Skip to main content
पडताळणी प्रलंबित

शिवलीलामृत अध्याय दुसरा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

जेथे सर्वदा शिवस्मरण । तेथे भुक्ति मुक्ति सर्वकल्याण । नाना संकटे विघ्ने दारुण । न बाधती कालत्रयी ॥ १ ॥

संकेते अथवा हास्येकरून । भलत्या मिसे घडो शिवस्मरण । न कळता परिसासी लोह जाण । संघटता सुवर्ण करी की ॥ २ ॥

न कळता प्राशिले अमृत । परी अमर करी की यथार्थ । औषधी नेणता भक्षीत । परी रोग सत्य हरी की ॥ ३ ॥

शुष्कतृणपर्वत अद्भुत । नेणता बाळक अकस्मात । अग्निस्फुलिंग टाकीत । परी भस्म यथार्थ करी की ॥ ४ ॥

तैसे न कळता घडे शिवस्मरण । परी सकळ दोषा होय दहन । अथवा विनोदेकरोन । शिवस्मरण घडो का ॥ ५ ॥

हे का व्यर्थ हाका फोडिती । शिव शिव नामे आरडती । अरे का हे उगे न राहती । हरहर ध्या गर्जती वेळोवेळा ॥ ६ ॥

शिवनामाचा करिती कोल्हाळ । माझे उठविले कपाळ । शिव शिव म्हणता वेळोवेळ । काय येते यांच्या हाता ॥ ७ ॥

ऐसी हेळणा करी क्षणोक्षणी । परी उमावल्लभनाम ये वदनी । पुत्रकन्यानामेकरूनी । शिवस्मरण घडो का ॥ ८ ॥

महाप्रीतीने करिता शिवस्मरण । आदरे करिता शिवध्यान । शिवस्वरूप मानूनि ब्राह्मण । संतर्पण करी सदा ॥ ९ ॥

ऐसी शिवी आवडी धरी । त्याहीमाजी आली शिवरात्री । उपवास जागरण करी । होय बोहरी महत्पापा ॥ १० ॥

ते दिवशी बिल्वदळे घेऊन । यथासांग घडले शिवार्चन । तरी सहस्रजन्मींचे पाप संपूर्ण । भस्म होऊनी जाईल ॥ ११ ॥

नित्य बिल्वदळे शिवासी वाहत । त्याएवढा नाही पुण्यवंत । तो तरेल हे नवल नव्हे सत्य । त्याच्या दर्शने बहुत तरती ॥ १२ ॥

प्रातःकाळी घेता शिवदर्शन । यामिनीचे पाप जाय जळोन । पूर्वजन्मीचे दोष गहन । माध्यान्ही दर्शन घेता नुरती ॥ १३ ॥

सायंकाळी शिव पाहता सप्रेम । सप्तजन्मीचे पाप होय भस्म । शिवरात्रीचा महिमा परम । शेषही वर्णू शकेना ॥ १४ ॥

कपिलाषष्ठी अर्धोदय संक्रमण । महोदय गजच्छाया ग्रहण । इतुकेही पर्वकाळ ओवाळून । शिवरात्रीवरूनि टाकावे ॥ १५ ॥

शिवरात्रि आधीच पुण्यदिवस । त्याहीवरी पूजन जागरण विशेष । त्रिकाळपूजा आणि रुद्रघोष । त्याच्या पुण्यासी पार नाही ॥ १६ ॥

वसिष्ठ विश्वामित्रादि मुनीश्वर । सुरगण गंधर्व किन्नर । सिद्ध चारण विद्याधर । शिवरात्रिव्रत करिताती ॥ १७ ॥

यदर्थी सुरस कथा बहुत । शौनकादिका सांगे सूत । ती श्रोती ऐकावी सावचित्त । अत्यादरेकरोनिया ॥ १८ ॥

तरी मासामाजी माघमास । ज्याचा व्यास महिमा वर्णी विशेष । त्याहीमाजी कृष्णचतुर्दशीस । मुख्य शिवरात्र जाणिजे ॥ १९ ॥

विंध्याद्रिवासी एक व्याध । मृगपक्षिघातक परमनिषिद्ध । महानिर्दय हिंसक निषाद । केले । अपराध बहु तेणे ॥ २० ॥

धनुष्यबाण घेऊनि करी । पारधीस चालिला दुराचारी । पाश वागुरा कक्षेसी धरी । कवच लेत हरितवर्ण ॥ २१ ॥

करी गोधांगुलित्राण । आणिकही हाती शस्त्रसामग्री घेऊन । काननी जाता शिवस्थान । शोभायमान देखिले ॥ २२ ॥

तव तो शिवरात्रीचा दिन । यात्रा आली चहूकडून । शिवमंदिर शृंगारून । शोभा आणिली कैलासींची ॥ २३ ॥

शुद्धरजततगटवर्ण । देवालय झळके शोभायमान । गगनचुंबित ध्वज पूर्ण । रत्नजडित कळस तळपताती ॥ २४ ॥

