Skip to main content
पडताळणी प्रलंबित

शिवलीलामृत अध्याय सहावा

श्रीगणेशाय नमः ॥

जय जय मदनांतका मनमोहना । मदमत्सरकाननदहना । हे भवभयपाशनिकृंतना । भवानीरंजना भयहारका ॥ १ ॥

हिमाद्रिजामाता गंगाधरा । सिंधुरवदनजनका कर्पूरगौरा । पद्मनाभमनरंजना त्रिपुरहरा । त्रिदोषशमना त्रिभुवनेशा ॥ २ ॥

नीलग्रीवा सुहास्यवदना । नंदीवहना अंधकमर्दना । गजातका दक्षक्रतुदलना । दानवदमना दयानिधे ॥ ३ ॥

अमितभक्तप्रियकरा । ताटिकांतकपूज्य त्रितापहरा । तुझे गुण वर्णावया दशशतवक्त्रा । शक्ति नव्हेचि सर्वथा ॥ ४ ॥

नित्य शांत निर्विकल्प निरंजना । आशापाशरहित विरक्त पूर्णा । निजभक्तपाशविमोचना । जन्ममरणां मोचक जो ॥ ५ ॥

जे विषयकामनायुक्त । तुज स्वामी अनन्य भजत । त्यासी पुरविसी विषयपदार्थ । जे जे इच्छित सर्वही ॥ ६ ॥

सकामासी कामना पुरवून । तू निजध्यानी लाविसी मन । तेच परम विरक्त होऊन । पद निर्वाण पावती ॥ ७ ॥

सोमवार शिवरात्रि प्रदोष । आचरता तरले असंख्य स्त्रीपुरुष । येचविषयी कथा निर्दोष । सूत सांगे शौनकादिका ॥ ८ ॥

आर्यावर्त देश पवित्र । तेथीचा चित्रवर्मा नाम नृपवर । जैसे पूर्वी नल हरिश्चंद्र । तैसा पुण्यशील प्रतापी ॥ ९ ॥

जैसा जनक रक्षी बाळ स्नेहाळ । तैसा गोविप्रपाळक नृपाळ । दुष्ट दुर्जन शत्रु खळ । त्यासी काळ दंडावया ॥ १० ॥

प्रयत्नाविषयी जैसा भगीरथ । बळास उपमिजे वायुसुत । समरभूमीस भार्गव अजित । विरोचनात्मज दानाविषयी ॥ ११ ॥

शिव आणि श्रीधर । त्यांच्या भक्तीस तत्पर । त्यास झाले बहुत पुत्र । पितयातुल्य प्रतापी ॥ १२ ॥

बहुत नवस करिता पंचवदना । एक कन्या झाली शुभानना । सुलोचना नैषधअंगना । उपमेस तिच्या न पुरती ॥ १३ ॥

तारकारिजनकशत्रुप्रिया । वृत्रारिशत्रुजनकजाया । उपमा देता द्विजराजभार्या । बहुत वाटती हळुवट ॥ १४ ॥

ते अपर प्रतिमा भार्गवीची । उपमा साजे हैमवतीची । की दूहिणजाया पुत्री मित्राची । उपमा साच द्यावी तीते ॥ १५ ॥

कलंकरहित रोहिणीधव । तैसा मुखशशी अभिनव । त्रैलोक्यसौंदर्य गाळूनि सर्व । ओतिली वाटे कमलोद्भवे ॥ १६ ॥

तिच्या जन्मकाळी द्विज सर्व । जातक वर्णिती अभिनव । चित्रवर्मा रायासी अपूर्व । सुख वाटले बहुतचि ॥ १७ ॥

एक द्विज बोले सत्य वाणी । ही होईल पृथ्वीची स्वामिणी । दहा सहस्र वर्षे कामिनी । राज्य करील अवनीचे ॥ १८ ॥

ऐकता तोषला राव बहुत । द्विजांस धन वस्त्र अलंकार देत । ज्याणे जे मागितले ते पुरवीत । नाही नेदी न म्हणेचि ॥ १९ ॥

तिचे नाम सीमंतिनी । सीमा स्वरूपाची झाली तेथूनी । लावण्य गंगा चातुर्यखाणी । शारदेऐसी जाणिजे ॥ २० ॥

राव संतोषे कोंदला बहुत । तो अमृतात विषबिंदु पडत । तैसा एक पंडित । भविष्यार्थ बोलिला ॥ २१ ॥

चौदावे वर्षी सीमंतिनीसी । वैधव्य येईल निश्चयेसी । ऐसे ऐकता राव मानसी । उद्विग्न बहुत जाहला ॥ २२ ॥

वाटे वज्र पडिले अंगावरी । की सौदामिनी कोसळली शिरी । किंवा काळजी घातली सुरी । तैसे झाले रायासी ॥ २३ ॥

पुढती बोले तो ब्राह्मण । राया शिवदयेकरून । होईल सौभाग्यवर्धन । सत्य सत्य त्रिवाचा ॥ २४ ॥

