Skip to main content
पडताळणी प्रलंबित

शिवलीलामृत अध्याय पंधरावा

श्रीगणेशाय नमः ॥

जयजय श्रीगंगाधरा । त्रिशूळपाणी पंचवक्त्रा । अर्धनारीनटेश्वरा । श्रीशंकरा नीलकंठा ॥ १ ॥

भस्मोद्भूलना त्रिनयना । कर्पूरगौरा नागभूषणा । गजास्यजनका गौरीरमणा । भक्तवत्सला दयानिधे ॥ २ ॥

तू आदिमध्यांतरहित । अज अव्यय मायातीत । विश्वव्यापक विश्वनाथ । विश्वंभर जगद्गुरो ॥ ३ ॥

तू नामगुणातीत असून । स्वेच्छे मायेसी आश्रयून । नानारूप नामाभिधान । क्रीडार्थ होसी सर्वेशा ॥ ४ ॥

सत्त्व रज तम हे गुणत्रय । तूचि नटलासी निःसंशय । स्थिरचरात्मक भूतमय । त्वद्रुपचि आहे बा ॥ ५ ॥

तू ब्रह्मांडाआदिकारण । विश्वसूत्र तव आधीन । जैसे हालविसी स्वेच्छे करून । तैसे संपूर्ण नाचत ॥ ६ ॥

तुझिया इच्छेवाचुनी । काहीच नोहे जीवाचेनी । ऐसे जाणोनी अंत:करणी । तुज शरण रिघती जे ॥ ७ ॥

तयां भक्तांसी तू शंकर । पूर्णकाम करोनि साचार । भवाब्धीतूनि नेऊनि पार । स्वपदी स्थिर स्थापिसी ॥ ८ ॥

ऐसा तुझा अदभुत महिमा । नकळे त्याची कवणा सीमा । म्हणोनि केवळ परब्रह्मा । शरण आलो असे पा ॥ ९ ॥

तरी दयाब्धे मज पामरा । न्यावे भवाब्धिपैलपारा । तुजवाचुनी कोण दातारा । अनाथासी उद्धरील ॥ १० ॥

असो आता बहू विनवणी । आधी पुरवी मनाची धणी । त्वदगुण प्राकृत वाणी । कीजे ऐसी असे जी ॥ ११ ॥

तुझिया कृपे शिवलीलामृत । चौदा अध्याय वर्णिले यथार्थ । वेदव्यासे स्कंदपुराणात । ब्रह्मोत्तरखंडी कथिले जे ॥ १२ ॥

परी माझ्या मनाची तृप्ती । जाहली नाही बा पशुपती । म्हणोनि आणिक हृदयी स्फूर्ती देऊनि कथा वर्णवी पां ॥ १३ ॥

तूं शंकर होता प्रसन्न । हाता येते सर्व त्रिभुवन । महाराज तू भक्तांलागून । वरप्रदाने तोषविसी ॥ १४ ॥

तुज श्रीशंकरासमान । वरदाना शक्त नसे कोण । तुझे देखोनि उदारपण । ब्रह्माविष्णूही लाजती ॥ १५ ॥

काय वर्णावी उदारता । प्रत्यक्ष आपुली सुंदर कांता । देऊनिया रावणभक्ता । आत्मलिंग वोपिलेसी ॥ १६ ॥

तेविच दैत्येंद्र त्रिपुर । तारक आणि भस्मासुर । इत्यादि स्वभक्तांलागी अपार । अनिवार वर दिल्हेसी ॥ १७ ॥

तू अत्यंत भोळा भगवान । कपटेही करिता तव सेवन । देऊनि इच्छित वरदान । आनंदविसी सेविका ॥ १८ ॥

असो ऐका श्रोते सर्व । ऐसा करितां म्यां शिवस्तव । हृदयी प्रकटोनि दयार्णव । स्फूर्ति देत उत्तम ॥ १९ ॥

अरे ह्या कलियुगामाझारी । पाखंडी मातोनि पृथ्वीवरी । श्रुति स्मृति पुराणोक्त सारी । कर्मे बुडविते जाहले ॥ २० ॥

जैनमत ते आगळे । सर्व भूमंडळी पसरले । तेणेयोगे वर्ण सगळे । भुलोनि गेले साचार ॥ २१ ॥

ते देखोनि म्यां सत्वर । तन्मतखंडनालागी भूवर । शंकरनामे अति सुंदर । जो अवतार धरियेला ॥ २२ ॥

ते माझे अद्भुत चरित्र । आधुनिकासी न कळे पवित्र । तरी तू प्राकृत भावे विचित्र । वर्णन करी श्रीधरा ॥ २३ ॥

ऐसी शिवे केली प्रेरणा । म्हणोनि पुराणार्थ-विवरणा । एकीकडे ठेवूनि जाणा । जगद्गुरुचरित्र वर्णितो ॥ २४ ॥

तरी सर्व तुम्ही श्रोते संत । सावध राहा हो श्रवणार्थ । जगद्गुरुकथा ऐकतां समस्त । पापपर्वत भंगती ॥ २५ ॥

कल्पारंभी कमळासने । परब्रह्माच्या आज्ञेने । जी महदादिकांच्या योगाने । ही सर्व सृष्टी रचियेली ॥ २६ ॥

इयेच्या कल्याणालागून । सर्व मार्गदर्शक पूर्ण । ऋग्यजुः-साम-अथर्वण । हे चार वेद जाहले ॥ २७ ॥

परी त्या वेदांचे अर्थराशी । स्पष्ट न होत सर्वांसी । म्हणोनि परमात्म्याच्या मानसी । कृपासमुद्र उचंबळला ॥ २८ ॥

मग तो स्पष्ट व्हावयालागुनी । पाणिन्यादि रूपे अवतरोनी । व्याकरणादि षशास्त्र झणी । करिता जाहला परमात्मा ॥ २९ ॥

आणि मन्वादिक स्मृती । करिता झाला तो विंशती । तदभ्यासे सर्व जगती । श्रुत्यर्थ जाणू लागले ॥ ३० ॥

पुढे कलियुग होता प्राप्त । भूमंडळी मानव समस्त । अल्पायू मंदमती अत्यंत । ऐसे जाण होतील ॥ ३१ ॥

आणि श्रुति स्मृति शास्त्र केवळ । गगनापरी अत्यंत विशाळ । म्हणोनि त्यांचा मानवा सकळ । अभ्यास नोहे कदाचि ॥ ३२ ॥

तेणे ते सर्व अति अज्ञानी । आणि सन्मार्ग भ्रष्ट होऊनी । जन्ममरणादि तीव्र दुःखांनी तडफडतील निश्चये ॥ ३३ ॥

ऐसे पूर्वी नारायणे । जाणुनी मग दयार्द्रपणे । कलिजनांच्या उद्धाराकारणे । व्यासावतार धरियेला ॥ ३४ ॥

आणि त्या व्यासपे चांग । चारी वेदांचे करूनि विभाग । वेदार्थदर्शक ऐसे सवेग । महाभारत रचियेले ॥ ३५ ॥

आणि विष्णु शिव नारद पद्म । मार्कंडेय भागवत ब्राह्म । अग्नि भविष्य वराह कुर्म । मत्स्य लिंग ब्रह्मवैवर्त ॥ ३६ ॥

स्कंद वामन आणि गरुड । तेवीचि अठरावे ब्रह्मांड । ऐसी अष्टादश पुराणे प्रचंड । लोकोद्धारार्थ रचियेली ॥ ३७ ॥

मग मेदिनी एकैक ब्राह्मण । व्यासकृत विभागातून । यथामती एकैक भागालागून । अभ्यासू लागले आनंदे ॥ ३८ ॥

आणि इतिहास पुराणे ऐकून । सन्मार्गे चालू लागले संपूर्ण । परी पुढे कलीच्या योगेकरून संकट दारुण पातले ॥ ३९ ॥

वेदशास्त्र पुराणे निंदनी । तयांचा दूरचि त्याग करूनी । पाखंड बौद्धमते निशिदिनी । वर्ते लागले सकळिक ॥ ४० ॥

ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र । लोम विलोम आणि संकर । ह्या सर्व जातींचे नारीनर । अधर्मे वर्ते लागले ॥ ४१ ॥

सकळ मेदिनीवरुती । बौद्धधर्म पसरला अती । देवग्रामदेवतांप्रती । भजू लागले जैनशास्त्र ॥ ४२ ॥

