक गौरी । पद्मजजनकसहोदरी । लावण्यामृतसरिते अवधारीं । कदाही तेथे न जावें ॥ १९ ॥

तव पिता निंदक कुटिल । मम द्वेषी दुर्जन खळ । तूं जातांचि तत्काळ । अपमानील शुभानने ॥ २० ॥

ज्याच्या अंतरी नाहीं प्रीती । त्याचे वदन न पाहावें कल्पांतीं । ऐसें त्र्यंबक बोले अंबिकेप्रती । तों नारद तेथे पातला ॥ २१ ॥

म्हणे पितृसदना जावयालागून । न पाहावा कदाही मान । मग नंदिवरी आरूढोन । दाक्षायणी चालिली ॥ २२ ॥

सवें घेतले भूतगण । मनोवेगें पातली दक्षसदन । तंव मंडप शोभायमान । ऋषींसुरवरीं भरलासे ॥ २३ ॥

आपुलाल्या पूज्यस्थानीं । देव बैसविलें सन्मानेकरूनी । एक सदाशिव वेगळा करूनी । पूजिले ऋषि सुरवर ॥ २४ ॥

जैसा उडुगणांत मिरवे अत्रिसुत । तैसा दक्ष मध्ये विराजित । शिवद्वेषी परम अभक्त । कुंडीं टाकीत अवदानें ॥ २५ ॥

भवानी जवळी आली ते वेळे । देखोनि सुरवर आनंदले । परी दक्षाचे धुरे डोळे भरले । कन्येकडे न पाहेचि ॥ २६ ॥

नंदीवरूनि उतरोनी । पितयासमीप आली भवानी । दक्ष मुख मुरडोनी । घाली ग्रंथी भूमंडळा ॥ २७ ॥

जगन्माता गुणनिधान । न्याहाळूनि पाहे पितृवदन । म्हणे धुरे भरले नयन । म्हणोनि न पाहे मजकडे ॥ २८ ॥

सकळ भगिनींचा सन्मान बहुत । दाक्षायणी तेव्हां देखत । जननीकडे विलोकित । तेही न पाहे तियेतें ॥ २९ ॥

मनांत दक्ष भावित । ईस कोणे बोलाविलें येथ । कन्या आणि जामात । दृष्टीं मज नावडती ॥ ३० ॥

आदिमाया प्रणवरूपिणी । अनंतब्रह्मांडांची स्वामिणी । तिचा अपमान देखोनि । भ्याले सकळ सुरवर ॥ ३१ ॥

म्हणती दक्ष भुलला यथार्थ । हे ब्रह्मांड जाळील निमिषांत । अपमान देखोनि उमा तेथ । क्रोधे संतप्त जाहली ॥ ३२ ॥

प्रलयवीज पृथ्वीवरी पडत । तैसी उडी घातली कुंडांत । उमंडळ डळमळत । होय कंपित भोगींद्र ॥ ३३ ॥

वैकुंठ कैलास डळमळी । कमळभवांडीं हांक वाजली । कृतांत कांपे चळचळी । म्हणे बुडाली सृष्टि आतां ॥ ३४ ॥

हांक देवोनी शिवगण । गेले शिवापाशीं धांवोन । सांगती सर्व वर्तमान । जें जें जाहलें दक्षगृहीं ॥ ३५ ॥

ऐकतां क्षोभला उमाकांत । जेवीं महाप्रलयींचा कृतांत । हांक देवोनि अदभुत । जटा आपटित आवेश ॥ ३६ ॥

तों अकस्मात वीरभद्र । प्रकटला तेथें प्रलयरूद्र । वाटे प्रलयाग्नि आणि द्वादश मित्र । एकत्र होवोनि प्रकटले ॥ ३७ ॥

वाटे त्याचिया तेजांत । चंद्र सूर्य बुचकळ्या देत । आकाश असे आसुडत । सडा होत नक्षत्रांचा ॥ ३८ ॥

कुंभिनी बुडाली देख । चतुर्दश लोक गाजली होक । दक्षगृहीं बलाहक । रक्तवर्षाव करीतसे ॥ ३९ ॥

अवचित उकलली क्षिती । दिवसा दिवाभीतें बोभाती । दक्षअंगींची सर्व शक्ती । निघोनि गेली तेधवां ॥ ४० ॥

इकडे वीरभद्र शिवस्तवन । करोनि निघाला क्रोधायमान । एकवीस पद्मे दळ घेऊन । मनोवेगें धांविन्नला ॥ ४१ ॥

सांठ कोटि गण घेऊन । मागूनी धांविन्नला अपर्णाजीवन । पुढे शिवपुत्र धांवोन । ख्याती केली दक्षयागीं ॥ ४२ ॥

वारणचक्र असंभाव्य । त्यावरी एकला लोटे कंठीरव । कीं विनायकें घेतली धांव । अपार अही पाहोनी ॥ ४३ ॥