विप्र सदना गेले सवेग । रायासी लागला चिंतारोग । तव ती शुभांगी उद्वेग । रहित उपवर जाहली ॥ २५ ॥

सकळकळाप्रवीण । चातुर्यखाणीचे दिव्यरत्न । तिचे ऐकता सुस्वर गायन । धरिती मौन कोकिळा ॥ २६ ॥

अंगीचा सुवास पाहून । कस्तूरीमृग घेती रान । पितयास आवडे प्राणाहून । पाहता नयन न धाती ॥ २७ ॥

वदन पाहूनि रतिपति लज्जित । कटी देखोनि हरि वदन न दाखवीत । गमन देखोनि लपत । मराळ मानससरोवरी ॥ २८ ॥

क्षण एक चाले गजगती । देखोनि शंकला करिपती । कुरळ केश देखोनि भ्रमरपंक्ती । रुंजी घालिती सुवासा ॥ २९ ॥

कमळ मृग मीन खंजन । लजित देखोनि जिचे नयन । वेणीची आकृती पाहून । भुजंग विवरी दडाले ॥ ३० ॥

या वृक्षावरून त्या वृक्षी देख । शुक पळती पाहता नासिक । बिंबफळे अतिसुरेख । लज्जित अधर देखता ॥ ३१ ॥

पक्वदाडिंबबीज सुरंग बहुत । त्यांस लाजविती जिचे दंत । कुच देखोनि कमंडलु शंकित । स्वरूप अद्भुत वर्णं किती ॥३२॥ तनूचा सुवास अत्यंत । जाय दशयोजनपर्यंत । सूर्यप्रभेसम कांति भासत । शशिसम मनोरमा ॥ ३३ ॥

झाली असता उपवर । तिच्या पद्मिणी सख्या सुंदर । किन्नरकन्या मनोहर । गायन करिती तिजपासी ॥ ३४ ॥

त्यांच्या मुखेकरोनी । वार्ता ऐके सीमंतिनी । चतुर्दशवर्षी आपणालागुनी । वैधव्य कथिले ऋषीने ॥ ३५ ॥

परम संताप पावली ते समयी । याज्ञवल्क्याची स्त्री मैत्रेयी । तिचे पाय धरूनि लवलाही । पुसे सद्गद होवोनिया ॥ ३६ ॥

सौभाग्यवर्धनव्रत । माये कोणते सांग त्वरित । कोणते पुजू दैवत । कोणत्या गुरूसी शरण जाऊ ॥ ३७ ॥

सांगितला सकळ वृत्तांत । चौदावे वर्षी वैधव्य यथार्थ । मग मैत्रेयी बोलत । धरी व्रत सोमवार ॥ ३८ ॥

सांगे शिवमंत्र पंचाक्षरी । तांत्रिक क्रिया सर्व श्रुत करी । निशी झालिया पूजावा त्रिपुरारी । षोडशोपचारे सप्रेम ॥ ३९ ॥

म्हणे तुज दुःख झाले जरी प्राप्त । तरी न सोडी हे व्रत । ब्राह्मणभोजन दंपत्य बहत । पूजी माये अत्यादरे ॥ ४० ॥

पडिले दु:खाचे पर्वत । तरी टाकू नको हे व्रत । उबग न धरी मनात । बोल न ठेवी व्रताते ॥ ४१ ॥

त्यावरी नैषधराज नळ जाण । त्याचा पुत्र इंद्रसेन । त्याचा तनय चित्रांगद सुजाण । केवळ मदन दुसरा ॥ ४२ ॥

चतुःषष्टिकळायुक्त । जैसा पितामह नळ विख्यात । सर्वलक्षणी दिसे मंडित । चित्रांगद तैसाचि ॥ ४३ ॥

कुंभिनी शोधिली समग्र । परी त्याहूनि नाही सुंदर । तो तीस योजिला वर । राशि नक्षत्र पाहूनि ॥ ४४ ॥

इकडे सीमंतिनी आचरे व्रत । सांगितल्याहूनि विशेष करीत । आठ दिवसा अकरा शत । दंपत्ये पूजीत वस्त्रालंकारे ॥ ४५ ॥

आणीकही ब्राह्मण भोजन । आल्या अतिथा देत अन्न । सांग करी शिवपूजन । जागरण सोमवारनिशी ॥ ४६ ॥

पंचसूत्री शिवलिंग । मणिमय शिवसदन सुरंग । कोणी एक न्यून प्रसंग । न घडे सीमंतिनीपासूनी ॥ ४७ ॥

शिव अभिषेकिता पापसंहार । शिवपूजने साम्राज्य अपार । गंधाक्षता माला परिकर । सौभाग्यवर्धन त्याकरिता ॥ ४८ ॥

शिवापुढे धूप जाळिता बहुवस । तेणे आंग होय सुवास । दीप चालविता वंश । वर्धमान होय पै ॥ ४९ ॥

आणिकही दीपाचा गुण । कांति विशेष आयुष्यवर्धन । नैवेद्ये भाग्य पूर्ण । वर्धमान लक्ष्मी होय ॥ ५० ॥

