Skip to main content
पडताळणी प्रलंबित

शिवलीलामृत अध्याय सातवा

श्रीगणेशाय नमः ॥

जय जय किशोरचंद्रशेखरा । उर्वीधरेंद्रनंदिनीवरा । भुजंगभूषणा सप्तकरनेत्रा । लीला विचित्रा तूझिया ॥ १ ॥

भानुकोटितेज अपरिमिता । विश्वव्यापका विश्वनाथा । रमामाधवप्रिया भूताधिपते अनंता । अमूर्तमूर्ता विश्वपते ॥ २ ॥

परमानंदा पंचवक्त्रा । परात्परा पंचदशनेत्रा । परमपावना पयःफेनगात्रा । परममंगला परब्रह्मा ॥ ३ ॥

मंदस्मितवदन दयाळा । षष्ठाध्यायी अतिनिर्मळा । सीमंतिनी आख्यानलीळा । स्नेहाळा तू वदलासी ॥ ४ ॥

श्रीधरमुख निमित्त करून । तूचि वदलासी आपुले गुण । व्यासरूपे सूतास स्थापून । रसिक पुराण सांगविसी ॥ ५ ॥

ऐसे ऐकता दयाळ । वदता झाला श्रीगोपाळ । विदर्भनगरी एक सुशीळ । वेदमित्रनामे द्विज होता ॥ ६ ॥

तो वेदशास्त्रसंपन्न । त्याचा मित्र सारस्वतनामे ब्राह्मण । वेदमित्रास पुत्र सुगुण । सुमेधा नामे जाहला ॥ ७ ॥

सारस्वतसुत सोमवंत । उभयतांचे मित्रत्व अत्यंत । दशग्रंथी ज्ञान बहुत । मुखोद्गत पुराणे ॥ ८ ॥

संहिता पद क्रम अरण ब्राह्मण । छंद निघंट शिक्षा जाण । ज्योतिष कल्प व्याकरण । निरुक्त पूर्ण दशग्रंथी ॥ ९ ॥

ऐसा विद्याभ्यास करता । षोडश वर्षे झाली तत्त्वता । दोघांचे पिते म्हणती आता । भेटा नृपनाथा वैदर्भासी ॥ १० ॥

विद्या दाऊन अद्भुत । मेळवावे द्रव्य बहुत । मग वधू पाहूनि यथार्थ । लग्ने करू तुमची ॥ ११ ॥

यावरी ते ऋषिपुत्र । विदर्भरायासी भेटले सत्वर । विद्याधनाचे भांडार । उघडोनि दाविती नृपश्रेष्ठा ॥ १२ ॥

विद्या पाहता तोषला राव । परी विनोद मांडिला अभिनव । म्हणे मी एक सांगेन भाव । धरा तुम्ही दोघेही ॥ १३ ॥

नैषधपुरीचा नृपनाथ । त्याची पत्नी सीमंतिनी विख्यात । मृत्युंजयमृडानीप्रीत्यर्थ । दांपत्यपूजा करी बहु ॥ १४ ॥

तरी तुम्ही एक पुरुष एक नितंबिनी । होवोनि जावे ये क्षणी । दिव्य अलंकार बहुत धनी । पूजील तुम्हाकारणे ॥ १५ ॥

तेथोन यावे परतोन । मग मीही देईन यथेष्ट धन । मातापितागुरुनृपवचन । कदा अमान्य करू नये ॥ १६ ॥

तव बोलती दोघे किशोर । हे अनुचित कर्म निंद्य फार । पुरुषास स्त्रीवेष देखता साचार । सचैल स्नान करावे ॥ १७ ॥

पुरुषासी नारीवेष देखता । पाहणार जाती अधःपाता । वेष घेणारही तत्त्वता । जन्मोजन्मी स्त्री होय ॥ १८ ॥

हेही परत्री कर्म अनुचित । तैसेचि शास्त्र बोलत । त्याहीवरी आम्ही विद्यावंत । धन अमित मेळवू ॥ १९ ॥

आमुची विद्यालक्ष्मी सतेज । तोषवू अवनीचे भूभुज । आमुचे नमूनि चरणांबुज । धन देती प्रार्थूनिया ॥ २० ॥

पंडितांची विद्या माय सद्गुणी । विद्या अकाळी फळदायिनी । विद्या कामधेनु सांडूनी । निंद्य कर्म न करू कदा ॥ २१ ॥

मातापित्यांहूनि विद्या आगळी । संकटी प्रवासी प्रतिपाळी । पृथ्वीचे प्रभु सकळी । देखोनिया जोडिती कर ॥ २२ ॥

विद्याहीन तो पाषाण देख । जिताचि मृत तो शतमूर्ख । त्याचे न पाहावे मुख । जननी व्यर्थ श्रमविली ॥ २३ ॥

राव म्हणे दोघांलागून । माझे मान्य करावे एवढे वचन । परम संकट पडले म्हणून । अवश्य म्हणती तेधवा ॥ २४ ॥

राये वस्त्र अलंकार आणून । एकासी स्त्रीवेष देऊन । सोमवारी यामिनीमाजी जाण । पूजासमयी पातले ॥ २५ ॥

जे सकळ प्रमदांची ईश्वरी । जिची प्रतिमा नाही कुंभिनीवरी । जीस देखोनि नृत्य करी । पंचशर प्रीतीने ॥ २६ ॥