मध्ये मणिमय शिवलिंग । भक्त पूजा करिती सांग । अभिषेकधारा अभंग । विप्र धरिती रुद्रघोषे ॥ २५ ॥

एक टाळ मृदुंग घेऊन । सप्रेम करिती शिवकीर्तन । श्रोते करटाळी वाजवून । हरहर शब्दे घोष करिती ॥ २६ ॥

नाना परिमळद्रव्यसुवास । तेणे दशदिशा दुमदुमल्या विशेष । लक्ष दीपांचे प्रकाश । जलजघोष घंटारव ॥ २७ ॥

शशिमुखा गर्जती भेरी । त्यांचा नाद न माये अंबरी । एवं चतुर्विध वाद्ये नानापरी । भक्त वाजविती आनंदे ॥ २८ ॥

तो तेथे व्याध पातला । समोर विलोकी सर्व सोहळा । एक मुहूर्त उभा ठाकला । हासत बोलिला विनोदे ॥ २९ ॥

हे मूर्ख अवघे जन । येथे द्रव्य काय व्यर्थ नासोन । आत दगड बाहेर पाषाण । देवपण येथे कैचे ॥ ३० ॥

उत्तम अन्न सांडून । व्यर्थ का करिती उपोषण । ऐसिया चेष्टा करीत तेथून । काननाप्रती जातसे ॥ ३१ ॥

लोक नामे गर्जती वारंवार । आपणही विनोदे म्हणे शिव हरहर । सहज सव्य घालोनि शिवमंदिर । घोर कांतार प्रवेशला ॥ ३२ ॥

वाचेसी लागला तोचि बेध । विनोदे बोले शिव शिव शब्द । नामप्रतापे दोष अगाध । झडत सर्व चालिले ॥ ३३ ॥

घोरांदर सेवता वन । नाढळतीच जीव लघुदारुण । तो वरुणदिग्वधूचे सदन । वासरमणि प्रवेशला ॥ ३४ ॥

निशा प्रवर्तली सबळ । की ब्रह्मांडकरंडा भरले काजळ । की विशाळ कृष्णकंबळ । मंडप काय उभारिला ॥ ३५ ॥

विगतधवा जेवी कामिनी । तेवी न शोभे कदा यामिनी । जरी मंडित दिसे उडुगणी । परी पतिहीन रजनी ते ॥ ३६ ॥

जैसा पंडित गेलिया सभेतून । मूर्ख जल्पती पाखंडज्ञान । जेवी अस्ता जाता सहस्रकिरण । उडुगणे मागे झळकती ॥ ३७ ॥

असो ऐशी निशा दाटली सुबुद्ध । अवघा वेळ उपवासी निषाद । तो एक सरोवर अगाध । दृष्टी देखिले शोधिता ॥ ३८ ॥

अनेक संपत्ति सभाग्यसदनी । तेवी सरोवरी शोभती कुमुदिनी । तटी बिल्ववृक्ष गगनी । शोभायमान पसरला ॥ ३९ ॥

योगभ्रष्ट कर्मभूमीस पावती जनन । तेवी बिल्वडहाळिया गगनींहून । भूमीस लागल्या येऊन । माजी रविशशिकिरण न दिसे ॥ ४० ॥

त्यात तम दाटले दारुण । माजी बैसला व्याध जाऊन । शरासनी शर लावून । कानाडी ओढोनि सावज लक्षी ॥ ४१ ॥

दृष्टी बिल्वदळे दाटली बहुत । ती दक्षिण हस्ते खुडोनि टाकीत । तो तेथे पद्मजहस्ते स्थापित । शिवलिंग दिव्य होते ॥ ४२ ॥

त्यावरी बिल्वदळे पडत । तेणे संतोषला अपर्णानाथ । व्याधास उपवास जागरण घडत । सायास न करिता अनायासे ॥ ४३ ॥

वाचेसी शिवनामाचा चाळा । हर हर म्हणे वेळोवेळा । पापक्षय होत चाळिला । पूजन स्मरण सर्व घडले ॥ ४४ ॥

एक याम झालिया रजनी । तो जलपानालागी एक हरिणी । आली तेथे ते गर्भिणी । परम सुकुमार तेजस्वी ॥ ४५ ॥

व्याध तिने लक्षिला दुरून । कृतान्तवत परम दारुण । आकर्ण ओढिला बाण । देखोनिया हरिणी बोलतसे ॥ ४६ ॥

म्हणे महापुरुषा अन्यायाविण । का मजवरी लाविला बाण । मी तव हरिणी आहे गर्भिण । वध तुवा न करावा ॥ ४७ ॥

उदरात गर्भ सूक्ष्म अज्ञान । वधिता दोष तुज दारुण । एक रथभरी जीव वधिता सान । तरी एक बस्त वधियेला ॥ ४८ ॥