तांबूलदाने यथार्थ । सिद्ध चारी पुरुषार्थ । नमस्कारे आरोग्य होत । प्रदक्षिणे भ्रम नासे ॥ ५१ ॥

जपे साधे महासिद्धि । होमहवने होय कोशवृद्धी । कीर्तन करिता कृपानिधी । सांब ठाके पुढे उभा ॥ ५२ ॥

ध्याने होय महाज्ञान । श्रवणे आधिव्याधिहरण । नृत्य करिता जन्ममरण । धूर्जटी दूर करीतसे ॥ ५३ ॥

तंत वितंत घन सुस्वर । शिवप्रीत्यर्थ करिता वाद्य समग्र । तेणे कंठ सुरस कीर्ति अपार । रत्नदाने नेत्र दिव्य होती ॥ ५४ ॥

एवं सर्व अलंकार वाहता । सर्वा ठायी जयलाभ तत्त्वता । ब्राह्मणभोजन करिता । वर्णिले सर्व प्राप्त होय ॥ ५५ ॥

मैत्रेयीने पूर्वी व्रत । सीमंतिनीसी सांगितले समस्त । त्याहूनि ते विशेष आचरत । शिव पूजित आदरे ॥ ५६ ॥

त्यावरी नैषधाचा पौत्र । चित्रांगद नामे गुणगंभीर । त्यासी आणोनिया सादर । सीमंतिनी दीधली ॥ ५७ ॥

चारी दिवसपर्यंत । सोहळा झाला जो अद्भुत । तो वर्णिता ग्रंथ यथार्थ । पसरेल समुद्राऐसा ॥ ५८ ॥

सहस्र अर्बुदे धन जाणा । राये दिधली वरदक्षिणा । वस्त्र अलंकार नवरत्ना । गणना कोणा न करवे ॥ ५९ ॥

अश्वशाळा गजशाळा । रत्नखचित याने विशाळा । चित्रशाळा नृत्यशाळा । आंदण दिधले जामाता ॥ ६० ॥

चारी दिवसपर्यंत । चारी वर्ण केले तृप्त । विप्रा दक्षिणा दिली अपरिमित । नेता द्विज कंटाळती ॥ ६१ ॥

आश्रमा धन नेता ब्राह्मण । वाटेस टाकिती न नेववे म्हणून । याचका मुखी हेचि वचन । पुरे पुरे किती न्यावे ॥ ६२ ॥

रायाचा औदार्यकृशान । दारिद्र्यरान टाकीले जाळून । दुराशा दुष्कंटकवन । दग्ध झाले मुळीहुनी ॥ ६३ ॥

धनमेघ वर्षता अपार । दारिद्र्यधुरोळा बैसला समग्र । याचक तृप्तितृणांकुर । टवटवीत विरूढले ॥ ६४ ॥

असो नैषधपुरीचे जन । पाहती सीमंतिनीचे वदन । इंदुकळा षोडश चिरून । द्विज ओतिले बत्तीस ॥ ६५ ॥

कलंक काढूनी निःशेष । द्विजसंधी भरल्या राजस । मुखीचे निघता श्वासोच्छ्वास । सुगंधराज तोचि वाटे ॥ ६६ ॥

जलजमुखी जलजकंठ । जलजमाला तेज वरिष्ठ । जलजनिंबपत्रे करूनि एकवट । ओवाळून टाकिती शशिमुखा ॥ ६७ ॥

असो साडे झालिया पूर्ण । नैषधदेशा गेला इंद्रसेन । सकळ वर्‍हाडी अनुदिन । सौंदर्य वर्णिती सीमंतिनीचे ॥ ६८ ॥

विजयादशमी दीपावळी लक्षून । जामात राहविला मानेकरून । कितीएक दिवस घेतला ठेवून । चित्रवर्मा राजेंद्रे ॥ ६९ ॥

जैसा श्रीरंग आणि इंदिरा । तैसा जोडा दिसे साजिरा । नाना उपचार वधूवरा । समयोचित करी बहु ॥ ७० ॥

कोणे एके दिवसी चित्रांगद । सवे घेऊनि सेवकवृंद । धुरंधर सेना अगाध । जात मृगये लागूनी ॥ ७१ ॥

वनी खेळता श्रमला फार । घर्म आला तप्त शरीर । जाणोनि नौका सुंदर । यमुनाडोही घातली ॥ ७२ ॥

त्यात मुख्य सेवक घेऊन । बैसला चित्रांगद गुणनिधान । आवले अवलोकिती चहुकडून । कौतुके भाषण करिताती ॥ ७३ ॥

कृतांत भगिनीचे उदक । कृष्णवर्ण भयानक । त्या उदकाचा अंत सम्यक । कधी कोणी न घेतला ॥ ७४ ॥

तो प्रभंजन सुटला अद्भुत । नौका तेथे डळमळीत । आवले आक्रोशे बोलत । नौका बुडाली म्हणोनिया ॥ ७५ ॥

भयभीत झाले समस्त । नौका बुडाली अकस्मात । एकचि वर्तला आकांत । नाही अंत महाशब्दा ॥ ७६ ॥