आला देखोनि वीरभद्र । पळों लागले देव समग्र । अवदाने सांडोनि सत्वर । ऋत्विज पळाले तेथोनियां ॥ ४४ ॥

आकांतला त्रिलोक । प्रळयकाळींचा पावक । दुमदुमला ब्रह्मांडगोळक । शक्रादि देव कांपती ॥ ४५ ॥

एक मळमूत्र भयें विसर्जिती । धोत्रे गळालीं नेणती क्षितीं । कुकुटरूपे रोहिणीपती । पळता झाला तेधवां ॥ ४६ ॥

शिखी होवोनियां शिखी । पळता झाला एकाएकीं । यम आपुलें स्वरूप झांकी । बकवेष घेवोनियां ॥ ४७ ॥

नैर्ऋत्यपती होय काक । शशक होय रसनायक । कपोत होवोनियां अर्क । पळता झाला तेधवां ॥ ४८ ॥

कीर होवोनि वृत्रारी । पळतां भय वाटे अंतरीं । नाना पक्षिरूपें झडकरी । नवग्रह पळाले ॥ ४९ ॥

पायाळावरी वीज पडत । दक्षावरी तेवीं अकस्मात । महावीर शिवसुत । वीरभद्र पातला ॥ ५० ॥

षड्बाहु वीर देदीप्यमान । असिलता खेटक धनुष्य बाण । त्रिशूळ डमरू शोभायमान । सायुध ऐसा प्रकटला ॥ ५१ ॥

पूषाचे पाडिले दांत । भगदेवाचे नेत्र फोडित । खांड मिशा उपडीत । ऋत्विजांच्या तेधवां ॥ ५२ ॥

चरणी धरूनि आपटिले । बहुतांचे चरण मोडिले । कित्येकांचे प्राण गेले । वीरभद्र देखतां ॥ ५३ ॥

मागूनि पातला शंकर । तेणे दक्षपृतना मारिली सत्वर । कुंडमंडप समग्र । विध्वंसूनि जाळिला ॥ ५४ ॥

देखोनियां विरूपाक्ष । भयभीत झाला दक्ष । पद्मज आणि सहस्राक्ष । पूर्वीच तेथूनि पळाले ॥ ५५ ॥

वीरभद्र म्हणे शतमूर्खा दक्षा । त्वां निंदिलें कैसे विरूपाक्षा । तुज लावीन आता शिक्षा । शिवद्वेषिया पाहें पां ॥ ५६ ॥

विद्युत्प्राय असिलता तीव्र । ऊर्ध्वहस्ते महावीर । छेदिता झाला दक्षशिर । प्रलय थोर जाहला ॥ ५७ ॥

दक्षशिर गगनीं उसळले । वीरभद्रं पायांतळीं रगडिलें । मग उमाधवापाशी ते वेळे । देव पातले चहूकडोनी ॥ ५८ ॥

सकळ सुरांसहित कमळासन । करीत उमावल्लभाचे स्तवन । म्हणे वृषभध्वजा कृपा करून । दक्षालागीं ऊठवीं ॥ ५९ ॥

संतोषोनि कर्पूरगौर । म्हणे आणोनि लावा दक्षाचे शिर । परी ते नेदी वीरभद्र । पायांतळीं रगडिलें ॥ ६० ॥

म्हणे शिवद्वेषी दुराचार । त्याचा करीन ऐसा संहार । जो शिवनाम न घे अपवित्र । जिव्हा छेदीन तयाची ॥ ६१ ॥

जो न करी शिवार्चन । त्याचे हस्तचरण छेदीन । जो न पाहे शिवस्थान । त्याचे नयन फोडीन मी ॥ ६२ ॥

विष्णु थोर शिव लहान । हर विशेष विष्णु सान । ऐसे म्हणे जो खळ दुर्जन । संहारीन तयातें ॥ ६३ ॥

सर्वथा नेदीं मी दक्षशिर । काय करितील विधिहरिहर । मग मेषशिर सत्वर । दक्षालागी लाविलें ॥ ६४ ॥

सजीव सानफोडीन सर्वथा करोनियां दक्ष । तीर्थाटना गेला विरूपाक्ष । द्वादश वर्षे निरपेक्ष । सेवीत वने उपवनें ॥ ६५ ॥

महाश्मशान जे आनंदवन । तेथे शंकर राहिला येऊन । मग सहस्र वर्षे संपूर्ण । तपासनीं बैसला ॥ ६६ ॥

पुढे हिमाचलाचे उदरीं । अवतरली त्रिपुरसुंदरी । शिवआराधना नित्य करी । हिमाचळीं सर्वदा ॥ ६७ ॥

हिमनगाची स्त्री मेनका । तीस पुत्र झाला मैनाकपर्वत देखा । पार्वती कन्या जगदंबिका । आदिमाया अवतरली ॥ ६८ ॥

ब्रह्मांडमंडपामाझारीं । जिची प्रतिमा नाहीं दुसरी । कमळजन्मा वृत्रारी । त्यासही दुजी करवेना ॥ ६९ ॥