वेदशास्त्रे पुराणे समस्त । अनुदिनी चालली लोपत । श्रुतिस्मृतिपुराणोक्त पंथ । बहुतेक पै लोपले ॥ ४३ ॥

अहो श्रोते तुम्ही कराल प्रश्न । ऐसे व्हावया काय कारण । तरी मंडनमिश्र नामेकरून । एक जैन उद्भवला ॥ ४४ ॥

तो केवळ बुद्धीचा सागर । देवगुरूपरी वक्ता चतुर । जयाच्या विद्येची साचार । सरी न पावे शुक्रही ॥ ४५ ॥

तेणे स्वये अति दारुण । करूनिया पै अनुष्ठान । सरस्वती आणि कृशान । प्रसन्न करून घेतले ॥ ४६ ॥

अग्नीमाजी हवन करूनी । कल्पिले काढी कुंडातुनी । याचकजनांची इच्छा झणी । तृप्त करी सर्वदा ॥ ४७ ॥

जैसा पूर्वी रावणसुत । महापराक्रमी इंद्रजित । हवन करोनि अश्वांसहित । रथ काढिता जाहला ॥ ४८ ॥

तैसा तो मंडनमिश्र अय्या । अग्नीत हवन करुनिया । त्यातून पीतांबरादिक वस्तुया । काढीतसे यथेच्छ ॥ ४९ ॥

विद्या पाहता अति प्रबळ । हुंकारे सूर्यासी उभा करील । अत्यद्भुत सामर्थ्य केवळ । सांगता वाचे न वदने ॥ ५० ॥

शास्त्री पुराणिक पंडित । अय्याचा मानिती धाक बहत । वादविवाद करितां समस्त । खंडित होत तत्क्षणी ॥ ५१ ॥

स्वये नवी शास्त्रे करूनी । पंडिता जिंकी तयांचेनी । कोणी न टिकती सभास्थानी । मुखा गवसणी घालित ॥ ५२ ॥

मोठे मोठे पंडित सगळे । वादविवाद करिता थकले । सकळ सृष्टीते जिंकिले । आपुल्या शास्त्री अय्याने ॥ ५३ ॥

श्रुतिस्मृत्युक्त सद्धर्ममार्ग । अधर्म ऐसे दावूनि सवेग । आपुली शास्त्र सर्वत्र सांग । स्थापना केली दुष्टाने ॥ ५४ ॥

आणि चारी वर्ण अठरा याती । यांच्या मती भ्रष्टवूनि अती । ग्रामदैवते आपुल्या हाती । आपुल्या शास्त्र स्थापिली ॥ ५५ ॥

पूर्वशास्त्र पडली एकीकडे । जैने स्वशास्त्र केले उघडे । तया अय्याच्या सामथ्र्यापुढे । चकित झाले सर्वही ॥ ५६ ॥

आणि आमुचा धर्म नाही उत्तम् । जैनधर्म हा बहु सुगम । ऐसे म्हणोनि सर्व जन परम । अंतरी खिन्न जाहले ॥ ५७ ॥

मग वेदशास्त्र पुराणे सोज्ज्वळ । यांसी टाकून तत्काळ । चारी वर्ण अठरा याती सकळ । चालवू लागले जैनधर्म ॥ ५८ ॥

अहो त्या मंडनमिश्रालागून असे सरस्वती सुप्रसन्न । म्हणोनि त्याच्या जिह्वाग्री बैसोन । बोलिल्या वचना सत्य करी ॥ ५९ ॥

आणि सदा होऊन अंकित । तया अय्याच्या घरी राबत । मद्यपान करूनि सतत । अनाचार वाढवी तो ॥ ६० ॥

नित्य प्रातःकाळी उठोन । मद्याचा एक घट मांडून । तेथे सरस्वतीची पूजा करून । नैवेद्य अप मद्याचा ॥ ६१ ॥

ऐसा तो अय्या त्रिकाल जाणा । सरस्वतीच्या करूनि पूजना । प्रसाद म्हणोनि मद्यपाना । करीतसे यथेष्ट ॥ ६२ ॥

नाही आचार ना विचार । कर्मभ्रष्ट पाखंडी थोर । आपुला शास्त्रधर्म साचार । सर्व स्थळी स्थापितसे ॥ ६३ ॥

सर्व जनांसी शिष्य करून । स्वये तयांचा गुरू होऊन । श्रुतिस्मृत्युक्त धर्म संपूर्ण । आचरो नेदी कवणासी ॥ ६४ ॥

ऐसा अनर्थ करता फार । भूमीसी होऊन अति भार । रात्रंदिवस ती अनिवार । दुःखाश्रु टाकू लागली ॥ ६५ ॥

देव ब्राह्मण साधुसंत । दु:खे पोळती अहोरात । काही काळे हे वृत्त समस्त । श्रुत जाहले शंकरासी ॥ ६६ ॥

तेव्हा तो शंकर पिनाकपाणी । अत्यंत कोपाविष्ट होऊनी । म्हणे सर्व कर्ममार्ग बुडवूनी । वर्तती की जैनधर्मे ॥ ६७ ॥

सकळही भूमंडळावर । जैनधर्माचा झाला की प्रसार । तरी आता मी अवतरोनि शंकर । जैन धर्मा उच्छेदितो ॥ ६८ ॥

ऐसे कोपे बोलोनि शिव । जो अनाथनाथ कृपार्णव । पुराणपुरुष महादेव । भाललोचन जगदात्मा ॥ ६९ ॥

जो अनंतब्रह्मांडनायक । भस्मासुरवरदायक । त्रिशूळपाणी मदनांतक । चंद्रशेखर उमापती ॥ ७० ॥

तेणे तत्काळ मेदिनीवर । उत्तरदेशी निर्मळ क्षेत्र । तेथे विप्रकुळामाजी सत्वर । घेतला अवतार नररूपे ॥ ७१ ॥

तेव्हा समुद्रवसनेलागून । परमानंद झाला असे पूर्ण । दशदिशांतरे प्रसन्न । देव संपूर्ण हर्षले ॥ ७२ ॥

मंद सुगंध शीतळ । वाहू लागला तो अनिळ । वापी कूप नद्यांचे जळ । झाले निर्मळ तत्क्षणी ॥ ७३ ॥

ऐसी शुभ चिन्हे अपार । होऊ लागली पृथ्वीवर । मुनि जाणूनि समाचार । निर्मळ क्षेत्री पातले ॥ ७४ ॥

आणि जाऊनियां विप्रसदनी । बालजातक वर्तवूनी । शंकराचार्य ऐसे तत्क्षणी । नाम ठेविते जाहले ॥ ७५ ॥

आता ह्या नामासी काय कारण । तरी शं’ म्हणजे सुकल्याण । ‘कृञ्’ धातूचा अर्थ करण । आणि ‘आचार्य’ म्हणजे सदगुरु ॥ ७६ ॥

ऐसा हा तीन शब्दांचा अर्थ । आणि हा सदुपदेशे यथार्थ । सर्व लोकांचे कल्याण सतत । करणार असे निश्चये ॥ ७७ ॥

अथवा संकर छेदावया । अवतरला असे म्हणोनिया । शंकराचार्य ऐसे तया । नाम ठेविते जाहले ॥ ७८ ॥

असो ऐसा कर्पूरगौर । वैदिकमार्ग स्थापावया सत्वर । ‘शंकराचार्य’ नामे भूवर । निर्मळक्षेत्री अवतरला ॥ ७९ ॥

पुढे झाले उपनयन । सकळ विद्या अभ्यासून । अल्पवयांतचि संन्यासग्रहण । करिता झाला मातृ आज्ञे ॥ ८० ॥

मग सवे घेऊनि शिष्यमंडळी । तीर्थयात्रार्थ भूमंडळी । फिरता जैनमताची आगळी । प्रवृत्ति देखिली सर्वत्र ॥ ८१ ॥

देशोदेशीचे निखिलजन । शंकराचार्याचा करिती अपमान । सकळ जनांचे लागले ध्यान । जैनशास्त्राकडे पां ॥ ८२ ॥

असो ऐसे फिरता मेदिनीसी । आचार्य पातले कोल्हापुरासी । मग शिष्यांसहित एके दिवशी । ग्रामांत चालिले भिक्षार्थ ॥ ८३ ॥

