श्री चंद्राची आरती
जय देव जय श्रीशशिनाथा
जय देव जय देव जय श्रीशशिनाथा । आरती ओवाळू पदि ठेउनि माथा ॥ ध्रु० ॥
उदयी तुझ्या हृदयी शीतलता उपजे । हेलावुनि क्षीराब्धी आनंदे गर्जे ॥ विकसित कुमुदिनि देखुनि मन ते बहु रंजे । चकोर नृत्य करिती सुख अद्भुत माजे ॥ जय० ॥ १ ॥
विशेष महिमा तुझा न कळे कोणासी । त्रिभुवनि द्वादशराशी व्यापुनि आहेसी ॥ नवही ग्रहांमध्ये उत्तम तूम होसी । तुझे बल वांछिती सकळहि कार्यासी ॥ जय० ॥ २ ॥
शंकरगणनाथादिक भूषण मिरवीती । भाळी मौळी तुजला संतोषे धरिती ॥ संकटनामचतुर्थीस पूजन जे करिती । संतति संपद पावुनि भवसागर तरती ॥ जय० ॥ ३ ॥
केवळ अमृतरूप अनुपम्य वळसी । स्थावर जंगम यांचे जीवन आहेसी ॥ प्रकाश अवलोकिता मन हे उल्हासी । प्रसन्न होउनि आता लावी निजकासी ॥ जय० ॥ ४ ॥
सिंधूतनया इंदू बंधु श्रीयेचा । सुकीर्तिदायक नायक उडुगण जो यांचा ॥ कुरंगवाहनचंद्रा अनुचित हे वाचा । गोसावीसुत विनवी वर दे मज साचा ॥ जय० ॥ ५ ॥
chandrachi aarati, jai dev jai dev jai shashinatha