तिचे स्वरूप पहावया । येती सुरभुसु मिळोनियां । जिचे स्वरूप वर्णावया । सहस्रवदना शक्ति नव्हे ॥ ७० ॥

मृग मीन कल्हार खंजन । कुरवंडी करावे नेत्रांवरून । अष्टनायिकांचे सौंदर्य पूर्ण । चरणांगुष्ठी न तुळे जिच्या ॥ ७१ ॥

आकर्ण नेत्र निर्मळ मुखाब्ज । देखोनि लजित होय द्विजराज । कंठीरव देखोनि जिचा माज । मुख न दावी मनुष्यां ॥ ७२ ॥

परम सुकुमार घनश्यामवर्णी । ओतिली इंद्रनीळ गाळूनी । दंततेज पडतां मेदिनी । पाषाण महामणी मैं होती ॥ ७३ ॥

आदिमाया प्रणवरूपिणी । ते झाली हिमनगनंदिनी । अनंतशक्तींची स्वामिणी । वेदपुराणीं वंद्य जे ॥ ४ ॥

कोट्यानुकोटी मीनकेतन । सांडणी करावीं नखांवरून । आंगींचा सुवास संपूर्ण ब्रह्मांड फोडोनि वरी जाय ॥ ७५ ॥

ब्रह्मादि देव मुळींनी । गर्मी पाळी बाळे तीन्ही । बोलतां प्रकाश पडे सदनीं । निराळवर्णी कोमलांगी ॥ ७६ ॥

सहज बोलतां क्षितीं । वाटे रत्नराशी विखुरती । पदमुद्रा जेथे उमटती । कमळे उठती दिव्य तेथे ॥ ७७ ॥

त्या सुवासासी वेधोनि वसंत । भोंवता गडबडा लोळत । केवळ कनकलता अद्भुत । कैलासाहुनी उतरली ॥ ७८ ॥

नंदीसहित त्रिपुरारी । येवोनि हिमाचळीं तप करी । शिवदर्शना झडकरी । हिमनग येता जाहला ॥ ७९ ॥

घालोनियां लोटांगण । करीत तेव्हां बहुत स्तवन । यावरी पार्वती येऊन करीत भजन शिवाचें ॥ ८० ॥

साठ सहस्र लावण्यखाणी । सवे सखिया जैशा पद्मिणी । तयांसहित गजास्यजननी । सेवा करी शिवाची ॥ ८१ ॥

द्वारीं सुरभीपुत्र रक्षण । ध्यानस्थ सदा पंचवदन । लाविले पंचदश लोचन । सदा निमग्न स्वरूपीं ॥ ८२ ॥

तारकासुराचे पुत्र तिघेजण । तारकाक्ष विद्युन्माली कमललोचन । तिहीं घोर तप आचरोन । उमारमण अर्चिला ॥ ८३ ॥

सहस्रदळ कमळेकरून । त्रिवर्गपूजिती त्रिनयन । सहस्रांत एक न्यून । कमळ झाले एकदां ॥ ८४ ॥

तिघेही काढूनि नेत्रकमळे । शिवार्चन करिते झाले । मागुती एक न्यून आलें । मग स्वशिरकमळे अर्पिलीं ॥ ८५ ॥

प्रसन्न होवोनि त्रिनेत्र । तिघे उठविले तारकपुत्र । तिघांसी दिधले अपेक्षित वर । झाले अनिवार त्रिभुवनीं ॥ ८६ ॥

तिघांसी चतुर्मुख प्रसन्न होऊनी । त्रिपुरें दिधलीं अंतरिक्षगमनी । दिव्य सहस्र वर्षे पाहतां शोधोनी । निमिषार्धे एक होती ॥ ८७ ॥

इतुक्यांत जो धनुर्धर । मारील लक्ष्य साधूनि शर । त्रिपुरासहित संहार । तुमचा करील निर्धारिं ॥ ८८ ॥

यावरी त्या तिघांजणीं । त्रिभुवन त्रासिलें बळेकरूनी । देव पळविले स्वस्थानाहूनी । पीडिली धरणी बहु पापें ॥ ८९ ॥

मग देव ऋषि सकळ मिळोन । वैकुंठपतीस गेले शरण । गरुडध्वज सर्वास घेऊन शिवापाशीं पातला ॥ ९० ॥

करितां अद्भुत स्तवन । परम संतोषला पंचवदन । म्हणे मी झालों प्रसन्न । मागा वरदान अपेक्षित ॥ ९१ ॥

म्हणती त्रिपुरें पीडिलें बहुत । देव ऋषि झाले पदच्युत । शिव म्हणे पाहिजे रथ । त्रिपुरमर्दनाकारणे ॥ ९२ ॥

तंव देव बोलती समस्त । आम्ही सजोनि देतों दिव्यरथ । मग कुंभिनी स्पंदन होत । चक्रे निश्चित शशिमित्र ॥ ९३ ॥