रंभा उर्वशी चातुर्यखाणी । परी लज्जा पावती जीस देखोनी । रेणुका जानकी श्रीकृष्णभगिनी । उपमा शोभे जियेसी ॥ २७ ॥

तिणे हे दंपत्य देखोनि । कृत्रिम पाहूनि हासे मनी । परी भावार्थ धरूनि चातुर्यखाणी । हरभवानी म्हणोनि पूजित ॥ २८ ॥

अलंकार वस्त्र यथेष्ट धन । षड्रसअन्ने देत भोजन । शिवगौरी म्हणोन । नमस्कार करून बोळवी ॥ २९ ॥

जाता ग्रामपंथ लक्षुनी । पुढे भ्रतार मागे कामिनी । नाना विकार चेष्टा भाषणी । बहुत बोले तयासी ॥ ३० ॥

म्हणे आहे हे एकांतवन । वृक्ष लागले निबिड सघन । मी कामानळेकरून । गेले आहाळून प्राणपति ॥ ३१ ॥

तू वर्षोनि सुरतमेघ । शीतळ करी ममांग । मी नितंबिनी झाले अभंग । जवळी पाहे येऊनिया ॥ ३२ ॥

तो म्हणे का चेष्टा करिसी विशेष । फेडी वस्त्र होय पुरुष । विनोद करिसी आसमास । हासती लोक मार्गीचे ॥ ३३ ॥

तव ते कामे होवोनि मूर्छित । मेदिनीवरी अंग टाकीत । म्हणे प्राणनाथा धाव त्वरित । करी शांत कामज्वराते ॥ ३४ ॥

तव तो परतोनि आला सवेग । म्हणे हे नसते काय मांडिले सोंग । तुम्ही आम्ही गुरुबंधु निःसंग । ब्रह्मचारी विद्यार्थी ॥ ३५ ॥

येरी म्हणे बोलसी काये । माझे अवयव चाचपोनि पाहे । गेले पुरुषत्व लवलाहे । भोगी येथे मज आता ॥ ३६ ॥

हाती धरूनि तयासी । आडमार्गे नेले एकांतासी । वृक्ष गेले गगनासी । पल्लव भूमीसी पसरले ॥ ३७ ॥

साल तमाल देवदार । आम्र कदंबादि तरुवर । त्या वनी नेऊनि सत्वर । म्हणे शंका सांडी सर्वही ॥ ३८ ॥

मी स्त्री तू भ्रतार निर्धार । नाही येथे दुसरा विचार । येरू म्हणे हे न घडे साचार । तुम्ही आम्ही गुरुबंधु ॥ ३९ ॥

शास्त्र पढलासी सकळ । त्याचे काय हेचि फळ । परत्रसाधन सुकृत निर्मळ । विचार करूनि पाहे पां ॥ ४० ॥

आधीच स्त्री वरी तारुण्य । परम निर्लज्ज एकांतवन । मिठी घाली गळा धावून । देत चुंबन बळेचि ॥ ४१ ॥

घेऊनिया त्याचा हात । म्हणे पाहे हे पयोधर कमंडलुवत । तव तो झिडकारूनि मागे सारीत । नसता अनर्थ करू नको ॥ ४२ ॥

धन्य धन्य ते पुरुष जनी । परयोषिता एकान्त वनी । सभाग्य सधन तरुणी । प्रार्थिता मन चळेना ॥ ४३ ॥

वृत्तीस नव्हे विकार । तरी तो नर केवळ शंकर । त्यापासी तीर्थे समग्र । येवोनि राहती सेवेसी ॥ ४४ ॥

जनरहित घोर वनी । द्रव्यघट देखिला नयनी । देखता जाय ओसंडोनी । तरी तो शंकर निर्धारे ॥ ४५ ॥

सत्यवचनी सत्कर्मी रत । निगमागमविद्या मुखोद्गत । इतुके असोनि गर्वरहित । तरी तो शंकर निर्धारे ॥ ४६ ॥

आपण देखता वर्म काढूनी । निंदक विंधिती वाग्बाणी । परी खेदरहित आनंद मनी । तरी तो शंकर निर्धारे ॥ ४७ ॥

दुसरियाचे कूटदोषगुण । देखे ऐके जरी अनुदिन । परी ते मुखास नाणी गेलिया प्राण । तरी तो शंकर निर्धार ॥ ४८ ॥

न दिसे स्त्रीपुरुष भाव जाण । गुरुरूप पाहे चराचर संपूर्ण । न सांगे आपुले सुकृत तप दान । तरी तो शंकर निर्धारे ॥ ४९ ॥

पैल मूर्ख हो पंडित । निवडू नेणे समान पाहत । कीर्ति वाढवावी नावडे मनांत । तरी तो शंकर निर्धारे ॥ ५० ॥

अभ्यासिले न मिरवी लोकात । शिष्य करावे हा नाहीच हेत । कोणाचा संग नावडे आवडे एकान्त । तरी तो शंकर निर्धार ॥ ५१ ॥

विरोनि गेल्या चित्तवृत्ती । समाधी अखंड गेली भ्रांती । अर्थ बुडालियाची नाही खंती । तरी तो शंकर निर्धारे ॥ ५२ ॥

श्रीधर म्हणे ऐसे पुरुष । ते ब्रह्मानंद परमहंस । त्यांच्या पायींच्या पादुका निःशेष । होऊनि राहावे सर्वदा ॥ ५३ ॥