घरोघरी भिक्षा याचित । येऊनि कासारांच्या आळीत । तयांजवळी भिक्षा मागत । तो हासू लागले जैन ते ॥ ८४ ॥

आणि म्हणती भिक्षा कैची येथ । कांचरस आहे कढईत । पाहिजे तरी हा समस्त । भिक्षेलागी समर्पितो ॥ ८५ ॥

तें स्वामी म्हणती कासारांप्रती । तुमची आहे जैनयाती । तरी अन्य भिक्षा न घेऊ निश्चिती । कांचरसचि आम्हां द्या ॥ ८६ ॥

ऐसे तयांप्रती सांगुनी । स्वामी म्हणती शिष्यालागुनी । तुम्ही स्वहस्तांच्या ओंजळी करूनी । कांचरस प्राशिजे ॥ ८७ ॥

ऐसे स्वामींचे ऐकूनि वचन । भिवोनि सकळ शिष्यजन । म्हणती वाचलो तरी यासमान । बहुत गुरु संपादू ॥ ८८ ॥

हा प्रत्यक्ष तप्त कांचरस । स्पर्शतां मृत्यू येईल आम्हांस । ज्याचे त्यानेंचि घ्यावें विष । आम्हां न लगे सेवा ही ॥ ८९ ॥

ऐसे बोलून शिष्यजन । पळू लागले सर्व तेथून । मग स्वामी स्वयें ओंजळ करून । म्हणती ओता कांचरस ॥ ९० ॥

अहो पूर्वी समुद्रमंथनकाळी । कालकूटविष ज्वाळामाळी । प्रगटला येऊनि तयाजवळी । स्वयें प्राशिता झाला जो ॥ ९१ ॥

तोचि तो शंकराचार्य भगवान । तयासी काय कांचरस कठीण । कल्पांतींच्या कृशानूलागून । गिळील जाण क्षणार्धे ॥ ९२ ॥

असो मग ते दुष्ट कासार । तो तप्त कांचरस प्रखर । आचार्याच्या ओंजळींत सत्वर । ओतिते झाले भिक्षेसी ॥ ९३ ॥

जया रसाचा बिंदु तत्त्वतां । भूमीवरी पडला असतां । जळोनि जाईल भूमि समस्ता । ऐसा तप्त अत्यंत ॥ ९४ ॥

परी तो जगद्गुरु भगवान । अति शीतळ मधुर जीवन । प्यावें तैसे त्या रसा तत्क्षण । प्राशिता झाला साचार ॥ ९५ ॥

ऐसें तयाचे पाहूनि साहस । कासारांचे दचकलें मानस । म्हणती हा मैं पुराणपुरुष । धर्मस्थापनार्थ अवतरला ॥ ९६ ॥

अहो पाहतां ज्या रसाप्रती । आमुचे नेत्र गरगरा फिरती । तो रस प्याला स्वये निगुती । धन्य मूर्ति शंकराचार्य ॥ ९७ ॥

ऐसें सर्व कासारीं बोलून । घट्ट धरिले स्वामींचे चरण । मग शंकराचार्य तेथून । जैनग्रामासी पातले ॥ ९८ ॥

आणि स्वकीय शिष्टमुखेंसी । निरोपिलें मंडनमिश्रासी । कीं तुम्हीं भेटून आम्हांसी । शास्त्रविवाद कीजिये ॥ ९९ ॥

वाद स्वमतशास्त्रवैभवें । आम्हांलागीं त्वां जिंकावें । अथवा आम्हीं पराभवावें । सद्धर्मशास्त्र तुम्हांसी ॥ १०० ॥

ऐसा शंकराचार्यांचा निरोप । ऐकोनि तो महागर्वकूप । मंडनमिश्र आगळे अमूप । बोलता झाला अभिमानें ॥ १ ॥

अरे आजपर्यंत बहु पंडित । वादार्थ आले मी मी म्हणत । परी ते म्यां जिंकिले समस्त । आमुच्या जैनशास्रेसी ॥ 10२ ॥

आतां हा येऊनि संन्यासी । सांगोन पाठवितो आम्हांसी । तरी मी आजी जिंकीन यासी । सरस्वतीचे प्रसादें ॥ 10३ ॥

ऐसें गर्वे बोलत वचन । सरस्वतीचे करूनि ध्यान । तो मंडनमिश्र जगद्गुरुलागून । जाऊनि भेटला तत्काळ ॥ 10४ ॥

ते दोघेही तेजस्वी महापुरुष । केवळ जैसे चंद्रचंडांश । दोघांचेही पराक्रम विशेष । समसमान निर्धारिं ॥ 10५ ॥

दोघेही बोलती एकमेकांसी । सभा करावी आजिचे दिवसीं । वेदशास्त्राची स्वमुखेंसी । चर्चा व्हावी सविस्तर ॥ 10६ ॥

पूर्वपक्ष उत्तरपक्ष करोन । अर्थ विवरावा संपूर्ण । ज्यासी अर्थ न होय पूर्ण । तयाचे शास्त्र मिथ्या पैं ॥ 10७ ॥

आणि जो पराजय पावेल । तद्धर्म विध्वंसूनि सकळ । ग्रंथही तयाचे तत्काळ । बुडवूनियां टाकावे ॥ 10८ ॥

ऐसे दोघेही प्रतिज्ञा बोलूनि । बैसले मध्ये पडदा लावूनी । सर्व जातींचे लोक तत्क्षणीं । सभेलागुनी पातले ॥ 10९ ॥

तों मंडनमिश्रे पडद्याआंत । शंकराचार्यासी नकळत । मद्यघट ठेवूनि तयांत । सरस्वती स्थापूनि पूजिली ॥ ११० ॥

तै त्या मद्याच्या घटांतूनी । सरस्वती बोले अय्यालागुनी । आतां मी शंकराचार्यांसी झणीं । शास्त्रमतें विध्वंसितें ॥ १11१ ॥

तूं माझ्या मागे बैसून । चमत्कार पाहें संपूर्ण । मी तुज आहे सुप्रसन्न । वचन सत्य करीन तुझें ॥ १1२ ॥

ऐसिये प्रकारे सुंदर । सरस्वतीचा ऐकूनि वर । तो महापंडित मंडनमिश्र । समाधान पावला ॥ १1३ ॥

मग पडद्याआंतून । शंकराचार्यासी बोले वचन । कोणता वेद आरंभून । अर्थ करू सांग पां ॥ १1४ ॥

हैं शंकराचार्य बोलत । चारी वेद करीं समाप्त । जें जें मी पुसेन यथार्थ । तें तें मजसी सांगावें ॥ १1५ ॥

ठायी ठायींचे अर्थ पुसेन । त्यांचे करावें समाधान । न सांगतां पदवीपासून । भ्रष्ट करीन क्षणमात्रे ॥ १1६ ॥

मग त्याच आचार्यभाषिता । मान्य करूनि तो तत्त्वतां । सरस्वतीसी म्हणे हे माता । बोलें आतां सत्वरीं ॥ १1७ ॥

हैं श्रीशंकराचार्यांप्रती । बोलू लागली सरस्वती । परी शंकराचार्यांच्या चित्तीं । जैन बोलतो ऐसेच ॥ १1८ ॥

म्हणोनि आचार्य बोलले । अय्या ऋग्वेद आरंभीं ये वेळे । तंव सरस्वतीने मुख काढिलें । घटांतून बाहेरी ॥ १1९ ॥

प्रथम ऋग्वेद ऋचांसहित । सरस्वती चालली बोलत । ठायी ठायीं आचार्य पुसत । अर्थकूटें तेधवां ॥ १२० ॥

परी ज्याच्या मुखापासून । चारी वेद झाले उत्पन्न । त्या ब्रह्मयाचें तें कन्यारत्न न अडखळे कोटेंचि ॥ 1२१ ॥

शंकराचार्य जें जें पुसत । त्याचे तत्क्षणीं ती उत्तर देत । असो ऐसा ऋग्वेद समस्त । समाप्त जाणा जाहला ॥ 1२२ ॥

परी सरस्वती म्हणते वेद । हा आचार्थी नेणोनि भेद । आतां बोले रे यजुर्वेद । ऐसे अय्यासी सांगितले ॥ 1२३ ॥

तें स्वामींचे ऐकूनि भाषित । सरस्वती पडद्याआंत । यजुर्वेदालागीं त्वरित । आरंभिती जाहली ॥ 1२४ ॥

