Skip to main content
पडताळणी प्रलंबित

शिवलीलामृत अध्याय आठवा

श्रीगणेशाय नमः ॥

जय जय शिव ब्रह्मानंदमूर्ती । वेदवंद्य तू भोळा चक्रवर्ती । शिवयोगिरूपे भद्रायूप्रती । अगाध नीती प्रगटविली ॥ १ ॥

तुझिया बळे विश्वव्यापका । सूत सांगे शौनकादिकां । भद्रायूसी शिवकवच देखा । श्रीगुरूने शिकविले ॥ २ ॥

मृत्युंजयमंत्र उत्तम । सर्वांगी चर्चिले भस्म । रुद्राक्षधारण सप्रेम । करी भद्रायुबाळ तो ॥ ३ ॥

एक शंख उत्तम देत । ज्याच्या नादे शत्रू होती मूर्च्छित । खड्ग दिधले अद्भुत । त्रिभुवनांत ऐसे नाही की ॥ ४ ॥

ते शस्त्र शत्रूते दावितां नग्न । जाती एकदाच भस्म होऊन । द्वादशसहस्र इभबळ गहन । तत्काळ दिधले कृपेने ॥ ५ ॥

देणे शिवाचे अद्भुत । म्हणे होई ऐश्वर्यवंत । आयुरारोग्य विख्यात । सर्व रायांत श्रेष्ठ तू ॥ ६ ॥

चिरकाल विजयी होऊनी । संतोषरूपे पाळी मेदिनी । निष्काम दाने करूनी । माजेल त्रिभुवनी कीर्तिघोष ॥ ७ ॥

भाग्यलक्ष्मी असो तव सदनी । भूतकारुण्यलक्ष्मी हृदयभुवनी । दानलक्ष्मी येवोनी । करकमळी राहो सदा ॥ ८ ॥

सर्वांगी वसो लक्ष्मी सौम्य । दोर्दंडीं वीरलक्ष्मी उत्तम । दिगंतरी कीर्ति परम । सर्वदाही वसो तुझी ॥ ९ ॥

शत्रुलक्ष्मी खड्गाग्री वसो । साम्राज्यलक्ष्मी सदा असो । विद्यालक्ष्मी विलसो । सर्वदाही तुजपासी ॥ १० ॥

ऐसे शिवयोगी बोलोन । तेथेच पावला अंतर्धान । भद्रायु सुमती गुरुचरण । सर्वदाही न विसंबती ॥ ११ ॥

इकडे भद्रायूचा पिता निरूती । दाशार्हदेशींचा नृपती । वज्रबाहु महामती । शत्रु त्यावरी पातले ॥ १२ ॥

मगधदेशाधिपति हेमरथ । तेणे देश नागविला समस्त । धन धान्य हरूनि नेत । सर्व करीत गोहरण ॥ १३ ॥

स्त्रिया पुरुष धरोनि समस्त । बळे नेऊनि बंदी घालीत । मुख्य राजग्राम वेष्टित । बाहेर निघत वज्रबाहु ॥ १४ ॥

युद्ध झाले दशदिनपर्यंत । हा एकला शत्रु बहुत । मग त्यासी धरोनियां जित । रथी बांधिती आकर्षोनी ॥ १५ ॥

वज्रबाहूचे अमात्य धरोन । तेही चालविले बांधोन । सर्व ग्रामप्रजा लुटून । राजस्त्रिया धरियेल्या ॥ १६ ॥

ऐसे हरोनि समस्त । घेवोनि चालिला हेमरथ । वज्रबाहु सचिवांसहित । मागे पुढे पाहतसे ॥ १७ ॥

पुत्र ना बंधु आम्हांस । कोण कैवारी या समयास । आम्ही पहावी कवणाची आस । सोडवील कोण दुःखार्णवी ॥ १८ ॥

तो समाचार कळला भद्रायूसी । की शत्रु नेती पितयासी । गुरुस्मरण करून मानसी । अंगी कवच लेइले ॥ १९ ॥

मृत्युंजयमंत्र परम । सर्वांगी चर्चिले भस्म । शंख खड्ग घेऊनि उत्तम । मातेलाग नमस्कारी ॥ २० ॥

म्हणे माते शत्रु बहुत । ग्राम हरूनि पितयास नेत । तरी मी गुरुदास तुझा सुत । संहारीन समस्तातें ॥ २१ ॥