शत बस्त वधिता एक । वृषभहत्येचे पातक । शत वृषभ तै गोहत्या देख । घडली शास्त्र वदतसे ॥ ४९ ॥

शत गोहत्यांचे पातक पूर्ण । एक वधिता होय ब्राह्मण । शत ब्रह्महत्यांचे पातक जाण । एक स्त्री वधिलिया ॥ ५० ॥

शत स्त्रियांहून अधिक । एक गुरुहत्येचे पातक । त्याहूनि शतगुणी देख । एक गर्भिण वधिलिया ॥ ५१ ॥

तरी अन्याय नसता ये अवसरी । मज मारिसी का वनांतरी । व्याध म्हणे कुटुंब घरी । उपवासी वाट पहात ॥ ५२ ॥

मीही आजि निराहार । अन्न नाहीच अणुमात्र । परी मृगी होऊनि सुंदर । गोष्टी वदसी शास्त्रींच्या ॥ ५३ ॥

मज आश्चर्य वाटते पोटी । नराऐशा सांगसी गोष्टी । तुज देखोनिया दृष्टी । दया हृदयी उपजतसे ॥ ५४ ॥

पूर्वी तू होतीस कोण । तुज एवढे ज्ञान कोठून । तू विशाळनेत्री रूपलावण्य । सर्व वर्तमान मज सांगे ॥ ५५ ॥

मृगी म्हणे ते अवसरी । पूर्वी मंथन करिता क्षीरसागरी । चतुर्दश रत्ने काढिली सुरासुरी । महाप्रयत्ने करूनिया ॥ ५६ ॥

त्यामाजी मी रंभा चतुर । मज देखोनि भुलती सुरवर । नाना तपे आचरोनि अपार । तपस्वी पावती आम्हाते ॥ ५७ ॥

म्या नयनकटाक्षजाळे पसरून । बांधिले निर्जरांचे मनमीन । माझिया अंगसुवासा वेधून । मुनिभ्रमर धावती ॥ ५८ ॥

माझे गायन ऐकावया सुरंग । सुधापानी धावती कुरंग । मी भोगी स्वर्गींचे दिव्य भोग । स्वरूपे न मानी कोणासी ॥ ५९ ॥

मद अंगी चढला बहुत । शिवभजन टाकिले समस्त । शिवरात्रा सोमवार प्रदोषव्रत । शिवार्चन सांडिले म्या ॥ ६० ॥

सोडोनिया सुधापान । करू लागले मद्यप्राशन । हिरण्यनामा दैत्य दारुण । सुर सोडोनि रतले त्यासी ॥ ६१ ॥

ऐसा लोटला काळ अपार । मृगयेस गेला तो असुर । त्या दुष्टासंगे अपर्णावर- । भजनपूजनविसरले ॥ ६२ ॥

मनास ऐसे वाटले पूर्ण । असुर गेला मृगयेलागोन । इतक्यात घ्यावे शिवदर्शन । म्हणोनि गेले कैलासा ॥ ६३ ॥

मज देखता हिमनगजामात । परम क्षोभोनि शाप देत । तू परम पापिणी यथार्थ । मृगी होई मृत्युलोकी ॥ ६४ ॥

तुझ्या सख्या दोघीजणी । त्या होतील तुजसवे हरिणी । हिरण्य असुर माझिये भजनी । असावध सर्वदा ॥ ६५ ॥

तोही मृग होऊनि सत्य । तुम्हासीच होईल रत । ऐक व्याधा सावचित्त । मग म्या शिव प्रार्थिला ॥ ६६ ॥

हे पंचवदना विरूपाक्षा । सच्चिदानंदा कर्माध्यक्षा । दक्षमखदळणा सर्वसाक्षा । उःशाप देई आम्हाते ॥ ६७ ॥

भोळा चक्रवर्ती दयाळ । उःशाप वदला पयःफेनधवल । द्वादश वर्षे भरतां तात्काळ । पावाल माझिया पदाते ॥ ६८ ॥

मग आम्ही मृगयोनी । जन्मलो ये कर्मअवनी । तरी मी गर्भिणी आहे हरिणी । प्रसूतकाळ समीप असे ॥ ६९ ॥

तरी मी आपुल्या स्वस्थळी जावोन । सत्वर येते गर्भ ठेऊन मग तू सुखे घेई प्राण । सत्य वचन हे माझे ॥ ७० ॥

ऐसी मृगी बोलली सावचित्त । त्यावरी तो व्याध काय बोलत । तू गोड बोलसी यथार्थ । परी विश्वास मज न वाटे ॥ ७१ ॥

नानापरी असत्य बोलोन । करावे शरीराचे संरक्षण । हे प्राणिमात्रास आहे ज्ञान । तरी तू शपथ वदे आता ॥ ७२ ॥

महत्पापे उच्चारून । शपथ वदे यथार्थ पूर्ण । यावरी ते हरिणी दीनवदन । वाहात आण ऐका ते ॥ ७३ ॥