तीरी सेना होती अपार । तिच्या दु:खासी नाही पार । चित्रांगदाचे पाठीराखे वीर । आकांत करिती एकसरे ॥ ७७ ॥

सेवक धावती हाक फोडीत । चित्रवर्यासी जाणविती मात । राव वक्षःस्थळ बडवीत । चरणी धावत यमुनातीरी ॥ ७८ ॥

शिबिकेमाजी बैसोनी । मातेसमवेत सीमंतिनी । धावत आली तेच क्षणी । पडती धरणी सर्वही ॥ ९ ॥

दुखार्णवी पडली एकसरी । तेथे कोणासी कोण सावरी । सीमंतिनी पडली अवनीवरी । पिता सावरी तियेसी ॥ ८० ॥

माता धावोनि उठाउठी । कन्येच्या गळा घाली मिठी । शोक करी तेणे सृष्टी । आकांत एकचि वर्तला ॥ ८१ ॥

सीमंतिनीचा शोक ऐकोनी । डळमळू लागली कुंभिनी । मेदिनीवसनाचे पाणी । तप्त झाले एकसरे ॥ ८२ ॥

पशु पक्षी वनचरे समस्त । वृक्ष गुल्म लता पर्वत । त्यासही शोक अत्यंत । सीमंतिनीसी पाहता ॥ ८३ ॥

शोके मूर्च्छना येऊनि । निचेष्टित पडली सीमंतिनी । तो इंद्रसेनासहित गृहिणी । आली वार्ता ऐकोनिया ॥ ८४ ॥

अवघी झाली एकत्र । दुखार्णवाचा न लागे पार । स्नुषेते देखोनि श्वशुर । शोकाग्नीने कवळिला ॥ ८५ ॥

चित्रांगदाची माता पडली क्षिती । तिचे नाम लावण्यवती । सकळ स्त्रिया सावरिती । नाही मिती शोकासी ॥ ८६ ॥

मृत्तिका घेवोनि हस्तकी । लावण्यवती घाली मुखी । म्हणे गहन पूर्वकर्म की । शोक झाला यथार्थ ॥ ८७ ॥

माझा एकुलता एक बाळ । चित्रांगद परम स्नेहाळ । पूर्वपापाचे हे फळ । कालिंदी काळ झाली आम्हा ॥ ८८ ॥

माझी अंधाची काठी पाही । कोणे बुडविली यमुनाडोही । मज अनाथाची गाठी पाही । कोणे सोडिली निर्दये ॥ ८९ ॥

माझा दावा गे राजहंस । कोणे नेले गे माझे पाडस । माझा चित्रांगद डोळस । कोणे चोरून नेला गे ॥ ९० ॥

म्हणे म्या पूर्वी काय केले । प्रदोषव्रत मध्येच टाकिले । की शिवरात्रीस अन्न घेतले । की व्रत मोडिले सोमवार ॥ ९१ ॥

की रमाधव उमाधव । यात केला भेदभाव । की हरिहरकीर्तनगौरव । कथारंग उच्छेदिला ॥ ९२ ॥

की पंक्तिभेद केला निःशेष । की संतमहंता लाविला दोष । की परधनाचा अभिलाष । केला पूर्वी म्या वाटे ॥ ९३ ॥

की दान देते म्हणवून । ब्राह्मणासी चाळविले बहुत दिन । की दाता देता दान । केले विघ्न म्या पूर्वी ॥ ९४ ॥

कोणाच्या मुखीचा घास काढिला । की गुरुद्रोह पूर्वी मज घडला । की पात्री ब्राह्मण बैसला । तो बाहेर घातला उठवूनी ॥ ९५ ॥

की कुरंगीपाडसा विघडविले । की परिव्राजकाप्रती निंदिले । तरी ऐसे निधान गेले । त्याच दोषास्तव वाटे ॥ ९६ ॥

असो प्रधानवर्गी सावरूनी । सहपरिवारे चित्रवर्मा सीमंतिनी । स्वनगरासी नेवोनी । निजसदनी राहविली ॥ ९७ ॥

इंद्रसेन लावण्यवती । शोके संतप्त नगरा जाती । तव दायाद येऊनि पापमती । राज्य सर्व घेतले ॥ ९८ ॥

मग इंद्रसेन लावण्यवती । देशांतरा पळोनि जाती । तेथोनिही शत्रु धरूनि आणिती । बंदी घालिती दृढ तेव्हा ॥ ९९ ॥

इकडे सीमंतिनी व्रत । न सोडी अत्यादरे करीत । एकादशशत दंपत्य । पूजी संयुक्त विधीने ॥ १०० ॥

सर्वही भोग वर्जून जाण । यामिनीदिनी नित्य करी शिवस्मरण । तीन वर्षे झाली पूर्ण । यावरी वर्तमान ऐका पुढे ॥ १०१ ॥

इकडे चित्रांगद यमुनेत बुडाला । नागकन्यांनी पाताळी नेला । नागभुवनीची पाहता लीला । तटस्थ झाला राजपुत्र ॥ १०२ ॥