अस्खलित शब्द उमटती । शंकराचार्य अर्थ पुसती । परी कुशलत्वें ती सरस्वती । करी समाधान तत्काळ ॥ 1२५ ॥

आचार्याचा न चाले उपाव । कोठेच न होय पाडाव । मग अंतरीं एक उपाव । ऐसा त्यांनीं योजिला ॥ 1२६ ॥

पूर्वी ऋग्वेद जाहला । आतां यजुर्वेद असे चालला । तरी यासी ऋग्वेदांतील भला । पुनरपि प्रश्न कीजिये ॥ 1२७ ॥

ऐसा करूनियां निश्चय । अय्यासी बोलती आचार्य । अरे तू सांप्रत नि:संशय । यजुर्वेद बोलतोसी ॥ 1२८ ॥

परी ऋग्वेदामाजी देख । शंका राहिली असे एक । ती ऋचा बोलूनि सम्यक् । अर्थ सांगें पुनरपि ॥ 1२९ ॥

ऐशा स्वामींच्या प्रश्नाला । ऐकून स्तब्धली ब्रह्मबाळा । पूर्वी ऋग्वेद सर्व म्हणितला । परी तिसी त्याचा आठव नसे ॥ १३० ॥

अहो सरस्वतीचा ऐसा मार्ग । कीं वेदशास्त्र पुराणे सांग । आरंभापासोनि स्पष्ट सवेग । संपूर्णही म्हणे पां ॥ 1३१ ॥

परी पुढे पुढे म्हणत असतां । मध्येच पुशिले पूर्वोक्त अर्था । तरी तियेसी पूर्वोक्त सर्वथा । स्मरत नसे कांहीच ॥ 1३२ ॥

म्हणोनि अंतरीं गडबडोन । स्तब्ध होतसे तत्क्षण । हें तियेचें वर्म कठीण । ठावुकें नसे कोणासी ॥ 1३३ ॥

परी शंकराचार्य चतुर । अंतरीं करीत विचार । ऐसे वेद सार्थ साचार । ब्रह्मांडी कोण बोलणार ॥ 1३४ ॥

ब्रह्मा आणि सरस्वती । हीं मात्र बोलतील निश्चितीं । या दोघांवांचूनि जगतीं । नसे कोणी समर्थ ॥ 1३५ ॥

ह्या अय्याच्या बापाचेनें । ऐसें नोहे वेद बोलणे । मग ह्या क्षुलुक पामराचेनें । कोठोनियां बोलवेल ॥ 1३६ ॥

तरी येथे काही तरी । कपट आहे निर्धारीं । ऐसें जाणोनियां अंतरीं । अय्यालागीं बोलत ॥ 1३७ ॥

अरे आतां उगा कां राहिलासी । मम प्रश्नासी को नोत्तरिसी । तों तो अय्या गडबडोनि मानसीं । म्हणे अनर्थ ओढवला ॥ 1३८ ॥

दोन चार वेळां स्वामींनी । प्रश्निले असे अय्यालागुनी । परी तो अत्यंत भय पावोनी । कांहींच वाणी बोलेना ॥ 1३९ ॥

मग शंकराचार्य उठोन । पाहती पडदा उघडोन । तों तेथे मद्यघटांतून । मुख बाहेर आलें असे ॥ १४० ॥

ते पाहतां ही सरस्वती होय । ऐसा अंतरीं करूनि निश्चय । तै जगद्गुरु शंकराचार्य । कोपें संतप्त जाहले ॥ 1४१ ॥

मग सकळ पडदे फाडून । शिरीं घातला दंड दारुण । तेणें तो मद्यघट फुटोन । चूर्ण तत्क्षण जाहला ॥ 1४२ ॥

आणि म्हणती हे दुराचारिणी । जैनालागी प्रसन्न होऊनी । वेदशास्त्रचर्चा रात्रंदिनी । चांडाळिणी करितेस ॥ 1४३ ॥

तुझे न पाहावें जारिणी मुख । ज्याच्या पोटीं जन्मलीस देख । त्या ब्रह्मयासीच तू निःशंक । अंगभोग देसी निर्लज्जे ॥ 1४४ ॥

ऐसी तूं महापापिणी । ह्या जैनासी वश होऊनी । जैनशास्त्र स्थापावया लागुनी । सर्वदा रत झालीस ॥ 1४५ ॥

ह्या दुष्ट पाखांडमतासी । आश्रय देऊनि अहर्निशी । अठरा याती चार वर्णासी । एकंकार केलास ॥ 1४६ ॥

जैनी झाले लोक समग्र । हा तूंचि केलासि वर्णसंकर । वेद शास्त्र पुराणे परिकर । एकीकडे राहिलीं ॥ 1४७ ॥

या जैनाचीं शास्त्रे संपूर्ण । तुवां त्यांचा धरोनि अभिमान । जैनमत प्रकटवून । लोकां पाखंडी घातलेंस ॥ 1४८ ॥

तुझ्या आश्रये ह्या दुष्टें स्वमतें । पृथ्वीवरील ग्रामदैवतें । स्थापूनिया स्वकीय हस्ते । भ्रष्ट केलीं सर्वही ॥ ४९ ॥

ऐसा तुझ्यायोगे सगळा । अत्यनर्थ वोढवला । तो म्यां कैलासीं ऐकियला । म्हणोनि घेतला अवतार ॥ १५० ॥

तू अनाचार केलासी अत्यंत । तरी सदा राहें नीचसुखांत । अ ंत्यजादिकांच्या गृहीं सतत । वास होवो मम शापें ॥ 1५१ ॥

ऐसे रीतीं सरस्वतीप्रती । शंकरस्वामी शाप देती । मग ती कोपोनि सरस्वती । स्वामींप्रती बोलत ॥ 1५२ ॥

तूं तों धर्म स्थापावयासी । साक्षात् शंकर अवतरलासी । तरी तुझा देह कीकटदेशीं । पडेल जाण मद्वचनें ॥ 1५३ ॥

ऐसे स्वामींसी शापून । सरस्वती गुप्त झाली तत्क्षण । मग स्वामींचे धरूनि चरण । मंडनमिश्र लोळत ॥ 1५४ ॥

परी शंकराचार्यां तत्क्षणीं । जैनशास्त्रांच्या मोटा बांधूनी । अति अगाध समुद्रजीवनीं । नेऊनियां बुडविल्या ॥ ५५ ॥

त्यांतूनि एक अमरकोश । सर्वोपयोगी असे विशेष । म्हणोनि त्या मात्र ग्रंथास । शंकराचार्यां रक्षिलें ॥ 1५६ ॥

असो ऐसे जैनशास्त्रांसी । विध्वंसूनियां क्षणार्धेसी । मग जवळ पाचारूनि जनांसी । स्वामी तयांसी बोलत ॥ 1५७ ॥

अहो हीं ग्रामदैवतें समस्त । आहेत खरीं जैनस्थापित । परी त्यांतें तुम्हीं सतत । भजत जावें स्वधर्मं ॥ 1५८ ॥

जैनें स्थापिलीं म्हणोनी । संशय कांहीं न धरावा मनीं । आपुला धर्म आपणा लागुनी । देवापाशीं काय असे ॥ 1५९ ॥

ऐसें स्वामी सकळ लोकां । सांगती तेव्हां अय्या देखा । स्वामीचरणीं स्वकीय मस्तका । ठेवूनियां विनवीत ॥ १६० ॥

म्हणे स्वामी जैनमत संपूर्ण । तुम्हीं टाकिलें उच्छेदून । परी कृपें जैनाचे अभिधान । किंचित् तरी रक्षावें ॥ 1६१ ॥

ऐसी ऐकतां दीनवाणी । कृपा उपजोनि स्वामींच्या मनीं । ग्रामदैवतांच्या सन्निधानीं । जैनाचा धोंडा स्थापिला ॥ 1६२ ॥

जेथे जेथे ग्रामदैवत । तेथे जैनाचा धोंडा वसत । ग्रामदेवतांसंगें त्याप्रत । प्रतिदिनीं पूजिती ॥ 1६३ ॥

असो मग स्वामी तेजोराशी । आज्ञापिती सकळ जनांसी । कीं आपुल्या जातिधर्मेसीं । पूर्वीप्रमाणे वर्तावें ॥ 1६४ ॥

जरी अधर्मे वर्ताल कोणी । तरी दंडीन ऐसे बोलुनी । वेदशास्त्र पुराणें तत्क्षणीं । प्रगट केलीं साचार ॥ 1६५ ॥