ब्राह्मणकुळी उपजोन । जो न करी वेदशास्त्राध्ययन । सत्यशौचवर्जित संध्याहीन । माझे शिरी पातक ते ॥ ७४ ॥

एक वेदविक्रय करिती पूर्ण । कृतघ्न परपीडक नावडे भजन । एक दानासी करिती । विघ्न । गुरुनिंदाश्रवण एक करिती ॥ ७५ ॥

रमावर-उमावरांची निंदा । त्या पापाची मज होय आपदा । दान दिधले जे ब्रह्मवृंदा । हिरोनि घेती माघारे ॥ ७६ ॥

एक यतिनिंदा करिती । एक शास्त्रे पहाती द्वैत निर्मिती । नाना भ्रष्टमार्ग आचरती । स्वधर्म आपला सांडूनिया ॥ ७७ ॥

देवालयामाजी जाउनी । हरिकथापुराणश्रवणी । जै बैसती विडा घेउनी । ते कोडी होती पापिये ॥ ७८ ॥

जे देवळात करिती स्त्रीसंभोग । की स्त्री-भ्रतारांसी करिती वियोग । ते नपुंसक होवोनि अभाग्य । उपजती या जन्मी ॥ ७९ ॥

वर्मकर्मे निंदा करीत । तो जगपुरीषभक्षक काग होत । शिष्यांसी विद्या असोनि न सांगत । तो पिंगळा होत निर्धार ॥ ८० ॥

अनुचित प्रतिग्रह ब्राह्मण घेती । त्यानिमित्ते गंडमाळा होती । परक्षेत्रीच्या गाई वळोनि आणिती । ते अल्पायुषी होती या जन्मी ॥ ८१ ॥

जो राजा करी प्रजापीडण । तो या जन्मी व्याघ्र का सर्प होय दारुण । वृथा करी साधुछळण । निर्वंश पूर्ण होय त्याचा ॥ ८२ ॥

स्त्रिया व्रतनेम करीत । भ्रतारासी अव्हेरित । धनधान्य असोनि वंचित । त्या वाघुळा होती या जन्मी ॥ ८३ ॥

पुरुष कुरूप म्हणोनिया त्यागिती । त्या या जन्मी बालविधवा होती । तेथेही जारकर्म करिती । मग त्या होती वारांगना ॥ ८४ ॥

ज्या भ्रतारासी निर्भर्सिती । त्या दासी किंवा कुलटा होती । सेवक स्वामीचा द्रोह करिती । ते जन्मा येती श्वानाच्या ॥ ८५ ॥

सेवकापासून सेवा घेऊन । त्याचे न दे जो वेतन । तो अत्यंत भिकारी होऊन । दारोदारी हिंडतसे ॥ ८६ ॥

स्त्री-पुरुष गुज बोलता । जो जाऊनि ऐके तत्त्वता । त्याची स्त्री दुरावे हिंडता । अन्न न मिळे तयाते ॥ ८७ ॥

जे जारण मारण करिती । ते भूत प्रेत पिशाच्च होती । यती उपवासे पीडिती । त्यांते दुष्काळ जन्मवरी ॥ ८८ ॥

स्त्री रजस्वला होऊनी । गृही वावरे जे पापिणी । पूर्वज रुधिरी पडती पतनी । त्या गृही देव-पितृगण न येती ॥ ८९ ॥

जे देवाच्या दीपाचे तेल नेती । ते या जन्मी निपुत्रिक होती । ज्या रांधिता अन्न चोरोनि भक्षिती । त्या मार्जारी होती या जन्मी ॥ ९० ॥

ब्राह्मणांस कदन्न घालून । आपण भक्षिती षड्रस पक्वान्न । त्यांचे गर्भ पडती गळोन । आपुलिया कर्मवशे ॥ ९१ ॥

जो माता-पित्यांसी शिणवीत । तो ये जन्मी मर्कट होत । सासू-श्वशुरा स्नुषा गांजीत । तरी बालक न वांचे तियेचे ॥ ९२ ॥

मृगी म्हणे व्याधालागून । जरी मी न ये परतोन । तरी ही महत्पापे संपूर्ण । माझ्या माथा बैसोत ॥ ९३ ॥

हे मिथ्या गोष्ट होय साचार । तरी घडो शिवपूजेचा अपहार । ऐसी शपथ ऐकता निर्धार । व्याध शंकला मानसी ॥ ९४ ॥

म्हणे पतिव्रते जाई आता । सत्वर येई निशा सरता । हरिणी म्हणे शिवपदासी तत्त्वता । पुण्यवंता जाशील ॥ ९५ ॥

उदकपान करोनि वेगी । निजाश्रमा गेली ते कुरंगी । इकडे व्याध दक्षिणभागी । टाकी बिल्वदळे खुडोनिया ॥ ९६ ॥

दोन प्रहर झाली यामिनी । द्वितीय पूजा शिवे मानूनी । अर्धपाप जळाले मुळीहूनी । सप्तजन्मीचे तेधवा ॥ ९७ ॥