माते तुझ्या सुकृतेकरून । कृतांत समरी करीन चूर्ण । पृथ्वी राजे जितचि धरून । आणीन तुझिया दर्शना ॥ २२ ॥

निर्दोष यशाचा ध्वज । उभवीन आज तेजःपुंज । शरत्काळींचा द्विजराज । सोज्ज्वळ जैसा शोभत ॥ २३ ॥

पद्माकरपुत्र सुनय वीर । सवे घेतला सत्वर । सर्पाचा माग काढी विनतापुत्र । तैसे दोघे धावती ॥ २४ ॥

इभ आहे कोणते कांतारीं । शोधीत धांवती दोघे केसरी । की जनकजेचे कैवारी । लहुकुश पुत्र जैसे ॥ २५ ॥

पायी क्रमिती भूमि सत्वर । शोभती धाकुटे वये किशोर । जवळी देखोनि शत्रूचे भार । सिंहनादे गर्जिन्नले ॥ २६ ॥

म्हणती उभे रहा रे तस्कर समस्त । बज्रबाहूऐसी दिव्य वस्त । चोरोनि नेतां त्वरित । शिक्षा लावीन तुम्हांते ॥ २७ ॥

तस्करांसी हेचि शिक्षा जाण । छेदावे कर्ण नासिक कर चरण । एवढा अन्याय करून । कैसे वांचून जाल तुम्ही ॥ २८ ॥

अवघे माघारे जंव पाहती । तंव दोघे किशोर धावती । म्हणती एक रमापती एक उमापती । येती निजभक्तकैवारे ॥ २९ ॥

एक मृगांक एक मित्र । एक वसिष्ठ एक विश्वामित्र । एक वासुकी एक भोगींद्र । तेवी दोघे भासती ॥ ३० ॥

असंख्यात सोडिती बाण । जैशा धारा वर्षे घन । वीर खिळिले संपूर्ण । मयूरा ऐसे दीसती ॥ ३१ ॥

परतले शत्रूचे भार । वर्षती शस्त्रास्त्रे समग्र । वाद्ये वाजती भयंकर । तेणे दिशा व्यापिल्या ॥ ३२ ॥

तो जलज वाजविला अद्भुत । धाके उर्वी डळमळत । पाताळी फणिनाथ । सावरीत कुंभिनीते ॥ ३३ ॥

दिशा कोंदल्या समस्त । दिग्गज थरथरा कापत । शत्रु पडिले मूर्च्छित । रिते रथ धावती ॥ ३४ ॥

त्यांतील दिव्य रथ घेवोनि दोनी । दोघे आरूढले तेच क्षणी । चापी बाण लावूनी । सोडिती प्रलयविद्युद्वत ॥ ३५ ॥

वज्रबाहूचे वीर बहुत । भारासमवेत गज रथ । भद्रायूभोवते मिळत । कैवारी आपुला म्हणवूनी ॥ ३६ ॥

वाद्ये वाजवूनियां दळ । भद्रायूभोवते मिळाले सकळ । म्हणती हा कैवारी या वेळ । आला न कळे कोठोनी ॥ ३७ ॥

पाठिराखा देखोनि समर्थ । वीरांस बळ चढले अद्भुत । हेमरथाची सेना बहुत । संहारिली ते काळी ॥ ३८ ॥

वज्रबाहूसहित प्रधान । रथी बांधले पाहती दुरून । म्हणती त्रिपुरारी मुरारी दोघेजण । किशोरवेषे पातले ॥ ३९ ॥

एका गुरूने शिकविले पूर्ण । दिसे दोघांची विद्या समान । त्यांत मुख्य राजनंदन । देखोनि स्नेह वाटतो ॥ ४० ॥

कोण आहेत न कळे सत्य । मज वाटती परम आप्त । हृदयी धरूनि यथार्थ । द्यावे चुंबन आवडीने ॥ ४१ ॥

मांडिले घोरांदर रण । रक्तपूर चालिले जाण । वज्रबाहु दुरून । प्रधानासहित पाहतसे ॥ ४२ ॥

अनिवार भद्रायूचा मार । शत्रु केले तेव्हा जर्जर । समरभूमि माजली थोर । बाणे अंबर कोंदले ॥ ४३ ॥

ऐसे देखोनि हेमरथ । लोटला तेव्हा कृतांतवत । दोघांसी युद्ध अद्भुत । चार घटिका जाहले ॥ ४४ ॥