मग सकळही ब्राह्मण । करू लागले वेदशास्त्राध्ययन । आणि अन्य जनही संपूर्ण । वढू लागले स्वधर्मे ॥ 1६६ ॥

ऐसें शंकराचार्ये दयाळे । आपुल्या उत्तम बुद्धिबळे । जैनाचें पाखंडमत आगळे । विध्वंसिले सर्वही ॥ 1६७ ॥

श्रुतिस्मृत्युक्त धर्मपरिकर । सर्वत्र स्थापिला पृथ्वीवर । तेवींच अद्वैताचा साचार । मार्ग सर्वांसी दाविला ॥ 1६८ ॥

एवं महाराज शंकर । भक्तवत्सल कर्पूरगौर । अवतरोनियां भूमीवर । भूभार हरिता जाहला ॥ 1६९ ॥

अहो शंकराची लीला अगाध । जो भक्तवत्सल स्वानंदकंद । सेवकां तारूनियां विशद । निजपदासी नेतसे ॥ १७० ॥

काय वर्णावे त्याचें चरित । जे दीन अनाथ सद्भक्त । शिव पंचाक्षरी षडक्षरी जपत । तयां तारील प्रसादें ॥ 1७१ ॥

दाशार्ह राव आणि कलावती । बहुला विदुर पापमती । तीहीं शिवपंचाक्षरे जपतां निगुती । अक्षय गति पावलीं ॥ 1७२ ॥

शबर केवळ निषाद । शिवकृपें तरला हे प्रसिद्ध । भस्म होऊनियां तद्भार्या शुद्ध । पुनरपि देहें प्रकटली ॥ 1७३ ॥

श्रीशिवयोगियानें । सुमतिभद्रायूकारणे । शिवकवचाच्या उपदेशानें । पावन केलें साचार ॥ 1७४ ॥

मैत्रेयीच्या उपदेशेकरूनी । शिवव्रत आचरतां सीमंतिनी । यमुनेत पति बुडाला असोनी । आला वांचोनी शिवकृपें ॥ 1७५ ॥

पराशरऋषीने आपण । रुद्राभिषेकेंकरून । राजपुत्राचा मृत्यु टाळून । तयासी राज्य स्थापिलें ॥ 1७६ ॥

ऐसें शिवकवच रुद्र । पडक्षरी पंचाक्षरी इत्यादि मंत्र । सर्वोद्धारक आहेत पवित्र । परी अभक्तां काय ते ॥ 1७७ ॥

जरी गर्गमुनीसारिखे सद्गुरू । दाशार्हराजापरी शिष्य थोरू । भाविक असतील तरी उद्धारू । होईल जाण निश्चयें ॥ 1७८ ॥

जरी भद्रायूसम शिष्यजन । शिवयोगियापरी गुरु सुजाण । तरी प्रत्यक्ष शिव प्रगटोन । नेईल शिष्या कैलासीं ॥ 1७९ ॥

कलियुगामाजीं गुरु महंत । एक अडक्यासी तीन मिळत । परी सद्गुरुसम अत्यदभुत । सामर्थ्य तेथे कैंचें पां ॥ १८० ॥

द्रव्याची इच्छा धरूनि मनीं । केवळ शिष्यजनांसीं भोंदुनी । मंत्रतंत्र फुकोनि कानीं । व्यर्थ साधना लाविती ॥ 1८१ ॥

शिष्यही अभाविक दुर्जन । गुरूचे पाहती सदा न्यून । म्हणोनि दोघां नरक दारुण । प्राप्त होय शेवटीं ॥ 1८२ ॥

आतांचे गुरुशिष्य सकळीक । केवळ द्रव्याचें गि-हाईक । दाशार्मादिकांपरी तो एक । शिष्य न दिसे कलियुगीं ॥ 1८३ ॥

सद्गुरु तो शिष्यांच्या धना । नरकासमान मानिती जाणा । सच्छिष्यही तनुमनधना । अर्पितात गुरुपायीं ॥ 1८४ ॥

म्हणोनि तरले ते दाशार्हादिक । नातरी तेच मंत्र सकळीक । परी हे आतांचे जन मूर्ख । द्रव्यलोभे भुलले पैं ॥ 1८५ ॥

अहो कृतयुगामाजी पाहतां । अस्थिगत प्राण होता । जेव्हां अस्थी पडती सर्वथा । तेव्हां प्राण जातसे ॥ 1८६ ॥

म्हणोनि तोपर्यंत साधन । करीत बैसती अरण्य जाऊन । त्रेतायुगीं ते चर्मगत प्राण । चर्म झडतां मृत्यू होय ॥ 1८७ ॥

द्वापारीं प्राण नाडीगत । नाही सुकती तों वाचत । ऐसे पूर्वी आयुष्य बहुत । होते सकळ मानवां ॥ 1८८ ॥

आणि लक्ष अयुत सहस्र वर्षे । ऐसीं तेव्हां होतीं आयुष्यें । म्हणोनि सकळ बहुत वर्षे । अनुष्ठाने आचरत ॥ 1८९ ॥

आणि ऐसे तप करित । कीं जेणें अंगीं वारुळे वाढत । मग प्रसन्न होऊनि भगवंत । आपुल्या नेत पदासी ॥ १९० ॥

आतां तों अन्नमय प्राण । अन्नाविना सत्वर मरण । आणि आयुष्य तेही अपूर्ण । नोहे साधन कांहींच ॥ 1९१ ॥

देहाचा नाहीं भरंवसा । कोण दिवस येईल कैसा । म्हणोनि साक्षात् जगदीशा । अंतरीं दया उद्भवली ॥ 1९२ ॥

आणि औट घटिकांत पूर्ण । परमेश्वरप्राप्ती होऊन । मोक्षासी जावें उद्धरोन । ऐसा मार्ग काढिला ॥ 1९३ ॥

तो मार्ग म्हणाल कवण । तरी सद्गुरूसी जावें शरण । यावीण मोक्षलाभालागून । इतर साधन नसेचि ॥ 1९४ ॥

आतां सद्गुरु तो कैसा असावा । सदा आनंद तन्मनीं वसावा । वामदेव गर्ग शुक किंवा । पराशरापरी साचा ॥ 1९५ ॥

शिष्यही असावे भाविक । गुरूचि मानावा ईश्वर ऐक । ऐसे घडतां हे सकळिक । जन तरतील कलियुगीं ॥ 1९६ ॥

श्रीधर म्हणे श्रोतयांसी । ज्या मंत्री तरले महाऋषी । तेचि हे मंत्र तुम्हांसी । प्रकाशित केले पां ॥ 1९७ ॥

ज्या मंत्रे भद्रायू तरला । जेणें दाशार्हराव उद्धरला । आणि जो मंत्र सुमतिराणीला । शिवयोगियें दिधला असे ॥ 1९८ ॥

ज्या मंत्रे बहुला उद्धरली । विदुर पावला शिवपदकमळीं । आणि भ्रतारासहित तरली । सीमंतिनी ज्या मंत्रे ॥ 1९९ ॥

तेचि षडक्षर पंचाक्षरी रुद्र । मृत्युंजय शिवकवच पवित्र । इत्यादि सकळही मंत्र । या ग्रंथांत कथियेले ॥ २०० ॥

परी श्रोते तुम्ही म्हणाल जरी । तेचि मंत्र असतां निर्धारी । तिंहीं सांप्रत पूर्वीच्या परी । कां न उद्धरती जन हे ॥ 20१ ॥

तरी जपकर्त्यांचे मन । शुद्ध असेल तरी तत्क्षण । पूर्वीप्रमाणे तयासी गुण । येईल जाण निश्चयें ॥ 20२ ॥

यालागीं विशुद्ध भावेंसी । जपावें या शिवमंत्रांसी । आणि सर्वांनीही अहर्निशीं । शिवलीलामृतासी ऐकिजे ॥ 20३ ॥

आपुल्या प्रपंचालागुनी । सावध जैसे निशिदिनी । तैसे जरी शिवस्मरणीं । तरी मग उणें कायसे ॥ 20४ ॥

कलियुगींच्या जनाकारणें । शंकराचार्य ह्या अभिधाने । अवतार घेऊनियां शिवानें । जैनमत बुडविले ॥ 20५ ॥