नामी आवड जडली पूर्ण । व्याध करी शिवस्मरण । मृगीमुखे ऐकिले निरूपण । सहज जागरण घडले तया ॥ ९८ ॥

तो दुसरी हरिणी अकस्मात । पातली तेथे तृषाकांत । व्याधे बाण ओढिता त्वरित । करुणा भाकी हरिणी ते ॥ ९९ ॥

म्हणे व्याधा ऐक ये समयी । मज कामानळे पीडिले पाही । पतीस भोग देवोनि लवलाही । परतोनि येते सत्वर ॥ १०० ॥

व्याध आश्चर्य करी मनात । म्हणे शपथ बोलोनी जाई त्वरित । धन्य तुमचे जीवित्व । सर्व शास्त्रार्थ ठाऊका ॥ 10१ ॥

वापी तडाग सरोवर । जो पतित मोडी देवागार । गुरुनिंदक मद्यपानी दुराचार । ती पापे समग्र मस्तकी माझ्या ॥ 10२ ॥

महाक्षत्रिय आपण म्हणवीत । समरांगणी मागे पळत । वृत्ति हरी सीमा लोटीत । ग्रंथ निंदीत महापुरुषांचे ॥ 10३ ॥

वेदशास्त्रांची निंदा करी । संतभक्तांसी द्वेष धरी । हरि-हर चरित्रे अव्हेरी । माझे शिरी ती पापे ॥ 10४ ॥

धन धान्य असोनि पाही । पतीलागी शिणवी म्हणे नाही । पति सांडोनि निजे परगृही । ती पापे माझिया माथा ॥ 10५ ॥

पुत्र स्नुषा सन्मार्ग वर्तता । त्यासी व्यर्थचि गांजिती जे न पाहता । ते कुरूप होती तत्त्वता । हिंडता भिक्षा न मिळेचि ॥ 10६ ॥

बंधु-बंधु जे वैर करिती । ते या जन्मी मत्स्य होती । गुरुचे उणे जे पाहती । त्यांची संपत्ति दग्ध होय ॥ 10७ ॥

जे मार्गस्थांची वस्त्र हरिती । ते अतिशूद्र प्रेतवस्त्रे पांघरती । आम्ही तपस्वी म्हणोनिया अनाचार करिती । ते घुले होती मोकाट ॥ 10८ ॥

दासी स्वामीची सेवा न करी । ती ये जन्मी होय मगरी । जो कन्याविक्रय करी । हिंसकयोनी निपजे तो ॥ 10९ ॥

स्त्री भ्रताराची सेवा करीत । तीस जो व्यर्थचि गांजीत । त्याचा गृहभंग होत । जन्मजन्मांतरी न सुटे ॥ ११० ॥

ब्राह्मण करी रसविक्रय । घेता देता मद्यपी होय । जो ब्रह्मवृंदा श्री अपमानिताहे । तो होय ब्रह्मराक्षस ॥ १1१ ॥

एके उपकार केला । जो नष्ट नाठवी त्याला । तो कृतघ्न जंत झाला । पूर्वकर्मे जाणिजे ॥ 1१२ ॥

विप्र श्राद्धी जेवुनी । स्त्रीभोग करी ते दिनी । तो श्वानसूकरयोनी । उपजेल निःसंशये ॥ १1३ ॥

व्यवहारी दहांत बैसोन । खोटी साक्ष देई गर्जोन । पूर्वज नरकी पावती पतन । असत्य साक्ष देताचि ॥ १1४ ॥

दोघी स्त्रिया करोन । एकीचेच राखी जो मन । तो गोचिड होय जाण । सारमेयशरीरी ॥ १1५ ॥

पूर्वजन्मी कोंडी उदक । त्याचा मळमूत्रनिरोधदेख । करिता साधुनिंदा आवश्यक । सत्वरदंत भग्न होती ॥ १1६ ॥

देवालयी करी भोजन । तरी ये जन्मी होय क्षीण । पृथ्वीपतीची निंदा करिता जाण । उदरी मंदाग्नि होय पै ॥ १1७ ॥

ग्रहणसमयी करी भोजन । त्यासी पित्तरोग होय दारुण । परबाळे विकी परदेशी नेऊन । तरी सर्वांगी कुष्ठ भरे ॥ १1८ ॥

जी स्त्री करीगर्भपात । ती उपजे वंध्या होऊन । देवालय टाकी पाडोन । तरी अंगभंग होय त्याचा ॥ १1९ ॥

अपराधाविण स्त्रीसी गांजिता हे । त्याचे ये जन्मी एक अंग जाये । ब्राह्मणाचे अन्न हरिती पापिये । त्यांचा वंश न वाढे कधी ॥ १२० ॥

गुरु संत माता पिता । त्यांसी जो होय निर्भत्सिता । तरी वाचा जाय तत्त्वता । अडखळे बोलता क्षणाक्षणा ॥ 1२१ ॥