वेदमित्रपुत्र साधु परम । धैर्यशत्रे निवटोनि काम । म्हणे ग्रामास चला जाऊ उत्तम । विचार करू या गोष्टीचा ॥ ५४ ॥

ऐसे बोलोनि सारस्वतपुत्र । स्त्रीरूपे सदना आणिला सत्वर । श्रुत केला समाचार । गतकथार्थ वर्तला जो ॥ ५५ ॥

सारस्वते मांडिला अनर्थ । रायाजवळी आला वक्षःस्थळ बडवीत । म्हणे दुर्जना तुवा केला घात । हत्या करीन तुजवरी ॥ ५६ ॥

वेदशास्त्रसंपन्न । येवढाच पुत्र मजलागून । अरे तुवा निर्वंश केला पूर्ण । काळे वदन झाले तुझे ॥ ५७ ॥

विदर्भ अधोगतमुख पहात । म्हणे कृत्रिम केवी झाले सत्य । शिवमाया परम अद्भुत । अघटित कर्तृत्व तियेचे ॥ ५८ ॥

राये मेळवूनि सर्व ब्राह्मण । म्हणे सतेज करा अनुष्ठान । द्यावे यासी पुरुषत्व आणून । तरीच धन्य होईन मी ॥ ५९ ॥

विप्र म्हणती हे ईश्वरी कळा । आमुचेनि न पालटे भूपाळा । तेव्हा विदर्भराव तये वेळा । आराधिता झाला देवीते ॥ ६० ॥

हवन मांडिले दुर्धर । राव सप्तदिन निराहार । देवी प्रसन्न झाली म्हणे माग वर । मग बोले विदर्भ तो ॥ ६१ ॥

म्हणे हा सोमवंत स्त्रीवेष । यासी पुनः करी पुरुष । देवी म्हणे ही गोष्ट निःशेष । न घडे सहसा कालत्रयी ॥ १२ ॥

निःसीम पतिव्रता सीमंतिनी । परम भक्त सद्भुणखाणी । तिचे कर्तृत्व माझेनी । न मोडवे सहसाही ॥ ६३ ॥

या सारस्वतासी दिव्य नंदन । होईल सत्य वेदपरायण । ईस सुमेधा वर जाण । लग्न करूनि देइजे ॥ ६४ ॥

देवीच्या आज्ञेवरून । त्यासीच दिधले लग्न करून । अंबिकेचे वचने जाण । पुत्र जाहला सारस्वता ॥ ६५ ॥

धन्य सीमंतिनीची शिवभक्ती । उपमा नाही त्रिजगती । जिचे कर्तृत्व हैमवती । मोडू न शके सर्वथा ॥ ६६ ॥

सूत म्हणे ऐका सावधान । अवंतीनगरी एक ब्राह्मण । अत्यंत विषयी नाम मदन । शृंगारसुगंधमाल्यप्रिय ॥ ६७ ॥

पिंगलानामे वेश्या विख्यात । तिसी झाला सदा रत । सांडूनि ब्रह्मकर्म समस्त । मातापिता त्यागिली ॥ ६८ ॥

धर्मपत्नी टाकूनि दुराचारी । तिच्याच घरी वास करी । मद्यमांसरत अहोरात्री । कामकर्दमी लोळत ॥ ६९ ॥

करावया जगदुद्धार । आपणचि अवतरला शंकर । ऋषभनामें योगीश्वर । होवोनि विचरत महीवरी ॥ ७० ॥

आपुले जे जे निर्वाणभक्त । त्यांची दुःखे संकटे निवारीत । पिंगलेच्या सदना अकस्मात । पूर्वपुण्यास्तव पातला ॥ ७१ ॥

तो शिवयोगींद्र दृष्टी देखोन । दोघेही धांवती धरिती चरण । षोडशोपचारेकरून । सप्रेम होऊनी पूजिती ॥ ७२ ॥

शुष्क सुपक्क स्निग्ध विदग्ध । चतुर्विध अन्ने उत्तम स्वाद । भोजन देऊनि बहुविध । अलंकारवस्त्र दीधली ॥ ७३ ॥

करूनियां दिव्य शेज । निजविला तो शिवयोगिराज । तळहाते मर्दिती दोघे चरणांबुज । सुवर्णाग्रजउदय होय तो ॥७४ ॥

एक निशी क्रमोनि जाण । शिवयोगी पावला अंतर्धान । दोघे म्हणती उमारमण । देऊनि दर्शन गेला आम्हां ॥ ७५ ॥

मग पिंगला आणि मदन । कालांतरी पावली मरण । परी गांठीस होते पूर्वपुण्य । शिवयोगीपूजनाचे ॥ ७६ ॥

दाशार्हदेशींचा नृपती । वज्रबाहुनामें विशेषकीर्ती । त्याची पट्टराणी नामे सुमती । जेवी दमयंती नळाची ॥ ७७ ॥

तो मदननामें ब्राह्मण । तिच्या गर्भी राहिला जाऊन । सीमंतिनीच्या पोटी कन्यारत्न । पिंगला वेश्या जन्मली ॥ ७८ ॥

कीर्तिमालिनी तिचे नांव । पुढे कथा ऐका अभिनव । इकडे सुमतीचे पोटी भूदेव । असतां विचित्र वर्तले ॥ ७९ ॥