दिव्य नारी देखिल्या नागिणी । पद्मिनी हस्तिनी चित्रिणी । शंखिनी अतिचतुर भामिनी । सुवास अंगी ज्यांचिया ॥ १०३ ॥

ज्यांच्या पदनखी निरंतर । गुंजारव करिती भ्रमर । ज्याचा देखता वदनचंद्र । तपस्वीचकोर वेधले ॥ १०४ ॥

नवरत्नांचे खडे । पसरले तेथे चहूकडे । स्वर्गसुखाहूनि आवडे । पाताळभुवन पाहता ॥ १०५ ॥

तक्षक नागराज प्रसिद्ध । त्यापुढे उभा केला चित्रांगद । साष्टांग नमित सद्‌गद । होवोनि स्तुति करीतसे ॥ १०६ ॥

निर्भय तेथे राजसुत । तक्षक वर्तमान पुसत । जे जे वर्तले समस्त । केले श्रुत चित्रांगदे ॥ १०७ ॥

मागुती नागराज झाला । तुम्ही कोण्या दैवतासी भजता । यावरी शिवमहिमा तत्त्वता । झाला वर्णिता चित्रांगद ॥ १०८ ॥

प्रकृतिपुरुष दोघेजणे । निर्मिली इच्छामात्रे जेणे । अनंत ब्रह्मांडे प्रीतीने । रचियेली हेळामात्रे ॥ १०९ ॥

इच्छा परतता जाण । अनंत ब्रह्मांडे टाकी मोडून । प्रकृतिपुरुषात होती लीन । पंचभूते तत्त्वांसहित ॥ ११० ॥

मग दोघे एकप्रीती । आदिपुरुषामाजी सामावती । तो सदाशिव निश्चिती । आम्ही भजतो तयाते ॥ १११ ॥

ज्याच्या मायेपासून । झाले हे त्रिमूर्ति त्रिगुण । त्या सत्त्वांशेकरून । विष्णु जेणे निर्मिला ॥ ११२ ॥

रजांशे केले विरिंचीस । तमांशे रुद्र तामस । तो शिव पुराणपुरुष । आम्ही भजतो सर्वदा ॥ ११३ ॥

पाताळ अंतरिक्ष दशदिशा त्रिभुवन । पंचतत्त्व सरिता मेदिनीवसन । भस्म लोष्ट अष्टधातु व्यापून । उरला तो शिव भजतो आम्ही ॥ ११४ ॥

अष्टादश वनस्पती सर्व बीजे । आकारा आली सहजे । व्यापिले जेणे कैलासराजे । त्याचे उपासक आम्ही असो ॥ ११५ ॥

ज्याचे नेत्र सूर्य जाण । रोहिणीवर ज्याचे मन । रमारमण ज्याचे अंतःकरण । बुद्धि द्रुहिण जयाची ॥ ११६ ॥

अहंकार ज्याचा रुद्र । पाणी जयाचे पुरंदर । कृतांत दाढा तीव्र । विराटपुरुष सर्वही जो ॥ ११७ ॥

एवं जितुके देवताचक्र । ते शिवाचे अवयव समग्र । एकादश रुद्र द्वादश मित्र । उभे त्यापुढे कर जोडूनी ॥ ११८ ॥

ऐसे ज्याचे गुण अपार । मी काय वर्ण मानव पामर । त्याच्या दासांचे दास किंकर । आम्ही असो कश्यपात्मजा ॥ ११९ ॥

ऐसे वचन ऐकूनि सतेज । परम संतोषला दंदशूकराज । क्षेमालिंगन देऊनि कद्रुतनुज । नाना कौतुके दाखवी तया ॥ १२० ॥

म्हणे देवास जे दुर्लभ वस्त । ते येथे आहे समस्त । तू मज आवडसी बहुत । राहावे स्वस्थ मजपासी ॥ १२१ ॥

चित्रांगद म्हणे महाराजा । शिवकर्णभूषणा सतेजा । जननीजनकांसी वेध माझा । एवढाच मी पोटी तयांच्या ॥ १२२ ॥

चौदा वर्षांची सीमंतिनी । गुणनिधान लावण्यखाणी । प्राण देईल ते नितंबिनी । बोलता नयनी अश्रु आले ॥ १२३ ॥

मातापितयांचे चरण । खंती वाटते कधी पाहीन । माझी माता मजविण कष्टी जाण । नेत्री प्राण उरला असे ॥ १२४ ॥

तरी मज घालवी नेऊन । म्हणोनि धरिले नागेंद्राचे चरण । तक्षक होऊन प्रसन्न । देत अपार वस्तूंते ॥ १२५ ॥

म्हणे द्वादशसहस्र नागांचे बळ । दिधले तुज होईल सुफळ । तैसाचि झाला तत्काळ । चित्रांगद वीर तो ॥ १२६ ॥

तू करशील जेव्हा स्मरण । तेव्हा तुज संकटी पावेन । मनोवेग वारू आणून । चिंतामणी सवे दिधला ॥ १२७ ॥