मंदरगिरी अक्ष होत । स्तंभ झाले चारी पुरुषार्थ । चारी वेद तुरंग बळिवंत । मूर्तिमंत पैं झाले ॥ ९४ ॥

सारथी विधि होत सत्वर । लाविले शास्त्रांचे वाग्दोर । पुराणे तटबंध साचार । उपपुराणें खिळे बहू ॥ ९५ ॥

कनकाद्रि धनुष्य थोर । धनुज्र्या होत भोगींद्र । वैकुंठींचा सुकुमार । झाला शर तेजस्वी ॥ ९६ ॥

रथीं चढतां उमानाथ । रसातळीं चालिला रथ । कोणासी न उपडे निश्चित । मग नंदी काढित शृंगानें ॥ ९७ ॥

मग स्पंदनीं एक चरण । दुजा नंदीवरी ठेवून । अपार युद्ध करून । त्रिपुरदळे संहारिलीं ॥ ९८ ॥

होतां युद्धाचें घनचक्र । वीरभद्रे संहारिले असुर । परी अमृतकुंडे समग्र । दैत्यांकडे असती पैं ॥ ९९ ॥

अमृत शिंपितां अमित । सजीव होती सवेंचि दैत्य । शिवें मेघास्त्र घालूनि समस्त । अमृतकुंडे बुडविलीं ॥ १०० ॥

अंतराळीं त्रिपुरें भ्रमती । लक्ष्य साधी मृडानीपती । दिव्य सहस्र वर्षे झालीं येच रीतीं । न लवती पातीं कदापि ॥ 10१ ॥

अंगीं लोटला घर्मपूर । ते हे भीमरथी गंगा थोर । नेत्रींचे जलबिंदु पडतां अपार । रुद्राक्ष तेथे जाहले ॥ 10२ ॥

दैत्यस्त्रिया पतिव्रता थोर । तेणें असुरांसी जय अपार । मग बौद्धरूपें श्रीकरधर । दैत्यस्त्रियांत प्रवेशला ॥ 10३ ॥

वेदबाह्य अपवित्र । प्रकट केलें चार्वाक शास्त्र । पतिव्रताधर्म मोडोनि समग्र । व्यभिचारकर्मे करविलीं ॥ 10४ ॥

तेणें दैत्यांस झालें अकल्याण । तंव इकडे शिवें लक्ष्य साधून । धनुष्यीं योजिला विष्णुबाण । पाशुपतास्त्र स्थापुनी ॥ 10५ ॥

उगवले सहस्र मार्तड । तैसें अस्त्र चालिलें प्रचंड । कीं उभारिला कालदंड । संहारावया विश्वातें ॥ 10६ ॥

कीं प्रळयाग्नीची शिखा सबळ । कीं कृतांताची जिव्हा तेजाळ । कीं ते प्रळयमेघांतील । मुख्य चपला निवडली ॥ 10७ ॥

कीं सप्तकोटिमंत्रतेज पाहीं । एकवटलें त्या अस्त्राठायीं । देव दैत्य भयभीत हृदयीं । म्हणती कल्पांत मांडिला ॥ 10८ ॥

न्याससहित जपोनि मंत्र । सोडोनि दिधलें दिव्यास्त्र । नवखंड धरणी आणि अंबर । तडाडले ते काळीं ॥ 10९ ॥

सहस्र विजा कडकडती । तैसी धांविन्नली अस्त्रशक्ती । भयें व्यापिला सरितापती । आंग टाकू पाहती दिग्गज ॥ ११० ॥

देव विमाने पळविती । गिरिकंदरीं असुर दडती । एक मूच्र्छना येवोनि पडती । उठती ना मागुते ॥ 1११ ॥

त्या अखें न लागतां क्षण । त्रिपुरें टाकिलीं जाळून । त्यांत तृतीय नेत्रींचा प्रळयाग्न । साह्य झाला तयातें ॥ १1२ ॥

तिन्ही ग्राम सेनेसहित । त्रिपुरें भस्म झाली तेथ । देव शिवस्तवन करित । चरण धरित सप्रेमें ॥ १1३ ॥

त्यावरी त्रिपुरपिता तारकासुर । तेणें प्रलय मांडिला थोर । देव पळविले समग्र । चंद्र सूर्य धरूनि नेले ॥ १1४ ॥

भागीरथी आदि गंगा पवित्र । धरूनि नेत तारकासुर । देवांगना समग्र । दासी करोनि ठेविल्या ॥ १1५ ॥

ब्रह्मा विष्णु शचीवर । करिती एकांतीं विचार । म्हणती शिवउमा करावीं एकत्र । होईल पुत्र षण्मुख ॥ १1६ ॥

त्याचे हस्तें मरेल तारकासुर । मग बोलावूनि पंचशर । म्हणती तुवां जावोनि सत्वर । शिवपार्वती ऐक्य करीं ॥ १1७ ॥

हिमाचळी तप करी व्योमकेश । मन्मथा तू भुलवीं तयास । मग रतीसहित कुसुमेश । शिवाजवळी पातला ॥ १1८ ॥