ऐसा सद्धर्मप्रतिपालक । जो शंभु अपर्णानायक । तयाचे स्मरण करितां सकळीक । भवभय निरसे मैं ॥ 20६ ॥

आपुल्या कार्यात रात्रंदिन । गुंतले असती जे का जन । ते अभागी आयुष्य सरोन । पावती निधन अकस्मात ॥ 20७ ॥

जे कित्येक प्रपंची गुंतले । शिवध्यान करू विसरले । जन्मासी आले तैसेचि गेले । ते जन्मले मेले सारखेच ॥ 20८ ॥

जे जन्मोनि कांही करीत नाहीं । ते शेवटीं जावोनि यमाचे गेहीं । तेथे पडोनि नरकडोहीं । अनेक भोग भोगिती ॥ 20९ ॥

अणि पुनरपि नाना योनींत । जन्मोनि अनंत दुःखे भोगित । एवं संसृतीच्या आवर्तात । बुचकळत सर्वदा ॥ २१० ॥

म्हणोनि सांगतों सर्वांलागुन । शिवचरणीं भाव धरोन । करितां शिवलीलामृतपान । जन्ममरण खंडेल ॥ 2११ ॥

शिवस्मरणकर्यांजनांसी । शिव नेतो मोक्षपदासी । ब्राह्मणादि सर्व जातीसी । शिवस्मरण तारक ॥ 2१२ ॥

परी ब्राह्मण आपुल्या कर्मात । बैसती बहुत ग्रंथ घोकित । आणि प्रपंचीं होऊनि रत । शिवस्मरण विसरले ॥ 2१३ ॥

आणि क्षत्रिय ते संपूर्ण । नाना शस्त्रे सांभाळून । सदा युद्ध इच्छिती म्हणोन । शिवस्मरण विसरले ॥ 2१४ ॥

वैश्य ते आपुल्या व्यवहारेंसी । द्रव्याची दुणाई इच्छूनि मानसीं । तागडी धरिती अहर्निशी । शिवस्मरण मग कैचें ॥ 2१५ ॥

कुणब्यासी नाहीं घरदार । नित्य नूतन संसार । भूमिसेवा करिती निरंतर । मग शिवस्मरण कैचें तयां ॥ 2१६ ॥

सोनार सुतार कासार । करीत आपुले व्यवहार । प्रपंचीं गुंतले निरंतर । मग शिवस्मरण कोठूनी ॥ 2१७ ॥

ऐशा सकळही यातीं । आपुल्या व्यवहारीं गुंतती । जन्ममरणांच्या आवृत्ती । न सुटती साचार ॥ 2१८ ॥

पुनःपुनः जन्ममरणें । चौथ्याऐंशी लक्ष योनी भोगणें । परी तयांच्या परिहाराकारणें । शिवनामामृत समर्थ ॥ 2१९ ॥

यालागीं शिवलीलामृत ग्रंथ । पापीजनोद्धारक निश्चित । याते जे श्रवण पठण करीत । ते जन होत शिवरूपी ॥ २२० ॥

एक मंडळामाझारी । म्हणजे बेचाळीस दिनाभीतरीं । सदा शिवमूर्ति ध्याऊनि अंतरीं । सात आवर्तने करिती जे ॥ 2२१ ॥

तयां श्रीगौरीरमण । प्रत्यक्ष देऊनियां दर्शन । सकळ कामना करितो पूर्ण । ऐसा महिमा ग्रंथाचा ॥ २2२ ॥

श्रावणमासीं सोमवारी । एक एक आवर्तन जो करी । श्रीशंकर तयाचे घरीं । वास करितो सर्वदा ॥ 2२३ ॥

श्रीशंकर झालिया प्रसन्न । जगीं तयासी काय न्यून । जैसी कामधेनू मिळतां संपूर्ण मनोरथ पूर्ण होतात ॥ 2२४ ॥

जरी पाहिजे शंभूची कृपा । तरी हा आहे मार्ग सोपा । करीत पंचाक्षरादि मंत्रजपा । शिवलीलामृत वाचावें ॥ 2२५ ॥

शनिप्रदोषीं शिवरात्रिदिनीं । आवर्तने करितां तत्क्षणीं । सर्व बंधमुक्त होऊनी । इच्छिला पदार्थ लाधतो ॥ 2२६ ॥

आतां शंकेल श्रोत्यांचे मन । श्रीशिवमंत्राच्या जपेंकरून । जैसीं दाशार्हाच्या अंगांतून । पापें निघालीं काकरूपें ॥ 2२७ ॥

तेवीं पंचाक्षरीमंत्राचा जप । आम्ही करीत असतां अमूप । काकरूपें आमुचे पाप । गेलें कां न दिसे पैं ॥ २2८ ॥

तरी श्रोतेजन हो ऐका । ऐसी अंतरीं न धरा शंका । स्कंदपुराणीं व्यासें जें का । लिहिलें तेंचि हें कथिलेंसे ॥ २2९ ॥

यालागीं हें असत्य म्हणतां । जिव्हेसी कीटक पडतील तत्त्वता । दाशार्हापरी भावें वर्तता । पापें भस्म होतील ॥ २३० ॥

चौदा अध्यायांभीतरीं । जे मंत्र कथिले ऋषीश्वरीं । तिहीं निष्पाप होऊनि सत्वरी । बहुत जन उद्धरले ॥ 2३१ ॥

शिवकवचे भद्रायूबाळ । शिवमंत्रे शारदा निर्मळ । राजपुत्राचा आलेला काळ । रुद्रावर्तने परतला ॥ 2३२ ॥

शबरस्त्री भस्म झाली । परी ती नैवेद्यार्पणाच्या वेळी । अन्नपात्र घेऊनि पतीजवळी । उभी राहिली पूर्ववत ॥ 2३३ ॥

बहुला ती केवळ पातकी । पश्चात्तापें गेली स्वर्गलोकीं । विदुरभ्रतार होता नरकीं । तोही तेथे आणविला ॥ 2३४ ॥

वामदेवें ब्रह्मराक्षसास । गौतमें कल्माषपादरायास । श्रीशिवें श्रियाळचांगुणेस । आणि चिलयास उद्धरिलें ॥ 2३५ ॥

दाशार्हराव आणि कलावती । शिवमंत्रे पावलीं मुक्ती । व्याध तरला अरण्यपंथी । कीर्तनश्रवणमात्रेच ॥ 2३६ ॥

गोरक्षकबाळ अज्ञान । तोही तरला शिवमंत्रेकरून । मंत्रांत मंत्र श्रेष्ठ हे दोन । पंचाक्षरी आणि षडाक्षरी ॥ 2३७ ॥

शिवकवच महामंत्रासहित । मृत्युंजय भस्ममंत्र विख्यात । रुद्रावर्तन चिताभस्मपूत आणि शिवदर्शन उत्तम ॥ 2३८ ॥

ह्यांची माहात्म्ये संपूर्ण । चौदा अध्यायांत वर्णन । ह्या पंधराव्या अध्यायीं आख्यान । जगद्गुरूचे कथियेलें ॥ 2३९ ॥

स्कंदाप्रती शंकर सांगत । जे ह्या मंत्रासी मुखें बोलत । तयां मी प्रत्यक्ष उमानाथ । दर्शन देतों प्रीतीनें ॥ २४० ॥

जो शिवलीलेसी पठण करी । तयासी प्रसन्न गिरिकुमारी । आणि मीही तयासी अहोरात्रीं । न विसंबें निश्चयें ॥ 2४१ ॥

ऐसें श्रीगिरिजानाथ । कथिते जाहले स्कंदाप्रत । म्हणोनि मीही तैसेचि येथ । वर्णियेलें असे पां ॥ 2४२ ॥

मी आपल्या पदरींचे कांहीं । उगाच वर्णन केले नाही । श्रोतेजनी हृदयाठायीं । विकल्प कांहीं न धरावा ॥ 2४३ ॥

शिवलीलेचे चौदा अध्याय । हा पंधरावा कोठील काय । ऐसा मनीं विकल्प होय । तरी सांगतो ऐकिजे ॥ 2४४ ॥

ज्या शिवें भक्त तारिले अपार । आणि ज्याचा शिवलीलामृत ग्रंथ पवित्र त्यानेच ह्या कलियुगीं अवतार । धर्मस्थापनार्थ घेतला ॥ 2४५ ॥