तिच्या सवती होत्या अपार । ही पट्टराणी ईस होईल पुत्र । त्यांही तीस विष दुर्धर । गर्भिणी असतां घातले ॥ ८० ॥

तीस तत्काळ व्हावा मृत्यू । परी रोग लागला झाली प्रसूत । विष अंगावरी फुटले बहुत । बाळकासहित जननीच्या ॥ ८१ ॥

क्षते पडली झाले व्रण । रक्त पू गळे रात्रंदिन । राये बहुत वैद्य आणून । औषधे देता बरे नोहे ॥ ८२ ॥

रात्रंदिवस रडे बाळ । सुमती राणी शोके विव्हळ । मृत्यूही नोहे व्यथा सबळ । बरी नव्हेचि सर्वथा ॥ ८३ ॥

लेकरू सदा करी रुदन । रायासी निद्रा न लागे रात्रंदिन । कंटाळला मग रथावरी घालून । घोर काननी सोडिली ॥ ८४ ॥

जेथे मनुष्याचे नाही दर्शन । वसती व्याघ्र सर्प दारुण । सुमती बाळ कडे घेऊन । सव्यअपसव्य हिंडतसे ॥ ८५ ॥

कंटक पाषाण रुतती चरणी । मूच्र्छा येऊनि पडे धरणी । आक्रंदे रडे परी न मिळे पाणी । व्रणेकरूनी अंग तिडके ॥ ८६ ॥

म्हणे जगदात्म्या कैलासपती । जगद्वंद्या ब्रह्मानंदमूर्ति । भक्तवज्रपंजरा तुझी कीर्ती । सदा गाती निगमागम ॥ ८७ ॥

जयजय त्रिदोषशमना त्रिनेत्रा । जगदंकुरकंदा पंचवक्त्रा । अज अजिता पयःफेनगात्रा । जन्मयात्रा चुकवी कां ॥ ८८ ॥

अनादिसिद्धा अपरिमिता । मायाचक्रचालका सद्गुणभरिता । विश्वव्यापका गुणातीता । धांव आता जगदगुरो ॥ ८९ ॥

ऐसा धांवा करिता सुमती । तंव वनी सिंह व्याघ्र गर्जती । परम भयभीत होऊनि चित्ती । बाळासहित क्षिती पडे ॥ ९० ॥

श्रावणारितनये नेऊन । वनी सांडिले उर्वीगर्भरत्न । की वीरसेनस्नुषा घोर कानन । पतिवियोगे सेवी जैसे ॥ ९१ ॥

सुमतीची करुणा ऐकून । पशुपक्षी करिती रुदन । धरणी पडता मूर्च्छा येऊन । वृक्ष पक्षी छाया करिताती ॥ ९२ ॥

चंचु भरूनिया जळ । बाळावरी शिंपिती वेळोवेळ । एकी मधुर रस आणोनि स्नेहाळ । मुखी घालोनि तोषविती ॥ ९३ ॥

वनगाई स्वपुच्छेकरूनी । वारा घालिती रक्षिती रजनी । असो यावरी ते राजपत्नी । हिंडता अपूर्व वर्तले ॥ ९४ ॥

तो वृषभभार वणिक घेवोनी । पंथे जाता देखे नयनी । त्यांचिया संगेकरूनी । वैश्यनगरा पातली ॥ ९५ ॥

तेथील अधिपति वैश्य साचार । त्याचे नाव पद्माकर । परम सभाग्य उदार । रक्षक नाना वस्तूंचा ॥ ९६ ॥

तेणे सुमतीस वर्तमान । पुसिले तू कोठील कोण । तिणे जे वर्तले मुळीहून । श्रुत केले तयाते ॥ ९७ ॥

ते ऐकूनि पद्माकर । त्याचे अश्रुधारा स्रवती नेत्र । श्वासोच्छ्‍वास टाकूनि घोर । म्हणे गति थोर कर्माची ॥ ९८ ॥

वज्रबाहूची पट्टराणी । पतिव्रता अवनीची स्वामिणी । अनाथापरी हिंडे वनी । दीनवदन आली येथे ॥ ९९ ॥

मग पद्माकर म्हणे सुमती । तू माझी धर्मकन्या निश्चिती । शेजारी घर देऊनि अहोराती । परामर्श करी तियेचा ॥ १०० ॥

बहुत वैद्य आणून । देता झाला रसायन । केले बहुत प्रयत्न । परी व्याधि न राहेचि ॥ १०१ ॥

सुमती म्हणे ताता । श्रीशंकर वैद्य न होता । कवणासही हे व्यथा । बरी न होय कल्पांती ॥ १०२ ॥

असो पुढे व्यथा होता कठीण । गेला राजपुत्राचा प्राण । सुमती शोक करी दीनवदन । म्हणे रत्न गेले माझे ॥ १०३ ॥

पद्माकर शांतवी बहुता रीती । नगरजन मिळाले सभोवती । तो निशांती उगवला गभस्ती । तेवी शिवयोगी आला तेथे ॥ १०४ ॥

जैसे दुर्बळाचे सदन शोधीत । चिंतामणि ये अकस्मात । की क्षुधेने प्राण जात । तो क्षीराब्धि पुढे धाविन्नला ॥ १०५ ॥

पद्माकरे धरिले चरण । पूजिला दिव्यासनी बैसवून । त्यावरी सुमतीप्रति दिव्य निरूपण । शिवयोगीं सांगता झाला ॥ १०६ ॥