शत्रु थरथरा कापत । म्हणती भीम की हनुमंत । किंवा आला रेवतीनाथ । मुसळ नांगर घेऊनी ॥ ४५ ॥

शत्रूचा देखोनि उत्कर्ष बहुत । भद्रायूने शिवयोगिदत्त । खड्ग काढिले तेज अद्भुत । सहस्रमार्तंडासमान ॥ ४६ ॥

काळाग्नीची जिव्हा कराळ । की प्रळय विजांचा मेळ । की काळसर्पाची गरळ । तेवी खड्ग झळकतसे ॥ ४७ ॥

ते शस्त्र झळकता तेजाळ । मागधदळ भस्म झाले सकळ । मागे होता हेमरथ तत्काळ । समाचार श्रुत जाहला ॥ ४८ ॥

की काळशस्त्र घेता हाती । देखताचि दळे संहारिती । मग पळू लागला पवनगती । उरल्या दळासमवेत ॥ ४९ ॥

प्रधानासहित वज्रबाहूसी टाकून । पळती शत्रु घेतले रान । ते भद्रायूने देखोन । धरिला धावून हेमरथ ॥ ५० ॥

धरिला तो दृढ केशी । ओढूनि पाडिला भूमीसी । लत्ताप्रहार देता हृदयदेशी । अशुद्ध ओकीत भडभडा ॥ ५१ ॥

रथी बांधिला आकर्षून । मंत्रिप्रधानांसहित जाण । क्षुरमुखशर घेऊन । पाच पाट काढिले ॥ ५२ ॥

अर्धखांड धर्ममिशी भादरून । माघारे चालवी संपूर्ण । राजस्त्रिया अपार कोश धन । घेत हिरोन तेधवा ॥ ५३ ॥

देश नागविला होता सकळ । वस्तुमात्र आणविल्या तत्काळ । गोभार परतविला सकळ । जेथींचा तेथे स्थापिला ॥ ५४ ॥

अमात्यसमवेत पिता । सोडवूनि पायी ठेविला माथा । बज्रबाहू होय बोलता । त्याजकडे पाहूनी ॥ ५५ ॥

नयनी लोटल्या अश्रुधारा । तू कोण आहेस सांग कुमारा । मज अपयशसमुद्रातून त्वरा । काढिले उडी घालुनी ॥ ५६ ॥

जळता शत्रुदावाग्नीत । वर्षलासी जलद अद्भुत । मज वाटे तू कैलासनाथ । बाळवेषे आलासी ॥ ५७ ॥

की वाटे वैकुंठनायके । रूपें धरिली बाळकांची कौतुके । की सहस्राक्षे येणे एके । केले धावणे वाटतसे ॥ ५८ ॥

सकल राजस्त्रिया धावोन । उतरिती मुखावरूनि निंबलोण । म्हणती बाळा तुजवरून । जाऊ ओवाळून सर्बही ॥ ५९ ॥

भद्रायु म्हणे नगरात । चला शत्रु घेवोनि समस्त । बंदी घालूनि रक्षा बहुत । परमयत्नेकरोनियां ॥ ६० ॥

नगरांत पिता नेऊनी । बैसविला दिव्य सिंहासनी । जयवाद्यांचा ध्वनी । अपार वाजो लागला ॥ ६१ ॥

नगर श्रृंगारिले एकसरा । रथी भरूनि वाटती शर्करा । नगरजन धावती त्वरा । वज्रबाहूसी भेटावया ॥ ६२ ॥

वज्रबाहु म्हणे सद्‌गद होऊन । जेणे मज सोडविले धावून । त्या कैवारियाचे चरण । धरा जाऊन ये वेळा ॥ ६३ ॥

भद्रायू म्हणे पितयालागून । शत्रूस करा बहुत जतन । तीन दिवसां मी येईन । परतोनि जाणा तुम्हापासी ॥ ६४ ॥

मी आहे कोणाचा कोण । कळेल सकळ वर्तमान । ऐसे बोलोनि दोघेजण । रथारूढ पैं झाले ॥ ६५ ॥

मनोवेगेकरून । येऊनि वंदिले मातेचे चरण । मग तिने करूनि निंबलोण । सुखावे पूर्ण पद्माकर ॥ ६६ ॥

असो यावरी शिवयोगी दयाघन । चित्रांगदसीमंतिनींसी भेटोन । जन्मादारभ्य वर्तमान त्यांसी सांगे भद्रायूचे ॥ ६७ ॥