पार्वतीच्या स्वरूपांत । रती तेव्हां प्रवेशत । वसंतें वन समस्त । शृंगारिलें तेधवां ॥ १1९ ॥

शिवाच्या मानसीं सतेज । प्रवेशला शफरीध्वज । पाखरें करिती बहु गजबज । शिवध्यान विक्षेपिती ॥ १२० ॥

ते पक्षी हांकावया नंदिकेश्वर । गेला होता तेव्हां दूर । तों पार्वती होवोनि कामातुर । पाठीसी उभी मन्मथाच्या ॥ 1२१ ॥

शिवें उघडिले नयन । तों पुढे देखिला मीनकेतन । म्हणे माझ्या तपासी केलें विघ्न । मग भाललोचन उघडला ॥ 1२२ ॥

निघाला प्रलयवैश्वानर । भस्म केला कुसुमशर । फाल्गुन पौर्णिमा साचार । काम जाळिला ते दिनीं ॥ 1२३ ॥

शिवदूत भूतगण । महाशब्दें हांक देवोन । स्मरगृह शब्द उच्चारून । नानापरी उपहासिती ॥ 1२४ ॥

शिवाची आज्ञा तेंपासून । फाल्गुनमासीं हुताशनी करून । जो हे व्रत न पाळी पूर्ण । अवदसा जाण त्या बाधी ॥ 1२५ ॥

ऐसा संहारूनि पंचशर । विचार करूनि पंचवक्त्र । तत्काळ उठोनि कर्पूरगौर । गेला कैलाससदनासी ॥ 1२६ ॥

रती शोक करी बहुत । मग समाधान करी निर्जरनाथ । म्हणे कृष्णावतारीं तुझा कांत । रुक्मिणीउदरीं अवतरेल ॥ 1२७ ॥

कमलासने कन्येसी भोगितां । कंदर्पास शाप दिधला होता । कीं शिवदृष्टीने तत्त्वतां । भस्म होसील कामा तू ॥ 1२८ ॥

असो इकडे हिमनगकुमारी । शिवप्राप्तीलागीं तप करी । सप्तऋषि प्रार्थिती त्रिपुरारी । वरीं कन्या हिमनगाची ॥ 1२९ ॥

पार्वती तप करी जे वनीं । शिव तेथे गेला बटुवेष धरोनी । गायनाच्या छंदें करूनी । पुसे भवानीप्रती तेव्हां ॥ १३० ॥

कासया तप करिसी येथ । येरी म्हणे जो कैलासनाथ । पति व्हावा एतदर्थ । आचरें तप येथे मी ॥ 1३१ ॥

बटु बोले ते अवसरीं । तू तंव हिमनगराजकुमारी । शंकर केवळ भिकारी । महाक्रोधी दारुण ॥ 1३२ ॥

ओलें गजचर्म प्रावरण । शार्दूलचर्म नेसला सर्पभूषण । वसविलें महाश्मशान । भूतगण सभोंवते ॥ 1३३ ॥

तरी विष्णु विलासी सगुण । त्यासी वरीं तूं ऐक वचन । तुज योग्य पंचवदन । वर नव्हे सर्वथा ॥ 1३४ ॥

ऐकतां क्षोभली जगन्माता । म्हणे शिवनिंदका होय परता । वदन न दाखवीं मागुता । परम खळा द्वेषिया ॥ 1३५ ॥

शिवनिंदक जो दुराचार । त्याचा विटाळ न व्हावा साचार । तुज शिक्षा करीन निर्धार । विप्र म्हणोनि राहिलें ॥ 1३६ ॥

देखोनि दुर्गेचा निर्धार । स्वरूप प्रकट करी कर्पूरगौर । पार्वतीने करूनि जयजयकार । चरण दृढ धरियेले ॥ 1३७ ॥

शिव म्हणे ते समयीं । प्रसन्न झालों माग लवलाहीं । अंबिका म्हणे ठाव देईं । अर्धांगी तुझ्या जगदात्म्या ॥ 1३८ ॥

अवश्य म्हणोनि त्रिपुरारी । कैलासासी गेला ते अवसरीं । पितृसदना झडकरी । गेली तेधवां जगदंबा ॥ 1३९ ॥

मग सप्तऋषि ते वेळे । शिवें हिमाचळा पाठविले । हिमनगें ते आदरें पूजिले । षोडशोपचारेंकरूनियां ॥ १४० ॥

अरुंधतीने येऊन । भवानी पाहिली अवलोकून । म्हणे शिव आणि भवानी पूर्ण । जोडा होय निर्धारे ॥ 1४१ ॥

मन्मथ संवत्सर चैत्रमासीं । लग्न नेमिलें शुद्ध अष्टमीसी । निश्चय करूनि सप्तऋषी । स्वस्थानासी पातले ॥ 1४२ ॥