जो ब्राह्मणांसी दंड मारी । त्यासी व्याधितिडका लागती शरीरी । जो संतांसी वादविवाद करी । दीर्घ दंत होती त्याचे ॥ 1२२ ॥

देवद्वारीचे तरुवर । अश्वत्थादि वृक्ष साचार । तोडिता पांगुळ होय निर्धार । भिक्षा न मिळे हिंडता ॥ 1२३ ॥

जो सूतकअन्न भक्षित । त्याचे उदरी नाना रोग होत । आपणचि परिमळद्रव्य भोगी समस्त । तरी दुर्गंधी सत्य सर्वांगी ॥ 1२४ ॥

ब्राह्मणाचे ऋण न देता । तरी बाळपणी मृत्यु पावे पिता । जलवृक्षछाया मोडिता । तरी एकही स्थळ न मिळे त्याते ॥ 1२५ ॥

ब्राह्मणासी आशा लावून चाळवी नेदी कदा दान । तो ये जन्मी अन्न अन्न । करीत हिंडे घरोघरी ॥ 1२६ ॥

जो पुत्रद्वेष करीत । आणि दरिद्रयाचे लग्न मोडीत । तरी स्त्रीस सल राहे पोटात । वंध्या निश्चित संसारी ॥ 1२७ ॥

जेणे ब्राह्मण बांधिले निग्रहून । त्यासी सांडसे तोडी सूर्यनंदन । जो नायके कथाग्रंथ पावन । बधिर होय जन्मोजन्मी ॥ 1२८ ॥

जो पीडी माता-पितयांस । त्याचा सर्वदा होई कार्यनाश । एकास भजे निंदी सर्व देवां । तरी एकचि पुत्र होय त्यासी ॥ 1२९ ॥

जो चांडाळ गोवध करी । त्यासी मिळे कर्कशा नारी । वृषभ श्री वधिता निर्धारी । शतमूर्ख पुत्र होंय त्यासी ॥ १३० ॥

उदकतृणेविण पशु मारीत । तरी मुक्याच प्रजा होती समस्त । जो प्रतिव्रतेसी भोगू इच्छित । तरी कुरूप नारी कर्कशा मिळे ॥ 1३१ ॥

जो पारधी बहुं जीव संहारी । तो फेपरा होय संसारी । गुरूचा त्याग जो चांडाळ करी । तो उपजताचि मृत्यु पावे ॥ 1३२ ॥

नित्य अथवा रविवारी मुते रवीसमोर । त्याचे बाळपणी दंत भग्न केश शुभ्र । जे मृत बाळासाठी रुदती निर्धार । त्यास हासता निपुत्रिक होय ॥ 1३३ ॥

हरिणी म्हणे व्याधालागून । मी सत्वरी येते पतीस भोग देऊन । न ये तरी ही पापे संपूर्ण । माझ्या माथा बैसोत पै ॥ 1३४ ॥

व्याध मनात शंकोन । म्हणे धन्य धन्य तुमचे ज्ञान । सत्वर येई गृहास जाऊन । सत्य संपूर्ण सांभाळी ॥ 1३५ ॥

जलपान करोनि वेगी । आश्रमा गेली ते कुरंगी । तो मृगराज तेच प्रसंगी । जलपानार्थ पातला ॥ 1३६ ॥

व्याधे ओढिला बाण । तो मृग बोले दीनवदन । म्हणे माझ्या स्त्रिया पतिव्रता सगुण । त्यासी पुसोन येतो मी ॥ 1३७ ॥

शपथ ऐके त्वरित । कीर्तन करिती प्रेमळ भक्त । तो कथारंग मोडिता निर्वंश होत । ते पाप सत्य मम माथा ॥ 1३८ ॥

ब्रह्मकर्म वेदोक्त । शूद्र निजांगे आचरत । तो अधम नरकी पडत । परधर्म आचरता ॥ 1३९ ॥

तीर्थयात्रेसी विघ्ने करी । वाटपाडी वस्त्र द्रव्य हरी । तरी सर्वांगी व्रण अघोरी । नरकी पडे कल्पपर्यंत ॥ १४० ॥

शास्त्रकोशी नाही प्रमाण । कूटकविता करी क्षुद्र लक्षून । हरिती ब्राह्मणांचा मान । तरी संतान तयांचे न वादे ॥ 1४१ ॥

हरिदिनी शिवदिनी उपोषण । विधियुक्त न करी द्वादशी पूर्ण । तरी हस्तपाद क्षीण । होती त्याचे निर्धारि ॥ 1४२ ॥

एक शिवहरिप्रतिमा फोडिती । एक भगवद्भक्ता विघ्ने करिती । एक शिवमहिमा उच्छेदिती । नरकी होती कीटक ते ॥ 1४३ ॥

मातृद्रोही त्यासी व्याधी भरे । पितृद्रोही पिशाच विचरे । गुरुद्रोही तत्काळ मरे । भूतप्रेतगणी विचरे तो ॥ 1४४ ॥

