Skip to main content

जातां पंढरीस सुख वाटे

जातां पंढरीस सुख वाटे जीवा । आनंदे केशवा भेटतांचि ॥१॥

या सुखाची उपमा नाहीं त्रिभुवनीं । पाहिली शोधोनी अवघी तीर्थे ॥२॥

ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार । ऐसे वैष्णव दिगंबर दावा कोठें ॥३॥

ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलिक । ऐसा वेणुनादीं कान्हा दावा ॥४॥

ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर । ऐसें पाहतां निर्धार नाही कोठें ॥५॥

सेना ह्मणे खूण सांगितली संती । या परती विश्रांती न मिळे जीवा ॥६॥

jata pandharisi abhang