दुर्लभ रत्ने भूमंडळी । देत अमूल्य तेजागळी । पर्वताकार मोट बांधिली । शिरी दिधली राक्षसाच्या ॥ १२८ ॥

देत दिव्य वस्त्रे अलंकार । सवे एक दिधला फणिवर । मनोवेगे यमुनातीर । क्रमूनि बाहेर निघाला ॥ १२९ ॥

झाले तीन संवत्सर । चहूकडे पाहे राजपुत्र । तेच समयी सीमंतिनी स्नानासी सत्वर । कालिंदीतीरा पातली ॥ १३० ॥

एकाकडे एक पाहाती । आश्चर्य वाटे ओळख न देती । दिव्यरत्नमंडित नृपति । चित्रांगद दिसतसे ॥ १३१ ॥

फणिमस्तकीची मुक्ते सतेज विशेष । भुजेपर्यंत डोले अवतंस । गजमुक्तांच्या माळा राजस । गळा शोभती जयाच्या ॥ १३२ ॥

पाचू जडल्या कटिमेखलेवरी । तेणे हिरवी झाली धरित्री । मृगपशु धावती एकसरी । नवे तृण वाढले म्हणोनिया ॥ १३३ ॥

मुक्ताफळे देखोनि तेजाळ । धावतच येती मराळ । देखोनि आरक्त रत्नांचे ढाळ । कीर धावती भक्षावया ॥ १३४ ॥

अंगी दिव्य चंदनसुगंध । देखोनि धावती मिलिंद । दशदिशा व्यापल्या सुबुद्ध । घ्राणदेवता तृप्त होती ॥ १३५ ॥

विस्मित झाली सीमंतिनी । भ्रमचक्री पडली विचार मनी । चित्रांगदही तटस्थ होऊनी । क्षणक्षणां न्याहाळीत ॥ १३६ ॥

कंठभूषणे रहित मंगळसूत्र । हरिद्राकुंकुमविरहित वस्त्र । अंजनविवर्जित नेत्र । राजपुत्र पाहातसे ॥ १३७ ॥

न्याहाळता तटस्थ स्वरूपासी । वाटती रंभा उर्वशी दासी । कुचकमंडलु यांसी । उपमा नाही द्यावया ॥ १३८ ॥

तप्तचामीकरवर्ण डोळस । चिंताक्रांत अंग झाले कृश । की चंद्रकळा राजस । ग्रहणकाळी झाकोळती ॥ १३९ ॥

मग तियेपाशी येऊन । पुसे साक्षेप वर्तमान । म्हणे तू आहेस कोणाची कोण । मुळापासून सर्व सांग ॥ १४० ॥

मग आपुल्या जन्मापासून । सांगितले चरित्र संपूर्ण । बोलता आसुवे नयन । भरूनिया चालिले ॥ १४१ ॥

अश्रुधारा स्रवती खालत्या । लाविल्या पयोधरलिंगास गळत्या । दंत जियेचे बोलता । नक्षत्रांऐसे लखलखती ॥ १४२ ॥

सीमंतिनीच्या सख्या चतुर । राजपुत्रा सांगती समाचार । तीन वर्षे झाली हिचा भ्रतार । बुडाला येथे यमुनाजळी ॥ १४३ ॥

इची सासूश्वशुर दोनी । शत्रूंनी घातली बंदिखानी । हे शुभांगी लावण्यखाणी । ऐसी गती इयेची ॥ १४४ ॥

कंठ दाटला सद्गदित । चित्रांगद खाली पाहात । आरक्त रेखांकित नेत्र । वस्त्र पुसीत वेळोवेळा ॥ १४५ ॥

सीमंतिनी सख्यांस सांगे खूण । कोण कोठील पुसा वर्तमान । सख्या पुसती येणे कोठून । झाले खूण नाम सांगा ॥ १४६ ॥

तो म्हणे आम्ही सिद्धपुरुष । जातो चिंतिलिया ठायास । क्षणे स्वर्ग क्षणे पाताळास । गमन आमुचे त्रिलोकी ॥ १४७ ॥

कळते भूतभविष्यवर्तमान । मग सीमंतिनीस हाती धरून । कानी सांगे अमृतवचन । भ्रतार तुझा जिवंत असे ॥ १४८ ॥

आजि तीन दिवसां भेटवीन । लटिके नव्हे कदापि जाण । श्रीसदाशिवाची आण । असत्य नव्हे कल्पांती ॥ १४९ ॥

सौभाग्यगंगे चातुर्यविलासिनी । तुझे ऐश्वर्य चढेल येथूनी । परी ही गोष्टी कोणालागूनि । दिवसत्रय प्रकटवू नको ॥ १५० ॥

ऐसे सांगोनि परमस्नेहे । येरी चोरदृष्टी मुख पाहे । म्हणे वाटते चित्रांगद होये । ऐसे काय घडू शके ॥ १५१ ॥

मृत्यु पावला तो येईल कैसा । मग आठवी भवानीमहेशा । करुणाकरा पुराणपुरुषा । न कळे लीला अगम्य तुझी ॥ १५२ ॥