कधी होईल शिवगौरी लग्न । इच्छिती बसेंद्रादि सहस्रनयन । तारकासुराचा तो प्राण । शिवपुत्र घेईल कधीं ॥ 1४३ ॥

इकडे नंदीस पाठवूनि ते वेळे । सर्व देव शिवें बोलाविले । घेवोनि त्रिदशांचे पाळे । पाकशासन पातला ॥ 1४४ ॥

इंदिरेसहित इंदिरावर । सावित्रीसहित चतुर्वक्त्र । अठ्याऐशीं सहस्र ऋषीश्वर । शिष्यांसहित निघाले ॥ 1४५ ॥

सिद्ध चारण गुह्यक । पितृगण मरुद्रण वसुअष्टक । एकादशरुद्र द्वादशार्क । यक्षनायक पातला ॥ 1४६ ॥

आपुलाल्या वाहनीं बैसोन । लोकपाल निघाले संपूर्ण । नवग्रह अष्टनायिका आदिकरून । किन्नर गंधर्व सर्वही ॥ 1४७ ॥

एवं सर्वांसहित शंकर । हिमाचलासी आला सत्वर । नगेंद्र येवोनि समोर । पूजोनि नेत सकळांते ॥ 1४८ ॥

दशसहस्र योजने मंडप । उभविला ज्यांचे तेज अमूप । सुवर्णसदने देदीप्य । जानवशासी दीधली ॥ 1४९ ॥

शिवस्वरूप पाहतां समस्त । वर्‍हाडी होत विस्मित एक म्हणती वृद्ध बहुत । पुराणपुरुष अनादि ॥ १५० ॥

हा आहे केवळ निर्गुण । नवरी स्वरूपें अति सगुण । असो देवकप्रतिष्ठा करून । मूळ आला हिमाद्री ॥ 1५१ ॥

आद्यंत अवघे साहित्य । कमलोद्भव स्वयें करित । नवनिधी अष्ट महासिद्धी राबत । न्यून तेथे नसे काही ॥ 1५२ ॥

असो नवरा मिरवीत । नेला आपुल्या मंडपांत । मधुपर्कादि पूजाविधी समस्त । हिमाचळ करीतसे ॥ 1५३ ॥

लग्नघटिका आली जवळी । तंव ते श्रृंगारसरोवरमराळी । बाहेर आणिली हिमनगबाळी । उभी केली पटाआड ॥ 1५४ ॥

लग्नघटिका पाहे दिनपती । मंगळाष्टके म्हणे बृहस्पती । पुण्याहं निश्चितीं । कमलासन म्हणतसे ॥ 1५५ ॥

असो यथाविधी संपूर्ण । दोघां झालें पाणिग्रहण । होमासी करिती प्रदक्षिण । शिव शक्ति तेधवां ॥ 1५६ ॥

इतुकें याज्ञिक झाले सर्वही । परी नोकरी कोणीं देखिली नाहीं । प्रदक्षिणा करितां ते समयी । पदनख देखिलें विधीनें ॥ 1५७ ॥

कामें व्यापिला सूर्यजामात । पटपटां वीर्यबिंदु पडत । साठी सहस्र बालखिल्य तेथ । जन्मले क्षण न लागतां ॥ 1५८ ॥

अन्याय देखोनि थोर । मदनांतक कोपला अनिवार । ब्रह्मयाचें पांचवें शिर । छेदूनि टाकिलें तेधवां ॥ 1५९ ॥

झाला एकचि हाहाकार । त्यावरी वैकुंठींचा सुकुमार । समाधान करी अपार । चतुर्वक्त्र नाम लैंपासुनी ॥ १६० ॥

असो यथाविधी सोहळे । चारी दिवस संपूर्ण जाहले । सकळ देव गौरविले । वस्त्रालंकारी हिमनगें ॥ 1६१ ॥

सवें पार्वती घेऊनी । कैलासा आला शूलपाणी । यावरी सर्व देव मिळोनी । प्रार्थिते झाले विश्वनाथा ॥ 1६२ ॥

खुटली विश्वाची उत्पत्ती । मन्मथ उठवीं उमापती । मग तो मीनध्वज पुढती । अनंग करोनि जीवविला ॥ 1६३ ॥

अंधकपुत्र तारकासुर । तेणे पळविले देव समग्र । शिवासी होईल कधीं पुत्र । देव समग्र वांछिती ॥ 1६४ ॥

चारी युगेपर्यंत । शिव उमा एकांतीं रमत । परी नोहें वीर्यपात । नव्हे सुत याकरितां ॥ 1६५ ॥

तों तारकासुरें केला आकांत । स्वर्ग जाळिले समस्त । देवललना धरूनि नेत । दासी बहुत पैं केल्या ॥ 1६६ ॥

देव शिवासी शरण जाती । तंव ती दोघे एकांती रमती । देव ऋषी बाहेर तिष्ठती । प्रवेश कोणा नव्हेचि ॥ 1६७ ॥