म्हणे वत्से सुमती ऐक । का हो रडसी करिसी शोक । तुझे पूर्वजन्मीचे पति पुत्र जनक । कोठे आहेत सांग पा ॥ १०७ ॥

आलीस चौर्‍याऐंशी लक्ष योनी फिरत । तेथीचे स्वजन सोयरे आप्त । आले कोठून गेले कोठे त्वरित । सांग मजपाशी वृत्तान्त हा ॥ १०८ ॥

तू नानायोनी फिरसी । पुढेही किती फेरे घेसी । कोणाचे पुत्र तू कां रडसी । पाहे मानसी विचारूनी ॥ १०९ ॥

शरीर धरावे ज्या ज्या वर्षी । त्या त्या कुळाभिमाने नाचती प्राणी । परी आपण उत्पन्न कोठूनी । ते विचारूनी न पाहती ॥ ११० ॥

त्वां पुत्र आणिला कोठून । कोण्या स्थळा गेला मृत्यु पावोन । तू आणि हे अवघे जन । जातील कोठे कवण्या देहा ॥ १११ ॥

आत्मा शिव शाश्वत । शरीर क्षणभंगुर नाशवंत । तरी तू शोक करिसी व्यर्थ । विचारूनि मनी पाहे पां ॥ ११२ ॥

आत्मा अविनाशी शाश्वत । तो नव्हे कोणाचा बंधु सुत । शरीराकारणे शोक करिसी व्यर्थ । तरी पडले प्रेत तुजपुढे ॥११३ ॥

जळी उठती तरंग अपार । सवेंचि फुटती क्षणभंगुर । मृगजळचि मिथ्या समग्र तरी बुडबुडे सत्य कैसेनी ॥ ११४ ॥

चित्रींच्या वृक्षच्छाये बैसला कोण । चित्राग्नीने कोणाचे जाळिले सदन । तेथे गंगा लिहिली सहित मीन । कोण वाहोनि गेला तेथे ॥ ११५ ॥

वंध्यासुते द्रव्य आणून । भीष्मकन्या मारुतीस देऊन । गंधर्वनगरींचे वर्‍हाडी आणून । लग्न कोणे लाविले ॥ ११६ ॥

वार्‍याचा मंडप शिवून । सिकतादोरे बांधिला आवळून । शुक्तिकारजताचे पात्र करून । खपुष्पे कोणी भरियेले ॥ ११७ ॥

कासवीचे घालूनि घृत । मृगजळीचे मीन पाजळती पोत । ते चरणी नुपूरे बांधोनि नाचत । जन्मांध पाहत बैसले ॥ ११८ ॥

अहिकर्णीची कुंडले हिरोनी । चित्रींचे चोर आले घेवोनि । हा प्रपंच लटिका मुळीहूनी । तो साच कैसा जाणावा ॥ ११९ ॥

मुळीच लटिके अशाश्वत । त्याचा शोक करणे व्यर्थ । क्लेशतरूचे उद्यान समस्त । शरीर हे उद्भवले ॥ १२० ॥

सकळ रोगांचे भांडार । कृमिकीटकांचे माहेर । की पापाचा समुद्र । की अंबर भ्रांतीचे ॥ १२१ ॥

मूत्र श्लेष्म मांस रक्त । अस्थींची मोळी चर्मवेष्टित । मातेचा विटाळ पितृरेत । अपवित्र असत्य मुळीच हे ॥ १२२ ॥

ऐसे हे शरीर अपवित्र । ते पशुमूत्रे झाले पवित्र । क्षुरे मूर्धज छेदिले समग्र । इतुकेनि पावन केवि होय ॥ १२३ ॥

शरण न जाती देशिकाप्रती । तरी कैसेनि प्राणी तरती । कल्पकोटी फेरे घेती । मुक्त होती कधी हे ॥ १२४ ॥

सुमती तू सांगे सत्वर । तुझे जन्मोजन्मीचे कोठे आहेत भ्रतार । अवघा हा मायापूर । सावध सत्वर होई का ॥ १२५ ॥

जयाचे हे सकळ लेणे । मागतां देतां लाजिरवाणे । तनुघर बांधिले त्रिगुणे । पांच वांसे आणोनिया ॥ १२६ ॥

याचा भरवसा नाही जाण । केधवा लागेल न कळे अग्न । की हे झाले वस्त्र जीर्ण । ऋणानुबंध तंव तगे ॥ १२७ ॥

मिथ्या जैसे मृगजळ । की स्वप्नीचे राज्य ढिसाळ । अहा प्राणी पापी सकळ । धन धान्य पुत्र इच्छिती ॥ १२८ ॥

गंगेमाजी काष्ठे मिळती । एकवट होती मागुती विघडती । तैसी स्त्रीपुरुष बोलिजेती । खेळ मुळीच असत्य हा ॥ १२९ ॥

वृक्षावरी पक्षी येती । किती एक बैसती किती एक जाती । आणिक्या तरूवरी बैसती । अपत्ये तैसी जाण पां ॥ १३० ॥

पथिक वृक्षातळी बैसत । उष्ण सरलिया उठून जात । सोयरे बंधु आप्त । तैसेच जाण निर्धार ॥ ३१ ॥

मायामय प्रपंचवृक्षी । जीव शिव बैसले दोन पक्षी । शिव सावधान सर्वसाक्षी । जीव भक्षी विषयफळे ॥ १३२ ॥

