Skip to main content

श्री खंडोबाची आरती

पंचानन हयवाहन सुरभूषितनीळा

पंचानन हयवाहन सुरभूषितनीळा ।
खंडामंडित दंडित दानव अवलीळा ॥
मणिमल्ल मर्दुनियां जों धूसुर पिवळा ।
हिरे कंकण बासिंगे सुमनांच्या माळा ॥ १ ॥

जय देव जय देव जय शिव मल्हारी ।
वारीं दुर्जनअसुरा भवदुस्तर तारी ॥ धृ. ॥

सुरवरसंवर वर दे मजलामी देवा ।
नाना नामे गाइन ही तुमची सेवा ॥
अघटित गुण गावया वाटतसे हेवा ।
फणिवर शिणला किती नर पामर केवा ॥ २ ॥

रघुवीरस्मरणी शंकर ह्रुदयीं निवाला ।
तो हा मल्लांतक अवतार झाला ॥
यालागीं आवडे भाव वर्णीला ।
रामी रामदासा जिवलग भेटला ॥ जय देव.॥ ३ ॥

khandoba aarati, panchanan haivan

मस्तकि मुगुट अंगी सोन्याचा शेला ।

मस्तकि मुगुट अंगी सोन्याचा शेला ।
हस्तकि खड्गा घेउनी मारिसी मणिमल्ला ।।
कैलासाची प्रतिमा जेजुरीचा किल्ला ।
बैसोनिया रक्षिसी दक्षिणचा जिल्हा ।।१।।

जयदेव जयदेव जय खंडेराया ।
अखंड भंडार रानें डवडवली काया ।।धृ ।।

चंपाषष्ठीचा जे करिती कुळधर्म ।
त्यांचे होत आहे परिपूर्णधर्म ।।
ज्यांनान कळे तुझ्या भक्तीचे वर्म ।
त्यांचे तोडीत आहे कळीकाळ चर्म ।।२।।

जयदेव जयदेव जय खंडेराया ।
अखंड भंडार रानें डवडवली काया ।।धृ ।।

तुझे भक्तीविन्मुख जे ते कौरव ।
जिकडे तुझा धर्म तिकडे गौरव ।।
मध्वनाथ जपतो येळकोट भैरव ।
निंदा करिती त्यांना होती रौरव ।।३।।

जयदेव जयदेव जय खंडेराया ।
अखंड भंडारानें डवडवली काया ।।धृ ।।

khandoba aarati, mastaki mugut angi sonyacha shela