मग अग्नि आत पाठविला । अतीतवेष तेणें धरिला । जो तृतीयनेत्रीं शिवाच्या राहिला । देवीं पाठविला मित्र म्हणोनी ॥ 1६८ ॥

हांक फोडोनि भिक्षा मागत । शिव पार्वतीस आज्ञापित । माझे वीर्य धरोनि अदभुत । भिक्षा देई अतीतातें ॥ 1६९ ॥

मग अमोघ वीर्य धरून । अग्नीस देत अंबिका आणोन । सांडले जेथे वीर्य जाण । रेतकूप झाला तो ॥ १७० ॥

तोचि पारा परम चंचळ । न धरवे कोणा हातीं तेजाळ । असो कृशानूनें वीर्य तत्काळ । प्राशन केले तेधवां ॥ 1७१ ॥

अग्नि झाला गरोदर । परम लज्जित हिंडे कांतार । तो साही कृत्तिका परम सुंदर । ऋषिपत्न्या देखिल्या ॥ 1७२ ॥

त्या गंगेत स्नान करूनी । तापत बैसल्या साहीजणी । तंव अग्नीने गर्भ काढूनी । पोटांत घातला साहींच्या ॥ 1७३ ॥

साहीजणी झाल्या गर्भिणी । परम आश्चर्य करिती मनीं । मग लजेनें गर्भ काढूनी । साहीजणींनी त्यागिला ॥ 1७४ ॥

साहींचे रक्त एक झालें । दिव्य शरीर तत्काळ घडलें । सहा मुखे हस्त शोभलें । द्वादश सरळ तेजस्वी ॥ 1७५ ॥

कार्तिकमासी कृत्तिकायोगीं । कुमार जन्मला महायोगी । मयूरवाहन भस्म अंगी । उपासीत शिवातें ॥ 1७६ ॥

शिवें निजपुत्र जाणोनी । नेवोनी लाविला अपर्णास्तनी । सप्त वर्षे मृडानी । लालन पालन करी त्याचें ॥ 1७७ ॥

देवांसी सांगे वैश्वानर । शिवासि झाला स्कंद पुत्र । ऐकतां देव समग्र । तारकावरी चालिले ॥ 1७८ ॥

सेना जयाची बाहत्तर अक्षौहिणी । त्याचें नगर वेढिती सुधापानी । पृतनेसहित तेच क्षणीं । तारकासुर बाहेर निघे ॥ 17९ ॥

इंद्रे स्वामिकार्तिकापासीं जाऊन । सेनापतित्व दिधलें संपूर्ण । दिव्य रथीं बैसवून । अभिषेकिला कुमार ॥ १८० ॥

इकडे तारकासुर सुधापानी । युद्ध करिती झोटधरणी । देव त्रासिले दैत्यांनी । आले पळोनि कुमाराकडे ॥ 1८१ ॥

स्कंदापुढे कर जोडून । देव करिती अपार स्तवन । रक्षीं तारकासुरापासून । शिवनंदन तोषला ॥ 1८२ ॥

देवांचा वृत्तांत जाणोनि सकळ । कुमारे धरिलें रूप विशाळ । तों तारकासुर धांविन्नला प्रबळ । शिवकुमार लक्षूनी ॥ 1८३ ॥

तेहतीस कोटी सुरवर । उभे स्वामीचे पाठीं भार । तारकाअंगीं बळ अपार । दशसहस्र कुंजरांचे ॥ 1८४ ॥

तारकासुर अनिवार । वर्षे सायकांचे संभार । स्वामीचे पाठीसीं सुर । लपती सत्वर जाऊनी ॥ 1८५ ॥

लक्षुनियां पाकशासन । तारकें शक्ति दिधली सोडून । प्रळयचपळेस मागे टाकून । मनोवेगें चालिली ॥ 1८६ ॥

भयभीत शक्र होऊन । करी हरिस्मरण कर जोडोन । म्हणे हे इंदिरामानसरंजन । निवारी येवोनि शक्ति हे ॥ 1८७ ॥

ब्रह्मानंदा विश्वव्यापका । दशावतार चरित्रचालका । मधुमुरनरकांतका । निवारी प्रळयशक्ति हे ॥ 1८८ ॥

वैकुंठींहूनि योगमाया । हरीने धाडिली लवलाह्या । तिणे ते शक्ति परतोनियां । एकीकडे पाडिली ॥ 1८९ ॥

यावरी तारकें बाणांचे पूर । स्वामीवरी सोडिले अपार । मुख पसरोनि शिवकुमार । तितुकें गिळितां जाहला ॥ १९० ॥

नाना शख्ने अस्त्रशक्ती । तारकें सोडिल्या अनिवारगती । तितुक्या गिळिल्या सहजस्थिती । शास्त्रसंख्यावदनाने ॥ 1९१ ॥

कल्पांतरुद्रासमान । भयानक दिसे मयूरवाहन । तारकें ब्रह्मास्त्र दिधले सोडून । तेंही गिळीं अवलीळे ॥ 1९२ ॥