पिता सोडवूनि पुरुषार्थ । केला तो ऐकिला की समस्त । तरी तो तुम्ही करावा जामात । कीर्तिमालिनी देऊनिया ॥ ६८ ॥

ऐकता ऐसा मधुर शब्द । सीमंतिनी आणि चित्रांगद । दृढ धरिती चरणारविंद । पूजिती मग षोडशोपचारे ॥ ६९ ॥

म्हणती तुझे वचन प्रमाण । वर आणावा आताचि आहे लग्न । मग दळभार वाहने पाठवून । दिधली वैश्यनगराप्रती ॥ ७० ॥

सुनयपुत्रासहित समग्र । नाना संपत्ति घेऊन अपार । लग्नासि चालिला पद्माकर । वाद्ये अपार वाजती ॥ ७१ ॥

भद्रायू बैसला सुखासनी । तैसीच माता शिबिकायानी । चित्रांगद सामोरा येवोनी । घेऊनि गेला मिरवीत ॥ ७२ ॥

वर पाहूनि जन तटस्थ । म्हणती कायसा यापुढे रतिनाथ । पृथ्वीचे राजे समस्त । आणविले लग्नासी ॥ ७३ ॥

त्यात वज्रबाहू सहपरिवारे । लग्नालागी पातला त्वरे । वराकडे पाहे सादरें । तब तो कैवारी ओळखिला ॥ ७४ ॥

पाय त्याचे धरावया धाविन्नला । भद्रायूने वरच्यावरी धरिला । आलिंगन देता वेळोवेळा । कंठ दाटले उभयतांचे ॥ ७५ ॥

नयनी चालिल्या विमलांबुधारा । अभिषेक करिती येरयेरा । मग वज्रबाहू पुसे वरा । देश तुझा कवण सांग ॥ ७६ ॥

फेडी संशय तत्त्वता । सांग कवण मातापिता । गोत्र ग्राम गुरु आता । सर्व सांग मजप्रती ॥ ७७ ॥

मग भद्रायूने एकांती नेऊन । सांगितले साद्यंत वर्तमान । हा शिवयोगियाचा महिमा पूर्ण । उपासना शिवाची ॥ ७८ ॥

अनंतपुण्य कोट्यानुकोटी । तै शिवयोगियाची होय भेटी । तो साक्षात् धूर्जटी । त्याचे चरित्र जाण हे ॥ ७९ ॥

मग ते सुमति पट्टराणी । भेटविली एकांती नेऊनी । वज्रबाहु खालते पाहुनि । रुदन करी तेधवा ॥ ८० ॥

म्हणे ऐसी निधाने वरिष्ठे । म्या घोरवनी टाकिली नष्टे । मजएवढा अन्यायी कोठे । पृथ्वी शोधिता नसेल ॥ ८१ ॥

सुमति मागील दुःख अद्भुत । आठवूनि रडे सद्गदित । म्हणे शिवयोगी गुरुनाथ । तेणे कृतार्थ केले आम्हा ॥ ८२ ॥

मग सीमंतिनी चित्रांगद । उभयतांचा करूनि ऐक्यवाद । वज्रबाहु बोले सद्गद । धन्य सुमति राणी तू ॥ ८३ ॥

बिंदूचा सिंधु करून । मज त्वा दाविला आणोन । सर्षप कनकाद्रीहून । श्रेष्ठ केला गुणसरिते ॥ ८४ ॥

त्वा माझा केला उद्धार । मज अभाग्यास कैचा पुत्र । हे राज्य तुझेचि समग्र । सुतासहित त्वा दीधले ॥ ८५ ॥

ऐसे बोलोनि त्वरित । वज्रबाहु बाहेर येत । भद्रायू धावोनि सद्गदित । साष्टांगे नमीत पितयाते ॥ ८६ ॥

वज्रबाहु देत आलिंगन । जेवी भेटती शिव आणि षडानन । की वाचस्पति आणि कच निधान संजीवनी साधिता आलिंगिती-८७ मस्तक अवघ्राणून झडकरी । सप्रेम बैसविला अंकावरी । कीर्तिमालिनी स्नुषासुंदरी । दक्षिणांकी बैसविली ॥ ८८ ॥

तव राजे समस्त आश्चर्य करिती । धन्य वज्रबाहु नृपती । मग पद्माकर सुनय यांप्रती । भद्रायू भेटवी पितयाते ॥ ८९ ॥