विप्र आहार बहुत जेविती । त्यांस जो हासे दुर्मती । त्याचे मुखी अरोचकरोग निश्चिती । न सोडिती जन्मवरी ॥ 1४५ ॥

एक गोविक्रय करिती । एक कन्याविक्रय अर्जिती । ते नर मार्जार मस्त होती । बाळे भक्षिती । आपुली ॥ 1४६ ॥

जो कन्या भगिनी अभिलाषी । कामदृष्टी न्याहाळी पतिव्रतेसी। प्रमेहरोग होय त्यासी। की खडा गुह्यात दाटत ॥ 1४७॥

प्रासादभंग लिंगभंग करी। देवांची उपकरणे अलंकार चोरी । देवप्रतिष्ठा अव्हेरी। पंडुरोग होय तेथे ॥ 1४८॥

एक मित्रद्रोह विश्वासघात करिती । मातृपितृहत्या गुरूसी संकटी पाडिती। ब्रह्मवध गोवध न वारिती। अंगी सामर्थ्य असोनिया ॥ 1४९॥

ब्राह्मण बैसवोनि बाहेरी। उत्तमान्न जेविती गृहांतरी। सोयर्‍यांची प्रार्थना करी। संग्रहणी पोटशूळ होती तया ॥ १५० ॥

एक कर्मभ्रष्ट पंचयज्ञ न करिती। एक ब्राह्मणांची सदने जाळिती। एक दीनासी मार्गी नागविती। एक संतांचा करिती अपमान ॥ 1५१ ॥

एक करिती गुरुछळण। एक म्हणती पाहो याचे लक्षण । नाना दोष आरोपिती अज्ञान। त्यांचे संतान न वाढे ॥ 1५२ ॥

जो सदा पितृद्वेष करी। जो ब्रह्मवृंदासी अव्हेरी। शिवकीर्तन ऐकता ध्या त्रासे अंतरी। तरी पितृवीर्य नव्हे तो ॥ 1५३ ॥

शिवकीर्तनी नव्हे सादर। तरी कर्णमूळरोग निर्धार । नसत्याच गोष्टी जल्पे अपार। तो दर्दुर होय निर्धारे ॥ 1५४ ॥

शिवकीर्तन किंवा पुराणश्रवण । तेथे शयन करिता सर्प होय दारुण । एक अतिवादक छळक जाण । ते पिशाचयोनी पावती ॥ 1५५ ॥

एका देवार्चनी वीट येत। ब्राह्मण पूजावया कंटाळत। तीर्थप्रसाद अव्हेरीत। त्याच्या आखुडती अंगशिरा ॥ 1५६ ॥

मृग म्हणे ऐसी पापे अपार। मम मस्तकी होईल परम भार। मग पारधी म्हणे सत्वर। जाई स्वस्थाना मृगवर्या ॥ 1५७ ॥

व्याध शिवनामे गर्जे ते क्षणी। कंठ सद्‌गदित अश्रू नयनी। मागुती बिल्वदळे खुडोनी। शिवावरी टाकीतसे ॥ 1५८ ॥

चौप्रहरांच्या पूजा चारी। संपूर्ण झाल्या शिवजागरी। सप्तजन्मीची पापे निर्धारी। मुळीहूनी भस्म झाली ॥ 1५९ ॥

तो पूर्वदिशा मुख प्रक्षाळीत। सुपर्णाग्रज उदय पावत। आरक्तवर्ण शोभा दिसत। तेचि कुंकुम प्राचीचे ॥ १६० ॥

तो तिसरी मृगी आली अकस्मात। व्याध देखिला कृतान्तवत। म्हणे मारू नको मज यथार्थ। बाळासी स्तन देऊन येते मी ॥ 1६१ ॥

व्याध अत्यंत हर्षभरित। म्हणे ही काय बोलेल शास्त्रार्थ । तो ऐकावया म्हणत। शपथ करूनि जाय तू ॥ 1६२ ॥

यावरी मृगी म्हणे व्याधा ऐक। जो तृणदाहक ग्रामदाहक। गोब्राह्मणांचे कोंडी उदक। क्षयरोग त्यासी न सोडी ॥ 1६३ ॥

ब्राह्मणांची सदने हरिती देख। त्यांचे पूर्वज रौरवी पडती निःशंक। मातृ-पुत्रा विघडती एक। स्त्रीपुरुषा विघड पाडिती ॥ 1६४ ॥

देवब्राह्मण देखोन । खालती न करिती कदा मान । निंदिती बोलती कठोर वचन । यम करचरण छेदी तयांचे ॥ 1६५ ॥

परवस्तु चोरावया देख । अखंड लाविला असे रोख । साधुसन्मानाने मानी दु:ख । त्यास नेत्ररोगतिडका न सोडिती ॥ 1६६ ॥

पुस्तकचोर ते मुके होती । रत्नचोरांचे नेत्र जाती । अत्यंत गर्वी ते महिष होती । पारधी निश्चित श्येनपक्षी ॥ 1६७ ॥