हा परपुरुष जरी असता । तरी मज का हाती धरिता । स्नेह उपजला माझिया चित्ता । परम आप्त वाटतसे ॥ १५३ ॥

काय प्राशून आला अमृत । की काळे गिळोनि उगळिला सत्य । हे मदनांतक षडास्यतात । तुझे कर्तृत्व न कळे मज ॥ १५४ ॥

जगन्निवासा हे करशील सत्य । तरी अकरा लक्ष पूजीन दंपत्य । तितुक्याच वाती यथार्थ । बिल्वदळे अर्पिन ॥ १५५ ॥

यावरी बोले राजपुत्र । सुकुमारे सदनासी जाई सत्वर । तुझी सासू आणि श्वशुर । त्यांसी सांगू जातो आता ॥ १५६ ॥

तुमचा पुत्र येतो म्हणोन । शुभ समाचार त्यास सांगेन । येरी करून हास्यवदन । निजसदनाप्रती गेली ॥ १५७ ॥

सख्या बोलती आण वाहून । तुझा भ्रतार होय पूर्ण । ऐसा पुरुष आहे कोण । जो तुझा हात धरू शके ॥ १५८ ॥

तुझी वचने ऐकून । त्याच्या नेत्री आले जीवन । सीमंतिनी म्हणे वर्तमान । फोडू नका गे उग्या रहा ॥ १५९ ॥

सीमंतिनीच्या मुखकमळी । सौभाग्यकळा दिसू लागली । सुखासनारूढ सदना गेली । कोठे काही न बोले ॥ १६० ॥

मनोवेगाच्या वारूवरी त्वरित । आरूढला सीमंतिनीकांत । निजनगराबाहेर उपवनात । जाऊनिया उतरला ॥ १६१ ॥

नाग मनुष्यवेष धरून । शत्रूस सांगे वर्तमान । द्वादशसहस्र नागांचे बळ घेऊन । चित्रांगद आला असे ॥ १६२ ॥

तुम्ही कैसे वाचाल सत्य । तव ते समस्त झाले भयभीत । येरू म्हणे इंद्रसेन लावण्यवती यथार्थ । सिंहासनी स्थापा वेगी ॥ १६३ ॥

मग नाग जाऊन । मातापितयासी सांगे वर्तमान । त्यांसी आनंद झाला पूर्ण । त्रिभुवनात न समाये ॥ १६४ ॥

तो शत्रु होवोनि शरणागत । उभयतांसी सिंहासनी स्थापीत । दायाद कर जोडोनि समस्त । म्हणती आम्हा रक्षा सर्वस्वे ॥१६५ ॥ मग सर्व दळभार सिद्ध करून । भेटीस निघाला इंद्रसेन । वाद्यनादे संपूर्ण । भूमंडळ डळमळी ॥ १६६ ॥

माता पिता देखोन । सप्रेम धावे चित्रांगद सुजाण । धरूनि पितयाचे चरण । क्षेमालिंगनी मिसळला ॥ १६७ ॥

मग लावण्यवती धावत । चित्रांगदाच्या गळा मिठी घालीत । जैसा कौसल्येसी रघुनाथ । चतुर्दश वर्षानंतरे ॥ १६८ ॥

हारपले रत्न सापडले । की जन्मांधासी नेत्र आले । की प्राण जाता पडले । मुखामाजी अमृत ॥ १६९ ॥

करभार घेऊन अमूप । धावती देशोदेशींचे भूप । पौरजनांचे भार समीप । येऊनिया भेटती ॥ १७० ॥

हनुमंते आणिला गिरिद्रोण । जेवी उठविला उर्मिलारमण । आनंदमय झाले त्रिभुवन । तैसेच पूर्ण पै झाले ॥ १७१ ॥

मातापितयांसमवेत । चित्रांगद चालिला मिरवत । नैषधपुर समस्त । श्रृंगारिले तेधवा ॥ १७२ ॥

चित्रवर्म्यासी सांगावया साचार । धावताती सेवकभार । महाद्वारी येता समाचार । मात फुटली चहूकडे ॥ १७३ ॥

चार जाऊनि रायास वंदित । उठा जी तुमचे आले जामात । राव गजबजिला धावत । नयनी लोटत आनंदाश्रु ॥ १७४ ॥

कंठ झाला सद्गदित । रोमांच अंगी उभे ठाकत । समाचार आणिला त्यासी आलिंगीत । धन वस्त्र देत सीमेहुनि ॥ १७५ ॥

अपार भरूनि रथ । शर्करा नगरात वाटीत । मंगळतुरे अद्भुत । वाजो लागली एकसरे ॥ १७६ ॥

धावले अपार भूसुर । राये कोश दाविले समग्र । आवडे तितुके धन न्यावे सत्वर । सुखासी पार नाही माझ्या ॥ १७७ ॥

जय जय शिव उमानाथ । म्हणोनि राव उडत नाचत । उपायने घेऊनि धावत । प्रजाजन नगरीचे ॥ १७८ ॥