गगनी न समाये ब्रह्मानंद । ऐसा झाला सकळा मोद । मग चारी दिवस सानंद । यथासांग लग्न झाले ॥ ९० ॥

आंदण दिधले अपार । दोन लक्ष वाजी अयुत कुंजर । दास दासी भांडार । भरूनि द्रव्य दीधले ॥ ९१ ॥

सर्व घेऊनि कीर्तिमालिनी । पद्माकरासहित जनकजननी । निजनगरा तेच क्षणी । जाती झाली तेधवा ॥ ९२ ॥

गगनगर्भी न समाये हरिख । ऐसे मातापितयांसी झाले सुख । पट्टराणी सुमति देख । केले आधीन सर्व तिच्या ॥ ९३ ॥

मग सकळ शत्रू सोडोन । प्रतिवर्षी करभार नेमून । करूनि आपणाआधीन । जीवदान दिधले तया ॥ ९४ ॥

भद्रायूऐसा पुत्र प्राप्त । होय असल्या पुण्य बहुत । जरी जन्मोजन्मीं हिमनगजामात । पूजिला असेल प्रेमभरे ॥ ९५ ॥

स्त्री पतिव्रता चतुर सुंदर । पुत्र पंडित सभाग्य पवित्र । गुरु सर्वज्ञ उदार थोर । पूर्वदत्ते प्राप्त होय ॥ ९६ ॥

मग त्या भद्रायूवरी छत्र । वज्रबाहूने उभवूनि सत्वर । स्त्रीसुमतिसहित तप अपार । हिमकेदारी करिता झाला ॥ ९७ ॥

करिता शिवआराधन । त्रिकाळ ज्योतिर्लिंगाचे पूजन । मागे भद्रायू बहुत दिन । राज्य करीत पृथ्वीचे ॥ ९८ ॥

शिवकवच भस्मधारण । रुद्राक्षमहिमा अपार पूर्ण । धन्य गुरु शिवयोगी सुजाण । शिष्य भद्रायू धन्य तो ॥ ९९ ॥

असो भद्रायू नृपनाथ । कीर्तिमालिनीसमवेत । चालिला वनविहारार्थ । अवलोकीत वनश्रियेते ॥ १०० ॥

छाया सघन शीतळ । पाट वाहती जल निर्मळ । तेथे बैसता सूर्यमंडळ । वरी कदापि दिसेना ॥ १०१ ॥

नारळी केळी पोफळी रातांजन । मलयागर सुवास चंदन । अशोकवृक्ष खर्जूरी सघन । आंबे जांभळी खिरणिया ॥ १०२ ॥

वट पिंपळ कडवे निंब । डाळिंब सेवरी मंदार कदंब । अंजीर औदुंबर पारिभद्र नभ । भेदीत गेले गगनमार्गे ॥ १०३ ॥

चंपक मोगरे जाई जुई । मालती सेवंती बकुळ ठायी ठायी । शतपत्र जपा अगस्ति वृक्ष पाही । वेष्टोनि वरी चालिले ॥ १०४ ॥

कनकवेली नागवेली परिकर । पोवळवेली नाना लता सुवासकर । द्राक्षद्वीप द्राक्षतरु सुंदर । जायफळी डोलती फळभारे ॥ १०५ ॥

बदके चातक मयूर । कस्तूरीमृग जवादी मार्जार । चक्रवाक नकुळ मराळ परिकर । सरोवरतीरी क्रीडती ॥ १०६ ॥

असो तया वनात । कीर्तिमालिनीसमवेत । क्रीडत असता अकस्मात । एक अपूर्व वर्तले ॥ १०७ ॥

दूरवरी भद्रायू विलोकीत । तो स्त्रीपुरुष येती धावत । ऊर्ध्व करोनिया हस्त । दीर्घस्वरे बोभाती ॥ १०८ ॥

पाठी लागला महाव्याघ्र । आक्रोशे बोभात विप्र । म्हणे नृपा स्त्री पतिव्रता थोर । मागे सुकुमार राहिली ॥ १०९ ॥

गजबजोनि धाविन्नला नृप । शर लावोनि ओढिले चाप । तव तो व्याघ्र काळरूप । स्त्रियेसी नेत धरूनिया ॥ ११० ॥