जितुके शस्त्रमंत्र निर्वाण । तितुके प्रेरीतसे चहूंकडून । प्रळयकाळासम शिवनंदन । गिळी क्षण न लागतां ॥ 1९३ ॥

मग निःशस्त्र तारकासुर । स्यंदनाहूनि उतरला सत्वर । स्वामीवरी धांवे अनिवार । सौदामिनीसारखा ॥ 1९४ ॥

ऐसें देखोनि षडानन । कृतांताऐसी हांक देऊन । रथाखाली उतरून । मल्लयुद्ध आरंभिलें ॥ 1९५ ॥

सप्तदिनपर्यंत । युद्ध झालें परम अदभुत । तारकासुर अत्यंत । जर्जर केला आपटोनी ॥ 1९६ ॥

पायीं धरोनि अवलीला । चक्राकार भोवडिला । मग धरणीवरी आपटिला । चूर्ण झाला मृद्धटवत ॥ 1९७ ॥

निघोनि गेला प्राण । दुंदुभी वाजवी शचीरमण । पुष्पें वर्षिती सुरगण । कर जोडोनि स्तुती करिती ॥ 1९८ ॥

मारिला जेव्हा तारकासुर । तेव्हा सात वर्षांचा शिवकुमार । मग सेनापतित्व समग्र । इंद्रे त्यासी दीधलें ॥ 1९९ ॥

तारकासुराचें नगर । इंद्रे लुटिले समग्र । देवस्त्रिया सोडविल्या सत्वर । सर्व देव मुक्त झाले ॥ २०० ॥

लागला तेव्हा जयवाद्यांचा घोष । कुमार गेला वाराणसीस । नमूनि शिवमृडानीस । सुख अपार दीधलें ॥ 20१ ॥

मग झालें मौंजीबंधन । सर्व तीर्थे करी षडानन । मग कपाटीं बैसला जाऊन । अनुष्ठान करी सुखें ॥ 20२ ॥

षडाननास भवानी म्हणत । ब्रह्मचर्य केले आजपर्यंत । आता स्त्री करूनि यथार्थ । गृहस्थाश्रम करीं कीं ॥ 20३ ॥

षडानन म्हणे अंबेप्रती । सांग स्त्रिया कैशा असती । म्यां देखिल्या नाहीं निश्चिती । कैसी आकृति सांगें मज ॥ 20४ ॥

अपर्णा म्हणे सुकुमारा । मजसारख्या स्त्रिया सर्बत्रा । ऐकतां हांसें आलें कुमारा । काय उत्तरा बोलत ॥ 20५ ॥

तुजसारख्या स्त्रिया जरी । तुजसमान मज निर्धारीं । तुझ्या वचनासी मातुश्री । अंतर पडों नेदी मी ॥ 20६ ॥

ऐसें कुमार बोलोन । महाकपाटांत जाय पळोन । मग ते जगन्माता आपण । धरू धांविन्नली तयातें ॥ 20७ ॥

नाटोपे कुमार ते क्षणीं । अंबा दु:खे पडे धरणीं । जे त्रिभुवनपतीची राणी । वेदपुराणीं वंद्य जे ॥ 20८ ॥

अरे तू कुमारा दावीं बदना । आला माझ्या स्तनासी पान्हा । कोणासी पाजू षडानना । निजवदन दाखवीं ॥ 20९ ॥

घेई तुझे दूध लोणी । म्हणोनि कुमार वमी ते क्षणी । बोले तेव्हां शापवाणी । क्रोधे करूनि कुमार तो ॥ २१० ॥

माझे दर्शना जी स्त्री येईल । ती सप्तजन्म विधवा होईल । स्वामिदर्शना पुरुष येईल । कार्तिकमासी कृत्तिकायोगीं ॥ 2११ ॥

तो सप्तजन्म सभाग्य । होईल धनाढ्य वेदपारंग । अनामिक हो अथवा मातंग । दर्शनें लाभ समानचि ॥ 2१२ ॥

स्वामींस ऋषि विनविती समस्त । भवानी तुजलागीं तळमळत । भेटोनि येई त्वरित । वाराणसीस जाऊनी ॥ 2१३ ॥

मग स्वामी आनंदवना जाऊनी । आनंदविलीं शिवभवानी । उभयतांचे समाधान करोनी । मागुती गेला पूर्वस्थळा ॥ २१४ ॥

स्कंदपुराण कथा सूत । शौनकादिकांप्रती सांगत । ऐकतां विघ्ने समस्त । क्षणमात्रे दग्ध होती ॥ २१५ ॥

अपर्णाहृदयाब्जमिलिंदा । श्रीधरवरदा ब्रह्मानंदा । पूर्णब्रह्मा अनादिसिद्धा । आनंदकंदा जगद्गुरु ॥ २१६ ॥

शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड । परिसोत सज्जन अखंड । त्रयोदशाध्याय गोड हा ॥ २१७ ॥

॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

shri shiv leelamrut adhyay 13 shiv lilamrut