भक्तांची जो निंदा करीत । त्याचे मुखी दुर्गंधी घाणित । जो माता-पितयांसी ताडित । लुला होत यालागी ॥ 1६८ ॥

जो अत्यंत कृपण । धन न वेची अणुप्रमाण । तो महाभुजंग होऊन । धुसधुसीत बैसे तेथे ॥ 1६९ ॥

भिक्षेसी यतीश्वर आला । तो जेणे रिता दवडिला । शिव त्यावरी जाण कोपला । संतति संपत्ति दग्ध होय ॥ 1७० ॥

ब्राह्मण बैसला पात्रावरी । उठवूनि घातला बाहेरी । त्याहूनिया दुराचारी । दुसरा कोणी नसेचि ॥ 1७१ ॥

ऐसा धर्माधर्म ऐकोन । पारधी सद्‌गद बोले वचन । स्वस्थळा जाई जलपान करोन । बाळांसी स्तन देऊन येई ॥ 1७२ ॥

ऐसे ऐकोनि मृगी लवलाह्या । गेली जलप्राशन करूनिया । बाळे स्तनी लावूनिया । तृप्त केली तियेने ॥ 1७३ ॥

वडील झाली प्रसूत । दुसरी पतीची कामना पुरवित । मृगराज म्हणे आता त्वरित । जाऊ चला व्याधापासी ॥ 1७४ ॥

मृग पाडसांसहित सर्वही । व्याधापासी आली लवलाही । मृग म्हणे ते समयी । आधी मज वधी पारधिया ॥ 1७५ ॥

मृगी म्हणे हा नव्हे विधी । आम्ही जाऊ पतीच्या आधी । पाडसे म्हणती त्रिशुद्धी । आम्हासी वधी पारधिया ॥ 1७६ ॥

त्यांची वचने ऐकता ते क्षणी । व्याध सद्गद झाला मनी । अश्रुधारा लोटल्या ला नयनी । लागे चरणी तयांच्या ॥ 1७७ ॥

म्हणे धन्य जिणे माझे झाले । तुमचेनि मुखे निरूपण ऐकिले । बहुता जन्मींचे पाप जळाले । पावन केले शरीर ॥ 1७८ ॥

माता पिता गुरु देव । तुम्हीच आता माझे सर्व । कैचा संसार मिथ्या वाव । पुत्रकलत्र सर्व लटके ॥ 1७९ ॥

व्याध बोले प्रेमेकरून । आतां कधी मी शिवपद पावेन । तो अकस्मात आले विमान । शिवगण बैसले त्यावरी ॥ १८० ॥

पंचवदन दशभुज । व्याघ्रांबर नेसले महाराज । अद्भुत तयांचे तेज । दिक्‌चक्रामाजी न समाये ॥ 1८१ ॥

दिव्य वाद्ये वाजविती किन्नर । आलाप करिती विद्याधर । दिव्य सुमनांचे संभार । सुरगण स्वये वर्षती ॥ 1८२ ॥

मृगे पावली दिव्य शरीर । व्याध करी साष्टांग नमस्कार । मुखे म्हणे जय जय शिव हर हर । तो शरीरभाव पालटला ॥ 1८३ ॥

परिसी झगडता लोह होय सुवर्ण । तैसा व्याध झाला दशभुज पंचवदन । शिवगणी बहुत प्रार्थुन । दिव्य विमानी बैसविला ॥ 1८४ ॥

मृगे पावली दिव्य शरीर । तीही विमानी आरूढली समग्र । व्याधाची स्तुती वारंवार । करिती सुरगण सर्वही ॥ 1८५ ॥

व्याध नेला शिवपदाप्रती । तारामंडळी मृगे राहती । अद्यापि गगनी झळकती । जन पाहतीला सर्व डोळा ॥ 1८६ ॥

सत्यवतीहृदयरत्नखाणी । रसभरित बोलिला लिंगपुराणी । ते सज्जन ऐकोत दिनरजनी । ब्रह्मानंदेकरूनिया ॥ 1८७ ॥

धन्य ते शिवरात्रिव्रत । श्रवणे पातक दग्ध होत । जे हे पठण करिती सावचित । धन्य पुण्यवंत नर तेचि ॥ 1८८ ॥

सज्जन श्रोते निर्जर सत्य । प्राशन करोत अ शिवलीलामृत । निंदक असुर कुतर्की बहुत । त्यास प्राप्त कैचे हे ॥ 1८९ ॥

कैलासनाथ ब्रह्मानंद । तयाचे पदकल्हार सुगंध । तेथे श्रीधर अभंग षट्पद । रुंजी घालीत शिवनामे ॥ १९० ॥

शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड । परिसोत सज्जन अखंड । द्वितीयाध्याय गोड हा ॥ १९१ ॥

॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

shri shiv leelamrut adhyay 2 shiv lilamrut