राये शर सोडिले बहुत । परी तो न गणी तैसाचि जात । विजूऐसे शर अद्भुत । आंगी भेदिले तयाच्या ॥ १११ ॥

गिरिकंदरे ओलांडून । व्याघ्र गेला स्त्रीस घेऊन । विप्र रायापुढे येऊन । शोक करी आक्रोशे ॥ ११२ ॥

अहा ललने तुजविण । गृह वाटते महा अरण्य । रायास म्हणे ब्राह्मण । धिक् क्षत्रियपण धिक् जिणे ॥ ११३ ॥

तुज देखता सत्य । माझ्या स्त्रीने केला आकान्त । अहा कांत पडले व्याघ्रमुखात । सोडवी मज यापासूनी ॥ ११४ ॥

तुजही हाका फोडिल्या बहुत । धाव धाव हे जगतीनाथ । धिक् तुझी शस्त्रे समस्त । खड्ग व्यर्थ गुरूने दीधले ॥ ११५ ॥

द्वादश सहस्र नागांचे बळ । धिक् मंत्र अस्त्रजाळ । क्षतापासोनि सोडवी तत्काळ । शरणागता रक्षी तोचि पार्थिव-११६ धिक् आश्रम धिक् ग्राम । जेथे नाही सत्समागम । धिक् श्रोता धिक् वक्ता सप्रेम । नाही कीर्तन शिवाचे ॥ ११७ ॥

धिक् संपत्ति धिक् संतती । द्विज न रक्षी न भजे उमापती । ते धिक् नारी पापमती । पतिव्रता जे नव्हे ॥ ११८ ॥

माता पितयांसी शिणवीत । धिक् पुत्र वाचला व्यर्थ । धिक् शिष्य जो गुरुभक्त । नव्हेचि, मतवादी पै ॥ ११९ ॥

गुरूची झाकोनि पदवी । आपुला महिमा विशेष मिरवी । धिक् पार्थिव जो न सोडवी । संकटी प्राण गेलिया ॥ १२० ॥

भद्रायू बोले उदिग्न । मी तुज इच्छिले देईन । करी पुढती उत्तम लग्न । अथवा राज्य दान घे माझे ॥ १२१ ॥

विप्र म्हणे कासया लग्न । स्त्रीहीनास कासयो धन । जन्मांधासी दर्पण । व्यर्थ काय दाऊनी ॥ १२२ ॥

मूढास कासया उत्तम ग्रंथ । तरुणास संन्यास देणे हे अनुचित । जरेने कवळिला अत्यंत । त्याचे लग्न व्यर्थ जैसे ॥ १२३ ॥

तृषाक्रांतासी पाजिले घृत । क्षुधातुरासी माळा गंधाक्षत । चिंतातुरापुढे व्यर्थ । गायन नृत्य कासया ॥ १२४ ॥

यालागी नलगे तुझे राज्य धन । दे माझी स्त्री आणोन । राव म्हणे जा कीर्तिमालिनी घेवोन । दिधली म्या तुजप्रती ॥ १२५ ॥

रायाचे सत्त्व पाहे ब्राह्मण । म्हणे दे कीर्तिमालिनी मज दान । माझे तप मेरुपर्वताहून । उंच असे न सरे कधी ॥ १२६ ॥

मी पापासी भीत नाही जाण । अंगिकारिले तुझे स्त्रीरत्न । सागरी ढेकुळ पडले येऊन । तरी सागर काय डहुळेल ॥ १२७ ॥

धुळीने न मळे आकाश । तैसा मी सदा निर्दोष । राव म्हणे हे अपयश । थोर आले मजवरी ॥ १२८ ॥

माझे बळ गेले तेच क्षणा । व्याघ्र नेली विप्रललना । आता स्त्री देवोनि ब्राह्मणा । अग्निकाष्ठे भक्षीन मी ॥ १२९ ॥

विप्रापुढे संकल्प करूनी । दान दिधली कीर्तिमालिनी । विप्र गुप्त झाला तेच क्षणी । राये अग्नी चेतविला ॥ १३० ॥

ज्वाळा चालिल्या आकाशपंथे । मग स्नान केले नृपनाथे । भस्म चर्चिले सर्वांगाते । रुद्राक्ष धारण पै केले ॥ १३१ ॥

आठवूनि गुरुचरण । शिवमंत्र शिवध्यान । प्रदक्षिणा करूनि तीन । अग्निकुंडाभोवत्या ॥ १३२ ॥