शिवमहिमा अगाध । सकळही कीजे प्रसिद्ध । म्हणोनि पंधरावा अध्याय शुद्ध । शिवाज्ञेनें वर्णिला ॥ 2४६ ॥

पूर्वयुगीं जी लीला वर्तली । ती चौदा अध्यायीं वर्णिली । कलियुगीं श्रीचंद्रमौळी । शंकराचार्य अवतरले ॥ 2४७ ॥

तेंचि सविस्तर कथन । या पंधराव्यांत केलें पूर्ण । श्रोतीं श्रवणार्थ रात्रंदिन । सादर असावें साचार | ॥ 2४८ ॥

हे पंधरा अध्याय संपूर्ण । नित्य करावे श्रवणपठण । अथवा सात पारायणे । अत्यादरें करावीं ॥ 2४९ ॥

मद्य मांस भक्षून । न करावें ग्रंथपठण । कीं स्नान केल्यावांचून । पारायण न करावें ॥ २५० ॥

रजस्वलेच्या श्रवणीं । न पडावा हा मंत्रशिरोमणी । कीं अभक्ष्यभक्ष्य भक्षूनी । शिवू नये या ग्रंथा ॥ 2५१ ॥

आणि जो दुष्ट दुर्जन । अविश्वासू निंदक महान । तयाच्याही श्रवणीं जाण । न घालावा सर्वथा ॥ 2५२ ॥

रजस्वला स्त्रियांसमान । दुर्जननिंदकांचे मन । केवळ अशुद्ध असते म्हणोन । ग्रंथश्रवणा योग्य नव्हे ॥ 2५३ ॥

ह्या ग्रंथाच्या पठणेकरून । इच्छिले सर्व प्राप्त होऊन । गंडांतरे रोग मृत्यु पाप ऋण । दरिद्र संकटें निरसती ॥ 2५४ ॥

अष्टकुष्ठादि रोग निरसती । शृंखळादि बंधने तुटती । आयुष्यवर्धन धनसंतती । अखंडित होय पां ॥ 2५५ ॥

आणि तुष्टि पुष्टि सायुज्यसदन । पठणमात्रे लाधतेपूर्ण । याच्या नित्यपारायणासमान । पुण्य नाहीं दुसरें ॥ 2५६ ॥

पंधरा अध्याय ग्रंथ सकळ । जरी नित्य नेमें न वाचवेल । तरी बेचाळीस ओंव्या सोज्वळ । भक्तिभावें वाचाव्या ॥ 2५७ ॥

नित्य प्रभातीं स्नान करून । बेचाळीस ओंव्या वाचितां पूर्ण । सर्व शिवलीलामृत पठण । केल्याचे पुण्य येईल ॥ 2५८ ॥

शिवलीलामृत ग्रंथ विशेष । पंधरा अध्याय बहुत सुरस । त्यांतील निवडोनि सारांश । बेचाळीस ओंव्या काढल्या ॥ 2५९ ॥

आतां बेचाळीस ओंव्या कोणत्या । तरी सांगतों ऐकाव्या त्या । श्रवणमात्रे सकळ श्रोत्यां । स्वर्गप्राप्ती निश्चयें ॥ २६० ॥

नित्यपाठाच्या बेचाळीस ओव्या

ॐनमोजी शिवा अपरिमिता । आदि अनादि मायातीता । पूर्णब्रह्मानंदा शाश्वता । हेरंबताता जगद्गुरु ॥ 2६१ ॥

ज्योतिर्मयस्वरूपा पुराणपुरुषा । अनादिसिद्धा आनंदवनविलासा । मायाचक्रचाळका अविनाशा । अनंतवेषा जगत्पते ॥ 2६२ ॥

जय जय विरूपाक्षा पंचवदना । कर्माध्यक्षा शुद्धचैतन्या । मनोजदमना मनमोहना । कर्ममोचका विश्वंभरा ॥ 2६३ ॥

जेथे सर्वदा शिवस्मरण । तेथे भुक्ति मुक्ति आनंद कल्याण । नाना संकष्टें विघ्ने दारुण । न बाधती कालत्रयीं ॥ 2६४ ॥

संकेते अथवा हास्येंकरून । भलत्या मिषे घडो शिवस्मरण । न कळतां परिस लोहालागुन । झगटतां सुवर्ण करीतसे ॥ 2६५ ॥

न कळत प्राशितां अमृत । अमर काया होत यथार्थ । औषध नेणतां भक्षीत । परी रोग हरे तत्काळ ॥ 2६६ ॥

जयजय मंगलधामा । निजजनतारक आत्मारामा । चराचरफलांकित कल्पद्रुमा । नामा अनामा अतीता ॥ 26७ ॥

हिमाचलसुतामनरंजना । स्कंदजनका शफरीध्वजदहना । ब्रह्मानंदाभाललोचना । भवभंजना महेश्वरा ॥ 2६८ ॥

हे शिवा वामदेवा अघोरा । तत्पुरुषा ईशाना ईश्वरा । अर्धनारीनटेश्वरा । गिरिजारंगा गिरीशा ॥ 2६९ ॥

धराधरेंद्रमानससरोवरीं । तू शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारीं । तव अपार गुणांसी परोपरी । सर्वदा वर्णिती आम्नाय ॥ २७० ॥

न कळे तुझे आदिमध्यावसान । आपणचि सर्व कर्ता कारण । कोठे प्रकटसी याचे अनुमान । ठायीं न पडे ब्रह्मादिकां ॥ 2७१ ॥

जाणोनि भक्तांचे मानस । तेथेंचि प्रकटसी जगन्निवास । सर्वकाळ भक्तकार्यास । स्वांगे उडी घालिसी ॥ 2७२ ॥

सदाशिव हीं अक्षरें चारी । सदा उच्चारी ज्याची वैखरी । तो परम पावन संसारीं । होऊनि तारी इतरांतें ॥ 2७३ ॥

बहुत शास्त्रवक्ते नर । प्रायश्चितांचे करितां विचार । परी शिवनाम एक पवित्र । सर्व प्रायश्चित आगळे ॥ 2७४ ॥

नामाचा महिमा अदभुत । त्यावरी प्रदोषव्रत आचरत । त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत । सत्य सत्य त्रिवाचा ॥ 2७५ ॥

जयजयाजी पंचवदना । महापापद्रुमनिकुंतना । मदमत्सरकाननदहना । निरंजना भवहारका ॥ 2७६ ॥

हिमाद्रिजामाता गंगाधरा । सुहास्यवदना कर्पूरगौरा । पद्मनाभमनरंजना त्रिनेत्रा । त्रिदोषशमना त्रिभुवनेशा ॥ 2७७ ॥

नीलग्रीवा अहिभूषणा । नंदीवहना अंधकमर्दना । दक्षप्रजापतिमखभंजना । दानवदमना दयानिधे ॥ 2७८ ॥

जयजय किशोरचंद्रशेखरा । उर्वीधरेंद्रनंदिनीवरा । त्रिपुरमर्दना कैलासविहारा । तुझ्या लीला विचित्र ॥ 2७९ ॥

कोटिभानुतेजा अपरिमिता । विश्वव्यापका विश्वनाथा । समाधिप्रिया भूतादिनाथा । मूर्तामूर्ता त्रयिमूर्ते ॥ २८० ॥

परमानंदा परमपवित्रा । परात्परा पंचदशनेत्रा । पशुपते पयःफेनगात्रा । परममंगला परब्रह्मा ॥ 2८१ ॥

जयजय श्रीब्रह्मानंदमूर्ती । तूं वंद्य भोळा चक्रवर्ती । शिवयोगीरूपें भद्रायूप्रती । अगाध नीती कथिलीस ॥ 2८२ ॥

जयजय भस्मोद्धूलितांगा । योगिध्येया भक्तभवभंगा । सकलजनआराध्यलिंगा । नेईं वेगीं तुजपासीं ॥ 2८३ ॥

जेथें नाहीं शिवाचे नाम । तो धिक् ग्राम धिक् आश्रम । धिक् गृह पुर उत्तम । आणि दानधर्मा धिक्कार ॥ 2८४ ॥

जेथे शिवनामाचा उच्चार । तेथे कैचा जन्ममृत्युसंसार । ज्यांसी शिवशिव छंद निरंतर त्यांहीं जिंकिलें कळिकाळा ॥ 2८५ ॥

जयाची शिवनामी भक्ती । तयाची पापे सर्व जळती । आणि चुके पुनरावृत्ती । तो केवळ शिवरूप ॥ 2८६ ॥