ती भक्षितांच भुलोनि गेला । आपण आपणासी विसरला । ऐसा अपरिमित जीव भ्रमला । जन्ममरण भोगीतसे ॥ १३३ ॥

त्यांमाजी एकादा पुण्यवंत । सद्‌गुरूसी शरण रिघत । मग तो शिव होवोनि भजत । शिवालागी अत्यादरे ॥ १३४ ॥

ऐसे ऐकता दिव्य निरूपण । पद्माकर सुमती उठोन । अष्टभावे दाटोन । वंदिती चरण तयाचे ॥ १३५ ॥

म्हणती येवढे तुझे ज्ञान । काय एक न करिसी इच्छेकरून । तू साक्षात उमारमण । भक्तरक्षणा धावलासी ॥ १३६ ॥

मग मृत्युंजयमंत्र राजयोगी । सुमतीस सांगे शिवयोगी । मंचूनि भस्म लाविता अंगी । व्यथारहित जाहली ते ॥ १३७ ॥

रंभाउर्वशीहूनि वहिले । दिव्य शरीर तिचे झाले । मृत्युंजयमंत्रे भस्म चर्चिले । बाळ उठले तत्काळ ॥ १३८ ॥

व्रणव्यथा जावोनि सकळ । बत्तीसलक्षणी झाला बाळ । मग शिवध्यान उपासना निर्मळ । सुमतीबाळ उपदेशिले ॥ १३९ ॥

परीस झगटतां पूर्ण । लोह तत्काळ होय सुवर्ण । तैसी दोघे दिव्यरूप जाण । होती झाली ते काळी ॥ १४० ॥

आश्चर्य करी पद्माकर । म्हणे धन्यधन्य गुरुमंत्र । काळ-मृत्युभय अपार । त्यापासून रक्षी गुरुनाथ ॥ १४१ ॥

गुरुचरणी रत होती सदा । त्यांसी कैंची भवभयआपदा । धनधान्यांसी नाही मर्यादा । भेद खेदा वारिले ॥ १४२ ॥

बाळ चरणांवरी घालोनी । सुमती लागे सप्रेम चरणी । म्हणे सद्गुरु तुजवरूनी । शरीर सांडणे हे माझे ॥ १४३ ॥

या शरीराच्या पादुका करून । तुझीया दिव्यचरणी लेववीन । तरी मी नव्हे उत्तीर्ण । उपकार तुझे गुरुमूर्ति ॥ १४४ ॥

मग शिवयोगी बोलत । आयुरारोग्य ऐश्वर्य अद्भुत । तुझिया पुत्रासी होईल प्राप्त । राज्य पृथ्वीचे करील हा ॥ १४५ ॥

त्रिभुवनभरी होईल कीर्ती । निजराज्य पावेल पुढती । भद्रायु नाम निश्चिती । याचे ठेविले मी जाण ॥ १४६ ॥

थोर होय भद्रायु बाळ । तंववरी क्रमी येथेचि काळ । मृत्युंजयमंत्र जप त्रिकाळ । निष्ठा धरूनि करीत जा ॥ १४७ ॥

हा राजपुत्र निश्चित । लोकांत प्रकटो नेदी मात । हा होईल विद्यावंत । चतुःषष्टिकळाप्रवीण ॥ १४८ ॥

ऐसे शिवयोगी बोलोन । पावला तेथेचि अंतर्धान । गुरुपदांबुज आठवून । सुमति सद्‌गद क्षणक्षणां ॥ १४९ ॥

पद्माकरासी सुख अत्यंत । सुनय पुत्राहूनि बहुत । भद्रायू त्यासी आवडत । सदा पुरवीत लाड त्याचा ॥ १५० ॥

पद्माकरे आपुली संपत्ती वेचून । दोघांचे केले मेखलाबंधन । दोघांसी भूषणे समान । केले संपन्न वेदशास्त्री ॥ १५१ ॥

द्वादश वर्षांचा झाला बाळ । धीर गंभीर परम सुशीळ । मातेच्या सेवेसी सदाकाळ । जवळी तिष्ठत सादर ॥ १५२ ॥

पदरी पूर्वसुकृताचे पर्वत । शिवयोगी प्रकटला अकस्मात । सुमती भद्रायु धांवत । पाय झाडीती मुक्तकेशी ॥ १५३ ॥

नयनोदके चरणक्षालन । केशवसने पुसिले पूर्ण । जे सुगंधभरित जाण । स्नेह तेचि लाविले ॥ १५४ ॥

वारंवार करिती प्रदक्षिणा । दाटती अष्टभावेकरून । षोडशोपचारी पूजन सोहळा करिती अपार ॥ १५५ ॥

स्तवन करीतसे तेव्हा सुमती । तुझिया प्रसादेकरून मी पुत्रवंती । यावरी भद्रायूसी नीती । शिवयोगी शिकवितसे ॥ १५६ ॥

श्रुतिस्मृतिपुराणोक्त पाही । धर्मनीती वर्तत जाई । मातापितागुरुपायी । निष्ठा असो दे सर्वदा ॥ १५७ ॥

गोभूदेवप्रजापाळण । सर्वाभूती पहावा उमारमण । वर्णाश्रमस्वधर्माचरण । सहसाही न सांडावे ॥ १५८ ॥

विचार केल्यावाचूनिया । सहसा न करावी आन क्रिया । मागे पुढे पाहोनिया । शब्द बोलावा कुशलत्वे ॥ ५९ ॥