जयजय शंकर उमारंगा । मदनांतका भक्तभवभंगा । विश्वव्यापकाआराध्यलिंगा । नेई वेगे तुजपाशी ॥ १३३ ॥

उडी टाको जाता ते वेळी । असंभाव्य चेतला ज्वालामाली । तव त्यामधून कपालमौली । अपर्णेसहित प्रकटला ॥ १३४ ॥

दशभुज पंचवदन । कर्पूरगौर पंचदशनयन । पंचविंशतितत्त्वांहून । पंचभूतांवेगळा जो ॥ १३५ ॥

भद्रायूस हृदयी धरूनि सत्वर । म्हणे सखया इच्छित माग वर । तुझी भक्ति निर्वाण थोर । देखोनि प्रकट झालो मी ॥ १३६ ॥

भद्रायू बोले सद्गदित । म्हणे विप्रस्त्री आणूनि दे त्वरित । ते ऐकोनि हासिन्नला गजमुखतात । विप्र तो मीच झालो होतो ॥ १३७ ॥

व्याघ्रही मीच होऊन । गेलो भवानीस घेऊन । भक्ति पहावया निर्वाण । दोघेही आम्ही प्रगटलो ॥ १३८ ॥

तुझी ही घे कीर्तिमालिनी । म्हणोनि उभी केली तेच क्षणी । देव सुमने वर्षती गगनी । राव चरणी लागतसे ॥ १३९ ॥

शिव म्हणे रे गुणवंता । अपेक्षित वर मागे आता । येरू म्हणे वज्रबाहु पिता । सुमति माता महासती ॥ १४० ॥

पद्माकर गुणवंत । कैलासी न्यावा स्त्रीसमवेत । इतुक्यास ठाव यथार्थ । तुजसमीप देईजे ॥ १४१ ॥

तुझिया पार्श्वभागी सकळ । असोत स्वामी अक्षयी अढळ । यावरी बोले पयःफेनधवल । कीर्तिमालिनी तू माग आता ॥ १४२ ॥

ती म्हणे माता सीमंतिनी । पिता चित्रांगद पुण्यखाणी । तुजसमीप राहोत अनुदिनी । शूळपाणी तथास्तु म्हणे ॥ १४३ ॥

तुम्ही उभयतांनी मागितले । ते म्या सर्व दीधले । माझे चित्त गुंतले । तुम्हापासी सर्वदा ॥ १४४ ॥

मग कीर्तिमालिनीसमवेत । दहा सहस्र वर्षेपर्यंत । भद्रायू राजा राज्य करीत । हरिश्चंद्रासारिखे ॥ १४५ ॥

मग त्यावरी सकळी । दिव्यदेह अवघी झाली । दिव्य विमानी कपालमौली । नेता झाला संनिध ॥ १४६ ॥

चित्रांगद सीमंतिनी । वज्रबाहु सुमति राणी । अवघी विमानारूढ होवोनी । पावली शिवपद शाश्वत ॥ १४७ ॥

स्त्रीपुत्रांसमवेत पद्माकर । भद्रायू कीर्तिमालिनी सुकुमार । त्यासी विमान धाडून श्रीशंकर । आपुल्या स्वरूपी मेळविले ॥ १४८ ॥

हे भद्रायूआख्यान । परम यशोदायक आयुष्यवर्धन । ऐकता लिहिता जाण । विजय कल्याण सर्वदा ॥ १४९ ॥

हे आख्यान जे म्हणत । ते सर्वदा वादी जयवंत । विजय धैर्य अत्यंत । कीर्तिवंत सर्वा ठायी ॥ १५० ॥

भद्रायूआख्यानपुण्य आगळे । पदरचना ही बिल्वदळे । उमावल्लभा वाहती भावबळे । ते तरती संसारी ॥ १५१ ॥

भद्रायूआख्यान कैलासगिरी । जो का पारायणप्रदक्षिणा करी । त्याचा बंध तोडोनि मदनारी । निष्पाप करी सर्वदा ॥ १५२ ॥

ब्रह्मानंदा सुखदायका । श्रीधरवरदा कैलासनायका । भक्तकामकल्पद्रुम गजांतका । न येसी तर्का निगमागमा ॥ १५३ ॥

शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड । परिसोत सजन अखंड । अष्टमाध्याय गोड हा ॥ १५४ ॥

॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

shri shiv leelamrut adhyay 8 shiv lilamrut