सीमंतिनीसी बोलावून । दिव्य अलंकार लेववून । जयजयकार करून । मंगळसूत्र बांधिले ॥ १७९ ॥

दिव्य कुंकुम नेत्री अंजन । हरिद्रा सुमनहार चंदन । सौभाग्य लेवविती जाण । त्रयोदशगुणी विडे देती ॥ १८० ॥

एक शृंगार सांवरिती । एक पीकपात्र पुढे करिती । नगरीच्या नारी धावती । सीमंतिनीसी पाहावया ॥ १८१ ॥

माता धावली सद्गदित । सीमंतिनीसी हृदयी धरीत । माये तुझा सौभाग्यपर्वत । असंभाव्य उचंबळला ॥ १८२ ॥

ऐश्वर्यद्रुम गेला तुटून । पुढती विरूढला भेदीत गगन । तुझी सौभाग्यगंगा भरून । अक्षय चालिली उतरेना ॥ १८३ ॥

धन्य धन्य सोमवारव्रत । अकरा लक्ष पूजिली दंपत्य । जितवन करावयास जामात । बोलावू धाडिले त्वरेने ॥ १८४ ॥

मातापितयांसमवेत । चित्रांगद नगरा येत । चित्रवर्मा नृपती त्वरित । सामोरा येत तयासी ॥ १८५ ॥

जामाताच्या कंठी । धावोनि श्वशुरे घातली मिठी । ब्रह्मानंदे भरली सृष्टी । पुष्पवृष्टी करिती देव ॥ १८६ ॥

नगरामाजी आणिली मिरवत । पुनः विवाह केला अद्भुत । मग एकांती चित्रांगद नृपनाथ । बोलावीत सीमंतिनीसी ॥ १८७ ॥

पाताळीचे अलंकार अद्भुत । सीमंतिनीलागी लेववीत । नवरत्नप्रभा फाकली अमित । पाहता तटस्थ नारीनर ॥ १८८ ॥

पाताळीचा सुगंधराज निगुती । आत्महस्ते लेववी सीमंतिनीप्रती । नाना वस्तु अपूर्व क्षिती । श्वशुरालागी दीधल्या ॥ १८९ ॥

सासूश्वशुरांच्या चरणी । मस्तक ठेवी सीमंतिनी । माये तुझा सौभाग्योदधि उचंबळोनि । भरला असो बहु काळ ॥ १९० ॥

पुत्र सीमंतिनीसहित । इंद्रसेन नैषधपुरा जात । अवनीचे राजे मिळोनि समस्त । छत्र देत चित्रांगदा ॥ १९१ ॥

समस्त राज्यभार समर्पून । तपासी गेला इंद्रसेन । तेथे करूनिया शिवार्चन । शिवपदासी पावला ॥ १९२ ॥

आठ पुत्र पितयासमान । सीमंतिनीसी झाले जाण । दहा सहस्र वर्षे निर्विघ्न । राज्य केले नैषधपुरी ॥ १९३ ॥

जैसा पितामह नळराज । परमपुण्यश्लोक तेज:पुंज । तैसाच चित्रांगद भूभुज । न्यायनीती वर्ततसे ॥ १९४ ॥

शिवरात्री सोमवार प्रदोषव्रत । सीमंतिनी चढते करीत । तिची ख्याती अद्भुत । सूत सांगे शौनकादिका ॥ १९५ ॥

हे सीमंतिनी आख्यान सुरस । ऐकता सौभाग्यवर्धन स्त्रियांस । अंतरला भ्रतार बहुत दिवस । तो भेटेल परतोनी ॥ १९६ ॥

विगतधवा ऐकती । त्या जन्मांतरी दिव्य भ्रतार पावती । शिवचरणी धरावी प्रीती । सोमवारव्रत न सोडावे ॥ १९७ ॥

ऐसे ऐकता आख्यान । अंतरला पुत्र भेटेल मागुतेन । आयुरारोग्य ऐश्वर्य पूर्ण । होय ज्ञान विद्या बहु ॥ ९८ ॥

गंडांतरे मृत्यु निरसोनि जाय । गतधन प्राप्त शत्रुपराजय । श्रवणे पठणे सर्व कार्य । पावे सिद्धी येणेचि ॥ १९९ ॥

सीमंतिनी आख्यान प्रयाग पूर्ण । भक्तिमाघमासी करिता स्नान । त्रिविध दोष जाती जळोन । शिवपद प्राप्त शेवटी ॥ २०० ॥

सीमंतिनी आख्यान सुधारस । प्राशन करिती संजनत्रिदश । निंदक असुर तामस । अहंकारमद्य सेविती ॥ २०१ ॥

अपर्णाहृदयारविंदमिलिंद । श्रीधरस्वामी पूर्ण ब्रह्मानंद । अभंग अक्षय अभेद । न चळे न ढळे कदाही ॥ २०२ ॥

शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड । परिसोत सज्जन अखंड । षष्ठाध्याय गोड हा ॥ २०३ ॥

॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

shri shiv leelamrut adhyay 6 shiv lilamrut