काळ कोण मित्र किती । कोणी द्वेषी शत्रु किती । आय काय खर्च किती । पाहावे चित्ती विचारूनिया ॥ १६० ॥

माझे बळ किती काय शक्ती । आपुले सेवक कैसे वर्तती । यश की अपयश देती । पहावे चित्ती विचारूनी ॥ १६१ ॥

अतिथी देव मित्र । स्वामी वेद अग्निहोत्र । पशु कृषि धन विद्या सर्वत्र । घ्यावा समाचार क्षणक्षणां ॥ १६२ ॥

लेकरू भार्या अरि दास । सदन गृहवार्ता रोगविशेष । येथे उपेक्षा करिता निःशेष । हानि क्षणात होत पै ॥ १६३ ॥

ज्या पंथे गेले विद्वज्जन । आपण जावे तोचि पंथ लक्षून । माता-पिता-यतिनिंदा जाण । प्राणांतीही न करावी ॥ १६४ ॥

वैश्वदेवसमयी अतिथी । आलिया त्यासी न पुसावी याती । अन्न वस्त्र सर्वांभूती । द्यावे प्रीत्यर्थ शिवाचिया ॥ १६५ ॥

परोपकार करावा पूर्ण । परपीडा न करावी जाण । करावे गोब्राह्मणरक्षण । सत्य सुजाण म्हणती तया ॥ १६६ ॥

निंदा वाद टाकोन । सर्वदा कीजे शिवस्मरण । तेच म्हणावे मौन । शिवसेवन तप थोर ॥ १६७ ॥

परदारा आणि परधन । हे न पहावे जेवी वमन । करावे शास्त्रश्रवण । शिवपूजन यथाविधी ॥ १६८ ॥

स्नान होम जपाध्ययन । पंचयज्ञ गोविप्रसेवन । श्रवण मनन निजध्यास पूर्ण । अनालस्ये करावी ॥ १६९ ॥

सुरत निद्रा भोजन । येथे असावे प्रमाण । दान सत्कर्म अभ्यास श्रवण । आळस येथे न करावा ॥ १७० ॥

काम पूर्ण धर्मपत्नीसी । निषिद्ध जाण परयोषितेसी । क्रोधे दंडावे शत्रूसी । साधुविप्रांसी नमिजे सदा ॥ १७१ ॥

द्वेषियांसी धरावा मद । संतभक्तांसी नम्रता अभेद । संसाररिपूसी मत्सर प्रसिद्ध । असावे निर्मत्सर सर्वांभूती ॥ १७२ ॥

दुर्जनासी दंभ दाविजे । भल्याचे पदरज वंदिजे । अहंकारे पृथ्वी जिंकिजे । निरहंकार द्विजासी ॥ १७३ ॥

वाचा सावध शिवस्मरणी । पाणी सार्थक दानेकरूनी । पाद पावन देवालययात्रागमनी । नित्य शिवध्यानी बैसावे ॥ १७४ ॥

पुराणश्रवणी श्रोत्र सादर । त्वचा संतआलिंगनीं पवित्र । सार्थक शिवध्यानी नेत्र । जिव्हेने स्तोत्र वर्णावे ॥ १७५ ॥

शिवनिर्माल्यवास घेईजे घ्राणी । ये रीती इंद्रिये लावावी भजनी । दीन अनाथ अज्ञान देखोनी । तयावरी कृपा कीजे ॥ १७६ ॥

ईश्वरी प्रेम संतांसी मैत्री । देवांचे द्वेषी त्यांची उपेक्षा करी । युक्तनिद्रा युक्ताहारी । मृगया करी परम नीतीने ॥ १७७ ॥

अतिविद्या अतिमैत्री । अतिपुण्य अतिस्मृती । उत्साह धैर्य दान धृती । वर्धमान असावी ॥ १७८ ॥

आपुले वित्त आयुष्य गृहच्छिद्र । मैथुन औषध सुकृत मंत्र । दान मान अपमान ही सर्वत्र । गुप्त असावी जाणिजे ॥ १७९ ॥

नष्ट पाखंडी शठ धूर्त । पिशुन तस्कर जार पतित । चंचळ कपटी नास्तिक अनृत । ग्राम्य सभेसी नसावे ॥ १८० ॥

निंदक शिवभक्तिउच्छेदक । मद्यपानी गुरुतल्पक । मार्गपाडक कृतघ्न धर्मलोपक । त्यांचे दर्शन न व्हावे ॥ १८१ ॥

दारा धन आणि पुत्र । यांसी आसक्त नसावे अणुमात्र । अलिप्तपणे संसार । करोनि आसक्त असावे ॥ १८२ ॥

बंधु सोयरे श्वशुर स्वजन । यांसी स्नेह असावा साधारण । भलता विषय देखोन । आसक्ती तेथे न करावी ॥ १८३ ॥

करावे रुद्राक्षधारण । मस्तकी कंठी दंडी करभूषण । गेलिया प्राण शिवपूजन । सर्वथाही न सांडावे ॥ १८४ ॥

शिवकवच सर्वांगी । लेऊं शिकवी शिवयोगी । भस्म चर्चिता रणरंगी । शस्त्रास्त्रबाधा न होय ॥ १८५ ॥