जैसे प्राणियांचे चित्त । विषयीं गुंते अहोरात । तैसें शिवनामीं जरी लागत । तरी मग बंधन कैचें ॥ 2८७ ॥

कामगजविदारक पंचानना । क्रोधजलदप्रभंजना । लोभांधकारचंडकिरणा । धर्मवर्धना दशभुजा ॥ 2८८ ॥

मत्सरविपिनकृशाना । दंभनगभेदका सहस्रनयना । लोभमहासागरशोषणा । अगस्त्यमहामुनिवर्या ॥ 2८९ ॥

आनंदकैलासविहारा । निगमागमवंद्या दीनोद्धारा । रुंडमालांकितशरीरा । ब्रह्मानंदा दयानिधे ॥ २९० ॥

धन्य धन्य तेचि जन । जे शिवभजनीं परायण । सदा शिवलीलामृत पठण । किंवा श्रवण करिती पैं ॥ 2९१ ॥

सूत सांगे शौनकादिकांप्रती । जे भस्म रुद्राक्ष धारण करिती । त्यांच्या पुण्यासी नाहीं गणती । त्रिजगतीं धन्य ते ॥ 2९२ ॥

जे करिती रुद्राक्षधारण । त्यांसी वंदिती शक्र द्रुहिण । केवळ तयांचे घेतां दर्शन । तरती जन तत्काळ ॥ 2९३ ॥

ब्राह्मणादि चार वर्ण । ब्रह्मचर्यादि आश्रमी संपूर्ण । स्त्री बाल वृद्ध आणि तरुण । यहीं शिवकीर्तन करावें ॥ 2९४ ॥

शिवकीर्तन नावडे अणुमात्र । ते अत्यंत जाणूनि अपवित्र । लेइले नाना वस्त्रालंकार । तरी केवळ प्रेतचि ॥ 2९५ ॥

जरी भक्षिती मिष्टान्न । तरी ते केवळ पशुसमान । मयूरांगींचे व्यर्थ नयन । तैसे नेत्र तयांचे ॥ 2९६ ॥

शिव शिव म्हणतां वाचे । मूळ न राहे पापाचें । ऐसे माहात्म्य शंकराचें । निगमागम वर्णिती ॥ 2९७ ॥

जो जगदात्मा सदाशिव । ज्यासी वंदिती कमलोद्भव । गजास्य इंद्र माधव । आणि नारदादि योगींद्र ॥ 2९८ ॥

जो जगद्गुरु ब्रह्मानंद । अपर्णाहृदयाब्ज़मिलिंद । शुद्ध चैतन्य जगदादिकंद । विश्वंभर दयाब्धी ॥ 2९९ ॥

जो पंचमुख पंचदशनयन । भार्गववरद भक्तजीवन । अघोर भस्मासुरमर्दन । भेदातीत भूतपती ॥ ३०० ॥

तो तू स्वजनभद्रकारका । संकट रक्षिसी भोळे भाविकां । ऐसी कीर्ति अलोलिका । गाजतसे ब्रह्मांडीं ॥ 30१ ॥

म्हणोनि भावें तुजलागून । शरण रिघालों असें मी दीन । तरी या संकटांतून काढूनि पूर्ण संरक्षीं ॥ 30२ ॥

(नित्यपाठाच्या बेचाळीस ओव्या समाप्त)

ब्रह्मानंद म्हणे श्रीधर । ह्या बेचाळीस ओंव्या समग्र । शिवलीलामृताचे होय सार । श्रोतीं निरंतर परिसाव्या ॥ 30३ ॥

सकळ शिवलीलामृताचें । आणि ह्या बेचाळीस ओंव्यांचे । श्रवण पठण केल्याचें । फळ असे समान ॥ 30४ ॥

जेवीं इक्षुरस गाळुनी । शर्करा काढिजे त्यांतुनी । तेवींचि हे शिवलीलेंतूनी । सार काढिलें सज्जनार्थ ॥ 30५ ॥

कोणी व्यवहारीं गुंतत । म्हणोनि वाचवेना सर्व ग्रंथ । कित्येक ते आळस करित । ग्रंथ विस्तृत म्हणोनियां ॥ 30६ ॥

हे जाणोनियां अंतरांत । शंकरआज्ञे नित्य पठणार्थ । श्रीशिवलीलेच्या सारभूत । ऐशा ह्या ओंव्या रचियेल्या ॥ 30७ ॥

भोळा चक्रवर्ती उदार । भक्तवत्सल कर्पूरगौर । तारावया जन समग्र । नाना उपाय करीतसे ॥ 30८ ॥

तो दीनजनांचा कनवाळू । नाना रीतीं करीत सांभाळू । परी हे दुर्जन कृतघ्न केवळू । मुखें नामही न घेती पां ॥ 30९ ॥

शिवनाम मुखीं असावे म्हणोन । साधुसंत करिती यत्न । परी हे सर्व अतिमूर्ख जन । प्रपंचीं गुंतोन पडताती ॥ 3१० ॥

तरणिउदयापासून । अस्तमानापर्यंत अनुदिन । निंदावाद मुखांतून । परी शिवनाम न येचि ॥ 3११ ॥

यालागीं सज्जनालागूनी । विनवितो उभय हस्त जोडोनी । शिवलीलामृत पठणे करूनी । मोक्ष जोडूनि घेइजे ॥ 3१२ ॥

नित्य समस्त नोहे पठण । तरी बेचाळीस ओंव्या संपूर्ण । वाचितां शुद्धभावेंकरून । मनोरथ पूर्ण होतील ॥ १३ ॥

पंचाक्षरी षडक्षरी मृत्युंजय । इत्यादि मंत्र जपतां दिव्य । काशीविश्वेश्वराचे दर्शन भव्य । घेतलें ऐसे होतसे ॥ 3१४ ॥

श्रीविश्वेश्वराच्या मुखांतील । हे मंत्र आहेत सकळ । म्हणोनि तो जाश्वनीळ । प्रत्यक्ष होय जपकर्त्या ॥ 3१५ ॥

आतां शेवटीं मी श्रीधर । श्रोतयांप्रती जोडून कर । विनंती करितों ही सादर । अंतरामाजीं ठेवावी ॥ 3१६ ॥

पंचाक्षरी षडक्षरी रुद्र । शिवकवच मृत्युंजयादि मंत्र । शिवलीलामृतामाजी पवित्र आहेत जाणा निर्धारिं ॥ 3१७ ॥

यालागी हा उत्तम ग्रंथ । कदापि न द्यावी दुर्जनाप्रत । तथापि देणार तरी निश्चित । इतुकें गुह्य राखावें ॥ 3१८ ॥

हा पंधरावा अध्याय संपूर्ण । आणि मंत्र न द्यावे निंदकालागून । एवढे श्रीधर हस्त जोडून । श्रोतयांप्रती मागत ॥ 3१९ ॥

हा शिवलीलामृत ग्रंथ । श्रीमत्स्कंदपुराणांतर्गत । ब्रह्मोत्तरखंडींचा अर्थ असे यथार्थ सर्वही ॥ 3२० ॥

स्कंदपुराणीं व्यासनारायणे । जैसे कथिले संस्कृत भाषेनें । आणि नैमिषारण्य सूतानें । जैसे ऋषींसी कथिलें पैं ॥ 3२१ ॥

तैसें हें प्राकृत भाषेत समस्त । पंधरा अध्याय शिवलीलामृत । रचिलें येणें श्रीविश्वनाथ । असो प्रीत सर्वदा ॥ 3२२ ॥

जैसे शंकरें कर्णी कथिलें । तैसें पत्रीं असे लिहिलें । न्यूनाधिक यद्यपि जाहलें । तरी दोष नसे मजवरी ॥ 3२३ ॥

जयजय शिवा कर्पूरगौरा । ब्रह्मानंदा जगदुद्धारा । श्रीधरहृदयारविंदभ्रमरा । अक्षय अभंगा दयानिधे ॥ 3२४ ॥

शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । रसभरित जेवीं इक्षुदंड । संत सज्जन परिसोत अखंड । पंचदशाध्याय गोड हा ॥ ३२५ ॥

॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु । शुभं भवतु ॥

॥ इति श्री शिवलीलामृत ग्रंथ समाप्त ॥

shri shiv leelamrut adhyay 15 shiv lilamrut