काळमृत्युभयापासून । रक्षी मृत्युंजयऔपासन । आततायी मार्गघ्न ब्रह्मघ्न । यांसी जीवे मारावे ॥ १८६ ॥

सोमवार व्रत शिवरात्र प्रदोष । विधियुक्त आचरावे विशेष । शिवहरिकीर्तन निर्दोष । सर्व सांडूनि ऐकावे ॥ १८७ ॥

महापर्व कुयोग श्राद्धदिनीं । व्यतीपात वैधृति संक्रमणी । न प्रवर्तावे मैथुनी । ग्रहणी भोजन न करावे ॥ १८८ ॥

सत्पात्री देतां दान । होय ऐश्वर्य वर्धमान । अपात्री दाने दारिद्र्य पूर्ण । शास्त्रप्रमाण जाणिजे ॥ १८९ ॥

वेद शास्त्र पुराण कीर्तन । गुरुब्राह्मणमुखे करावे श्रवण । दान दिधल्याचे पाळण । करिता पुण्य त्रिगुण होय ॥ १९० ॥

अपूज्याचे पूजन । पूज्य त्याचा अपमान । तेथे भय दुर्भिक्ष मरण । होते जाण विचारे ॥ १९१ ॥

महाडोही उडी घालणे । महापुरुषासी विग्रह करणे । बलवंतासी स्पर्धा बांधणे ही द्वारे अनर्थाची ॥ १९२ ॥

दाने शोभे सदा हस्त । कंकण मुद्रिका भार समस्त । श्रवणी कुंडले काय व्यर्थ । श्रवणसार्थक श्रवणेचि ॥ १९३ ॥

ज्याची वाचा रसवंती । भार्या रूपवती सती । औदार्य गुणसंपत्ती । सफल जीवित्व तयाचे ॥ १९४ ॥

देईन अथवा नाही सत्य । हे वाचेसी असावे व्रत । विद्यापात्रे येती अमित । सद्यः दान त्यां दीजे ॥ १९५ ॥

विपत्तिकाळी धैर्य धरी । वादी जयवंत वैखरी । युद्धामाजी पराक्रम करी । याचकांसी पृष्ठी न दाविजे ॥ १९६ ॥

ब्राह्मणमित्रपुत्रांसमवेत । तेचि भोजन उत्तम यथार्थ । गजतुरंगांसहित पंथ । चालणे तेचि श्रेष्ठ होय ॥ १९७ ॥

ज्या लिंगाचे नाही पूजन । तेथे साक्षेपे पूजा करावी जाऊन । अनाथप्रेतसंस्कार जाण । करणे त्या पुण्यासी पार नाही ॥ १९८ ॥

ब्रह्मद्वेषाएवढे विशेष । मारक नाही कदा विष । सत्समागम रात्रंदिवस । तुच्छ सुधारस त्यापुढे ॥ १९९ ॥

प्रतापे न व्हावे संतप्त । परसौख्ये हर्षभरित । सद्वार्ता ऐकता सुख अत्यंत । तोचि भक्त शिवाचा ॥ २०० ॥

पाषाण नाम रत्ने व्यर्थ । चार रत्ने आहेत पृथ्वीत । अन्न उदक सुभाषित । औदार्य रत्न चौथे पैं ॥ २०१ ॥

वर्म कोणाचे न बोलावे । सद्‌भक्तांचे आशीर्वाद घ्यावे । भाग्याभाग्य येत स्वभावे । स्वधर्मध्रुव न ढळावा ॥ २०२ ॥

पूर्वविरोधी विशेष । त्याचा न धरावा विश्वास । गर्भिणी पाळी गर्भास । तेवी प्रजा पाळी का ॥ २०३ ॥

गुरु आणि सदाशिव । यांसी न करावा भेदभाव । भाग्यविद्यागर्व सर्व । सोडोनि द्यावा जाण पां ॥ २०४ ॥

नराची शोभा स्वरूप पूर्ण । स्वरूपाचे सद्गुण आभरण । गुणांचे अलंकार ज्ञान । ज्ञानाचे भूषण क्षमा शांति ॥ २०५ ॥

कुल शील विद्या धन । राज्य तप रूप यौवन । या अष्टमदेकरून । मन भुलो न द्यावे ॥ १०६ ॥

ऐसा नानापरी शिवयोगी । बोधिता झाला भद्रायूलागी । हे नीति ऐकतां जगी । साकडे न पडे सर्वथा ॥ २०७ ॥

सातवा अध्याय गिरी कैलास । यावरी वास्तव्य करी उमाविलास । पारायण प्रदक्षिणा करिती विशेष । निर्दोष यश जोडे तयां ॥२०८ ॥

की हा अध्याय हिमाचळ । भक्तिभवानी कन्या वेल्हाळ । तिस वरोनी पय:फेनधवल । श्वशुरगृही राहिला ॥ २०९ ॥

पुढिले अध्यायी कथा सुरस । शिवयोगी दया करील भद्रायूस । ब्रह्मानंद निशिदिवस । श्रवण करोत विद्वज्जन ॥ २१० ॥

भवगजविदारक मृगेंद्र । श्रीधरवरद आनंदसमुद्र । तो शिव ब्रह्मानंद यतींद्र । जो जगद्गुरू जगदात्मा ॥ २११ ॥

शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड । परिसोत सज्जन अखंड । सप्तमाध्याय गोड हा ॥ २१२ ॥

॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

shri shiv leelamrut adhyay 7 shiv lilamrut